(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharati Airtel Share Price : भारती एअरटेलच्या शेअर दरात मोठी घसरण; 'ही' भीती ठरली कारणीभूत!
Bharati Airtel Share Price : भारती एअरटेलमध्ये आज शेअर विक्रीचा सपाटा दिसून आला. भारती एअरटेलच्या शेअर दरात 5 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.
Bharati Airtel Share Price : आज भारती एअरटेलच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. गुंतवणूकदारांकडून भारती एअरटेलच्या शेअर्सच्या विक्रीचा सपाटा सुरू होता. यामुळे आज भारती एअरटेलचा शेअर दर जवळपास पाच टक्क्यांनी घसरला. अदानी समूह टेलिकॉम क्षेत्रात उतरत असल्याच्या वृत्ताने विक्रीचा सपाटा सुरू झाला असल्याचे म्हटले जात आहे. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये भारती एअरटेल 695 रुपयांवर स्थिरावला होता. मात्र, सोमवारी शेअरने 658.95 रुपयांचा नीचांक गाठला होता. दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास 660 रुपयांच्या आसपास शेअर ट्रेड करत होता. तर, बाजार बंद झाला तेव्हा 659.55 रुपयांवर शेअर दर स्थिरावला.
अदानी समूहाची धास्ती?
अदानी समूह 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावात सहभाग घेणार असल्याचे वृत्त समोरल आल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. अदानी समूहाने टेलिकॉम क्षेत्रात एन्ट्री केल्यास पुन्हा एकदा टॅरिफ वॉर (Tariff War) सुरू होण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ टेलिकॉम क्षेत्रात उतरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ वॉर सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर आज भारती एअरटेलमध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला.
रिलायन्सच्या शेअर दरात 0.58 टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, दुसरीकडे व्होडाफोन आयडियाच्या शेअर दरात तेजी असल्याचे दिसून आले. व्होडाफोन आयडियामध्ये 3.57 टक्क्यांची तेजी दिसून आली.
अदानी समूहाचे स्पष्टीकरण
26 जुलै 2022 पासून 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू होणार आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया या कंपन्या लिलावात सहभागी होणार आहे. अदानी समूह एन्ट्री घेणार असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर टेलिकॉम क्षेत्रात मोठी चर्चा झडली. अदानी समूहाने यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, अदानी समूह सामान्य ग्राहकांसाठी मोबाइल क्षेत्रात उतरणार नाही. तर, Private Network Solution प्रदान करणार आहे. स्पेक्ट्रमचा वापर विमानतळापासून अदानी समूहाच्या अंतर्गत असलेली बंदरे, पॉवर ट्रान्समिशनसाठी सायबर सुरक्षा देण्यासाठी आणि आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक खासगी नेटवर्क म्हणून करणार असल्याचे अदानी समूहाने स्पष्ट केले.
मोठ्या रक्कमेवर लिलाव होण्याची शक्यता
रिलायन्स जिओच्या एन्ट्रीनंतर भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांचे ग्राहक जिओकडे वळले. त्याच्या परिणामी व्होडाफोन आयडियावर आर्थिक संकट ओढावले. त्यामुळे सरकारला बेलआउट पॅकेजची घोषणा करावी लागली होती. आता, 5-जी स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी मोठी बोली लावली जाण्याची शक्यता आहे.