छत्रपती संभाजी महाराज: अपराजित योद्धा आणि कुशल प्रशासक
Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कधीही हार न मानणारा साहसी योद्धा व कुशल राज्यप्रशासक. पण त्यांची ही प्रतिमा नेहमी दडपून राहिली आहे, काहींनी ती मुद्दाम ठेवली आहे.
पण सत्य हे सुर्यासम तेजस्वी असते त्याच्या तेजाला कोण आव्हान देणार? शंभुराजेंचा जन्म पुरंदरी ते दुदैवी मृत्यु बहादूरगड. यामध्ये जे शभुराजेंचं चरित्र येतं त्या चरित्राची चिकित्सा केली तर कळून येईल की, या हिंदुस्थानात शंभुराजेंसारखा महान स्वराज्यभिमानी आणि स्वाभिमानी राजा झाला नसेल. पण इतिहासात त्यांचं चरित्र वाईट रंगाने रंगवलं गेलं! प्रथम बखरी मधून संभाजीराजांची व्यसनी, बाईलपंट, राज्यबुडवा अशी प्रतिमा चितारली! आणि त्याच बखरीचा आधार घेऊन अनेक इतिहासकारांनी कर्तुत्ववान राजाचा कर्तुत्वहीन युवराज असं चिकित्सकवृत्तीचा अभाव असलेलं चरित्र लोकांपुढे फेकलं. आणि आम्ही तेच घोकत बसलो.
पण काळाचा महिमा अगाध आहे. सत्य हे जणू बीज आहे, ते तुडवण्याच्या हेतून धरणीच्या उदरात कोचलं तर, ते सत्य पुढे अंकुर, रोपटं, त्याचा डौलदार वृक्ष होऊन ते सत्य आसमंताला उलट सलामी देतं! इतरांनी फेकून दिलेला किरकोळ स्फटिक खडा. तो आहे हिरा आणि तो हिरा शोधून काढला, पैलू देऊन चमकवला ते इतिहासकार वा.सी बेंद्रेनी.
पुढे डॉ. कमल गोखले यांनी शंभूराजेंच्या जीवनावर पी.एच.डी केली आणि या दोघांमुळे आपल्याला खऱ्या अर्थाने शंभुराजे कळले. शंभूराजेंच्या जन्मानंतर माईची ममता काय असते कळण्याआधी त्यांच्या मातोश्रींचं दुर्दैवी निधन झालं. पुढे आज्जी आऊसाहेब जिजामातांनी व इतर मातांनी त्यांचा संभाळ केला. आईविना असलेला मुलगा महाराजांनी खूप प्रेमाने ममतेना वाढवला. शिवाजीमहाराजांनी बाळशंभुंना कला, शस्र शास्र, राजनीती, पुराण, रामायण महाभारत, उपनिषदे, गीता धर्मशास्त्र आदीचे उत्कृष्ट शिक्षण दिले. एक पिता म्हणून, व नंतर युवराज म्हणून योग्य संस्कार केले, योग्य मार्गदर्शन केले.
ॲबे कॅरे युवराज संभाजी राजेंविषयी सांगतो हा युवराज वडिलांच्या कीर्तीला शोभेल असा आहे. तो वडिलांच्या आज्ञेवरून मोहिमेचं नेतृत्व करत असतो. त्याच्यातील सौन्दर्य हा त्याच्या प्रजेला व सैन्याला आकर्षित करणारा गुण आहे.
हा युवराज एका प्रौढ सेनापती सारखा वीर अनुभवी वाटतो. एकदा वडीलांनी त्याला गुजरातमधील खंबायतच्या मोहीमेवर पाठवलं होतं. तेव्हा ते युवराजांचं नाव ऐकून पळून गेले. शंभूराजेंच्या नेतृत्वाखाली लढण्यास मावळ्यांना आनंद व्ह्यायचा आणि ते आपल्या सरदारांना चांगल्या कामगिरीबद्दल बक्षीसी देत. ह्या वर्णनाने शभुराजेंचं कुमारवयीन जीवन आपल्यापुढे सादर होतं. कुमारवयात विशेषतः मुलांचं मन विवीध मार्गाला भटकतं. पण हा युवराज, या वयात निरनिराळ्या विद्या शिकत होता. राजनीतीचे धडे घेत होता. वडिलांकडून युद्ध व प्रशासन जाणून घेत होता. शंभूराजेंचा बालपणी अवघ्या नवव्या वर्षी छत्रपती महाराजांसोबत हजारपेक्षा जास्त किलोमीटर प्रवास घडला. तिथं औरंगजेबाच्या हुकमाने कैद झाली. त्रास तर झाला असणार.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्यकारभार करता यावा यासाठी मोघल छावणीत मनसबदार लहान वयात संभाजीराजेंना पाठवलं. तिथं त्यांना मोघल शासनाची माहिती झाली. शत्रूगोटातील व्यक्तींचा परिस्थितीचा अनुभव आला असणारच. लहानपणीपासूनच हा युवराज अगदी कठीण प्रतिकूल वातावरणात वाढला. जणू अस्सल दर्जाचं पोलाद भट्टीत तापून सुबक आकार घेत होतं त्याचप्रमाणे शंभुराजें मोठे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला. थोरला पुत्र नात्याने त्यांची विधिवत युवराजपदी नेमणूक झाली. इथून पुढे त्यांच्या कारकिर्दीस एक भलतेच वळण लागले, जणू संकटांचा कडा कोसळला.
दरबारी प्रधान आणि त्यांच्या कुरबुरी वाढू लागल्या, प्रधानांना त्यांचं वागणं खटकू लागलं. राज्याभिषेकाच्या ( १६७४ ) दोन वर्षांनी ( १६७६ ) शंभूराजे बाहेर पडले ते रायगडी आले ते साडेतीन वर्षांनी. या मधल्या काळात प्रधान व सोयराबाईसाहेबांचा एक गट तयार झाला असावा असा अभ्यासकांचा अंदाज. या सर्व गोष्टी भरीला जाऊ नये म्हणून, महाराजांनी संभाजीराजेंना शृंगारपुरीला ठेवलं. तेथे त्यांनी विविध धर्मपुराणे ऐकली, वाचली, बुधभूषण तिथेच लिहिला असावा असे सौ. कमल गोखले म्हणतात. तिथल्या लोकांच्या अडचणी सोडवल्या. १६७८ साली कलशभिषेक झाला. तिथे त्यांना भवानीबाई नावाची मुलगी झाली.
पुढे डिसेंबर १६७८ ला मंत्र्याला व सावत्र आईच्या वागण्याला कदरून म्हणा अथवा कुठल्याशा कारणाने युवराज दिलेरखानास मिळाले. नंतर तिथं राहिल्यावर मराठी प्रजेवर व सैन्यावर होणारा अन्याय व कदाचित उपरती झाल्यामुळे युवराज गनिमीकाव्याने निघून आले. हा प्रसंग इतिहासात अतिशय विचित्र आहे. पुढं छत्रपती शिवाजी महाराजांचं 1680 साली निधन झालं. गृहकलह व राज्यकलहास पुन्हा जोर चढला. सोयराबाईंची पुत्रासाठी राज्य व अण्णाजी दत्तो, मोरोपंत व इतर प्रधानांचा कावा वाढू लागला. शंभूराजे तेव्हा पन्हाळ्यावर होते. निधनाआधी पितापुत्राची भावनामय भेट झाली, लेकरा म्हणून त्यांनी समजावलं.
राजांच्या निधनाची बातमी युवराजांना कळू दिली नाही . पुढे याचा सुगावा लागताच, सरसेनापती हंबीरराव मोहिते व शभुराजेंनी मिळून अण्णाजी दत्तो टोळीला जेरबंद केलं. मंचकरोहन केलं, नंतर राज्याभिषेक केला. पुढे त्या मंत्र्यावर दया दाखवत सुटका करून केली इथे त्यांची सौजन्यवृत्ती दिसते. पण याच प्रधानानी त्यांना माशाच्या जेवणातून विष देण्याचा कट केला. नंतर दिल्लीवरून पळून आलेल्या शहजादा अकबराच्या मदतीने शंभूराजेंना संपवण्याचा प्रयत्न केला. पण इथे अकबराने शहाणपणा दाखवत राजाला साथ दिली. मग अनाजी दत्तो टोळीला देहदंडाच्या शिक्षा दिल्या.
पुढे औरंगजेब आपल्या मुलाचा बंदोबस्त करायला व दक्षिण काबीज करायला आला. स्वराज्यात अक्षरश: धुमाकूळ घातला, प्रजेला त्रास देऊ लागला. काही वतनदार आता स्वराज्य संपलं म्हणून आपला बस्तान गुंडाळून औरंगजेबाला शरण गेले. ! बऱ्याच फितुरी झाल्या. मोघली सैन्य राज्यात नासधूस करू लागलं. सागरी किनारपट्टीचा सिद्दी मोघलांना जाऊन मिळाला. त्यालाही आणखी चेव चढला, पोर्तुगीज वळवळ करू लागले. इंग्रज कुरापती करू लागले. अगदी सगळीकडेच अशी भयानक संकटं नव्या छत्रपतींच्या समोर येऊन पडली. परंतु याला घाबरतो कसला तो मर्द मराठा छावा. राजेंनी पराक्रमाची शर्थ केली, आपले अप्रतिम शूरत्व दाखवलं.
सिद्दीचा जबर बंदोबस्त केला. पोर्तुगीज तर पळवू पळवू मारले, होय पोर्तुगीजचा व्हाईसरॉय तर प्राण हातात घेऊन पळत होता, त्यावेळी शंभूराजे बेभान होऊन त्याच्या मागे लागले, थेट खाडीत घोडा घातला, खंडो बल्लाळने घोडा जाऊन आवरला म्हणून छत्रपती वाचले (इथे छत्रपती संभाजी राजेंचा आक्रमक क्षत्रिय बाणा कळतो). शभुराजेंना घाबरून पोर्तुगीजांनी आपली गोव्याची राजधानी दुसरीकडे नेली. पोर्तुगीज व्हॉईसरॉय जिवाच्या भीतीने तर सेंट झेव्हीयर्सची प्रार्थना करू लागला.स्वराज्याचा वकिलाला थोरल्या महाराजांच्या काळात फार मान मिळत नव्हता (ते शिवाजी महाराजांना बंडखोर जाहगिरदार मानत होते, राजा झाल्यावर फार मानत नव्हते) पण शंभुराजेंच्या काळात वकिलाला शाही सन्मान मिळायचा. अर्थात तशी जरब पोर्तुगीजांना बसवली होती.
शंभूराजेंची युद्धनीती ही अगदी थोरल्या छत्रपतींप्रमाणेच होती. यावर युद्धनीतीचे अभ्यासक व इतिहासाचे अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ अभ्यंकर म्हणतात ही युद्धनीती हिट अँड रन स्वरूपाची आहे अर्थात 'गनिमी कावा'- याला डॉ अभ्यंकर खच्चीकरणाची युद्धनीती सुद्धा म्हणतात. यात शत्रूवर आक्रमण करून, शत्रू डोईजड होताना दिसला की शहाणपणाने माघारी फिरायचं, व परत शत्रू स्थिरस्थावर झाला आणि शत्रू बेसावध असताना त्याच्यावर तुफान हल्ला चढवायचा.! अशी युद्धनीती मराठ्यांची शान होती. त्याच युद्धनीतीचा वापर करून छत्रपती संभाजी महाराजांनी मोघली फौजानां सळो की पळो करून सोडले होते.
