Go First पाठोपाठ आणखी एक एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर; प्रकरण नेमकं काय?
Airline Crisis: गो फर्स्ट (Go First) एअरलाईन्सच्या संकटामुळे सध्या भारतीय विमान वाहतूक उद्योगासमोर गंभीर आव्हानं आहेत. अशातच आता या एपिसोडमध्ये आणखी एका एअरलाईन्सचं नाव जोडलं गेलं आहे.
Airline Crisis: गो फर्स्ट (GO First) पाठोपाठ आणखी एक विमान कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. देशातील आणखी एका विमान कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रियेची सुनावणी होणार असून ती कंपनी म्हणजे, स्पाईसजेट (Spicejet). नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) पुढील आठवड्यात स्पाईसजेट कंपनीच्या कर्जदात्यानं दाखल केलेल्या दिवाळखोरीच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. स्पाईसजेटविरोधातील दिवाळखोरीच्या याचिकेवर एनसीएलटीमध्ये 8 मे रोजी सुनावणी होणार आहे.
स्पाईसजेटच्या विरोधात NCLT समोर अर्ज कोणी दाखल केला?
लो कॉस्ट एअरलाईन्स सेवा देणारी विमान कंपनी स्पाईसजेटला कर्ज देणारी कंपनी एअरक्राफ्ट लेसर एअरकॅसल (आयर्लंड) लिमिटेडनं दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी NCLT कडे अर्ज दाखल केला आहे. 28 एप्रिल रोजी हा अर्ज दाखल करण्यात आला होता. एनसीएलटीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, न्यायाधिकरणाचं मुख्य खंडपीठ या अर्जावर 8 मे रोजी सुनावणी करणार आहे.
GoFirst नं स्वतःहून दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी अर्ज दाखल केलाय
यापूर्वी, GoFirst या वाडिया समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीनं स्वतः दिवाळखोरी निवारण प्रक्रिया सुरू करण्यासाठी NCLT कडे अर्ज दाखल केला होता. आर्थिक संकटात सापडल्यानंतर GoFirst नं हा अर्ज दाखल केला आहे, ज्यावर सुनावणी घेतल्यानंतर NCLT नं आपला निर्णय राखून ठेवला आहे.
स्पाइसजेटचे प्रवक्ते काय म्हणाले?
दिवाळखोरीसाठी अर्ज केल्यावर, स्पाईसजेटच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, "या घटनाक्रमाचा एअरलाईन्सच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. एका निवेदनात प्रवक्त्यानं आशा व्यक्त केली की, हा मुद्दा न्यायालयाबाहेर सोडवला जाईल. यासोबतच ते म्हणाले की, सध्या या कर्जदात्याचं कोणतंही विमान एअरलाईन्सच्या ताफ्यात समाविष्ट नाही. या विमान लीजिंग फर्मची सर्व विमानं आधीच परत केली गेली आहेत."
आणखी दोन याचिकाही प्रलंबित
दरम्यान, एनसीएलटीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, स्पाईसजेट विरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करण्याशी संबंधित दोन अन्य याचिका प्रलंबित आहेत. दिवाळखोरीचा अर्ज विलिस लीज फायनान्स कॉर्पोरेशननं 12 एप्रिल रोजी दाखल केला होता, तर एकर्स बिल्डवेल प्रायव्हेट लिमिटेडनं 4 फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही याचिकांबाबत स्पाईसजेटकडून तातडीनं कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
गो फर्स्ट एअरलाइन्सची 9 मेपर्यंतची सर्व उड्डाणं रद्द
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गो फर्स्ट (GoFirst) एअरलाइन्सने आता 9 मेपर्यंत आपली सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. एअरलाइन्सने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ऑपरेशनल कारणांमुळे गो फर्स्टने (GoFirst) 9 मे 2023 पर्यंतची आपली उड्डाणं रद्द केल्याचं म्हटलं आहे. उड्डाणं रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल विमान कंपनीने खेद व्यक्त केला आहे. एअरलाइन्सने म्हटले आहे की, प्रवाशांना मूळ पेमेंट मोडद्वारे रकमेचा पूर्ण परतावा लवकरच दिला जाईल.