एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हेरगिरी : टायगर जिंदा रहेगा !
हेरगिरीमध्ये महिलांना ‘हनीट्रॅप’ म्हणून वापरले जाते, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. 1964 साली ब्रिटनचे वॉर सेक्रेटरी जॉन प्रोफ्युमो आणि क्रिस्तीन किलर यांचे लैंगिक संबंध उघडकीस आले.
1994 साली भारताच्या जीएसएलव्ही उपग्रह आणि क्रायोजेनिक इंजिनाचे संशोधन फायनल मोडमध्ये होते. त्याच दिवसांत अकस्मात एके दिवशी इस्त्रोच्या दोन संशोधकांना आणि मालदिवच्या दोन महिला मरीयम रशीदा आणि फौजिया हसन या चौघांना भारताविरुद्ध हेरगिरी करण्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली. या दोन संशोधकांसोबत आणखी एक उद्योजक व आयपीएस अधिकाऱ्यास विशेष जलद तपासाद्वारे अटक केली गेली. 'रॉ' आणि सीबीआयच्या तपासानुसार या दोन महिला ‘हनीट्रॅप’ म्हणून काम करत होत्या. 'इस्रो’चे हे दोन्ही संशोधक या हनीट्रॅपमध्ये अडकून क्रायोजेनिक इंजिनची महत्त्वाची गोपनीय कागदपत्रे त्यांच्या हवाली करत होते. त्या महिला ही माहिती कुणाला देताहेत हे देखील त्यांना नेमके माहिती नव्हते. ती माहिती त्या कुणा परकियांच्या हवाली करताहेत याची मात्र त्यांना कल्पना होती.
ही घटना जितकी नाट्यमय होती त्याहून अधिक थ्रिलिंग होती. यानंतर मात्र आपल्या देशात जे होते तेच झाले. मीडियाचा उथळ वापर करत राजकीय नेत्यांच्या बयानबाजीस उधाण आले. ‘रॉ’च्या म्हणण्यानुसार रशियन क्रायोजेनिक तंत्राच्या सप्लायर चेनमधील माफियांच्या नफेखोरीसाठी या महिला राबत होत्या. या घटनेनंतरचा पुढील घटनाक्रम मात्र नाट्यमय वळणांचा होता. सीबीआयने काही वर्षांनी हे आरोप मागे घेतले. दोन्ही संशोधकांनी आपल्यावरील चौकशी आणि कारवाईस सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सीबीआय पुरावे देऊ शकली नाही आणि तिथे संशोधकांनी न्याय लढाई जिंकली. त्यांना दहा लाख रुपयांची नुकसानभरपाई देखील मिळाली, परंतु त्यांची कधीही भरून न येणारी बदनामी झाली, त्यांची तपस्या धुळीस मिळाली. विशेष बाब म्हणजे २०१२ मध्ये त्या दोन महिलांनाही कारावासातून मुक्त केलं गेलं. हा ‘हनीट्रॅप’ नंतर खूप दिवस संशयाच्या फेऱ्यातच होता.
