राज्यातील आरोग्य यंत्रणेला कोरोनाच्या उपचाराप्रमाणे त्यांना आता हळूहळू मानसिक आजारांवर पण गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. हा आजार आता फारसा महत्व देण्याइतपत वाटत नसला तरी नंतर हा आजार बळावू शकतो. शाररीक इजा बरे करणे सोपे असते. मात्र, मनावरील जखमेवर फुंकर घालण्यासाठी वेळीच मानसिक उपचार होणं ही काळाची गरज आहे.


कोविड-19, लॉकडाउन, सक्तीची विश्रांती आणि तेच तेच. या सगळ्या प्रकारामुळे लोकांच्या मनात चीड निर्माण झाली असून उगाच मानसिक ताण वाढत असल्याची जाणीव अनेकांना होत आहे. आता बस्स! झाल्याची भावना प्रबळ होत असून मन अस्थिर होत असून, अनेक वेळ इंटरनेटच्या माध्यमातुन घालविल्यानंतर अनेकांना सर्व ओळखीचे लोक आजूबाजूला असूनही एकटे पडल्यासारखे वाटत आहे. या सगळ्या प्रकारामुळे आपण आजारी वाटत नसलो तरी वैद्यकीय शास्त्रीय भाषेत याला मानसिक आजार म्हटले जाते. यावर वेळीच उपाय केले नाही तर हा आजार बळावू शकतो. या सगळ्या कोलाहालात नागरिकांच्या मनावर होणाऱ्या 'इजाचा' विचार करण्याची गरज असून वेळ पडल्यास संपूर्ण राज्यात कोरोनाच्या उपचारासोबत मानसिक उपचारांबाबत गंभीरतेने विचार करायला हवा.


बहुतांश नागरिक लॉकडाउनमुळे घरात बसून आहेत. चौथ्या लॉकडाउनमुळे ते खुपच डाउन झाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एका बाजूला कोरोनाची भीती असताना नागरिकांना हा 'सक्तीचा आराम' आता बोचू लागलाय. अनेकांना मानसिक कोरोनाचे डोहाळे लागले आहेत. आपल्या आजू बाजूला राहत्या परिसरात जर कुणाला कोरोनाची लागण झाल्यावर माहिती मिळाली की काही जणांना धडकी भरत आहे. मग काही वेळ गेल्यानंतर त्यांना सुद्धा कोरोना झालाय की काय अशी भीती वाटू लागत आहे, काहींना आपलं अंग गरम वाटू लागतं तर काहींना थोड्या प्रमाणात घशात खव-खव जाणवू लागते. मग थोडसं कोमट पाणी त्याच्या गुळण्या आणि काहीसे घरगुती उपाय सुरु होत असल्याच चित्र सगळीकडे पहायला मिळत आहे. काहीजण तर थेट डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन हजेरी लावत आहे.


विशेष म्हणजे ज्यांना शहरात व्यवस्थित राहण्याची सुविधा आहे ते बऱ्यापैकी वेळ इंटरनेटच्या माध्यमातून मनोरंजन करून घालवीत आहे. सामाजिक माध्यमावर राहण्याचा त्यांचा वेळ वाढला आहे. मात्र, ह्या सगळ्या प्रकारात हा मोठा धोका असून मानसोपचार तज्ञांच्या मते जास्त वेळ अशा पद्धतीने इंटरनेटवर काढल्यामुळे मानसिक स्वास्थ्य ढासळू शकते. कुठल्याही गोष्टीचा अतिरके हा वाईट असतो, आणि बहुतांश सध्या शहरात इंटरनेट वापरण्याचं प्रमाण वाढले आहे. काही जण कुठे अडकून पडले आहे, त्यांना त्यांचा एकटेपणा असह्य होत आहे. सगळीकडे विचित्र असं वातावरण निर्माण झालं आहे.


याबाबत अधिक माहिती देताना, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ, डॉ वृषाली रामदास राऊत सांगतात की, "कोरोनाची साथ अनपेक्षित असल्याने आपण सगळेच एका गंभीर प्रसंगामधून जात आहोत. कोरोनाने आपल्या आर्थिक, सामाजिक व भावनिक या तिन्ही पातळीवर आयुष्य ढवळून निघाले आहे. चिंता, निराशा, दुःख व ताण या नकारात्मक भावना वाढीस लागून चिंता रोग (एन्जायटी डिसऑर्डर), नैराश्य व ताण-तणावामुळे निर्माण होणारे मानसिक आजार अनुभवले जात आहेत. रोजगार गेल्याने/जाण्याच्या भीतीने व ताणने लोकांना झोप न लागणे, ब्लडप्रेशर वाढणे, रक्तातील साखर वाढणे, कुटुंबातील वाद वाढणे असले प्रकार बघायला मिळत आहेत. मुळात मृत्यूची भीती आपल्या सगळ्यावर हावी झाल्याने आपण सगळे, क्षणात निर्णय (अम्यगला हायजॅक) हा प्रकार अनुभवत आहोत. ज्यात आपला तार्किक मेंदु (फ्रंटल लोब) काम करणं बंद करतो व आपण केवळ भावनेच्या भरात, उतावीळपणाने निर्णय घेत आहोत ज्या निर्णयांचा आपल्याला पुढे जाऊन पश्चाताप होईल. काही स्त्रियांना घरगुती हिंसाचार हा प्रकार अनुभवास आला तर लहान मुलांना हालचाली बंद होऊन ऑनलाईन राहिल्याने मेंदू व शारीरिक वाढीवर परीणाम होत आहे जो नेहमीकरता नुकसान करेल."


त्या पुढे असेही सांगतात की, "एकंदरीत आपण सगळे कमी अधिक प्रमाणात मानसिक आजार अनुभवत आहोत. जागतिक आरोग्य परिषदेने वर्तवल्याप्रमाणे सध्या व कोरोनानंतर मानसिक आजारांची लाट राहील ज्याचा आपल्या कार्यशक्तीवर पण परीणाम होईल. एकंदरीत सरकारने यावर आत्ताचं मानसोपचार केंद्र सुरू करावीत, यात सरकारी/कंत्राटी मानसशास्त्रद्याचे अध्यापक यांचा समावेश करावा, थोडक्यात प्राथमिक मानसोपचार सुरु करावेत."


नागरिकांचं मानसिक आरोग्य उत्तम असणं ही काळाची गरज आहे. नागरिकांना केव्हाही मनात धडधड होणे, भीती वाटत असल्यास घरातील, परिचययातील, मित्रांशी बोला. जर तुम्हालाही यासंदर्भात कुणी माहिती विचारात असेल तर शक्यतो त्याच्याशी बोला. जर तुम्हाला त्याचं गांभीर्य अधिक वाटत असेल तर त्यांस डॉक्टर्सकडे जाण्याचा सल्ला द्या. मानसिक आजारामध्ये कुटुंबीयांची साथ फार मोलाची असते, त्यांच्या आधारवर रुग्ण अशा आजारावर मात करण्यास यशस्वी होत असल्याची अनेक उदाहरणे समाजात पाहावयास मिळतात.


"सुरुवातीच्या काळात लोकं फार कोरोनची चिंता करत नव्हते. मात्र, जसं जसा कोरोनाचं फैलाव वाढत गेला त्यानंतर लोकांना या आजारची भीती (फियर सायकोसिस) वाटू लागली. मी तर या काळात माझ्या तीन डॉक्टरांची टीम बनवली असून ते आधी रुग्णांना समुपदेशन करतात. अनेक लोक भितीपोटी आमच्याकडे येऊ लागलेत. घरातील सदस्यांना कोरोना झाला असून आता आपले काय होणार या भीतीने लोक क्लीनिकला भेट देत आहे. आम्ही त्यांना शक्यतो उपचार करत आहोत. मात्र, याचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. लोकांना अलगीकरणाची भीती वाटत आहे. अशा लोकांवर तात्काळ उपचार केल्यास ते बरे होत आहे. त्यांच्या मनातील भीती दूर करणे गरजेचे आहे. असे, डॉ युसूफ माचिसवाला, प्राध्यापक, ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज, सर जे जे समूह रुग्णालय, यांनी सांगितले.


राज्यातील आरोग्य यंत्रणेला कोरोनाच्या उपचाराप्रमाणे त्यांना आता हळूहळू मानसिक आजारांवर पण गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. हा आजार आता फारसा महत्व देण्याइतपत वाटत नसला तरी नंतर हा आजार बळावू शकतो. शाररीक इजा बरे करणे सोपे असते. मात्र, मनावरील जखमेवर फुंकर घालण्यासाठी वेळीच मानसिक उपचार होणं ही काळाची गरज आहे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग