Vistara Air India: 3 सप्टेंबरपासून विस्ताराचे बुकिंग बंद, 12 नोव्हेंबरपासून एअर इंडियाद्वारे सेवा सुरु होणार
विस्तारा (Vistara) या ब्रँड नावाने ओळखल्या जाणाऱ्या टाटा एसआयए एअरलाइन्स लिमिटेडने एअर इंडियामध्ये विलीन होण्याची घोषणा केली. त्यामुळं 3 सप्टेंबरपासून ग्राहकांना विस्ताराची बुकिंग करता येणार नाही.
Vistara Air India News : विस्तारा (Vistara) या ब्रँड नावाने ओळखल्या जाणाऱ्या टाटा एसआयए एअरलाइन्स लिमिटेड एअर इंडियामध्ये विलीन झाली आहे. त्यामुळं आता 3 सप्टेंबरपासून विस्ताराची बुकींग बंद (Vistara bookings closed) करण्यात आली आहे. कंपनीने एका निवेदनात याबाबतची माहिती दिली आहे. 3 सप्टेंबरपासून ग्राहक 12 नोव्हेंबर किंवा त्यानंतर प्रवासासाठी विस्तारासोबत बुकिंग करू शकणार नाहीत. विस्तारा 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत बुकिंग घेणे आणि फ्लाइट चालवणे सुरु ठेवणार आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता विस्तारा विमाने एअर इंडियाद्वारे चालविली जाणार आहेत. या विमानांद्वारे चालवल्या जाणाऱ्या मार्गांचे बुकिंग एअर इंडियाच्या वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल. या संक्रमण काळात, विस्तारा आणि एअर इंडिया दोन्ही प्रत्येक पायरीवर सर्व ग्राहकांना आवश्यक समर्थन, सतत संवाद आणि सुविधा सुनिश्चित करतील. विस्ताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कन्नन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षात आमच्या सर्व ग्राहकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत.
विलीनीकरणाची घोषणा नोव्हेंबर 2022 मध्ये झाली होती
या प्रस्तावित विलीनीकरणाची घोषणा नोव्हेंबर 2022 मध्ये करण्यात आली. एअर इंडिया टाटा समूहाच्या मालकीची आहे. तर विस्तारा ही टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्समधील 51:49 चा संयुक्त उपक्रम आहे. सध्या टाटा समूहाचा विस्तारामध्ये 51 टक्के आणि सिंगापूर एअरलाइन्सचा 49 टक्के हिस्सा आहे.सिंगापूर एअरलाइन्सने एअर इंडियामध्ये विस्ताराचे प्रस्तावित विलीनीकरणाचा एक भाग म्हणून थेट विदेशी गुंतवणुकीसाठी भारत सरकारकडून मंजुरी मिळवली आहे, असे सिंगापूर एअरलाइन्सने शुक्रवारी सिंगापूर शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
प्रस्तावित विलीनीकरण 2024 च्या अखेरीस पूर्ण होणार
एअरलाइन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, विलीनीकरण पूर्ण करणे संबंधित पक्षांद्वारे लागू भारतीय कायद्यांचे पालन करण्याच्या अधीन आहे. येत्या काही महिन्यांत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या माहितीनुसार, प्रस्तावित विलीनीकरण 2024 च्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या विलीनीकरणाला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने जूनमध्ये मान्यता दिली होती. त्यानंतर आता 3 सप्टेंबरपासून विस्ताराची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 नोव्हेंबरपासून विस्ताराची सेवा पूर्णपण बंद होणार आहे. त्यानंतर 12 नोव्हेंबरपासून एअर इंडियाद्वारे सेवा सुरु होणार आहे. दरम्यान, विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये 25.1 टक्के हिस्सा मिळेल. या करारानंतर एअर इंडिया जगातील सर्वात मोठ्या एअरलाइन समूहांपैकी एक होईल.
महत्वाच्या बातम्या: