एक्स्प्लोर
आमच्या छकुलीच्या लग्नाला यायचं हं..!!
तिचं हे सगळं गाऱ्हाणं ऐकून मी निमूट परत निघाले. परतताना देव्हाऱ्यावर पुजलेल्या पत्रिकेवर लक्ष केलं. पत्रिकेच्या एका कोपऱ्यात लिहिलं होतं ' आमच्या छकुलीच्या लग्नाला यायचं हं. '

शेजारची लक्ष्मीकाकू लगबगीनं घरात आली. आम्ही रात्रीच्या जेवणाच्या तयारीत. इतक्या घाईघाईने यायला काय झालं असं विचारायला उशीर लक्ष्मीकाकूने घडलेली घटना हळू आवाजात पण न थांबता सांगायला सुरु केली.
"मी आज लग्नाला गेलते खाल्ल्या गलीच्या शेवंतीच्या नातीच्या. काय सांगू बाई तुम्हाला शेवंतीच्या नातीचं लगीन कॅन्सल हुताहुता ऱ्हायलं की. त्याचं झालं आसं नवरदेव पारण्यावरनं टेजवर आल्याला. सगळ्या वराडाच्या हातात आक्षिदा. मामा आंतरपाट धरुन हुबारल्यालं. बामण नवऱ्या मुलीला टेजवर घिवून या मनून कवाचा माईकमदी वरडाय लागल्याला. तवर कोणतर सांगावा घिवून आलं. नवरीचं वय कमीय. पुलिसगाडी इतीय लगीन थांबवायला. सगळ्या वराडात कुजबुज सुरु झाली. तवर तिकडं नवरदेव टेजवरनं उतरला. बाशिंग सोडलं कपाळावरचं. मळवट पुसला. नवरीलाबी शालू काढून टाकाय लावला. तिजंबी बाशिंग सोडीवलं. वराडाच्या ट्यांपुतच नवरा नवरी घातली. सोबतीला नवरीची आजी, मामा-मामी आन् नवरदेवाचं आईबाप, मामा-मामी, बामण घेतलं अन् ट्यांपु पळवला माळावरच्या म्हादेवाच्या देवळात. पुलिस आलं चौकशी किली. आन् गेलं निगून. आमी आलू बाय जिवून. म्हंत्यातचच की नवरा येतू नवरीसाठी अन् वराड येतं जेवायसाठी. "
लक्ष्मीकाकूनं सांगितलेली घटना ऐकून फार आश्चर्य वाटण्याचं काही कारण नव्हतं. गावांमध्ये आजही अठरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींची लग्नं होतात. कुणी पोलिसांना कळवायच्या फंद्यात पडत नाही आणि कळवलंच तर वर सांगितल्यासारखा प्रकार घडतो. पोलिस शेर तर लग्नमालक सव्वाशेर असतात. शेवंतीच्या नातीचं लग्न थांबवायला पोलिस आले होते त्याअर्थी नवऱ्या मुलीचं वय अठराच्या आतच असणार हे गृहीत होतं. कुणीतरी जाणतेपणानं वरती कळवलं होतं नवरीचं वय कमी असल्याचं. पोलिस आपलं काम करायला आले तर लग्नमालकांनी पळवाट काढून लग्न लावलंच. शेवंतीची नात बालविवाहाचा बळी ठरली ती ठरलीच.
दुसऱ्या दिवशी मी शेवंतीच्या घरी गेले. नातीचं लग्न इतक्या लवकर करायची काय गरज होती असं विचारलं तर तिने रडायलाच सुरुवात केली. ती रडत रडतच सांगू लागली. "माझ्या सुननं पिटवून घेल्तं. लेक इजवायला गेला तर त्यो बी पेटला. दोगंबी राख झाली घरासहीत. ही पुरगी चार वर्षाची हुती तवापस्नं मी सांबाळली. आठवीपतुर शाळा शिकवली. सातवी नापास झाली तवापास्नं घरी हुती. दोन वर्षं झालं शानी झाल्याय. मी रोज गांडीला खुरपं लावून कामाला जाते. पुरगी इकटीच घरी आस्ती. मागल्या महिन्यात पावणं आलं. पुरगी पसंद पडली. माझी फाटकी परस्तिती बघून करणीधरणी बी काय करु नका म्हणली. म्हणून मी बी तयार झाले बग. मी इकटी बाई कुटंकुटं पुरी पडणार. ही जग दुनया चांगली हाय व्हय. पुरगी हापशावर पाण्याला गिली तरी रिकामटेकडं चार टगे वकावका बगत्यातं.? वयात आल्याली पुरगी घरात आस्ली की रात्च्याला झोप सुदीक लागत न्हाय. हे बघ उद्या काय कमीजास्त झालं आस्तं तर कोण आलं आस्तं निस्तारायला. लोक वाकून बगायच बसल्यालं आस्तय. आमी गरीब माणसं. आमाला नीट करुन बी खाऊ दिना गाव. कुण्या खेळवण्या भाड्यानं पुलिसात कळवलं कुणासठाव. भरल्या मांडवातनं निहून देवळात लगीन लावावं लागलं माझ्या लेकराचं. ज्यानं कुणी बी हे केलं आसल त्याजं तर नीट हुईल काय मुडद्याचं." ज्या कुणी ही वर्दी पोलिसात दिली होती त्याच्या नावानं शेवंती बोटं मोडून, जमिनीवर हात आपटून शिव्या-शाप देऊ लागली. उद्या तिला वर्दी देणाऱ्याचं नाव कळलंच तर ती त्याच्या नरडीवर पाय द्यायलाही कमी करणार नाही. तिचं हे सगळं गाऱ्हाणं ऐकून मी निमूट परत निघाले. परतताना देव्हाऱ्यावर पुजलेल्या पत्रिकेवर लक्ष केलं. पत्रिकेच्या एका कोपऱ्यात लिहिलं होतं ' आमच्या छकुलीच्या लग्नाला यायचं हं. '
हिंदू विवाह कायद्यान्वये मुलीचं वय अठरा आणि मुलाचं वय एकवीस होण्यापूर्वी लग्न लावून देणे हा गुन्हा ठरतो. मुलगी अठरा आणि मुलगा एकवीस नंतरच विवाहासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम होतात. हे सगळं खरं असलं, मान्य असलं तरीही हा कायदा गावागावातील मुला-मुलींच्या पालकांच्या खिजगणतीतही नाही. फार क्वचित मुलाचं लग्न एकवीसच्या आत होतं. पण आजही खेडेगावांमध्ये मुलगी उजवायची घाईच केली जाते. ज्या मुलींना शिक्षणासाठी घरुनच पाठिंबा आहे आणि त्यांचीही शिकायची इच्छा आहे अशा मुली सहज यातून निसटतात. पण ज्या पालकांची मुलींना शिकविण्याची ऐपत नसते. (कर्ज काढून लग्न करण्याची ऐपत असते हा भाग वेगळा) आणि ऐपत असली तरी इच्छा नसते. अशांच्या मुलींना मात्र ते म्हणतील तेव्हा बोहल्यावर उभं राहावं लागतं आणि तसंही त्यांच्या आयुष्याची इतीकर्तव्यताच लग्न, मुलंबाळं, संसार असते म्हणून त्याही मम म्हणत राजीखुशी लग्नाला तयार असतात.
खेडेगावांमध्ये होणाऱ्या अंदाजे तीस टक्के तरी लग्नातल्या वधू ह्या अल्पवयीन असतात. भारताचा बालविवाहामध्ये दुसरा क्रमांक लागतो हे खेदजनक वास्तव आहे. पालक विचार करतात की पोरीला दहावीनंतर शाळा तर शिकवायची नाही मग तिला घरात ठेऊन करणार काय! सतत नातेवाईकांच्या भंडावून सोडणाऱ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं आणि मुलीच्या लग्नाबद्दल विचारणा करणारेही पावलापावलावर उभे असतात " काय कधी देताय पुरीच्या लग्नाचे लाडू. अमुक अमुक ठिकाणी हाय जागा. बघू द्या काय. चांगली दहा एकर बागाइत हाय बघा. (किंवा पोरगं पुण्यात कंपनीत कामाला हाय) पोरगं बी लालभडक हाय. तुम्ही दिवू नका ओ पुरगी फकस्त ईवून तर जावू द्या पावणं पुरीला बघून. पसंत पडली तर बघू पुढचं पुढं," अशा मध्यस्थांना पोरींचे आईबापही भुलतात. वाटलं बरं स्थळ की सुपारी फोडून येणाऱ्या लग्नसराईत लग्नाचा बार उडवून देतात. मग तिथं पोरीच्या वयाचा विचार करायला कुणालाच सवड नसते. शेजारचे, गावातले चार शहाणे शिकलेले लोक असतात त्यांच्या लक्षात ही गोष्ट येत नाही असं अजिबात नाही. ते ही म्हणतात 'हून चाल्लय गरीबाचं. जाऊ द्या की कशाला आपण मोडता घालायचा.'
खेडेगावांमध्ये कमी वयाच्या एखाद्या मुलीचं लग्न होतंय असं ध्यानात आलं तरी कुणी पोलिसात वर्दी द्यायला धजावत नाही. पहिली गोष्ट ही की लग्न झाल्यानंतरचे मुलीच्या शरीरावर होणारे दूरगामी परिणाम, तिची मानसिक अक्षमता कुणालाच माहित नसते. दुसरी गोष्ट अशी की होतंय, सगळं व्यवस्थित तर कशाला कुणाच्या आनंदात विरजण टाका असा ढोबळ विचार. आणि तिसरी गोष्ट अशी की गावांमध्ये भावभावकी मोठी. हितसंबंध गुंतलेले. भावकीतल्या किंवा एखाद्या जवळच्या माणसानं जरी कायद्याचा आधार घेऊन लग्न थांबवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं नाव उघडं पडण्याच्या शक्यता अधिक असतात. आणि पडलंच नाव उघडं तर होणारे परिणामही भीषण असतात. " आमच्या घराचा खेळ करतो काय " म्हणत भावकीतनं घर वगळून टाकण्यापासून ऐकमेकांचे जीव घेण्यापर्यंत मजल जाऊ शकते. आपण खोडा घालून कशाला कुणाची दुष्मनी पैदा करा, असा स्वार्थी विचारही त्यापाठी असतो.
परवा एका पत्रकार मैत्रीणीने आणि तिच्या एका पत्रकार मित्राने जवळच्या गावातला असाच एक बालविवाह थांबवला होता. ती बातमी वर्तमानपत्रात छापून आली. एक बालविवाह थांबवला म्हणून पत्रकार मित्र-मैत्रीणीचं कौतुक झालं. मी ही ती बातमी वाचली होती. तेव्हाही माझ्या गावात, नातेवाईकात होणारे कित्येक बालविवाह आठवून आपण हे थांबवू शकलो नाही याचा गिल्ट मनात निर्माण झाला. पण शहरात राहून आपल्याशी फारसा संबंध नसलेले बालविवाह थांबवणं बरच सोपं असतं परंतु गावात राहून आपल्याच शेजारचे, गल्लीतले, नातेवाईकातले बालविवाह रोखणं महाकठीण काम आहे. त्याची कारण वरती दिलीच आहेत.
मुलींच्या सुरक्षिततेचा निर्माण झालेला प्रश्न, दिवसेंदिवस वाढणारे बलात्कार, समज नसलेल्या वयात सैराट होऊन मुलंमुली स्वतःच्या आयुष्याचं करुन घेत असलेलं मातेरं, वर्षानुवर्षे टिकवून ठेवलेली प्रतिष्ठा धुळीला मिळण्याची भीती, शिकलेल्या मुलीसाठी तितकाच किंवा त्याहून अधिक शिकलेला नवरा शोधणे, शेतकऱ्यांच्या बाबतीतली सरकारची चुकीची धोरणं त्यामुळे मुलींच्या शिक्षणखर्चाचा निर्माण होणारा प्रश्न, 'लग्नाची मुलगी म्हणजे आईबापाच्या गळ्यातला फास ' असं समजण्याची सनातन मानसिकता अशा अनेक अडचणी मुलीचं कमी वयात लग्न होण्याला कारणीभूत आहेत. एखाद्या मुलीचं कमी वयात लग्न होतंय म्हणून पोलिसात कळवल्याने, तो बालविवाह थांबवल्याने प्रश्न सुटणार नाहीत. लोकांचे नाइलाजही ध्यानी घ्यायला हवेत. आणि भारतातील लोकांनी पळवाटा काढण्यात डॉक्टरेट मिळवलेली आहे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
एखादा बालविवाह थांबवणे म्हणजे जुन्या जखमेवर केली जाणारी वरवरची मलमपट्टी आहे. बालविवाहाला संपूर्णपणे आळा घालायला असेल तर त्याच्याशी संबंधित इतर प्रश्नांवरही काम होणे गरजेचे आहे. त्याशिवाय बालविवाहाचा हा सनातन तिढा (शेकडो बालविवाह थांबवले तरी) सोडवता येणार नाही.
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
























