झिरो टू हिरो! जूनियर इंजीनियर म्हणून सुरुवात; आज दोन लाख कोटींच्या कंपनीचा प्रमुख; वाचा AM नाईकांचा प्रवास
अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनी L&T च्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. अनेक दशकांपासून लाखो कोटी रुपयांची ही कंपनी सांभाळणारे ए.एम.नाईक (AM Naik) आता निवृत्त झाले आहेत.
AM Naik Steps Down: भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपनी L&T च्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. अनेक दशकांपासून लाखो कोटी रुपयांची ही कंपनी सांभाळणारे ए.एम.नाईक (AM Naik) आता निवृत्त झाले आहेत. आता त्यांची जागा एस एन सुब्रमण्यन घेणार आहेत. केवळ L&T मधीलच नाही तर भारतीय कॉर्पोरेट जगतातील एक मोठा अध्याय बंद झाला आहे.
एएम नाईक यांचे पूर्ण नाव अनिल कुमार मणिभाई नाईक आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील अग्रगण्य उद्योजकांमध्ये त्यांची गणना होते. 81 वर्षीय नाईक हे त्यांच्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत अनेक नेत्रदीपक यशाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली L&T या जगभरातील बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीची स्थापना झाली. आता नाईक यांची कारकीर्द संपुष्टात आली आहे. L&T चे व्यवसायातील साम्राज्य हे 1,91,300 कोटी रुपयांचे आहे.
L&T चा 6 दशकांचा संबंध
ए.एम. नाईक यांचा हा प्रवासही विलक्षण ठरतो कारण त्यांनी अगदी सामान्य स्थितीतून सुरुवात केली. नाईक यांनी त्यांच्या 8 दशकांच्या आयुष्यातील 6 दशके ही L&T या कंपनीसोबत घालवली आहेत. त्यापैकी जवळपास 2 दशके कंपनीचे नेतृत्व करण्यात घालवली आहेत.
कशी झाली कंपनीची प्रगती
L&T च्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, नाईक यांनी 1965 मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कंपनीत आपल्या करिअरची सुरुवात केली. हळूहळू ते महाव्यवस्थापक ते व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशी शिडी चढत गेले. 29 डिसेंबर 2003 रोजी त्यांना L&T चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले. 2012 ते 2017 पर्यंत ते L&T चे समूह कार्यकारी अध्यक्ष होते. ऑक्टोबर 2017 मध्ये, त्यांनी स्वतःला कार्यकारी जबाबदारीपासून दूर केले आणि त्यांना गटाचे अध्यक्ष बनवले.
आता सामाजिक कार्यावर लक्ष
आता नाईक यांनी कॉर्पोरेट जीवनाचा निरोप घेतला आहे. आता त्यांचे लक्ष सीएसआर उपक्रमांसह समाजकल्याणाच्या कामांवर असणार आहे. कर्मचारी ट्रस्टच्या अध्यक्षपदीही ते कायम राहणार आहेत. आता ते गेल्या काही वर्षांत सुरु केलेले सामाजिक उपक्रम पुढे नेण्यावर भर देणार आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी उपेक्षित लोकांना शिक्षण आणि कौशल्ये देण्यासाठी नाईक चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केला. त्याचप्रमाणे कमी दरात विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट सुरू केले आहे.
स्वदेशीला चालना देण्याचं काम
संरक्षणाच्या बाबतीत स्वदेशीला चालना देण्याचे सर्वात मोठे श्रेय ए.एम. नाईक यांना जाते. स्वावलंबी भारतासाठी ते प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली L&T ने केवळ संरक्षण क्षेत्रातच प्रवेश केला नाही, तर आज लष्कराला अनेक महत्त्वाची उपकरणे तयार करुन पुरवली जात आहेत. सध्या, L&T हे संशोधन आणि विकासापासून उत्पादनापर्यंत संरक्षण क्षेत्रातील एक प्रमुख नाव आहे. ही कंपनी क्षेपणास्त्रांसह अनेक शस्त्रे बनवत आहे. अवकाश क्षेत्रातही L&T हे मोठे नाव आहे. या सगळ्याचे श्रेय नाईक यांना
जाते.
सरकारकडून नाईक यांचा अनेकवेळा सन्मान
नाईक यांच्या कर्तृत्वाला परिचयाची किंवा ओळखीची गरज नाही. त्यांच्या या योगदानाचे सरकारने अनेकदा कौतुक केले आहे. मोदी सरकारने नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सुरू केले तेव्हा नाईक यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नोव्हेंबर 2018 ते एप्रिल 2022 पर्यंत ते NSDC चे अध्यक्ष होते. आयआयएम अहमदाबादसह अनेक आघाडीच्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांच्या बोर्डाचा तो भाग आहे. त्यांच्या योगदानामुळे गुजरात सरकारने त्यांना 2009 मध्ये गुजरात गरिमा पुरस्काराने सन्मानित केले. त्यांना 2009 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता, तर 2019 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या: