एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली!
केरळमधल्या आट्टापड्डी भागातील कदुकुमन्ना या आदिवासी भागात, जंगलात राहत असलेल्या मधु नावाच्या आदिवासी तरुणाची बातमी सध्या अशीच डम्पिंग ग्राऊंडवर फेकली गेली आहे. तो भुकेने मरणार होताच, पण झुंडीच्या मारहाणीने मेला इतकाच काय तो फरक!
ट्रेंडमध्ये नसलेल्या बातम्यांचं एक मोठं अदृश्य डम्पिंग ग्राऊंड असतं. गरिबी, भूक, भूकबळी, अन्नचोरी, औषधोपचारांचा अभाव, उपचार न मिळाल्याने झालेले मृत्यू, कुपोषण, बालमृत्यू इत्यादी पद्धतीचे विषय त्यात येतात. नरकवत आयुष्य जगलेले लोक त्यांची संकटं, अडचणी, दु:खं यांसह या ट्रेंडमध्ये नसलेल्या बातम्यांच्या त्या भल्यामोठ्या अदृश्य डम्पिंग ग्राऊंडवर शतकांपासून साचलेल्या, कुजलेल्या कचऱ्यात अजून एक निरुपयोगी कचरा बनून नाहीसे होतात. त्यांच्या नष्ट होण्याविषयी कुणाला खेद, खंत वाटत नाही. कारण, त्यांच्या असण्याचं कधी कुणाला काडीचं अप्रुप वाटलेलं नसतं. किड्या-मुंग्यांसारखी माणसं ही. एकवेळ मुंगी तरी चावेल, पण यांच्यात तितकीही क्षमता नाही. मग त्यांच्याबाबतची बातमी ट्रेंडमध्ये का यावी? ती फारतर गरिबीचा मजाक उडवता येण्यासाठी ‘सेल्फीची पार्श्वभूमी’ बनू शकतात. त्यांना घासातला घास कुणी काढून देण्याची गरज नाही. कुणाचं पोट भरल्याने आपलं मनोरंजन थोडीच होत असतं? केरळमधल्या आट्टापड्डी भागातील कदुकुमन्ना या आदिवासी भागात, जंगलात राहत असलेल्या मधु नावाच्या आदिवासी तरुणाची बातमी सध्या अशीच डम्पिंग ग्राऊंडवर फेकली गेली आहे. तो भुकेने मरणार होताच, पण झुंडीच्या मारहाणीने मेला इतकाच काय तो फरक! भुकेपायी त्यानं पाकुलममधील एका दुकानातून हातात उचलता येतील इतके तांदूळ चोरले. ते एक किलोभर देखील असतील-नसतील. त्याला तांदूळ चोरून पळताना लोकांनी पकडलं, बांधून घातलं आणि बेदम मारहाण केली. हे करत असताना काही उत्साही तरुणांनी ‘तांदूळचोरासोबत सेल्फी’देखील काढले, आणि सोशल मीडियावर ते मोठ्या हौसेने प्रसिद्धही केले. भरपूर मनोरंजन झाल्यावर हातपाय बांधलेल्या मधूला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. मधु गंभीर जखमी झालेला होता. पोलिसांच्या गाडीतच त्याला रक्ताची उलटी झाली. त्याला दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच तो मरण पावला.
मध्यंतरी आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने ‘जागतिक भूक निर्देशांक’ अहवाल जाहीर केला. जगातील 119 देशांमधील उपासमारीची सद्य:स्थिती त्याद्वारे मांडली जाते. शून्य असेल तिथं शून्य उपासमार, आणि शंभर आकडा असेल तिथे शंभर टक्के उपासमार, असं या निर्देशांकाचं मापन असतं. एकूण लोकसंख्येत किती लोक कुपोषित आहेत, त्यात पाच वर्षांखालील किती मुलं कुपोषित आहेत, पाच वर्षांखालील किती मुलांची वाढ खुंटलेली आहे आणि पाच वर्षांखालील मुलांचा मृत्युदर किती आहे, या चार मुद्द्यांचा यात विचार केला जातो. 2017 सालच्या जगातील 119 विकसनशील देशांच्या यादीत भारताचा शंभरावा क्रमांक आहे, 2016 साली तो 16 वा, 2014 साली 55 वा होता. त्या अहवालानुसार भारतातल्या पाच वर्षाखालील वाढ खुंटलेल्या मुलांचं प्रमाण 21 टक्के आहे. अशी स्थिती असलेल्या सर्वांत शेवटच्या पाच देशांपैकी आपला देश एक आहे, ही अत्यंत चिंताजनक आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. देशातल्या दोन वर्षांपेक्षा लहान बालकांना पूरक आहार देण्याचे प्रमाण 2006-2016 या दहा वर्षांत 52.7 टक्क्यांवरून 42.7 टक्क्यांवर घसरलं असून, दोन वर्षांपेक्षा लहान मुलांपैकी, फक्त 9.6 टक्के बालकांना पुरेसा आहार मिळतो आहे. महाराष्ट्रातलं हेच प्रमाण 6.5 टक्के इतकं घसरलेलं आहे. कुपोषित मुलांची संख्या वाढतेच आहे. दुसऱ्या बाजूने कुपोषित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था दुर्लक्षित बनवल्या आहेत. ग्राम बाल विकास केंद्रं (VCDC) व बाल उपचार केंद्रं (CTC) निधीअभावी बंद पडली आहेत. तालुका पातळीवरची पोषण पुनर्वसन केंद्रं (NRC) जिल्हा पातळीवर हलवल्याने अनेक मुलं लाभापासून वंचित राहिली आहेत. अंगणवाड्यांमधून मिळणारा ताजा आहार बंद करून, अत्यंत निकृष्ट दर्जाचा, बेचव असा पाकीट बंद आहार (Take Home Ration-THR) दिला जातोय, जो मुलं खाऊच शकत नाहीत. अंत्योदयसारखी योजना चांगली आहे, पण ती राबवलीच जात नाही. तिला मुळात कमी निधी आहे आणि तोही पूर्णपणे खर्च केला जात नाही, असंच चित्र आहे. त्यातही पुन्हा ‘आधारकार्डाशिवाय रेशन मिळणार नाही’ असे फतवे अधूनमधून निघत असतातच. या सगळ्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी लोकांची आहे की नाही?
या आकडेवाऱ्या एवढ्यासाठी दिल्या की, पुढील काही मुद्द्यांचा शांतपणे विचार होणं गरजेचं आहे. भुकेकडे आपण कसं पाहतो? लोकांवर अन्नचोरीची वेळ का येते, याविषयी आपलं म्हणणं काय आहे? भुके-कंगाल असला तरी चोराला शिक्षा व्हायला हवी, हे मान्य. पण ती कुणी करायची? लोकांनी कायदा हाती घेऊन, आधीच भुकेने अर्धमेल्या झालेल्या गरीबड्या माणसाला मरेपर्यंत मारहाण करावी का? या सेल्फिग्रस्त समाजाचा आपण एक हिस्सा आहोत, याची आपल्याला किंचित तरी लाज वाटते का? भाजपचे स्टेट प्रेसिडेंट कुम्मान राजशेखरन यांनी या घटनेचा निषेध म्हणून एक हास्यास्पद उद्योग केला. आपले हात दोरखंडाने बांधून घेऊन मधुसारखे फोटो काढून घेतले आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. यातून निष्पन्न काय झालं? ही तर त्या भुके-कंगालाच्या मरणाची क्रूर चेष्टाच झाली केवळ. याहून काही करावं, यासाठी डोकं चालवायला मुळात या लोकांकडे डोकं असायला तर हवं ना! पण लोकांनी डोकं चालवलं ते त्या दुकानदाराचा आणि मारहाण करणाऱ्या लोकांचा धर्म कोणता हे शोधून त्याला वेगळं वळण देण्यात. मूळ प्रश्न बाजूला ठेवून नसत्या कुरापती उकरून काढण्यात राजकीय लोक सराईत असतातच; आता राजा करतो तेच रयत करायला शिकली आहे इतकाच याचा अर्थ.
सरकारने कुपोषणाबाबत काय करावं हे सांगणं सोपं आहे. पण सगळा भार सरकारवर न टाकता ‘आपण काय करावं?’ याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? तुकारामांचा एक अभंग आहे, त्यातल्या काही ओळी अशा आहेत :
बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥
बरे झाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोरे-गुरे ॥
बरे झाले नाही धरिली लोकलाज । बरा आलो तुज शरण देवा ॥
तुका म्हणे बरे व्रत एकादशी । केले उपवासी जागरण ॥
हा उपरोध आपण समजून घेऊ शकणार आहोत का? दुष्काळ नसलेल्या दिवसांत देखील किंवा सुकाळाच्या स्थितीत देखील, देशातले लोक उपाशी निजत असतील, मूठभर तांदळाची चोरी करून लोकांचा मार खाऊन मरून जात असतील. तर आपल्याकडे बारमाही दुष्काळ अकलेचा आहे असंच म्हणावं लागेल. प्रश्न आहे हे कबुल करण्याचीच जिथं राज्यकर्त्यांची तयारी नसते, तिथं प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा देखील दुष्काळ असणारच.
संबंधित ब्लॉग
चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या
चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे
चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्स
चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य
चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे
चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा?
चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत?
चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट
चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं
चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो…
चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या
चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही…
चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये!
चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं
चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन
चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’
चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं
चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर
चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड
चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे
चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं
चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं
चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या
चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…
चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…
चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत
चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!
चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement