Adani Group Share Sale: अदानी उभारणार 3.5 अब्ज डॉलरचा निधी; तीन कंपन्यांमधील शेअर्सची विक्री करणार
Adani Group Share: अदानी समूह तीन कंपन्यांमधील शेअर्स विक्रीतून 3.5 अब्ज डॉलरचा निधी उभारणार आहे.
Adani Group Share Sale: अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूह अदानी समूह (Adani Group) आपल्या तीन कंपन्यांमधील शेअर विक्रीद्वारे 3.5 अब्ज डॉलरचा निधी उभारणार आहे. याशिवाय, अदानी ग्रीन एनर्जीच्या बोर्डाने पुढील महिन्यात 1 अब्ज डॉलर किंमतींच्या शेअर विक्रीला मंजुरी दिली आहे.
'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि वीज पारेषण कंपनी अदानी ट्रान्समिशन लिमिटेडच्या मंडळांनी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना शेअर विक्रीद्वारे 21 हजार कोटी रुपये ( जवळपास 2.5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त) निधी उभारण्यास आधीच मान्यता दिली आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे संचालक मंडळदेखील असाच निर्णय घेण्याची शक्यता आहे. 'पीटीआय'च्या वृत्तानुसार, पुढील दोन आठवड्यांत अदानी ग्रीन एनर्जी जवळपास एक अब्ज डॉलरचा निधी उभारण्याची शक्यता आहे.
संचालक मंडळाने बैठकीत शेअर्स विक्रीच्या प्रस्तावासाठी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी ट्रान्समिशन लिमिटेडने भागधारकांची मंजुरी मागितली आहे. निधी उभारणीला मंजुरी देण्यासाठी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे संचालक मंडळ जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बैठक घेऊ शकते.
अदानी समूहातील कंपन्यांचा भांडवली खर्चाच्या गरजा भागवण्यासाठी 3.5 अब्ज डॉलरचा निधी उभारण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) निधी उभारण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
पात्र संस्थात्मक खरेदीदारांना समभाग जारी करून निधी उभारणी केली जाईल. पीटीआयच्या वृत्तानुसार, युरोप आणि मध्य पूर्व मधील गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी सकारात्मकता दाखवली आहे. सध्या असलेल्या काही गुंतवणुकदारदेखील या नव्या ऑफरमध्ये शेअर्स खरेदी करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, नवीन गुंतवणूकदार देखील चांगला प्रतिसाद देतील असा कंपनीला विश्वास आहे.
GQG Partners यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये 1.87 अब्ज डॉलर गुंतवले होते. GQG Partners देखील या शेअर्सच्या ऑफरमध्ये सहभागी होऊ शकतात. गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या कंपनीची वाढ होत असल्याच्या दाव्यावर विश्वास ठेवला असून समूहात अधिक पैसे गुंतवण्यास रस दाखवला आहे.
परदेशात अनेक वित्तीय संस्था आणि इतर गुंतवणूकदारांसह व्यापक रोड शो केल्यानंतर निधी उभारणीला अंतिम रूप देण्यात आले आहे. हिंडेनबर्ग अहवालाच्या पार्श्वभूमीवर अदानी एंटरप्रायझेसला 20,000 कोटी रुपयांचा फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) रद्द करण्याची नामुष्की अदानी समुहावर ओढावली होती. या नामुष्कीच्या तीन महिन्यानंतर आता निधी उभारणी करण्यात येत आहे.