एक्स्प्लोर
शिवराज्याभिषेकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी.. (पूर्वार्ध)
रयतेला आधार देतानाच सर्व पातशाह्यांना शह देण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक करवून घेतला. शिवराज्याभिषेकाचे महत्व जाणून घेण्यासाठी इतिहासात हजार वर्षे मागे जावे लागेल त्या शिवाय शिवराज्याभिषेकाच्या निर्णयाची महती पटणार नाही.
शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करवला यामागे अनेक कारणे असली तरी एक महत्वाचे कारण म्हणजे शेकडो वर्षापासून आपल्या स्वतःच्या मुलुखातील राजाशिवाय जगत असणाऱ्या प्रजेला राजा मिळवून देणे हे होते. शिवराय हे वारसा अधिकाराने राजे झाले नव्हते की त्यांच्या वंशातदेखील कुणी स्वतःला राज्याभिषेक करवून घेतला नव्हता. शेकडो वर्षे अनेक पातशाह्यांचा अत्याचार सहन करणाऱ्या प्रजेस आत्मबल यावे आणि शत्रुनेही आपल्या उद्दिष्टांना चांगले समजून घ्यावे हा ही हेतू त्यामागे होता.
शिवरायांच्या आधी विजयनगरचे साम्राज्य आणि त्याही आधी पृथ्वीराज चौहान यांचेच मुलकी राज्य आढळते. बाकी साऱ्या राजवटी या परकीय यवनी आक्रमकांच्या होत्या ज्या अत्यंत जुलमी आणि अमानुष होत्या. त्यातील लूटपाट, जोर जबरदस्ती, धर्मांतर याने रयत त्रासली होती. रयतेला आधार देतानाच सर्व पातशाह्यांना शह देण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक करवून घेतला. शिवराज्याभिषेकाचे महत्व जाणून घेण्यासाठी इतिहासात हजार वर्षे मागे जावे लागेल त्या शिवाय शिवराज्याभिषेकाच्या निर्णयाची महती पटणार नाही.
चौहान वंशाच्या क्षत्रिय राजांचे १२व्या शतकाच्या उत्तरार्धात अजमेर राज्य होते. यातीलच एका राजा होता पृथ्वीराज चौहान. हा दिल्लीच्या तख्ताचा शेवटचा हिंदू राजा. महापराक्रमी योद्धा व कुशल धनुर्धर अशी त्याची ख्याती होती. याला 'राय पिथौर' नावानेही ओळखले जाते! राजपूत इतिहासातील चौहान (चाहमान) घराण्यातील तो सर्वात प्रसिद्ध राजा होय. गझनीच्या शहाबुद्दीन मुहम्मद घौरीने भारतावर अनेकदा आक्रमणाचे प्रयत्न केले. दोन वेळा स्वाऱ्या केल्या त्यात एकदा पृथ्वीराजाने त्याचा पराभव केला. मात्र दुसऱ्यायावेळी घौरीने पृथ्वीराजाचा पराभव केला होता ही त्याची इतिहासातली ओळख. अशा या पराक्रमी पृथ्वीराजचा जन्म अजमेरचे राजपूत राजे महाराज सोमेश्वर यांच्या घराण्यात झाला होता. त्यांची आई होती कर्पूरादेवी. या दाम्पत्याला तब्बल १२ वर्षांनंतर पुत्ररत्न प्राप्त झाले होते. पृथ्वीराजच्या जन्मानंतर काही वर्षांपासूनच त्याला मारण्याच्या योजना आखल्या जात होत्या. त्याच्या जन्मानंतर मातापित्यांना हरिराज नावाचा आणखी एक पुत्र झाला. पृथ्वीराज बालपणीच युद्धात तरबेज झाला होता. तलवारबाजीची त्याला विशेष आवड होती आणि त्याची धनुर्विद्या ही एखाद्या वीर योद्ध्याला साजेशी होती. त्याने कुमारवयात असताना जंगलातील शिकारीदरम्यान एका वाघाशी झटापट करुन त्याचा जबडा फाडून काढला होता.
तलवार, धनुष्य यात रमणाऱ्या या राजपुत्राचा एक मित्र होता चंद बरदाई, जो या युद्धकलांसोबत कवितांमध्ये रमणारा होता. चंद बरदाई हा अनाथ बालक होता जो महाराज सोमेश्वर यांना सापडला होता. चंद बरदाई आणि पृथ्वीराज दोघेही सोबतच वाढले. ते एकमेकांचे मित्र तर होतेच, त्याहीपेक्षा ते एकमेकांना भावाप्रमाणे मानत. याच चंद बरदाईने पुढे पृथ्वीराज चौहानचे चरित्र लिहून ठेवले.
त्यासमयी दिल्लीवर तोमर वंशाचा राजा अनंगपालचे राज्य होते. कर्पूरादेवी ही त्याची एकुलती एक मुलगी होती, जी अजमेरचे महाराज सोमश्वर यांची पत्नी आणि पृथ्वीराजची आई होती. अनंगपाल यांना पुत्र नव्हता. त्यांना चिंता होती की दिल्लीचा उत्तराधिकारी कोणाला करायचे. याच चिंतेतून त्यांनी मुलगी कर्पूरादेवी आणि जावई राजे सोमेश्वर यांच्यासमोर पृथ्वीराजला दिल्लीचा युवराज करण्याचा प्रस्ताव ठेवला. दोघांनीही त्याला संमती दिली आणि पृथ्वीराज वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी आजोबा अनंगपाल यांच्या गादीचा वारस झाला. परंतु तो लहान असल्यामुळे त्याची आई कर्पूरादेवीने कदंबवास ह्या मंत्र्याच्या साहाय्याने काही काळ राज्यकारभार पाहत होती.
दिल्लीपती महाराज अनंगपाल यांच्या मृत्यूनंतर इसवीसन ११६६ मध्ये पृथ्वीराजना विधीपूर्वक दिल्लीचे उत्तरदायित्व सोपवण्यात आले. (काही इतिहासकार हे साल ११७८ असल्याचे लिहितात. यावेळी पृथ्वीराज केवळ ११ वर्षांचे होते) अनंगपाल यांच्या निकटवर्तीयांना हे सहन झाले नाही. कानामागून आला आणि तिखट झाला अशी त्यांची पृथ्वीराजाबद्दलची भावना झाली. या असंतुष्टापैकी विग्रह्राज याचा पुत्र, पृथ्वीराजांचा चुलत भाऊ नागार्जुन याला पृथ्वीराजांचे दिल्लीधिपती होणे असह्य होऊ लागले. त्याचा विद्रोह एक दिवस बाहेर पडला. जणूकाही तो महाराज अनंगपाल यांच्या मृत्यूची वाटच पाहात होता. त्याला वाटत होते की ह्या ११ वर्षांच्या बालकाचा युद्धाच्या नावानेच थरकाप उडेल. नागार्जुनला वाटले ते काही पूर्ण असत्य नव्हते. पृथ्वराज बालक नक्कीच होता मात्र तो युद्धाला घाबरणारा नव्हता. त्याच्यासोबत आई कर्पूरा देवीचा आशीर्वाद आणि सेनापती कमासा याचे युद्ध कौशल्य होते. नागार्जुनने तातडीने हालचाली करत अजमेर येथील गुडपुरा येथे हल्ला केला. गुडपुराच्या सैनिकांनी नागार्जुनसमोर शस्त्र टाकले. यामुळे नागार्जुनचा विश्वास द्विगुणित झाला. मात्र, सेनापती कमासाला ही गोष्ट कळताच त्याने दिल्ली आणि अजमेरमधील विरोधकांवर पकड मिळवून गुडपूराकडे मोर्चा वळवला. ते पाहून नागार्जुन भयभीत झाला होता तरीही तो रणभूमीवर उतरला कारण त्याच्याकडे दुसरा पर्यायच शिल्लक नव्हता. दोन्ही बाजूंचे सैन्य निकराने लढत होते अखेर जे व्हायचे तेच झाले. कमासाच्या तलवारीपुढे नागार्जुनचे काही एक चालले नाही आणि त्याचा अंत झाला.
नागार्जुनचे बंड पृथ्वीराजांनी मोडले. मात्र त्याच वेळी शिहाबुद्दीन मुहम्मद घौरीने मुलतानच्या बाजूने गुजरातवर स्वारी केली व पृथ्वीराजाकडे आपले प्रतिनिधी त्याने मांडलिकत्व स्वीकारावे व मदत करावी म्हणून धाडले; परंतु ते प्रतिनिधी अयशस्वी झाले. ह्याच वेळी दुसरा मूलराज ह्या चालुक्य राजाने शिहाबुद्दीन मुहम्मदाचा पराभव केला. त्यामुळे पृथ्वीराजावरील संकट आपोआप निभावले. त्यानंतर पृथ्वीराजाने ११८२ मध्ये पूर्वीच्या अलवार संस्थानाजवळच्या तहशीलवर राज्य करणाऱ्या भादानकांवर स्वारी करून त्यांचा उच्छेद केला. त्यानंतर त्याने केलेल्या युद्धाचे तपशील आढळतात मात्र प्रत्यक्ष त्याने कोणते प्रदेश जिंकले, याचे सविस्तर उल्लेख सापडत नाहीत.
पृथ्वीराजाचे कन्नौजचे राजा जयचंद याच्याशी प्रथमपासूनच सामंजस्य नव्हते. पृथ्वीराज जसा साहसी आणि धाडसी राजा होता तसाच एक प्रेमी देखील होता. त्याचे शत्रु जयचंदची मुलगी संयोगितावर प्रेम होते. मात्र आपसी रंजीशीमुळे ग्रासलेल्या राजा जयचंदांनी जेव्हा राजकुमारी संयोगिताचे स्वयंवर ठेवले तेव्हा पृथ्वीराजला त्यात निमंत्रण देखील देण्यात आले नव्हते. हे कमी पडले की काय म्हणून राजा जयचंदाने आपली कन्या संयोगिता हिच्या स्वयंवरप्रसंगी हुबेहूब पृथ्वीराज सारखा दिसणारा पुतळा पहारेकऱ्यासारखा प्रवेशद्वारात द्वारपाल म्हणून उभा केला; आपल्या पित्याच्या या खोडसाळपणावर संयोगिता नाराज होती. तिचेही पृथ्वीराजावर प्रेम होते. भावी नियोजित वरास निवडण्याची वेळ जवळ आली तसा तिने मनोनिग्रह पक्का केला की इथे उपस्थित एकाही राजाला हार न घालता आपल्या आवडत्या पृथ्वीराजाच्या पुतळ्यास हार घालावयाचा. पण पृथ्वीराजाने अकस्मात येऊन त्या पुतळ्याला हार घालणाऱ्या संयोगितेला घोड्यावर घालून पळवून नेले. या घटनेचा स्पष्ट निर्देश तत्कालीन लेखांत नाही; तथापि जयानकाने लिहिलेल्या 'पृथ्वीराजविजय' ह्या ग्रंथात तिलोत्तमा अप्सरेने पृथ्वीवर अवतार घेतलेल्या एका राज्यकन्येवर पृथ्वीराजाचे प्रेम बसल्याचे वर्णन आले आहे. ते याच घटनेस उद्देशून असावे. जयानक पृथ्वीराजाच्या दरबारी होता. दुर्दैवाने त्याच्या काव्याचा यापुढील भाग उपलब्ध नाही.
पृथ्वीराजाविषयीची माहिती प्रामुख्याने चंद बरदाईच्या 'पृथ्वीराज रासो' (हिंदी) व त्याचा आश्रित कवी जयानक याच्या 'पृथ्वीराजविजय' (संस्कृत) या काव्यांवरुन मिळते. त्यापैकी 'पृथ्वीराज रासो' हे काव्य नंतरचे असून अतिशयोक्तींनी व दंतकथांनी भरले आहे. तर 'पृथ्वीराजविजय' हे समकालीन असून अधिक विश्वासनीय आहे. त्यातही दृष्टांत व पुराणदाखले आहेत. परंतु दुर्दैवाने त्याचे एकच हस्तलिखित आणि तेही जीर्णशीर्ण अवस्थेत उपलब्ध आहे. याशिवाय काही कोरीव लेखांवरुन व तत्कालीन यवनी राजवटीच्या पदरी असणाऱ्या मुस्लीम इतिहासकारांच्या ग्रंथांवरुन पृथ्वीराजाविषयी काही माहिती मिळते. तत्कालीन इतिहासकारांमध्ये यातील बऱ्याच घटनात एकवाक्यता आढळत नाही. या घटनेनंतर पुढे पृथ्वीराज चौहान आणि आणि गझनीचा मुहम्मद घौरी यांच्यात सातत्याने रक्तरंजित संघर्ष झाला यावर मात्र इतिहासकारांत दुमत नाही.
मुहम्मद घौरीला समजावून घेण्यासाठी इतिहासात थोडे मागे गझनीच्या मुहम्मदापर्यंत जावे लागेल त्याशिवाय घौरीचे सामर्थ्य अन योग्यता याची पार्श्वभूमी कळणार नाही. मुहम्मदापर्यंत जाण्यासाठी गजनीचा इतिहास पाहणे क्रमपप्राप्त आहे. आजही गझनी हे शहर अफगाणिस्तानात आहे, आजच्या जुन्या गझनीमध्ये अनेक पडक्या वास्तू असून सु. ४२ मी. उंचीचे दोन कुतुबमीनारसदृश मीनार आहेत. काबूल रस्त्यावर सु. १·५ किमी. वरील रौझा येथे मुहम्मदाची कबर आहे. अनेक संत, कवी इत्यादींच्या कबरी गझनीत असल्याने शहराला धार्मिक महत्त्व आहे. गझनीजवळ बौद्ध अवशेषही मिळाले आहेत. सध्या आयसीस या अतिरेकी संघटनेने या शहराला विशेष इस्लामी सभ्यतेचे केंद्र म्हणून दर्जा दिला आहे याचा इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो. ९६३ मध्ये अलप्तगीन या तुर्की सरदाराने गझनीस आपली राजधानी वसवली. त्याचा जावई सबक्तगीन याने गझनीचे साम्राज्य खूप वाढविले. सबक्तगीनचा मुलगा मुहम्मद याच्या कारकीर्दीत (९९८–१०३०) गझनी वैभवशिखरावर पोहोचले. भारतातून लुटून नेलेल्या संपत्तीमुळे गझनीला सौंदर्यशाली नगरी बनविणाऱ्या अनेक वास्तू तेथे निर्माण झाल्या. ११५३ साली अलाउद्दीन घौरी याने गझनी बेचिराख केले. त्यानंतर गझनीस पुन्हा ऊर्जितावस्था आली नाही. नंतर नादिरशाहने त्यावर कब्जा मिळवला. या साखळीत अखेरीस हे शहर आधुनिक अफगाणिस्तानचा निर्माता अहमदशाह दुर्रानीने घेतले. १८३९-४२ मधील इंग्रज-अफगाणयुद्धात काही दिवस इंग्रजांचा येथे अंमल होता. १९४८-४९ साली जुन्या गझनीच्या उत्खननामुळे जगाचे पुन्हा इकडे लक्ष वेधले. विसाव्या शतकात काबूल-कंदाहार महामार्गाच्या निर्मितीनंतर मधला टप्पा म्हणून गझनीस पुन्हा महत्त्व मिळाले. या गझनी शहराला इतिहासात सर्वात जास्त महत्व अन ऐश्वर्य मिळवून दिले यमिनी वंशाच्या मुहम्मद गझनीने!
मुहम्मद गझनी हा अफगाणिस्तानातील गझनीच्या यमिनी घराण्यातील सर्वश्रेष्ठ व पराक्रमी सुलतान. भारतातील तुर्की किंवा यमिनी या घराण्याच्या सत्तेची सुरुवात मुहम्मदापासून झाली. तुर्की सुलतान सबक्तगीनचा (सुबुक्तिगीन) तो मुलगा. बापाबरोबर युद्धात राहून त्यास लढाईचे उत्कृष्ट शिक्षण मिळाले होते. सावत्रभाऊ इस्माईल याच्याशी भांडून तो गझनीच्या गादीवर आला. राज्यावर येताच ९९८ साली महमूदाने सामानी सुलतान अब्दुल मलिक ह्याच्याबरोबर युद्ध करुन हेरात, बाल्ख व खोरासान येथे आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याचे यश मान्य करुन बगदादच्या खलीफाने त्यास अमीनुल्मिल्लत व यमीनुदौल्ला हे किताब दिले. धर्मप्रसार व राज्यविस्तार या उद्देशाने त्याने इ. स. १००१-२४ पर्यंत हिंदुस्थानवर सतत स्वाऱ्या केल्या. १००१ मध्ये महमूदाने लाहोरच्या जयपालाविरुद्ध स्वारी करुन त्याचा पराभव केला. १००४-१००५ मध्ये मुलतान व पंजाब यांवर त्याने चढाई केली. तेव्हाच्या दिल्लीश्वराचा राजा जयपालचा मुलगा अनंगपालाच्या विरुद्ध झालेल्या लढाईत त्याने राजाचा पराभव केला. ह्या सर्व स्वाऱ्यांत त्याला स्थानिकांनी प्रखर प्रतिकार केला होता. या लढाया भौगोलिक वर्चस्वाइतक्याच धार्मिक कारणासाठी लढल्या गेल्या. कारण मुहम्मदाचा हेतू केवळ साम्राज्यविस्ताराचा नसून धर्मप्रसाराचाही होता.
या विजयानंतर हिमालयाच्या उतरणीवर असलेले नगरकोटमधील पवित्र देवालय एकाएकी लुटून तो गझनीस निघून गेला. दरम्यान इ. स. १००२-१००३ मध्ये तो इराण व अफगाणिस्तानातील सीस्तान येथे लढाईत गुंतल्याने हिंदुस्थानातील लोकांना थोडासा दिलासा मिळाला; परंतु त्याने पुन्हा हिंदुस्थानवर स्वाऱ्या करुन लाहोर, स्थानेश्वर, कनौज, मथुरा, कालिंजर, ग्वाल्हेर वगैरे शहरे लुटली व तेथील प्रसिद्ध देवालये फोडून अमाप संपत्ती गझनीस नेली. (इथे लक्षात येईल की आताच्या भारताच्या भौगोलिक स्थितीतील मध्य-उत्तर भारतात त्याने किती खोलवर चढाया केल्या होत्या, त्याच्या या वेगवान स्वाऱ्यात त्याला यश मिळवून देण्यात त्यांच्याकडील अरबी घोड्यांचा खूप मोठा वाटा होता) १०१४ ते १०१७ मध्ये त्याने मध्य आशियात लष्करी मोहिमा काढून समरकंद, बुखारा वगैरे प्रदेश जिंकले. १०२४ मध्ये मुहम्मदाने केलेली काठेवाडातील सोमनाथची स्वारी ही भारतावरील अत्यंत महत्त्वाची स्वारी होय. त्या वेळी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पवित्र व प्रसिद्ध असलेल्या सोमनाथ मंदिराला भारतातील अनेक राजांनी अगणित देणग्या दिलेल्या होत्या. मुहम्मदाने कोणालाही न जुमानता देवालय उद्ध्वस्त करुन तेथील अगणित लूट बरोबर घेऊन तो गझनीस परतला. यानंतर मुहम्मदाने तीन वर्षांनी मुलतानवर स्वारी केली (१०२७). या शेवटच्या स्वारीनंतर तो तीन वर्षांनी गझनी येथे मरण पावला. त्याला सात मुलगे होते. त्यापैकी मस्ऊद व मुहम्मद असे दोन राज्यधिकारी झाले.
मुहम्मदाने अफगाणिस्तान, इराण, अमूदर्या नदीच्या पलीकडचा प्रदेश व पंजाबच्या काही भागावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती. पायदळ आणि घोडदळ मिळून साधारणतः एक लाख एवढे सैन्य व सु. १,७०० हत्ती आणि अगणित सोनेनाणी अशी त्याची संपत्ती होती. खलिफाने त्यास अखेरच्या दिवसांत ‘कह्फुद्दौला वल्-इस्लाम’ अशी आणखी एक पदवी देऊन त्याचा गौरव केला. मृत्यूपूर्वी जिंकलेल्या विशाल प्रदेशात कार्यक्षम प्रशासनव्यवस्था निर्माण करणे मुहम्मदास शक्य झाले नाही. शिवाय त्याच्या मुलांतील अंतर्गत चुरशीमुळे त्याचे राज्य पुढे फार काळ टिकले नाही; तथापि मुहम्मद हा न्यायप्रिय, विद्वानांचा चाहता, उदार आणि धर्मशील होता याविषयी दुमत नाही. त्याने फक्त मूर्तिभंजकाचेच कार्य केले असे नाही, तर तो विद्या, कला व काव्याचा भोक्ता होता. स्वतः सुन्नी व कडवा इस्लामी असूनही त्याने फार्सी साहित्य व विद्या यांचे संवर्धन केले. अल्-बीरुनी, अल्-उत्बी, अल्-बैहकी, उनसुरी, फर्रुकी, असजदी, फिर्दौसी इ. अरबी-फार्सी लेखक, कवी आणि विद्वान त्याच्या दरबारी होते. त्याने गझनीत एक भव्य मशीद बांधली. त्या मशिदी शेजारी एक पाठशाळा सुरु केली. यातील विद्यार्थासाठी मोफत निवासगृह होते आणि अनेक अध्यापक व विद्यार्थी बाहेरुन अध्ययनासाठी तेथे येत. त्याने गझनीतील रस्ते सुधारुन दुकानांची सोय केली आणि वजनमापे यांत सुधारणा केल्या. ती तपासण्यासाठी एक अधिकारी नेमला. यामुळे खोरासान ते लाहोर यांच्या दरम्यान व्यापार वाढला. सेना व प्रजा यांसाठी त्याने एका बाजूस नागरी लिपित ‘अव्यक्तमेकं, मुहम्मद अवतार’ असा मध्यभागी मजकूर असलेली सोने, रुपे, तांबे यांची नाणी पाडली होती. त्याने न्यायदानात गरीब-श्रीमंत असा भेद केला नाही आणि विधवा स्त्रिया, सामान्यजन या सर्वांना समान वागणूक दिली. त्याने बांधलेल्या अनेक वास्तूंतूनही त्याची कलादृष्टी दिसते. त्याने कालवे बांधून शेतीस उत्तेजन दिले. त्यातील बन्द-इ-सुल्तान हा विशिष्ट बनावटीचा असून त्याचा काहीसा उपयोग आजही करतात. गझनी शहरात विजयाचे स्मारक म्हणून त्याने बांधलेले मिनार, लहान मशिदी, उत्कृष्ट कारंजी, हौद इ. गोष्टीवरून त्याचे वास्तुकलेवरील प्रेम स्पष्ट होते. त्याचा स्वतःचा राजप्रासाद उत्तम रीतीने शृंगारलेला होता. मुहम्मदाने आपल्या विजयांद्वारे त्याच्यानंतर येणाऱ्या हिंदुस्थानावरील आक्रमकांचा मार्ग सोपा करुन ठेवला. अशा या ऐश्वर्य संपन्न गझनीवर नंतर ताबा मिळवला मुहम्मद घौरीने!
दहाव्या शतकात घौरच्या अफगाणांनी घोर येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. घौरी व गझ्नी यांतील अनेक वर्षांच्या तंट्यातून घौरी घराणे इतिहासाला परिचित झाले. घुर किंवा घौर या तुर्की राजघराण्यात त्यांचा जन्म झाला. घुर आधुनिक अफगाणिस्तानच्या पश्चिम मध्य भागात हेरात आणि गझनीच्या मधोमध आहे. तुर्की अमीरांना घुरीद किंवा घौरी या नावाने ओळखले जात होते. शन्सबानी वंशातील मलिक इझ्झुद्दीन अल् हुसैन याच्या कुत्बुद्दीन, सैफुद्दीन व अलाउद्दीन या तीन मुलांनी नावलौकिक मिळविला. १००९ मध्ये मुहम्मद गझनीने घोर प्रांत काबीज केल्यानंतर घोर व गझनी घराण्यांतील तंटे विकोपाला गेले. त्यातूनच बहराम गझनीने कुत्बुद्दीन व सैफुद्दीन घौर यांना ठार केले. त्यामुळे त्यांचा भाऊ अलाउद्दीन याने गझनीवर चाल करुन, तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यास सेल्जूक लोकांशी सामना द्यावा लागला. अलाउद्दीनचा मुलगा सैफुद्दीन ११५६ मध्ये गादीवर आला. ११५७ मध्ये त्याचा खून झाल्यानंतर त्याचा चुलत भाऊ घियासुद्दीन हा गादीवर बसला. त्याने ११७३ मध्ये गझनी शहर काबीज करून तेथे आपला भाऊ शिहाबुद्दीन यास नेमले. हाच पुढे मुहम्मद घौरी म्हणून प्रसिद्ध झाला. घौरी घराण्यातील हा कर्तबगार सुलतान होय. शिहाबुद्दीन उर्फ मुईझ्झुद्दीन घौरी ऊर्फ मुहम्मद या नावांनी तो इतिहासात प्रसिद्ध आहे. उत्तर भारतातील यवनीराज्याचा पहिला शासक अन् संस्थापक म्हणून तो आपल्याला जास्त परिचित आहे.
घियासुद्दीन १२०२ मध्ये मरण पावला. नंतर शिहाबुद्दीन सर्व राज्याचा मालक झाला. त्याच्या कारकीर्दीत घौरी राज्याचा विस्तार पंजाबपासून बॅबिलॉनपर्यंत व ऑक्सस नदीपासून हॉर्मझच्या सामुद्रधुनीपर्यंत झाला होता. माळवा व त्या जवळील काही प्रांतांखेरीज सबंध उत्तर हिंदुस्थानचा पश्चिम भाग त्याने जिंकला होता. मुहम्मद घौरीने हिंदुस्थानात यवनी राज्याचा पाया घातला. मुहम्मदाने गझनी ताब्यात घेतल्यामुळे घियासुद्दीनने त्याला गझनी प्रांताचा प्रशासक म्हणून नेमले तसेच मर्जीनुसार गझनीचे प्रशासन चालवण्याची आणि राज्याचा विस्तार करण्याची त्याला परवानगी दिली. काही वर्षांनी घियासुद्दीनच्या निधनानंतर मुहंमदाने आपले सार्वभौम राज्य जाहीर केले. गुजरातवर इ. स. ११७८ मध्ये केलेल्या स्वारीत मुहम्मदाचा पराभव झाला होता असूनही ११७९ मध्ये त्याने पेशावर येथे आपला अंमल बसविला. जम्मूच्या विजयदेव राजाशी हातमिळवणी करुन त्यांने लाहोरच्या सुलतान खुसरौखानचा पराभव केला व पंजाबमध्ये आपली सत्ता स्थापिली. यानंतर त्याने आपला मोहरा दिल्लीच्या दिशेने वळवला! (आधीच्या आणि या उल्लेखावरुन स्पष्ट होते की अकराव्या शतकात देखील आताच्या लाहोर अन् जम्मूमध्ये हिंदू राजे राज्य करत होते)
याच दरम्यान दिल्लीचा अखरेचा हिंदू राजा पृथ्वीराजाने आपल्या दिग्विजयास सुरुवात केली. त्याने प्रथम बुंलेदखंडावर स्वारी केली. परमर्दी या चंदेल्ल राजाचा पराभव केला. पुढे त्याने ११८७ मध्ये गुजरातवर आक्रमण करुन ते उद्ध्वस्त करण्याचा यत्न केला; पण तेथे त्यास फारसे यश आले नाही. त्यामुळे त्याने चालुक्य नृपती दुसरा भीम याच्याशी तह करुन युद्ध थांबविले. या सर्व शेजाऱ्यांच्या युद्धांतून त्यास कोणत्याच प्रकारचा फायदा झाला नाही. पृथ्वीराज चौहानने आपल्या राज्यावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येकाला चोख धडा शिकवला आणि साम्राज्याचा विस्तार केला. त्यांचा मोहम्मद घौरीसोबत अप्रत्यक्ष संघर्ष ११७९-८० मध्ये सुरु झाला होता. मात्र रणभूमीवर समोरासमोर गाठ पडण्यासाठी ११वर्षे जावी लागली. ११९१ मध्ये या दोघांची गाठ रणभूमीवर पडली.
११९१ मध्ये शहाबुद्दीन मुहम्मद घौरीने पृथ्वीराजाच्या राज्यावर आक्रमण करुन तबरहिंदचा अभेद्य किल्ला हस्तगत केला आणि देशात धुमाकुळ माजविला. तेव्हा पृथ्वीराजाने मोठी फौज घेऊन त्याच्याशी सामना देण्याचे ठरविले. पंजाबात भठिंड्यापासून ४३ किमी. वर आताच्या हरियाणामधील थानेसर म्हणजेच तत्कालीन तराईन येथे दोन्ही सैन्यांची घनघोर लढाई होऊन मुहंम्मदाचा पराभव झाला. राजपुतांनी त्याचा पाठलाग न करता त्यास जाऊ दिले. पुढे त्यांनी पंजाबही हस्तगत केला नाही. (खरे तर राजपूत राजांची ही औदार्याची अनाठायी भूमिका नंतर त्यांच्या विनाशास कारणीभूत ठरली) यानंतर मुहम्मद घौरीने सातत्याने पृथ्वीराजावर स्वाऱ्या केल्या अन् पराभव स्वीकारले, या पराभवाचे शल्य मुहंम्मदाच्या मनात सलत राहिले. त्याने पुढील वर्षी ११९२ मध्ये अफगाण व तुर्क सैन्याची मोठी फौज जमवून पुन्हा पृथ्वीराजावर स्वारी केली. पृथ्वीराजाच्या हाकेला प्रतिसाद देऊन अनेक उत्तर भारतीय राजे त्याच्या मदतीला आले. तराईन येथेच दोन्ही सैन्यांची गाठ पडली. मुहंम्मदाने ‘आपण आपल्या भावास विचारुन माघार घेऊ’ असा खोटा संदेश पाठवल्यामुळे राजपूत सैन्य गाफील राहिले, या संधीचा फायदा घेऊन अचानक हल्ला करुन मुहंम्मदाने जय मिळविला. कन्नौजचे महाराज जयचंद यांनी पृथ्वीराज चौहान बरोबरच्या वैमनस्यापोटी मुहंम्मद घौरीशी हातमिळवणी केली होती त्याचा मुहंम्मद घौरी ला खूप फायदा झाला. त्याची परिणिती पृथ्वीराज चौहान यांच्या पराभवात अन् अटकेत झाली. उत्तर भारतामध्ये लूट करून सर्व दौलत गझनीला नेली गेली व पृथ्वीराज चौहान यांना कैद करून मुहम्मद घौरी त्यांना गझनीला घेऊन गेला. पृथ्वीराज चौहान पकडले गेल्यानंतर चौहान वंशाच्या साम्राज्यास उतरती कळा लागली. इतर राजांनी निकराने लढण्याचा प्रयत्न न करता मांडलिकत्व स्वीकारुन आपली संस्थाने राखली. सर्वांनी हाराकिरी केली. इथे स्वराज्याचे उदाहरण द्यावेसे वाटते-संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर मराठ्यांनी प्राण पणाला लावून औरंगजेबाशी जो निकराचा संघर्ष करुन त्याचे थडगे शेवटी मराठी मातीत गाडले होते तसे इथे काही घडते तर इतिहास वेगळा झाला असता. पण इतिहासात ‘जर तर’ला शून्य मोल आहे !
मुहंम्मद घौरीने पृथ्वीराज चौहानचा तराईन येथील लढाईत पराभव केला व दिल्ली सल्तनतीची सुरुवात केली. त्यामुळे भारतीय इतिहासातील परकीय आक्रमाक राज्यकर्त्यांमध्ये त्याची गणना होते. वास्तवात पृथ्वीराज चौहान यांनी मुहंमद घौरीचा जेव्हा पराभव केला तेव्हा त्याला जीवदान दिले परंतू कन्नौजचे महाराज जयचंद यांनी महाराज पृथ्वीराज चौहान यांचेवरील सुडापोटी गझनीचा मुहंमद घौरीशी हातमिळवणी करुन आपसातील सूड घेण्यासाठी देश-देव-धर्म सर्व पणाला लावले आणि धुळीस मिळवले!
मुहंम्मद घौरीने कपटनीतीने पृथ्वीराजला बंदी बनवले. जेव्हा पृथ्वीराजला घौरीसमोर आणण्यात आले तेव्हा त्याला नजर झुकवून बोलण्याचा आदेश दिला मात्र, पृथ्वीराजने तेवढ्याच तडफेने उत्तर दिले, 'एक सच्चा राजपूत आपली नजर तेव्हाच झुकवतो जेव्हा त्याच्या शरीरात प्राण राहात नाही'. हे बाणेदार उत्तर एकून घौरी संतप्त झाला त्याने पृथ्वीराजच्या डोळ्यात तप्त सळई घालण्याचा आदेश दिला. देखण्या राजबिंड्या पृथ्वीराजांचे डोळे फोडण्यात आले या दरम्यान पृथ्वीराज चौहान यांची एक छोटेखानी फौज आणि त्यांचा बालमित्र चंद बरदाई मुहम्मद घौरीच्या परतीच्या वाटेने पाठलाग करत करत थेट गझनीच्या सीमेपर्यंत आले होते. राजपूत इतिहासात इथे ते एका मेरुमण्याच्या शोधात आले असल्याचा गोंधळात टाकणारा उल्लेख आढळतो, या सैन्याचे उल्लेख 'रासो'मध्येही आहेत पण या सैन्याचे पुढे काय झाले याविषयी ठोस माहिती कुठेच सापडत नाही. मात्र सैन्याच्या या तुकडीबरोबर आलेला चंद बरदाई हा मुहम्मद घौरीने त्याच्या दरबारात बोलाविलेल्या कवींच्या-शायरांच्या जलशात सामील झाल्याचे उल्लेख आहेत.
आपल्याला ज्या हिंदू राजाने पराभवाची धूळ चारली त्याला जनतेमध्ये खुलेआम फासावर लटकवावे असं घौरीच्या मनात होते. याची तीन कारणे होती, एक म्हणजे आपल्या प्रजेचा आपल्या सुलतानाच्या शौर्यावर-ताकदीवर विश्वास टिकून राहावा, दुसरे म्हणजे समग्र अफगाण बादशहांत आपला वचक बसावा अन् तिसरे कारण दिल्लीच्या सल्तनेत त्याची दहशत कायम राहावी हे होते.
मात्र राजपूत इतिहासकारांच्या मते घौरीचा अंत पृथ्वीराजांनी केला होता. त्याची रसभरीत वर्णने आढळतात. त्यानुसार पृथ्वीराजास जाहीर मृत्यूदंड देण्यापूर्वीच्या काळात घौरीने तिरंदाजीची स्पर्धा आयोजित केली. दरम्यान पृथ्वीराजचा मित्र चंद बरदाई हा घौरीच्या दरबारात कवी म्हणून सामील झाला होता. या स्पर्धेदरम्यान त्याने सम्राट घौरीला सांगितले की, 'पृथ्वीराज एक उत्कृष्ट धनुर्धर आहे जो केवळ आवाजावरुन लक्ष्याचा वेध घेतो.' घौरीला हे काही पटले नाही.त्याला खात्री करून घ्यावी वाटली. त्याने तिरंदाजी स्पर्धेसाठी पृथ्वीराजला आणण्यास सांगितले. तेव्हा चंद बरदाईने एका दोह्यातून पृथ्वीराजला बाण नेमका कुठे मारायचा आहे हे सांगितले. तो म्हणाला, "चार भाष चौबीस गज अंगुल हस्त प्रमाण, त ऊपर सुल्तान है अब मत चुके चौहान". यापुढची चाल करताना चंद बरदाई म्हणला, 'सम्राट, पृथ्वीराज हा एक राजपूत राजा आहे. तो फक्त दुसऱ्या राजाच्या आदेशानेच बाण सोडेल तेव्हा तुम्ही स्वतः त्याला धनुष्य चालवण्याचा आदेश द्यावा.' घौरीनेही तसे केले, आणि पृथ्वीराजचा बाणाने घौरीच्या छाताडाचा वेध घेतला, घौरी तिथेच गतप्राण झाला. यानंतर दोन्ही मित्रांनी एकमेकांना मिठी मारली आणि पुढे काय होणार याची त्यांना कल्पना होती त्यामुळे त्यांनी एकमेकांवर वार करुन वीर मरण पत्करले. संयोगिताला ही माहिती मिळाल्यानंतर तिनेही जीवन संपवले. मात्र इतिहासात याचे दस्त ऐवज नाहीत.
काही इतिहासकारांच्या मते १२०५ मध्ये ख्वारिज्मच्या शाह अलाउद्दीन मुहम्मदने शिहाबुद्दीन मुहम्मद घौरीचा अंदखूई (मध्य आशिया) येथे पराभव केला. १५ मार्च, इस.१२०६ रोजी आताच्या पाकिस्तानच्या झेलम जिल्ह्यातील दमिक या गावी एका अंतर्गत यादवीच्या युद्धात मुहम्मद घौरी सिंधू नदीकाठी गख्खर लोकांचे बंड मोडण्यात गुंतला असता, विश्वासघाताने झालेल्या खूनात तो मृत्युमुखी पडला असंही मानलं जातं. मुहम्मद घौरीच्या मृत्युच्या कारणाची, काळाची नेमकी पुष्टी होत नाही. या उलट मुहम्मद घौरीने तराईनच्या युद्धपश्चात काय काय केले याचे विश्लेषण करणारी ऐतिहासिक कागदपत्रे पृथ्वीराजाने केलेल्या घौरीच्या वधावर प्रश्नचिन्ह लावतात हा ही एक मुद्दा आहे. कारण तराईन येथे राजपुतांचा पराभव केल्यानंतर त्याने अजमेर, कनौज, वाराणसी ही राज्ये घेतली. जिंकलेल्या प्रदेशांची व्यवस्था पहाण्याकरिता त्याने दिल्ली येथे आपला गुलाम कुत्बुद्दीन ऐबक यास सुभेदार नेमले. मुहम्मद घौरीच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बख्तियार खल्जी नावाच्या दुसऱ्या एका सरदाराने अयोध्या आणि बिहार हे प्रांत जिंकून तेथील हिंदू सत्तेचा शेवट केला. अशा रीतीने माळवा व त्याजवळच्या काही प्रांताखेरीज सर्व उत्तर हिंदुस्थान यवनांच्या ताब्यात आला. हे उल्लेख इतिहासात आढळतात त्यामुळे घौरीवधाच्या पृथ्वीराजांच्या घटनेची विश्वासार्हता नष्ट होते. शिवाय तत्कालीन इतिहास साधनांत याचा उल्लेखहीनाही. मुहम्मद घौरीला मुलगा नसल्याने त्याचा पुतण्या गादीवर आला. त्याच्या मरणानंतर ख्वारिज्मच्या शाहांनी ते राज्य जिंकले. हिंदुस्थानात घौरी घराण्याचा शेवट १२०६ साली व गझनीत १२१५ मध्ये झाला.
पृथ्वीराजास तीन बायका होत्या. त्यांत संयोगिता ही अत्यंत आवडती होती. त्याचा पुत्र गोविंद पुढे अजमेरच्या गादीवर आला. पृथ्वीराज हा स्वत:एक चांगल्यापैकी सेनापती होता; परंतु त्याच्यात राजकारणी पुरुषाची नीतिकुशलता नव्हती. अनेक वेळा कदंबवास या आपल्या मंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे तो वागत असे आणि तो सल्ला काही प्रसंगी अयोग्य असे. पृथ्वीराजाने अनकेदा बचावाचे, औदार्याचे धोरण स्वीकारल्यामुळे त्यास अखेरीस अपयश आले. तबरहिंद ह्या सरहद्दीच्या किल्ल्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे सोडून त्याने अजमीरवरच सर्व डागडुजी केली व मुहंम्मदाचा पराभव केला असतानासुद्धा त्यास सोडून दिले. ह्या लष्करी चुकांमुळे त्याचा विनाश झाला व त्याचे साम्राज्य अधिक काळ टिकू शकले नाही. पृथ्वीराजाने जयचंदाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केल्याचे कुठे आढळत नाही. ‘संयोगिता किंवा स्वदेश’ असा प्रश्न त्याला कधी पडला होता का हे ही कळायला मार्ग नाही. महापराक्रमी असूनही स्वतःच्या चुकीच्या धोरण हेतूंमुळे पराभूत झालेल्या या राजाच्या वधामुळे बचावात्मक व शरणागताची धोरणे स्वीकारण्याची मानसिकता हिंदूंत रुजली. अखेर त्या मानसिकतेला शिवरायांनीच छेद दिला.
हिंदूंच्या पराभवाची कारणमीमांसा : अरब व तुर्क यांनी हिंदुस्थानवर अनेक वर्षे सारख्या स्वाऱ्या केल्या. अनेक वर्षांच्या प्रतिकारानंतर हिंदूंना पराभव पत्करावा लागला; परंतु हिंदूंच्या पराभवाची कारणमीमांसा करताना इतिहासकारांनी एक निष्कर्ष असाही काढला आहे की, जात - वंश सामंजस्य आणि हवापाणी, शौर्य आणि धैर्य या सर्व दृष्टींनी हिंदू हे अरब व तुर्क यांच्या तुलनेने दुर्बल असल्यामुळे त्यांचा पराभव झाला. जगाच्या इतिहासाच्या संदर्भात पाहिले तर हिंदूंनी वर्षानुवर्षे दीर्घकाल केलेल्या प्रतिकाराइतका प्रतिकार इतर कोणत्याही देशांतील लोकांनी केलेला नाही; अरबांना सिंधमध्ये ७५ वर्षे, हिंदु अफगाणिस्तानात २२० वर्षे व पंजाबमध्ये १५० वर्षे लढल्यानंतरच मुसलमानांना ते प्रदेश जिंकता आले होते. प्रदेश जिंकला तरी त्यांना हिंदू संस्कृती व धर्म नष्ट करण्यात यश आले नाही. त्यांची पीछेहाट मात्र निश्चितच झाली.
हिंदूंच्या पराभवाची कारणे ही केवळ बाह्य स्वरूपाची नसून अंतर्गतही होती. वायव्य सरहद्द प्रांत, हिंदू-अफगाणिस्तान व सिंध हे सरहद्दीवरील प्रांत हिंदुस्थानपासून अलग समजले जात होते. हे प्रांत आर्थिक दृष्ट्या मागासलेले प्रांत म्हणून सर्वसाधारण लोक समजत असत. या प्रांतांवर झालेल्या आक्रमणाकडे हिंदुस्थानातील इतर लोकांनी लक्ष दिले नाही. सरहद्दीवर आलेले आक्रमण हे आपणा सर्वांवर आलेले आक्रमण आहे, असे समजून सर्व हिंदू एकवटले नाहीत. मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर हिंदूंनी सरहद्दीवरील संरक्षणाकडे लक्ष दिले नाही; कारण त्यावेळी सबंध भारतात छोटी छोटी अनेक राज्ये होती. सबंध भूमी एका सत्तेखाली नव्हती. जलद दळणवळणाच्या अभावी अत्यंत कर्तबगार, क्रूर व कडव्या सम्राटाला भारतासारख्या मोठ्या प्रदेशावर एकछत्री अंमल फार वर्षे टिकविता आला नाही, हा ही इतिहासाचा एक धडाच आहे.
त्या काळात देशातील बऱ्याच भागात उपाध्याय वर्गाचे वर्चस्व वाढले असल्यामुळे क्षत्रिय व शूद्र लोक त्यांचे दास बनले होते. उपाध्याय वर्गाकडे राजसत्तेचे नेतृत्व होते. हा प्रकार सिंध व काबूल येथे अस्तित्त्वात होता. कर्मकांडांचे स्तोम वाढल्याने राज्यकर्ते व प्रजा यांच्या अंतर पडले, अशी समजूत आहे; पण या दाव्याला काही इतिहासकारांची मान्यता नाही. बहुसंख्य हिंदू हे केवळ कर्मकांडात व्यग्र होते त्यामुळे हल्लेखोर आक्रमकांचे आणखीनच फावले. या काळात पुरोहित वर्गाचे राज्य एखादेच झाले. पुरोहित राज्य आपोआप क्षत्रिय बने.
हिंदूंच्या पराभवाचे आणखी एक कारण म्हणजे हिंदूंचे युद्धकलेतील ज्ञान परिपूर्ण नसून, त्यांनी नवीन युक्त्या किंवा नवीन पद्धती अंगीकारल्या नाहीत. शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्यात ते मागे पडले. शिवाय ‘समुद्रापार गेल्याने धर्मद्रोह होतो’ अशा खुळचट कल्पनांनी ते ग्रासले होते. या उलट कुठेही जाण्यास तयार असलेले अरब किंवा तुर्क हे उत्तम घोडेस्वार असून त्यांनी युद्धकौशल्यात बरीच प्रगती केलेली होती. प्रचंड संख्येने येऊन ते अचानकपणे हिंदूंवर तुटून पडत. त्यामुळे हिंदूंमध्ये एकप्रकारचे भीतिदायक वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या शहरांवर हल्ले करून, यवन तलवारीच्या जोरावर शहरे उद्ध्वस्त करीत. अशा तऱ्हेने वारंवार हल्ले झाल्यामुळे हिंदू समाज दुर्बळ झाला होता. या आक्रमकांनी लढण्याच्या नवीन पद्धती शोधून काढल्या. तर हिंदूंना स्वतःच्या लढण्याच्या पद्धतीमधील गुणदोष अपवादादाखलच उमजले.
अरब व तुर्क लोक धर्मवेड्या भावनेने लढत असल्यामुळे बेभान होऊन लढाई करीत. ‘इस्लामची विचारतत्त्वे जगभर पसरविण्याचे पवित्र कार्य आपण करीत आहोत’, या भावनेने ते लढत. हिंदूंनी मात्र नेहमी बचावात्मक धोरण अंगीकारले. लष्करी शिक्षण, प्रभावी शस्त्रे, क्रूरता, भोगलालसा इत्यादी गुण हिंदूंमध्ये यवनीआक्रमकांएवढे नव्हते. या सर्व पार्श्वभूमीवर शिवरायांच्या स्वराज्याचा आकार जरी खूप लहान वाटत असला तरी त्यांची जिगर आणि महत्वाकांक्षा हिमालयाइतकी होती असे म्हणावे वाटते. कारण पृथ्वीराजानंतर स्वतःचे राज्य निर्माण करून स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे ते हिंदू धर्मातले ते एकमेव राजे होते ! अपवाद फक्त विजयनगरचे साम्राज्य....
(पूर्वार्ध)
- समीर गायकवाड.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement