(Source: Poll of Polls)
लतादीदी, सचिन आणि क्रिकेटचं प्रेम
Remembering Lata Mangeshkar : यश धुल आणि त्याची विश्वचषक विजेती युवा टीम इंडिया खरोखरच दुर्दैवी म्हणायला हवी. यश धुलच्या टीम इंडियानं इंग्लंडला हरवून अंडर नाईन्टिन विश्वचषकावर पाचव्यांदा भारताचं नाव कोरलं. पण सर्वोच्च यशाच्या त्याक्षणी त्यांच्या डोक्यावर लता मंगेशकर यांच्या आशिर्वादाचा हात नव्हता.
रोहित शर्मा आणि त्याची टीम इंडियाही दुर्दैवी म्हणायला हवी. भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातली हजारावी वन डे खेळण्यासाठी रोहित शर्मा आणि त्याची टीम इंडिया आज अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर उतरली, पण त्यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लतादीदी या जगात नव्हत्या. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातल्या या दोन घटनांच्या निमित्तानं लतादीदींचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे त्यांचं क्रिकेट आणि क्रिकेटवीरांवरचं निस्सीम प्रेम.
संगीत हे लतादीदींचं पहिलं प्रेम असेल, तर क्रिकेट हे त्यांचं दुसरं प्रेम होतं. त्यामुळं आज लतादीदी असत्या, तर यश धुल आणि त्याची युवा टीम इंडिया असो किंवा रोहित शर्मा आणि त्याची सीनियर टीम इंडिया... त्यांच्या यशात... त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला लतादीदींना नक्कीच आवडलं असतं. कारण लतादीदींनी त्यांच्या उभ्या आयुष्यात क्रिकेट खेळावर आणि भारतीय क्रिकेटवीरांवर भरभरून प्रेम केलं. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्यासारख्या एक ना अनेक क्रिकेटवीरांना त्यांच्या निर्व्याज प्रेमाचा वारंवार अनुभव आला आहे.
एक मुंबईकर या नात्यानं लतादीदींचं क्रिकेटप्रेम हे स्वाभाविक म्हणायला हवं. मुंबईच्या ब्रेबॉर्न आणि वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटताना त्यांना एका जमान्यात हजारोंनी पाहिलं होतं. पण जसजशी त्यांची लोकप्रियता वाढू लागली, तसतसं त्यांना मुंबईत स्टेडियमवर येऊन क्रिकेट सामन्यांचा आनंद घेणं अशक्य झालं. मग आपली क्रिकेटची ही आवड त्या अधूनमधून लंडनच्या लॉर्डस स्टेडियमवर भागवू लागल्या. १९८३ साली कपिलदेवच्या भारतीय संघानं विश्वचषकावर आपलं नाव कोरलं, त्यावेळीही लतादीदी लॉर्डसवर प्रेक्षकांमध्ये उपस्थित होत्या. पण कपिलदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का देणारा क्षण वेगळाच होता. तो क्षण म्हणजे भारतीय संघाचं अभिनंदन करण्यासाठी लतादीदी सर्वसामान्य चाहत्यांच्या जथ्थ्यामधूनच त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. कपिलदेवच्या विश्वचषक विजेत्या फौजेचे शिलेदार दिलीप वेंगसरकर यांच्या मनात ती आठवण कायमसाठी कोरली गेली आहे.
दिलीप वेंगसरकर यांनी त्यांच्या हृदयात जतन करून ठेवलेली दुसरी आठवण आहे ती १९८६ साली लतादीदींनी त्यांना लंडनमध्ये खाऊ घातलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या मटणाची आणि गाजराच्या हलव्याची. त्या सेलिब्रेशनचं निमित्त होतं वेंगसरकरांनी लॉर्डस कसोटीत झळकावलेल्या सलग तिसऱ्या शतकाचं. लतादीदींच्या हातचं जेवण किती रुचकर होतं हे सांगून वेंगसरकर आजही तृप्तीचा ढेकर देतात.
लतादीदींच्या मनात भारतीय क्रिकेटवीरांविषयी किती आपुलकी आणि किती आदर होता याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे १९८३ सालच्या विश्वचषक विजयानंतर कपिलदेव आणि त्याच्या सहकाऱ्यांचा एक लाखांची थैली देऊन झालेला गौरव. आजचा जमाना असा आहे की, अंडर नाईन्टिनचा विश्वचषक जिंकल्यानंतर युवा टीम इंडियाच्या प्रत्येक सदस्याला बीसीसीआयकडून ४० लाख रुपयांच्या इनामाची घोषणा झाली आहे. पण १९८०च्या दशकात बीसीसीआयच्या खजिन्यात काही फार पैसे नव्हते. त्यामुळं १९८३ सालच्या विश्वचषक विजयासाठी बीसीसीआयनं भारतीय शिलेदारांना प्रत्येकी जेमतेम २५ हजार रुपयांच्या इनामाची घोषणा केली होती. ती रक्कम ऐकल्यावर आपल्याला आज जितका मोठा धक्का बसतो, त्यापेक्षा कितीतरी मोठा धक्का लतादीदींना त्या काळातही बसला होता. त्यामुळं बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे आणि राजसिंग डुंगरपूर यांनी त्यांच्याकडे म्युझिक कॉन्सर्टचा प्रस्ताव मांडला त्यावेळी लतादीदींनी पुढच्याच क्षणी त्यांना आपला होकार कळवला होता. विश्वचषक विजेत्या भारतीय संघाच्या गौरवनिधीसाठी दिल्लीत आयोजित म्युझिक कॉन्सर्टसाठी त्यांनी एकही नवा पैसा न घेता हजेरी लावली. त्यामुळंच त्या म्युझिक कॉन्सर्टमधून बीसीसीआयला तब्बल २० लाख रुपयांचा गौरवनिधी उभारता आला आणि त्या निधीमधूनच प्रत्येक विश्वचषक विजेत्याला एक लाखांची थैली बहाल करता आली.
लतादीदी आणि सचिन... नातं मायलेकाचं -
सचिन तेंडुलकरविषयी तर काय सांगावं? तो तर साक्षात लतादीदींचा मानसपुत्र आहे. देशातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाइतक्याच लतादीदीही सचिनच्या फलंदाजीच्या चाहत्या होत्या. सचिनलाही जन्मजात संगीताचा कान लाभला आहे. त्यामुळं तोही लतादीदींचा तितकाच मोठा चाहता आहे. पण पहिल्याच भेटीत सचिननं लतादीदींना आई म्हणून हाक मारली आणि तिथूनच दोघांमधल्या नात्यात मायेचा ओलावा निर्माण झाला. सचिनसारखा कर्तृत्ववान लेक लाभणं हे माझं भाग्यच आहे, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले होते. देशातला भारतरत्न हा सर्वोच्च किताब लतादीदींना २००१ साली आणि सचिन तेंडुलकरला २०१४ साली प्रदान करण्यात आला. पण लतादीदींच्या हृदयात सचिन हा कितीतरी वर्ष भारतरत्न म्हणूनच अढळ स्थान राखून होता आणि लतादीदींनी ती भावना जाहीर बोलूनही दाखवली होती. लतादीदी आणि सचिनमधला एकमेकांविषयीचा तो आदर आणि एकमेकांविषयीची ती आपुलकी खरोखरच मायलेकाच्या उदात्त प्रेमाचं एक आगळं उदाहरण ठरावं.
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या माजी कर्णधारांनाही लतादीदींच्या वात्सल्याचा आशीर्वाद लाभला आहे. धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या बातम्यांचं प्रसिद्धीमाध्यमांवर पेव फुटलं, त्यावेळी दीदींनी खास ट्वीट करून धोनीला निवृत्त न होण्याची विनंती केली होती. विराट कोहलीनं २०१६ साली इंग्लंडविरुद्धच्या मुंबई कसोटी सामन्यात २३५ धावांची खेळी उभारली, त्यावेळी लतादीदींनी विराटला एक खास गाणं समर्पित केलं होतं. धोनीच्या टीम इंडियानं २०१० साली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मोहाली कसोटी जिंकली, त्यावेळी लतादीदींनी खास ट्वीट करून त्या विजयाचा शिल्पकार असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणला शाबासकी दिली होती.
‘आम्ही फक्त लता मंगेशकरांना ओळखतो’ -
लतादीदी आणि क्रिकेटवीरांमधल्या भावनिक नात्याचा कळस म्हणजे सुनील गावस्कर यांचा लाहोरमधला किस्सा. ही घटना आहे भारतीय संघाच्या १९८२ सालच्या पाकिस्तान दौऱ्याची. त्या दौऱ्यात सुनील गावस्कर हे भारतीय संघाचे कर्णधार आणि महाराजा फत्तेसिंगराव गायकवाड हे भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. त्या दौऱ्यात भारतीय संघासाठी लाहोरमध्ये एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. पाकिस्तानच्या प्रसिद्ध गायिका नूरजहाँ यांनाही त्या पार्टीचं निमंत्रण होतं. नूरजहाँ या त्या पार्टीला आपल्याच तोऱ्यात वावरत होत्या. फत्तेसिंगराव गायकवाडांनी त्यांची सुनील गावस्करांची ओळख करताना म्हटलं की, आप इन्हे तो जानती ही होगी? त्यावर आपल्याच तोऱ्यात नकारार्थी उत्तर देऊन नूरजहां म्हणाल्या, ‘नही, हम तो सिर्फ इम्रान खान और झहीर अब्बास को जानते है.’ सुनील गावस्करांची खासियत म्हणजे त्यांनी त्यावर अजिबात नाराजी न दाखवता, नूरजहां यांच्याकडून झालेल्या अपमानाची तिथल्या तिथं परतफेड केली. त्यानंतर फत्तेसिंगरावांनी नूरजहांची ओळख करून देताना गावस्करांना विचारलं की, मलिका ए तरन्नुम नूरजहां यांना तुम्ही ओळखलंच असाल? त्यावर गावस्करांचं उत्तर होतं की, नाही, मी फक्त लता मंगेशकरांनाच ओळखतो.
सुनील गावस्करांचं ते उत्तर आज ४० वर्षांनंतरही तितकंच खरं आहे. अवघं जग आजही लता मंगेशकरांनाच ओळखतं.