Paris Olympics Swapnil Kusale: कोल्हापूरी जगात भारी!
Paris Olympics Swapnil Kusale: कोल्हापूरी मातीची बातच न्यारी आहे. ‘सुजल्याशिवाय कळत नाही की मारले कुठयं’ हा झाला कोल्हापूरी बाणा. खरंतर पन्नास मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकाराची फायनल गाठताना स्वप्निलची कामगिरीही सातव्या क्रमांकाची होती. आजवरची त्याची सर्वोत्तम वैयक्तीक कामगिरी होती ती इजिप्तच्या कैरोमधिल चौथ्या क्रमांकाची. त्यामुळे येथे भारतीय मीडियानेही स्वप्निलला तसे फारसे गांभिर्याने घेतले नाही. एकतर ऑलिम्पिकमधिल ही शुटींग रेंज पॅरिसपासून तब्बल २७२ किलोमीटर दूर आहे. मुंबईच्या भाषेत सांगायचे झाले तर ऑलिम्पिक मुंबईला असेल तर शुटींग साताऱ्याला. बरं तिथे जाण्यासाठी ऑलिम्पिक समितीकडून कुठलीही सोय नाही. आपल्या खर्चाने जायचे आणि यायचे. त्यामुळे हा प्राणायाम आणि स्वप्नीलचा क्वालिफाईंगमधिल सातवा क्रमांक, यामुळे निम्म्याहून अधिक भारतीय मिडिया पॅरिसमध्य तळ ठोकून होता. या सगळ्यांना स्वप्निलने कोल्हापूरी हिसका दाखविला आणि मग स्वप्निलची प्रतिक्रीया घेण्यासाठी अवघ्या पॅरिसमध्ये धावपळ उडाली.
आम्ही काही मोजके पत्रकार सकाळी साडेतीनला घरातून निघून सव्वा आठला शुटींगच्या रेंजवर इतिहास घडण्याची वाट पहात होतो. आणि तो क्षण जवळ आला. स्वप्निलने चक्क ब्राँझ मेडलला गवसणी घातली आणि कोल्हापूरी जगात भारी असल्याचे दाखवून दिले. जगातील सर्वोत्तम खेळाडू त्याच्यापुढे होते. अशावेळी त्याने अविश्वसनीय पद्धतीने आपली कामगिरी उंचावत नेली. इतकी की एकवेळ अशी आली की फक्त सहा फैरी शिल्लक असताना तो दुसऱ्या क्रमांकावर होता. एक शॉट थोडासा खराब झाला आणि त्याची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. खरं तर त्या खराब शॉटनंतर कुठल्याही खेळाडूने हाय खाल्ली असती. पण स्वप्नील ठरला कोल्हापूरी. त्याने त्या एका खराब शॉटनंतर प्रत्येक शॉटगणिक आपली कामगिरी उंचावली. आणि भारताला एतिहासिक ब्राँझ मेडल जिंकून दिले. वैयक्तीक क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांच्यानंतरचे हे अवघे दुसरे मेडल आहे. खाशाबांनी १९५२ सालच्या हेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत ब्राँझ मेडल जिंकले होते. लिएंडर पेस मुंबईत रहात असला तरी स्पर्धात्मक टेनिस त्याने पश्चिम बंगालकडून खेळले होते.
भारतीय शुटींगला ऑलिम्पिकमध्ये खरी ओळख मिळवून दिली ती अंजली भागवत, सुमा शिरूर आणि दीपाली देशपांडे या तीन शार्प शुटरनी. अंजली आणि सुमा ऑलिम्पकच्या फायनलपर्यंत धडकल्या. पण मेडलला गवसणी घालू शकल्या नाहीत. महाराष्ट्राच्या महिला नेमबाजी गाजवत असताना त्याता महाराष्ट्राच्या पुरुष नेमबाजांचा टक्का जवळपास कुठेच नव्हता. कुसाळेने ही कसर आज भरून काढली. नेमबाजीत ऑलिम्पिकची फायनल गाठणारा तो पहिला महाराष्ट्राचा खेळाडू ठरला. आणि हो त्याने ऑलिम्पिकचे ब्राँझ मेडलही जिंकले. विशेष म्हणजे दिपाली देशपांडे आणि विश्वजित शिंदे यांचा स्वप्निल हा शिष्य. आज या दोघांना स्वप्निलने आयुष्यातील सर्वोत्तम गुरुदक्षिणा दिली.
ऑलिम्पिकचे मेडल जिंकल्यामुळे आता स्वप्निलच्या यशात अनेक वाटेकरी येतील. पण एक टाळी त्याच्या आईवडीलांसाठी जरुर वाजवली पाहीजे. स्वप्निलची आई गावची सरपंच आहे तर वडील शिक्षक. मुलाने खेळात यश मिळावे म्हणून या माऊलींनी हाल सोसले. वयाच्या पंधाराव्यावर्षी स्वप्निलने घर सोडून नेमबाजीसाठी नाशिक गाठले. घरापासून दूर त्याने नेमबाजीसाठी स्वताल वाहवून घेतले. सुरुवातीला रायफल घेण्यासाठी स्वप्निलच्या वडिलांना कर्ज काढावे लागले. स्वप्निलचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी पोटाला चिमटा काढला. आज स्वप्निलने आईवडिलांचे हे ऋण फेडले. नंतर पुण्याच्या लक्ष्य अकादमीने त्याला मोलाची मदत केली. काय योगायोग आहे बघा. स्वप्निलेच कुटुंब हे वारकरी. पंढरपूरच्या विठोबाची मनोभाव कुसाळे कुटुंब सेवा करीत आले आहेत. आणि आज स्वप्निल ऑलिम्पिकची पंढरी समजल्या जाणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकत होता. आधुनिक ऑलिम्पिकचा जनक असणाऱ्या बॅरेन पिअर द कुबर्तिन याची पॅरिस ही जन्मभुमी. यंदा शंभर वर्षानंतर पॅरिसमध्ये ऑलिम्पिकच्या पंढरीत हे ऑलिम्पिक होतोय. आणि स्वप्निलने नेमका हाच मुहुर्त साधलाय. खऱ्या अर्थाने स्वप्निल आज शुटींगचा वारकरी झाला. ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर त्याला जय हरी विठ्ठल म्हणून साद घातल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव मी कधीच विसरू शकत नाही... त्याच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास सांगत होता ही तर फक्त सुरुवात आहे.