हेरगिरीमध्ये महिलांना ‘हनीट्रॅप’ म्हणून वापरले जाते, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. 1964 साली ब्रिटनचे वॉर सेक्रेटरी जॉन प्रोफ्युमो आणि क्रिस्तीन किलर यांचे लैंगिक संबंध उघडकीस आले. केवळ विवाहबाह्य संबंध हे या प्रकरणाचे स्वरूप नव्हते, कारण क्रिस्तीन किलर ही एका केजीबी एजंट ह्युजिन इव्हानोव्हसोबत त्याच्या रात्री रंगीन करत होती. थोडक्यात जॉन प्रोफ्युमो एका हनीट्रॅपची शिकार झाले होते. ब्रिटीश संसदेत या प्रकरणावर खोटे निवेदन दिल्याने प्रोफ्युमो प्रकरण आणखीच चिघळले. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधानांनी हे प्रकरण उघडकीस आल्यावर प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देऊन राजीनामा देत त्यांनी आपली नामुष्की कमी केली. पण ब्रिटनने त्यांच्यावर अखेरपर्यंत लक्ष ठेवले अगदी आता सेरजी स्क्रीपलवर जसे रशियाने लक्ष ठेवले अगदी तसेच ! अधूनमधून सातत्याने अशा घटना जगभरात नेहमीच उघडकीस येत असतात. पण कधी कधी मामला याच्या नेमका उलटाही असतो. म्हणजे हेर आपल्या देशासाठी शत्रूराष्ट्रात जातो. तिथं नवी ओळख मिळवतो आणि तिथल्याच विजातीय लिंगी व्यक्तीला विश्वासात घेऊन, तिच्याशी नातं प्रस्थापित करून अत्यंत चलाखीने हेरगिरी करत राहतो. लव्हिंग एजंट हा सर्वात रिस्की आणि धोकादायक मार्ग. जगभरातील आपसातील कट्टर शत्रू असलेल्या देशात अशा घटना नित्य घडतात. आपल्याकडेही अशी घटना घडून गेली. आपल्या एका हेराने थेट पाकिस्तानमध्ये जाऊन तिथं वेगळी ओळख निर्माण करून तिथल्याच एका तरुणीशी लग्न करून थेट पाकिस्तानी सैन्यात चंचूप्रवेश करून एक महत्वाची कामगिरी पार पाडली होती. रवींद्र कौशिक त्यांचे नाव. 'एक था टायगर' हा त्यांच्यावरच बेतला होता अशी वदंता आहे. याच भूमिकेला पुढे नेत सलमानखानने 'टायगर जिंदा है' काढला होता ज्याच्याशी मात्र रविंद्र कौशिक यांचा संबंध नव्हता. सलमानच्या 'टायगर'ला अफाट लोकप्रियता मिळाली, लोकांनी डोक्यावर घेतलं. पण रिअल लाईफमधील टायगरच्या जिंदगीचा अटकेनंतर नरक झाला होता.
रविंद्र कौशिक यांचा जन्म पाक सीमेवर असलेल्या श्रीगंगानगरचा. पाक सीमेला लागून घर असल्यामुळे उर्दूमिश्रित पंजाबीवर त्यांची कमांड होती आणि छंद म्हणून नाटकांवर त्यांचा अंमळ जास्ती जीव होता. एकदा लखनौ इथे भरलेल्या राष्ट्रीय हिंदी नाट्यसंमेलनात मंचावर त्यांचे एकपात्री नाटक सुरु होते. यात चीनने पकडलेल्या एका हेराची भूमिकाही होती. शत्रूने पकडल्यावर प्राण जायची वेळ आली तरी नाट्यनायक तोंड उघडत नाही असं कथानक त्यात होतं. दरम्यान तिथे प्रेक्षकात काही अनाहूत आणि अनामिक पाहुणे उपस्थित होते. ते भारतीय गुप्तचर यंत्रणेतील काही अधिकारी होते. रविंद्रने साकारलेली पात्रे बघून या लोकांनी त्यांना अचूक 'हेर'ले. त्यांची या कामासाठी निवड करत असल्याचं सांगितलं. पुढे जाऊन त्यांना 'रॉ' ने दोन वर्षे प्रशिक्षण दिले. कार्यक्षेत्र म्हणून साहजिकच त्यांना पाकिस्तान दिले गेले. पाकिस्तानची भौगोलिक, धार्मिक. राजकीय आणि सैनिकी माहिती त्यांना पुरवली गेली. एका काटेकोर नियोजनानुसार वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी रविंद्र कौशिकांचा धर्म बदलण्यात आला, ते नबी अहमद शाकिर झाले. त्यांना रीतसर पाकमध्ये एस्कॉर्ट केले गेले. तिथे गेलेल्या रविंद्रांचा कुणालाही संशय आला नाही कारण त्यांची भाषा आणि व्यक्तीमत्व !
तिथे जाऊन त्यांनी कराची विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे त्यांनी लॉ ची पदवी घेतली. पुढे जाऊन पाक सैन्यात ते भरती झाले. कमिशन अधिकारी ते मेजर जनरलपर्यंतची पदे त्यांना मिळाली. हा टप्पा त्यांना गाठता आला कारण त्यांना आपण पक्के पाकिस्तानी आहोत हे सिद्ध करता आलं. या करिता त्यांनी तिथं निकाह केला. कराचीस्थित अमानत नामक देखण्या पाकिस्तानी युवतीशी त्यांनी निकाह झाला. तिच्याशी मात्र त्यांनी प्रतारणा केली नाही. तिच्यावर प्रेम केलं. तिच्यापासून त्यांना संततीप्राप्ती झाली. एक विवाहित मुलकी लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला. हे अत्यंत जिकिरीचं आणि जीवघेणं होतं. इथपर्यंतचा सगळा प्रवास धोक्यांचा होता. 1973 ते 1983 या दहा वर्षात रविंद्र कौशिकनी पाक सैन्यदलांची खडा न खडा माहिती भारत सरकारला पुरवली. त्यामुळे त्यांना 'ब्लॅक टायगर' हा कोड देऊन गौरवले गेले. त्यांनी पाठवलेली माहिती आपल्या देशाला खूप कामी आली.
पण सत्य कधी तरी बाहेर पडतेच. रविंद्रही त्याला अपवाद नाहीत. पाक लष्करात जसजशी त्यांची पदे मोठी होत गेली तसतसे त्यांना भारताशी संपर्क साधण्यात मर्यादा पडू लागल्या. माणसांचा गराडा राहू लागला, बिनतारी संदेश यंत्रणेचे जाळे आपसूक सोबत राहू लागले. भारत सरकारने यावर नामी शक्कल लढवत रविंद्र कौशिक यांच्याकडेच एका हेराला एस्कॉर्ट करायचे ठरावले. त्यासाठी इनायत मसीहची निवड केली गेली. ठरल्या दिवशी त्याला सीमापार पाठवलं गेलं. रविंद्र कौशिक यांच्याशी कुठे आणि कसा संपर्क साधायचा याचा सगळा आराखडा बनवून दिलेला होता. पण सर्वच गोष्टी नेहमीच मनाजोगत्या होत नसतात. संशयास्पद हालचालींमुळे दुर्दैवाने तो पकडला गेला. त्याचा अनन्वित छळ केला गेला. अखेर त्याने आपली असलीयत त्यांना सांगितली. तरीही पाकचे समाधान झाले नाही, त्याचा इथे कोणी तरी साथीदार असणार याचा त्यांना अंदाज होता. त्यांनी त्याला मरणाच्या दारावर उभं केलं आणि त्याचं मौन सुटलं. त्यातून नबी अहमद शाकिर उर्फ रविंद्र कौशिक यांचे पितळ उघडे पडले. आयएसआयने गतिमान हालचाली केल्या, पाक सैन्य हाय एलर्टवर ठेवले गेले आणि सप्टेंबर 1983 सियालकोट येथील लष्करी तळावर रविंद्र कौशिकांना अटक केली गेली. सलग दोन वर्षे त्यांचा अतोनात शारीरिक छळ केला गेला. (तो इथे शब्दात मांडण्याइतके धैर्य माझ्याकडे नाही. त्यांच्यावर खटला चालवला गेला. अपेक्षेप्रमाणे अखेर 1985 मध्ये त्यांना मृत्यूदंड सुनावला गेला. मात्र आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दबावापुढे झुकत ही शिक्षा रद्द करून त्यांना आजन्म कारावासाची सजा सुनावली गेली. तिथून पुढे सलग सोळा वर्षे सियालकोट, मियांवाला आणि कोटलखपत येथील तुरुंगात ठेवलं गेलं. तिथेही त्यांचा अमानुष छळ होत राहिला.
त्यातूनही आपल्या हेरगिरीची चुणूक दाखवित रविंद्रनी जीवाची बाजी लावत आपल्या घरी काही पत्रं पाठवली. ती पत्रे घेऊन त्यांचे आप्तेष्ट तत्कालीन रक्षामंत्र्यांना भेटले. पण काही उपयोग होऊ शकला नाही कारण भारत सरकारने नबी अहमद शाकीर उर्फ रविंद्र कौशिक यांच्याशी आपला संबंध नसल्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे भूमिकेत बदल करणे शक्य झाले नाही. परिणामी रविंद्र कौशिक यांच्या सुटकेसाठी भारत सरकार इच्छा असूनही प्रयत्न करू शकले नाही. या दरम्यान कौशिक यांनी पाठवलेल्या एका पत्रात अत्यंत भावविवश होऊन आपल्या सरकारला काही प्रश्न विचारले होते ज्याचे उत्तर सरकार कधीच देऊ शकले नाही. आपण या देशासाठी प्राणाची बाजी लावली पण बदल्यात मातृभूमीची माती देखील मला नसीब होऊ शकत नाही का ? अशी कैफियत त्यांनी मांडली. प्रचंड छळ आणि मानसिक दबाव सोसूनही रविंद्र कौशिक तब्बल सोळा वर्षे जगले. इतका प्रदीर्घ कारावास भोगणाऱ्या कौशिक यांचे नोव्हेंबर 2001 मध्ये मुलतान येथील पाक सैन्यदलाच्या कारागृहात फुफ्फुसे निकामी झाल्याने निधन झाले. कारागृहाच्या मागील बाजूस असणाऱ्या दफनभूमीत त्यांना दफन केले गेले. रविंद्र कौशिक यांच्या अस्थी भारतात येऊच शकल्या नाहीत, त्यांना शत्रूराष्ट्राच्या मातीतच घुसमटावं लागलं.
विशेष बाब म्हणजे रविंद्र कौशिक यांच्या जीवनावर आधारित चित्रपट सलमानने बनवल्याचा दावा 2012 मध्ये कौशिक यांच्या कुटुंबीयांनी केला तेंव्हा प्रसिद्धी माध्यमांनी रविंद्रना दोन बाय चारच्या कॉलमचेच महत्व दिले. सलमान खानने तर या चित्रपटाद्वारे शेकडो कोटी कमावून त्यातला फुटका पैसाही कौशिक कुटुंबीयास देण्याचे देण्याचे औदार्य दाखवले नाही. किंबहुना आपल्या देशातील कोणत्याही मिडीयाने वा राजकीय व्यक्तींनी, शक्तींनी त्याच्यावर यासाठी दबाव आणला नाही. असे का घडले असावे याचा विचार करताना लक्षात येते की मुळात आपल्या देशातील हेर आणि त्यासंबंधीची यंत्रणा याविषयी आपल्याकडे अत्यंत तोकडी माहिती आहे, शिवाय त्याविषयी आपल्यात प्रचंड औदासिन्य व न्यूनगंड आहे. आता कुलभूषण जाधव यांच्या निमित्ताने ज्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून येताहेत त्याही पोरकटच आहेत. त्यातल्या त्यात समाधानाची एकच बाब आहे ती म्हणजे की कुलभूषण जाधव आपले नागरिक आहेत याचा आपल्या देशाने स्वीकार केला आहे. तत्कालीन सरकारने कौशिक यांना नाकारण्याची भूमिका घेतली गेली होती अर्थात परिस्थितीनुसार तो निर्णय घेतला गेला होता हे 1972 च्या युद्धावरून स्पष्ट झाले होते.
प्रत्यक्षात जेंव्हा एखादे राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रातील व्यक्तीस अटक करून त्याला हेर ठरवते आणि त्यावर सुनावणी सुरु करते, त्याला शिक्षा ठोठावली जाते तेंव्हा आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार त्याची कार्यवाही होणे अपेक्षित असते. पण बऱ्याच वेळा पकडल्या गेलेल्या नागरीकाचे नागरिकत्व त्याच्या मातृक देशाकडून नाकारले जाते आणि हा आमचा माणूस नाही असे प्रतिपादन केले जाते. तर कधी कधी त्याचे आपल्या देशाशी असणारे संबंध स्वीकारून त्यानुसार पुढची पाऊले टाकली जातात. हेरगिरी केली जाते म्हणजे नेमके काय आणि कसे केले जाते, आपल्या देशाची यासाठीची यंत्रणा कशी राबवली जाते, तिचा इतिहास काय आहे यापासून सामान्य जनता कोसो दूर असते पण कुलभूषण जाधवांच्या सारखे प्रकरण घडले की यावरून सोशल मिडीयावर बाष्कळ चर्चा सुरु होतात. ही झाली एक बाजू, मात्र भारतीय हेरांचा इतिहास जेंव्हा जेंव्हा अभ्यासला जाईल तेंव्हा तेंव्हा रविंद्र कौशिक यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाईल. रविंद्र कौशिक यांचं जीवनकार्य अविस्मरणीय तर होतंच होतं पण अतुलनीयही होतं, म्हणूनच 'टायगर जिंदा रहेगा' असं म्हणावंसं वाटतं कारण प्रत्येक भारतीयाच्या हृदयात ते जिवंतच असणार आहेत..
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement