मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा जांघेच्या दुखापतीतून शंभर टक्के सावरला आहे का? या प्रश्नाचं उत्तर दस्तुरखुद्द रोहित शर्मानं तरी होकारार्थी दिलं आहे. ज्याचं दुखणं हे त्यालाच नेमकं कळतं, असं म्हणतात. त्यामुळं हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळून रोहितनं आपण मॅचफिट असल्याचं सिद्ध केलं आहे, असं मानायला हरकत नाही. पण त्याउपरही आयपीएलच्या रणांगणात रोहितच्या एका अर्थहीन सामन्यातल्या सहभागानं भारतीय क्रिकेटमध्ये काही प्रश्न नव्यानं उपस्थित झाले आहेत, हेही तितकंच खरं आहे.


रोहित शर्माला आयपीएलच्या त्या अर्थहीन सामन्यात खेळण्याची एवढी घाई का झाली असावी? ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फिट होण्याची वाट पाहण्यापेक्षा मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करणं रोहित शर्माला गरजेचं का वाटलं? आयपीएलच्या या जमान्यात फ्रँचाईझीकडून खेळणं देशासाठी खेळण्यापेक्षा मोठं झालं आहे का, अशा एक ना अनेक प्रश्नांची आता सरबत्ती होऊ लागली आहे. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्यासारख्या दिग्गजांनीही तोच सूर लावल्यानं रोहित शर्माला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे.


बीसीसीआयचे फिजियो नितीन पटेल यांनी रोहितला किमान तीन आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण तो सल्ला न मानता रोहित केवळ दोनच आठवड्यांत आयपीएलच्या साखळी सामन्यात खेळण्यासाठी पुन्हा मैदानात उतरला. ही रोहितची चूक मानली तरी 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितला 26 ऑक्टोबर रोजीच निकालात काढणं किती योग्य होतं?


बीसीसीआयच्या निवड समितीनं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वन डे, ट्वेन्टी20 आणि कसोटी सामन्यांसाठीच्या तिन्ही भारतीय संघांतून रोहित शर्माचा पत्ता कापला. बीसीसीआयची निवड समिती एवढ्यावरच थांबली नाही, तर भारताच्या वन डे आणि ट्वेन्टी20 संघांच्या उपकर्णधारपदी रोहितऐवजी लोकेश राहुलची नियुक्तीही जाहीर करण्यात आली. बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीसह कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्मासारख्या ज्येष्ठ आणि प्रतिभावान शिलेदाराला ही वागणूक किती योग्य होती?


टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्याआधी रोहित शर्माची फिटनेस चाचणी घेतली असती आणि रोहितऐवजी घाईघाईनं लोकेश राहुलची उपकर्णधारपदी निवड जाहीर केली नसती, तर या प्रकरणातली कटुता टाळता आली असती. पण बीसीसीआय, राष्ट्रीय निवड समिती आणि टीम इंडियाच्या संघव्यवस्थापनानं ती खबरदारी घेतली नाही. त्यामुळं रोहितनं आयपीएलच्या साखळी सामन्यात खेळण्याची घाई केली असली, तरी बीसीसीआय, राष्ट्रीय निवड समिती आणि संघव्यवस्थापन यांच्याकडून चूक झाली नाही, असं म्हणता येणार नाही.


रोहित शर्माला 18 ऑक्टोबर रोजी पंजाबविरुद्धच्या सामन्यात जांघेतल्या दुखापतीचा त्रास सुरु झाला. त्यानंतर बीसीसीआयचे फिजियो नितीन पटेल यांनी त्याला किमान तीन आठवडे सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. हा सल्ला मानला असता तर रोहितला थेट 10 नोव्हेंबरच्या आयपीएल फायनलमध्येच खेळता आलं असतं. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पुरतं डावलण्यात आल्यानं रोहित शर्मा दुखावला होता. त्यामुळंच त्यानं कदाचित भावनेच्या भरात हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.


मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफचं तिकीट आणि आयपीएलच्या गुणतालिकेतला नंबर वन हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्याआधीच कन्फर्म झाला होता. हैदराबादविरुद्धचा अखेरचा सामना गमावला असता तरीही मुंबईच्या नंबर वन स्थानाला धक्का बसणार नव्हता. त्यामुळंच कदाचित रोहित शर्मानं अवघ्या दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर त्या अर्थहीन सामन्यात खेळण्याचा धोका स्वीकारला असावा.


वास्तविक बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हैदराबादविरुद्धच्या सामन्याच्या काही तास आधीच रोहितला छोट्या उद्दिष्टाचा विचार न करता आपल्या करीअरचा विचार करण्याचा सल्ला दिला होता. पण त्याचा अजिबात बाऊ न करता रोहित शर्मा अखेरच्या साखळी सामन्यासाठी मैदानात उतरला. हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात खेळून त्यानं नेमकं काय साध्य केलं?


रोहित शर्मानं या सामन्यात सात चेंडूंमध्ये जेमतेम चार धावा जमवल्या. पण हैदराबादच्या डावात त्यानं वीसही षटकं क्षेत्ररक्षण केलं. थोडक्यात काय, तर रोहित इरेला पेटून या सामन्यात खेळला आणि दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आपण मॅचफिट झाल्याचं त्यानं बीसीसीआयला दाखवून दिलं. पण रोहितची ती कृती योग्य होती का? या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. कारण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मॅच फिटनेस सिद्ध करण्याच्या प्रयत्नात तो अख्खा दौराच रोहितच्या हातून निसटण्याची भीती आहे.


वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जांघेतील दुखापत ही खूपच नाजूक असते. त्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्याच्या आत एखाद्या क्रिकेटरनं त्या स्नायूंवर अतिताण दिला तर दुखापत आणखी बळावू शकते. म्हणूनच मुंबई इंडियन्सच्या कर्णधारानं तीन आठवड्यांच्या विश्रांतीआधीच आयपीएलच्या रणांगणात उतरण्याचा स्वीकारलेला धोका लक्षात घेता, त्याच्या डोक्यावर दुखापतीनं उचल खाण्याची तलवार ही कायम टांगती राहणार आहे.


विजय साळवी यांचे अन्य ब्लॉग :


BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : धवन पैलवान की जय हो!


BLOG : कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : मुंबईचा खडूस फलंदाज


BLOG | : कर्णधार धोनीला फलंदाज धोनीवर भरवसा नाही का? कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट


BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : गावस्करांचं चुकलं की, त्यांना समजून घेताना अनुष्काचं चुकलं?


BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : झुंजार माणसा, झुंज दे… असं कृतीतून सांगणारा क्रिकेटर


BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : चुकांमधून शिकण्याची वृत्ती हेच रोहित आणि सूर्यकुमारच्या यशाचं गमक


BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : वादळवारं सुटलं ग.. आयपीएलचं तुफान उठलं ग..


BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : बंगलोरचा आयपीएलमधला इतिहास बदलण्याची जबाबदारी देवदत्त पडिक्कलवर


BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : ख्रिस गेलला का बसवलं आणि अजिंक्य रहाणेचं घोडं अडलं कुठे?


BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : जय हो अंबाती रायुडू, जय हो फाफ ड्यू प्लेसी