एक्स्प्लोर
गरीबाच्या झोळीत 'धोंडा'
तिसऱ्या मोठ्या ताटात पुरणाचे धोंडे ठेवले होते. चौथ्या ताटात मावशींना व त्यांच्या नवऱ्याला भरपोषाखाचा आहेर होता. आणि एका छोट्याशा बाॕक्सध्ये मावशींच्या मुलाला सोन्याची अंगठी आणि लेकीला चांदीची जोडवी.

प्रातिनिधीक फोटो
प्रसंग 1 -
" कुठं निघालात काकी दोघंपण नवराबायको जोडीनं, अन् हे बोकड कशाला घेतलय सोबत ?"
" चाललाव बाई बाजारला. इकायचय ही बोकड मंगळवार बाजारात."
" अजून जरा मोठं होऊ द्यायचं की. बारीकच दिसतय अजून."
" अडचण हाय जरा. धोंडा महिना चालू हाय. धाकटीचा पहिला धोंडा हाय. तिचा फोन आल्ता परवा दिशी. तिच्या जावंला आलय माहेरनं धोंडं दान. सासू वटवट करायच्या आधी घिवून ई म्हणली मलाबी धोंडदान. चारपाच हजार तर लागत्यातं की सगळं रीतीनं करायला. तिला साडी,जुडवी,नवऱ्याला पोषाक,तिच्या लेकराला कापडं, सासूला जावला झंपरपीसं. तबक नाही तर आरती तर घ्यावी की एकांदी चांदीची अन् बाकीचा सगळा सराजम काय कमी आस्तुय काय. "
" तुमची परिस्थिती नाही तर करता कशाला. लोकाची सोन्याची सूरी असली म्हणून आपण काय दोरी घेवून फास घ्यायचा असतो काय काकी ?"
" तसं नाही गं माझे चिमणे. तिच्या जावंचं म्हायार साजरं हाय. सोन्यानान्याशिवाय काय आणत न्हायती. आपण आपल्या परस्तिती नुसार तर करावं की. आपल्या लिकीला सासूचा जाच व्हाय नगं. सासूचं सारखं घालून पाडून ऐकाय परिस आपल्याच पोटाला चिमटा घिवून काय आसल ती रितभात केल्याली बरी."
प्रसंग 2 -
शारदामावशी सूनेला तिच्या माहेरनं आलेलं धोंडंदान बघायला अर्ध्या तासात तीनवेळा बोलावून गेल्या. जायची अजिबातच इच्छा नसताना शेजारधर्म म्हणून जावं लागलं. लग्नात रूखवत मांडावा तसं सगळं साहित्य मांडलं होतं. एका ताटात मावशींच्या मुलाला- सुनेला आणलेले भारीतले कपडे मांडले होते. दुसऱ्या ताटात (चांदीच्या) ताटभरून अनारसे होते आणि त्यावर चांदीचाच दिवा तेवत होता. तिसऱ्या मोठ्या ताटात पुरणाचे धोंडे ठेवले होते. चौथ्या ताटात मावशींना व त्यांच्या नवऱ्याला भरपोषाखाचा आहेर होता. आणि एका छोट्याशा बाॕक्सध्ये मावशींच्या मुलाला सोन्याची अंगठी आणि लेकीला चांदीची जोडवी. असा सगळा जावयाला द्यायच्या धोंडेदानाचा सरंजाम दिसत होता. मावशींचा आणि त्यांच्या सूनेचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मुलाच्या चेहऱ्यावर सोन्याच्या अंगठीपेक्षा अधिक झळाळी आलेली दिसत होती. मावशी सेवानिवृत्त शिक्षिका आहेत तर त्यांची सून बँकेत नोकरीला.आणि मुलगा इंजिनियर. उच्चशिक्षित नोकरदार कुटुंबाला या जुनाट प्रथेचं, विनाकष्ट मिळालेल्या घबाडाचं कोण कौतुक. धोंडेदानाचा हा सगळा कौतुकसोहळा नाइलाजाने बघावा लागला.
माझ्या दिवसभराच्या कामांमध्ये मागे पडलेली लेकीच्या धोंडंदानाची बोकड विकून तजवीज करायला निघालेल्या गल्लीतल्या काकीची आर्थिक हतबलता संध्याकाळी शेजारच्या शारदामावशींच्या सूनेला आलेल्या धोंडेंदानाच्या कौतुकसोहळ्यानं अधिकच गडद केली.
भारतीय पंचाग हे चंद्र परिभ्रमणावर अवलंबून आहे तर जाॕर्जियन कालगणणा पृथ्वी परिभ्रमणावर अवलंबून आहे. या दोन्हीमध्ये प्रत्येक वर्षी ११ दिवसांचे अंतर पडते. हे अंतर, हा फरक टाळण्यासाठी प्रतित्रैवार्षिक ( 11+11+11= 33) अशी अधिक महिन्याची योजना करण्यात आली आहे (संदर्भस्त्रोत-विकीपिडीया). एवढंच काय ते अधिकमासामागचं खगोलशास्त्रीय कारण आहे. आपल्याकडील उत्सवप्रेमी आणि स्वार्थांध लोकांनी संधी मिळेल तेव्हा विनाकारण धोंडेदानासारख्या अनेक प्रथा परंपरा निर्माण केल्या आहेत. आणि या परंपरांचं ओझं पुढच्याही पिढ्या कधी नाइलाजाने तर कधी हौसेनं वाहत आल्या आहेत.
"अधिकमास हा विष्णूचा महिना असतो. आपल्या लेकीला त्याच्या घरची लक्ष्मी बनवणारा जावई म्हणजे नारायणच म्हणून अधिकमासात जावयाला चांदीची भांडी, सोन्याचे दागिने आणि धोंडेजेवण देऊन मुलीच्या आईवडिलांनी पुण्य गाठीशी बांधायचे असते." जावयांच्या पदरात सोन्याचांदीचं दान टाकायला भाग पाडणाऱ्या आणि मुलींच्या आईवडिलांना आर्थिक झळ पोहचवणाऱ्या ह्या असल्या कुप्रथा आणि त्यांना चिकटलेल्या पापपुण्याच्या संकल्पना संपण्याची चिन्हे न दिसता उलट त्यांचे ग्लोरीफिकेशन करणेच सुरू असल्याचे याही वर्षी दिसते आहे.
शंभरातले नव्व्यान्नव जावई आणि त्यांचे कुटुंबिय धोंड्यामहिन्याची चातकासारखी वाट बघत असतात. पुरूषवर्गासाठी बायकोच्या माहेरकडून आयतं घबाड मिळण्याची संधीच असते ती. आणि सोबतच मिळालेल्या घबाडाचं सार्वजनिक प्रदर्शन करण्याची खाजही आत दबा धरून बसलेली असते. लग्नाच्या निमित्ताने मिळालेल्या सोन्यानाण्याची हाव पुन्हा अधिकमासात डोकं वर काढत असते. काहींना अपेक्षा नसताना सासरवाडीकरून असं घबाड मिळतं पण ते नाकारण्याचं मोठं मन ते कधीच दाखवत नाहीत. क्वचितच एखाद्या जावयाला आणि मुलीला अशा कुठल्याच प्रथापरंपरांचा लोभ नसतो. पण असे लोक फारच विरळ.
ज्या मुलींच्या माहेरची असा साग्रसंगीत धोंडेदानाचा घाट घालण्याची ऐपत नसते अशांपैकी काही मुली माहेरच्या ऐपतीचा विचार न करता अडून बसतात. जावा-नंणंदांशी स्पर्धा करत आईवडिलांचा जीव मेटाकुटीला आणतात. पोटाला चिमटा घेऊन माहेरच्या माणसांनी आणलेला धोंडेदानाचा सरंजाम त्यांना सासरी भावभावकीत,जावाभावांमध्ये मिरवून टेचात राहायचं असतं. काही मुलींना सासरघरून, नवऱ्याकडून धोंडेदानासाठी सतत विचारणा होते. घालून पाडून बोलले जाते, माहेरच्या आर्थिक परिस्थितीवरून सतत टोमणे मारले जातात. अशा मानसिक त्रासाला कंटाळून शेवटी या मुली नाइलाजाने का होईना माहेरी धोंडेदानाची मागणी करतात.
जावयाला धोंडदान हे कुणी परंपरा म्हणून देतं, कुणाला यात प्रतिष्ठा दिसते, कुणी यापाठीमागच्या पापपुण्याच्या संकल्पनेला बळी पडतं तर काही ठिकाणी मुलीच्या आईवडिलांचा नाइलाज दिसतो. जवळ भरपूर पैसा असणारे लोक स्वतःच्या लेकीला काही देण्याची सतत संधी शोधत असतात. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात अशा लोकांच्या उत्साहाला आलेलं उधान बघण्यासारखं असतं. आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गांनी अशा पद्धतींसाठी आणि सोबतच मिळणाऱ्या प्रतिष्ठेसाठी कितीही खर्च केले तरी त्यांच्या झोळीत ' धोंडा ' पडत नसतो. परंतु आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील लोकांना लेकीला सासरचा जाच होऊ नये म्हणून नाइलाजाने घरखोरी करत असे आर्थिक खड्डे बुजवावे लागतात. "गरीब लोकांनी अंथरूण बघून पाय पसरावे." असं म्हणणाऱ्यांच्या पोकळ तत्त्वज्ञानाला इथं काडीचाही अर्थ नसतो.
खेडेगाव असो नाहीतर शहरीभाग सगळीकडे अशा प्रथांचं स्तोम माजलेलं आहे. (पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा यात अग्रेसर असल्याचे दिसते). खेड्यातली अडाणी माणसं काय आणि शहरातील शिक्षित काय वेगवेगळ्या निमित्तानं येणाऱ्या देण्याघेण्याचं अवडंबर माजवण्यात पटाईत आहेत. आपल्या सुनेला माहेरहून धोंडेदान आलं नाही म्हणून अस्वस्थ होणाऱ्या, सुनेला आडून आडून बोल लावणाऱ्या खेड्यातील अडाणी सासवा जशा आहेत तशा शहरातील उच्चशिक्षितही आहेत. " देणारे देतात हौसेनं, आम्ही कशाला नाही म्हणून त्यांच्या हौसेत मोडता घाला." असा साळसूदपणाचा आव आणत धोंडेजेवणात मिळालेल्या सोन्याच्या अंगठीसोबत सेल्फी काढून सोशल मिडीयावर टाकणाऱ्या काॕर्पोरेट जावईबापूंचीही संख्या काही कमी नाही.
धोंडेदान असो अन्यथा इतर कोणतही निमित्त असो सासरवाडीकडून मिळत असेल तर घ्यायचंच, मिळत नसेल तर मागून घ्यायचं किंवा मागूनही मिळत नसेल तर ओरबाडून घ्यायचं. अशी जी भारतीय जावयांची (त्यांना साथसोबत करणाऱ्या त्यांच्या बायका) आणि जावई लोकांच्या कुटुंबियांची स्वार्थी मानसिकता जितकी या प्रथांचं अवडंबर माजवण्यात सिंहाचा वाटा उचलतेय तितकीच हातभार लावतेय ती म्हणजे "लेकीला नाही तर कुणाला द्यायचं?" असं म्हणत ऐनकेनप्रकारे देण्याघेण्याला प्रतिष्ठेचं रूप देणाऱ्या मुलींच्या आईवडिलांची वृत्ती. या अशा लोकांमुळेच हातावर पोट असणाऱ्या गरीबांच्या, करून खाणारांच्या झोळीत दर तीन वर्षाला "धोंडा" पडतोच पडतो.
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम






















