एक्स्प्लोर
मी खरंच असुरक्षित आहे?
थॉमसन रायटर्सचा सर्व्हे आला आणि भारत महिलांसाठी कसा आणि किती प्रमाणात असुरक्षित आहे यावर यथेच्छ चर्चा झाली...

प्रातिनिधिक फोटो
थॉमसन रायटर्सचा सर्व्हे आला आणि भारत महिलांसाठी कसा आणि किती प्रमाणात असुरक्षित आहे यावर यथेच्छ चर्चा झाली...
मला मात्र आजूबाजूला वावरताना हा भारत खरंच असुरक्षित वाटतोय का हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यासाठी मला माझ्या आयुष्यातल्या काही घडून गेलेल्या गोष्टींवर पुन्हा कटाक्ष टाकावा लागेल... आणि त्याच निमित्ताने गतकाळातल्या चांगल्या वाईट गोष्टींचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न...
खरंतर मला असुरक्षित वाटू लागलं त्यावेळी माझं वयही काही समजून घेईल इतकं मोठं झालेलं नव्हतं. साधारण तिसरीच्या वर्गात होते मी...
सकाळी साडे सहाची वेळ... विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने शाळेत चालले होते... आई मागून आवरून येत होती... मी पुढे चालू लागले... आणि अचानक माझ्या मागून येणाऱ्या कुणीतरी माझ्या मानेला हात लावला... मी एकदा मागे वळून पाहिलं... पुन्हा झरझर चालू लागले... पुन्हा तेच झालं... मी घाबरून एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत पळाले... ती पावलं माझ्या मागून येत राहिली...
प्रचंड घाबरून तिथेच उघड्या असलेल्या एका घरात शिरून मी त्या घरातल्या बाईला घट्ट मिठी मारली... आणि ओरडून ओरडून सगळं सांगितलं... त्या काकी घरातून धावत बाहेर आल्या... धावत जाऊन त्यांनी त्या मुलाला पकडलं आणि चांगलंच बडवलं...
तो कचरा वेचणारा मुलगा होता... पाठीवर प्लास्टिकची मोठी गोणी आणि हाफपँट असा त्याचा वेश...
आजही त्या चाळीतून जाताना तो मुलगा मला जशाच्या तसा उभा आहे असा भास होतो...
या निमित्ताने माझी नको असणाऱ्या स्पर्शाशी पहिली ओळख झाली...
आणि पुढे होत गेली...
खरंतर हे सगळं टाळण्यासाठी आपण सतत अलर्ट राहायला हवं आणि चापून चोपून नीट दिसायला हवं ही भीतीही मनात साचत राहिली...
आपल्या कुठल्याच इशाऱ्यातून कुणाला काही चुकीचा मेसेज जाऊ नये यासाठी काळजी घेतली जाऊ लागली... आणि त्यातूनच मित्र परिवार दुरावू लागला...
शाळेत – क़ॉलेजात हाताच्या बोटावर मोजणाऱ्या मैत्रिणींखेरीज माझे कुणीच मित्रही नव्हते... आणि आता मात्र मैत्रिणींपेक्षाही मित्र जास्त आपलेले वाटतात...
कॉलेजमधलं आयुष्य माझ्यासाठी खऱ्या अर्थानं घडणं होतं... आज जो काही अनुभव पाठीशी बांधला गेलाय किंवा लोकांमध्ये राहाण्याची, इतरांशी संवाद साधण्याची जी काही आवड वगैरे निर्माण झाली त्याचं खरं कारण तेच असावं कदाचित...
एकलकोंड्या झालेल्या माझ्या स्वभावाला एक्स्ट्रोवर्ट बनवण्याचे धडे कॉलेजने दिले.
रुईयाचं नाट्यवलय म्हणजे माझ्यासाठी विद्यापीठ होतं... याचं कारण, त्याकाळामध्ये फॅमिली सोडून इतरही जग असतं हे मला समजलं होतं...
मित्र, दिग्दर्शक, टिचर्स, क्रश अशा कित्येक पुरूषी भूमिका मी जवळून पाहिल्या. कट्टा एन्जॉय केला. मात्र पुन्हा तेच... नाटकांची रिहर्सल संपून रात्री घरी यायला दोन वाजायचे... वय होतं 16 वर्ष.
इतक्या रात्री एकटीनं ट्रेनचा प्रवास करणं मला अंगवळणी पडलं असलं तरी आई बाबा घाबरून जायचे. बाबांनी रोज स्टेशनला घ्यायला येण्याचं ठरवलं. तेव्हा काय आमच्या घरी कसलं वाहन नव्हतं. त्यानंतर मग बाबा रोज आपल्याला रात्री घ्यायला येतात. मग पुन्हा सकाळी 6 वाजता कामावर जातात या सगळ्याचा विचार करून माझंच मन बधीर होत चाललं होतं... शेवटी ज्यासाठी रुईयाला एडमिशन घेतलं त्याच नाटकाला रामराम ठोकावा लागला...
कवितांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरणं सुरू झालं... सुदैवाने चांगली सोबत आणि मित्रपरिवार असल्यामुळे कधीही असुरक्षित वाटलं नाही. उलट मनापासून काळजी घेणारे मित्रच मैत्रिणींपेक्षा माझ्या नशिबी खूप आले...
मग तो आभाळ फाटल्यासारख्या पावसात मुंबई ते लातूर केलेला प्रवास असो किंवा मग माझ्यासाठी वॉशरुम शोधण्याची मोहिम असो...
कित्येक बिकट... भयंकर प्रसंग माझ्या वाट्याला या प्रवासाच्या निमित्तानं आले मात्र त्या प्रत्येक प्रसंगात मला माझ्या सोबतच्या पुरूषांनी ठामपणे साथ दिली.
त्यामुळे त्यांच्या सोबत असताना मला कधीच असुरक्षित वाटलं नाही मात्र ज्यावेळी एकटेपणा सोबत असतो त्यावेळी मात्र मनात भीती ही असतेच... कुठेही एकटीनं जायला मन तयार असतं पण सतत एक बागुलबुवा मनात वावरत असतो... असुरक्षिततेचा...
माझी कम्फर्ट झोन सोडून जेव्हा मी माझ्या नावानीशी या जगात काहीतरी स्थान निर्माण करू पाहात असते तेव्हा कधी कधी माझ्या वाट्याला येणारे प्रसंग... मानहानी हे केवळ मुलगी म्हणून माझ्या वाट्याला आलेले असतात...
मग ती काम करण्याच्या ठिकाणची दडपशाही असो किंवा मग - ती एक बाई आहे म्हणजे तिला फारसं झेपणार नाही असा अविश्वास असो... अशा कित्येक प्रसंगात आजही मुलींची होणारी मुस्कटदाबी मी पाहिलीय... पाहातेय...
मुली आणि महिलांच्या असुरक्षिततेचा महत्वाचा मुद्दा हा त्यांच्या मानसिक आरोग्याशीही संबंधित असतो. ते म्हणजे प्रत्येक पातळीवर सतत होणारं त्यांचं दमन... त्यांच्या शब्दाला न मिळणारी किंमत असो किंवा मग त्यांच्यावर लादली गेलेली बाळंतपणं असोत... या दोन्हीही टोकाच्या गोष्टी वाटत असल्या तरी त्यांच्या मुळाशी असलेल्या मानसिकता समान आहेत... आजही आपण जितके पुढे गेलोय तितकेच मागास राहिलेलो मला तरी दिसतोय... माझ्या आजूबाजूला मला सुरक्षित वाटावं यासाठी असलेले पुरूष जितके आहेत त्याहून कित्येक पटींनी अधिक असणाऱ्या पुरूषांशी मला रोज सामना करावा लागत असतो.
आणि तो करताना माझी दमछाक होतेच... माझ्यासारख्या प्रत्येकीची होते...
मात्र असुरक्षित वाटतंय म्हणजे नेमकं काय वाटतंय...
मी कुणाशीही दोन हात करायला सक्षम नाही ?
मला माझे अधिकार मिळवण्यासाठी कुणाशी वाद घालता येणार नाही ?
मला माझी कर्तव्य योग्य पद्धतीनं पूर्ण करता येणार नाही?
मला माझी मतं मांडण्यासाठी पुरूषी खांद्याची गरज आहे?
मला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येणार नाही?
की मग मला कुणीतरी काहीतरी करेल या सगळ्याची भीती माझ्या मनात आहे....?
नेमकं काय...
तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही अंशी कमी जास्त टक्केवारीत आहेत. काही ठिकाणी या सगळ्या गोष्टींसाठी मला पाठीवर कौतुकाची थाप देणारे हात मिळतात तर काही ठिकाणी माझे पाय खेचणारे...
पण या प्रत्येक प्रसंगातून माझ्यासारख्या कित्येक जणी संघर्ष करू पाहाताहेत...
पुढे जाताहेत... आणि स्वत चं स्वत पुरतं आयुष्य सोप्पं आणि सुरक्षित करू पाहाताहेत इतकंच...
त्यामुळे जागतिक पातळीवर भारत पहिल्या क्रमांकाच असुरक्षित देश आहे का हा मुद्दा मनाला फासरा पटणारा नसेल कदाचित मात्र प्रत्येकीला आपला भारत आपापल्या वाट्याला आलेल्या अनुभवांवरून सुरक्षित आणि असुरक्षित वाटतोय... यात त्यांचीही चूक नाही.
- यामिनी दळवी
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग

























