BLOG : जेव्हा अपह्रत पत्नीला पतीच ग्राहक बनून वेश्या वस्तीतून सोडवून घेऊन येतो!
काही घटना केवळ घटना नसतात तर त्या शिकवण असतात संपूर्ण समाजासाठी. ही घटना आहे 2011 सालची. बंगलोरमध्ये एक नवदाम्पत्य राहत होतं, छान संसार चाललेला होता. दोघंही खूश होते. पण माणसाच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळू शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.
एके दिवशी तरुणाला ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईला जावं लागलं. तरुण आपल्या बायकोला माहेरी सोडून मुंबईत गेला. काही दिवस मुंबईत काढल्यानंतर त्याचा मुक्काम वाढणार असल्याचं त्याच्या लक्षात आलं. मग त्याने आपल्या बायकोला मुंबईतच निघून ये असं सांगितलं. ती 5 ऑक्टोबरला आपल्या आईचा निरोप घेऊन मुंबईकडे जायला निघाली.
बंगलोरमधल्या मॅजेस्टिक रेल्वे स्टेशनवर ती उभी असताना दोन अनोळखी व्यक्ती तिच्याशी बोलायला आल्या. ती थोडी घाबरली पण त्यांचं बोलणं ऐकून घेतल्यावर तिला ते नॉर्मल आहेत असं वाटलं. मग ते दोघे चहा घ्यायला लागले, तू ही चहा घे म्हणून तिला ऑफर केली, मग तिनेही तो चहा घेतला.
चहा घेतल्यानंतर मात्र त्या दोघांनी त्यामध्ये टाकलेल्या गुंगीच्या औषधामुळे तिला गुंगी आली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती एका गाडीत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण त्या दोघांनीही तिला ओरडू दिलं नाही. ते दोघे तिला मुंबईला घेऊन आले.
मुंबईत आल्यावर मुंबईतल्या शरीर विक्रीचा व्यवसाय चालतो तिथे हे दोघे तिला घेऊन गेले. तिला 40 हजार रुपयांना विकण्यात आलं. इकडे तिचा पती ती अजून मुंबईत कशी पोहोचली नाही याची काळजी करत होता. शेवटी त्याने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली.
दिवस उलटत होते, तिला एका खोलीत डांबलं गेलं. ज्या लोकांनी तिला इथे आणलं त्यांनी तिला वाटेत असतानाच मारण्याची धमकी दिली होती. घाबरलेल्या अवस्थेत असलेली ती तरुणी आता आपलं पुढचं जीवन इथेच जाणार का या तीव्र चिंतेत पडलेली होती.
पंधरा दिवस उलटले, तिचा नवरा, नातेवाईक, आई-वडील सर्वच चिंतेत होते. ज्या स्त्रीने तिला विकत घेतलं तिच्याकडून वारंवार धमक्या चालू होत्या. शेवटी एक दिवस एका ग्राहकाला तिच्या खोलीत पाठवलं गेलं. त्या व्यक्तीने आत आल्यावर दरवाजा बंद केला, तशी ती त्याच्याजवळ जाऊन पाया पडली. मला इथे कसं जबरदस्ती आणलं गेलं हे तिने त्या व्यक्तिला सांगितलं.
सुदैवानं ती व्यक्ती चांगल्या प्रवृत्तीची निघाली. तिने त्याला आपल्या नवऱ्याशी बोलण्यासाठी मोबाईल देण्याची विनंती केली. त्या व्यक्तीने सर्व ऐकून घेतल्यानंतर आपला मोबाईल दिला, पतीचा पाठ असलेला मोबाईल नंबर तिने डायल केला. चिंतेत असलेल्या तिच्या नवऱ्याने अनोळखी फोन उचलला, ऐकतो तर त्याच्या बायकोचा रडत असतानाचा आवाज.
हादरुन गेलेल्या पतीने सगळी घटना ऐकली आणि आणखीच हादरुन गेला. तू कुठल्या भागात आहेस विचारल्यावर माहिती नसलेल्या त्याच्या पत्नीला, आलेल्या ग्राहकानेच पत्ता सांगितला. यावर पतीने तातडीनं मी येतो असं सांगितलं. फोन ठेवल्यानंतर पती पोलिसांना फोन करायचा विचार केला खरा पण काही गडबड झाली तर त्याच्या पत्नीच्या जीवाला धोका असल्याची त्याला भीती वाटते.
मग त्याने एक शक्कल लढविली, सांगितलेल्या जागेवर तो स्वत:च ग्राहक म्हणून पोहोचला. एव्हाना ज्या व्यक्तीच्या मोबाईलवरुन फोन केला गेला ती व्यक्ती निघून गेली होती. पत्नीला ज्या खोलीत ठेवलं होतं तिथे तो पोहोचला. दोघंही दार लावल्यानंतर ओक्सा-बोक्शी रडू लागले.
त्यानं तिला धीर दिला, आपल्या जवळच्या मोबाईलवरुन तातडीने पोलीस स्टेशनला फोन केला आणि घडलेली घटना कथन केली. पोलिसांनीही तत्परता दाखवून संबंधित ठिकाणी रेड टाकली आणि दोघांची सुटका तसेच आणखी काही जणींची सुटका केली ज्यांना अशा पद्धतीनं फसवलं गेलं होतं.
संबंधित फसवणूक करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. पण आज केवळ त्या तरुणीचं धैर्य, चातुर्य, प्रसंगावधान आणि नशीब यामुळे ती या संकटातून, या नरकातून बाहेर पडू शकली. नशीब अशासाठी की आलेली ती व्यक्ती जर चांगल्या प्रवृत्तीची नसती तर आज ती तरुणी बाहेर पडू शकली नसती.
पण अशा घटनांमधून समाजानं बोध घेण्याची गरज आहे. विशेषत: महिला वर्गाने किंवा तरुणींनी. कोणत्याही अनोळखी माणसांनी अचानक येऊन जवळीक साधण्याचा केलेला प्रयत्न, दाखवलेली आपुलकी, देऊ केलेले पदार्थ, संकटात टाकणार तर नाहीत ना याची खबरदारी घेतली पाहिजे.
समाजात केवळ व्यक्ती राहत नाहीत तर प्रवृत्तीही इथे वास करतात. कोणी सद्प्रवृत्तीचा असतो तर कोणी या संबंधीत तरुणीला फसविणाऱ्या प्रवृत्तीचा. अनादी कालापासून हे होत आलं आहे आणि होत राहिल. मर्यादा पुरुषोत्तम रामही जगाने पाहिला आणि रावणासह दुर्योधन आणि दुष:सनही. आपण सतर्क राहणे हे आवश्यक.
महिला वा तरुणींना आपल्या घरातील पतीचा, भावाचा वा वडिलांचा फोन नंबर पाठ असायला हवा ही शिकवणही या कथेतून मिळते. कारण त्या तरुणीला पतीचा मोबाईल नंबर पाठ नसता तर ती यातून बाहेर पडू शकली नसती.
एकूण काय तर या घटनेतून आपण सर्वांनीच बोध घेणं अती आवश्यक
प्रशांत कुबेर यांचे याआधीचे ब्लॉग