एकीकडे राज्याचा बचाव व दुसरीकडे शत्रू मुलखात जाऊन आक्रमण करणे जेणेकरून राज्यावरचं आक्रमण ढिल पडेल. हंबीरराव मोहिते, कवी कलश, येसाजी कंक, कृष्णाजी कंक,नागो बल्लाळ, रुपाजी भोसले, हरजीराजे महाडील, संताजी घोरपडे दादाजी प्रभू, आदी सेनानींनी अफाट लढा देऊन स्वराज्यचे रक्षण केले. छत्रपतींनी एवढी आक्रमणे केली, छत्रपतींनी औरंगजेबाला अजिबात स्वस्थ बसू दिलं नाही. त्याने तर पगडी काढून फेकून दिली व जोपर्यंत हा दक्षिण काबीज करत नाही तोपर्यंत पगडी घालणार नाही अशी शपथ घेतली.
छत्रपती संभाजी राजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १६८९ साली संगमेश्वरला तीनशे चारशे सैनिक घेऊन असता, शेख निजाम उर्फ मुकर्रबखानला आलमगीर बादशहाचा निरोप दिला की त्या जाहगिरदारला जिवंत पकडून आणा. तसा वाऱ्याच्या वेगानं मुकर्रबखान संगमेश्वरास आला. संभाजी राजेंनी इथे शिताफीने निसटून जाणे योग्य होते पण घडून गेलेल्या बाबींना जर तरचा अर्थ नसतो. अखेर सह्याद्रीचा छावा पकडला गेला, कैद झाला. बादशाहची छावणी ज्या दिवशी बहादुरगडाला लागली त्याच दिवशी संभाजीराजे व कवी कलश यांना कैद करून समोर आणलं. इराणमध्ये जसं कैद्याला विदूषकाप्रमाणे फिरवतात तसं संभाजीराजेंना, कवी कलशाला तख्ताकुलाह घालून फिरवले, त्या दिवशी जणू शबे बारात व ईद प्रमाणे उत्सव झाला. बादशहाचे लोक सण असल्यागत आनंदी होते असं साकी मुस्तैदखान सांगतो.
दरबारातील उमरावांनी संभाजीराजेंना सांगितलं की बादशाहला नमस्कार व मुजरा करा. पण इथे संभाजी महाराज झुकले नाही. बादशहाच्या दरबारी असलेला साकी मुस्तैदखान म्हणतो - संभाजी फार गर्विष्ठ होता, त्याने आलमगीर पुढे किंचितही मान झुकवली नाही.
या कैदेत - बादशहाचा चाकर ईश्वरदास नागर सांगतो, एका सरदारामार्फत शंभूराजेंना दोन प्रश्न विचारले गेले १) खजिना कुठे आहे? २) माझे कोणते सरदार तुला सामील होते? यावर शभुराजेंनी उत्तर न देता औरंगजेबाला अपशब्द वापरले. त्या सरदारांनी बादशहाला भीटीपोटी तसे शब्द न वापरता सांगितले की याप्रकारचे वाक्य व शब्द वापरले हे ऐकताच औरंगजेब पिसाळला व त्याने हुकूम केला की संभाजीचे डोळे काढा व त्याला नवी दृष्टी द्या. या कैदेत असताना संभाजीराजेंनी पूर्णतः अन्न सोडलं व अगणित हालअपेष्टा, भयंकर यातना सहन करत प्राण सोडले. असा स्वराज्याचा युवराज बाणेदारपणे आपल्या आयुष्याचा अंत जगला व या देशाला स्वातंत्र्यप्रेरणा देऊन गेला. देशाभिमान काय असतो हे सांगून गेला.
सिंहावलोकन -
छत्रपती संभाजीराजेंनी त्यांचा राज्यकारभार या आक्रमण काळात सुद्धा नीट चालवला. अगदी वडील छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे. उपलब्ध ऐतिहासिक साधनावरून समजते की, रयतेला कुठलाही त्रास दिला नाही. सर्व न्यायनिवाडे व्यवस्थित केले. इंग्रजांना लिहिलेल्या एका पत्रात तर ते सांगतात वडिलांनी जे नियम चालवले तेच मी चालवणार व दुसऱ्या एका पत्रात वेदशास्रपंडितास सन्मान देताना सांगतात की आबासाहेबांचे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य. म्हणजे यावरून कळून येईल की संभाजीराजे वडिलांनी घालून दिलेल्या वाटेवर स्वराज्याचा कारभार करत होते. साधू संतांना देणग्या देणे, मोईन देणे, त्यांना पालखी देणे यासारखे धर्मकार्य त्यांनी भरपुर केले, व साधू संतांचे आशीर्वाद मिळवले. संत तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी यांना 19 ऑगस्ट 1680 रोजी मोईन दिली. 13 सप्टेंबर 1680 रोजी कुडाळ पाटगाव येथील मौनीबुवांना पालखी व भोई दिले.
तात्पर्य - साधूसंतांची काळजी घेण्याचे राजकर्म शंभुराजेंनी योग्य पार पाडले.
शस्रासोबत शास्रात सुद्धा नैपुण्य मिळवले, नायिकाभेद, सातसतक, बुधभूषण सारखे ग्रंथ लिहिले. नायिकाभेद हा शृंगारशास्र तर सातसतक अध्यात्मिक बाबीचे उत्कृष्ट लिखाण असलेला ग्रंथ आहे. तर बुधभूषण राजनीतीवरचा ग्रंथ आहे.
असा प्रतिभावंत - पराक्रमी राजा आपण त्यांच्या या गुणांकडे दुर्लक्ष करून, सध्या भलत्याच गोष्टीत आपण रमतो की छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर पण या सर्व सामाजिक राजकीय वादाने अपल्याला खरे संभाजी महाराज कळणार नाहीत. त्यासाठी आपल्याला स्वतः त्यांच्या चरित्राचं वाचन, मनन, चिंतन करावं लागेल, तेव्हा आपल्याला कळेल की हा असामान्य योद्धा, जो खूप साहसी आहे, याबद्दल इतिहासपंडित सेतुमाधव पगडी म्हणतात- माणसाकडे साहस गुण असला तर त्याच्या गुणांना बहर येतो, पण साहस नसल्यास बाकीचे गुण मातीमोल ठरतात. छत्रपती संभाजी राजे हे फार साहसी वृत्तीचे राजे होते, एवढे की मिर्झाराजा जयसिंगाच्या मुलाला पत्र पाठवले की आपण औरंगजेबास मिळून कैद करू आणि शहजादा अकबराला गादीवर बसवू व देशात पुन्हा धर्माची स्थापना करू. या पत्रात त्यांचं साहस थेट हिंदुस्तानच्या बादशहाला कैद करण्याचा आहे. हंबीररावा नंतर त्यांनी केलेलं सैन्याचं नेतृत्व या गुणांची साक्ष देतं.
छत्रपती संभाजींकडून निर्भीड, पराक्रमी, साहसी, स्वाभिमानी, गुणवंत, प्रतिभाशाली आयुष्य कस जगावं, त्यांचं तोलामोलाने या मातीसाठी निडर होऊन ताठ मानेने बलिदान द्यावं हे शिकल पाहिजे. 9 वर्षांच्या काळात अविरत अविश्रांतपणे ज्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं, ज्याने शत्रूचे आक्रमण असतानाही, राज्यातील लोकांची काळजी घेतली, त्यात कुठेही कमी पडू दिली नाही, ज्याने अनेक कटकारस्थाने, गृहकलह सहन करत त्यातून धैर्यशीलपणे मार्ग काढत, स्वराज्य चालवलं हे सर्व महान कार्य पाहून अशा वीराला जगातील कोणताही व्यक्ती आपसूकच प्रणाम करेल.