रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची विराटसेना अखेर आपल्या नावलौकिकाला जागली. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेन, अॅरॉन फिन्च आणि उमेश यादव या बाहुबलींच्या फौजेनं डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवला. युएईतल्या आयपीएलच्या रणांगणात बंगलोरनं दहा धावांच्या फरकानं विजयी सलामी दिली.


वास्तविक आयपीएलच्या रणांगणातली सर्वात गुणवान शिलेदारांची फौज असूनही बंगलोरला गेल्या तीन वर्षांत आपल्या ताकदीला साजेशी कामगिरी बजावता आलेली नाही. त्यामुळंच आयपीएलच्या यंदाच्या मोसमात तरी बंगलोर किमान प्ले ऑफ गाठणार का, हा चेष्टेखोर प्रश्न सातत्यानं विचारण्यात येत होता. त्याचं कारण अर्थातच बंगलोरला 2017 साली आठव्या, 2018 साली सहाव्या आणि 2019 साली पुन्हा आठव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. पण यंदाच्या मोसमासाठी बंगलोरनं केलेली संघबांधणी आणि त्यांनी दिलेली विजयी सलामी पाहता त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करण्यात येत आहे.


बंगलोरच्या दृष्टीनं सलामीच्या सामन्यात समाधानाचे अनेक क्षण पाहायला मिळाले. त्यातला सर्वोत्तम समाधानाचा क्षण ठरला तो सलामीला देवदत्त पडिक्कल या नव्या ताऱ्याचा आयपीएल क्षितिजावर झालेला उदय. अवघ्या वीस वर्षांच्या या डावखुऱ्या फलंदाजानं आयपीएलमधल्या पदार्पणात अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला. त्यानं केवळ 42 चेंडूंमध्ये आठ चौकारांसह 56 धावांची खेळी उभारली.


आयपीएलमधल्या पदार्पणात अर्धशतक साजरं करणारा देवदत्त पडिक्कल हा बंगलोरचा पाचवा फलंदाज ठरला. या कामगिरीनं त्याला ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, युवराजसिंग आणि श्रीवत्स गोस्वामी यांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. पण देवदत्तनं बंगलोरच्या डावात निव्वळ अर्धशतकच झळकावलं नाही, तर त्यानं अॅरॉन फिन्चच्या साथीनं 11 षटकांत 90 धावांची धडाकेबाज सलामी दिली. देवदत्त आणि फिन्चच्या या सलामीनंच बंगलोरच्या विजयाचा पाया रचला.


देवदत्त पडिक्कलची हैदराबादविरुद्धची कामगिरी ही कर्णधार विराट कोहलीवरचं ओझं नक्कीच हलकं करणारी ठरली. खरं तर फिन्चच्या साथीनं बंगलोरच्या डावाची सुरुवात करण्यासाठी विराटइतका दुसरा चांगला पर्याय नाही. पण बंगलोरची मधली फळी भक्कम करण्यासाठी विराटनं स्वत: चौथ्या क्रमांकावर येऊन, देवदत्तला सलामीला खेळवण्याचा निर्णय घेतला होता. विराटची ही रणनीती देवदत्त पडिक्कलनं सलामीच्या सामन्यात कमालीची यशस्वी ठरली.


अर्थात भुवनेश्वर कुमारचा अपवाद वगळता हैदराबादच्या ताफ्यातही वेगवान गोलंदाजांची मोठी नावं नव्हती. ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श दुखापतीमुळं केवळ चारच चेंडू टाकून माघारी परतला होता. त्या परिस्थितीत हैदराबादी आक्रमणातल्या कच्च्या दुव्यांचा देवदत्तनं नेमका लाभ उठवला. प्रतिस्पर्धी आक्रमणावर हातचं न राखता तो तुटून पडला. कर्णधार विराटनं दिलेल्या सल्ल्यानुसार समोरचा गोलंदाज कोण आहे, याचा त्यानं विचार केला नाही. देवदत्तनं खराब चेंडूची प्रतीक्षा करून आपल्या भात्यातून सवयीनं मोठे फटके काढले.


देवदत्त पडिक्कलला आक्रमक फलंदाजीची लाभलेली देणगी ही नैसर्गिक आहे, पण मोठे फटके खेळण्यासाठी त्याची धोका स्वीकारायची तयारी असते. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात खेळत असूनही त्यानं एखाद्या कसलेल्या फलंदाजासारखं हैदराबादच्या आक्रमणावर वर्चस्व गाजवलं. आश्चर्य म्हणजे बंगलोरच्या सलामीच्या भागिदारीत ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरॉन फिन्चनं फक्त एका सहकलाकाराची भूमिका बजावली.


देवदत्त पडिक्कलमधल्या आक्रमक फलंदाजाची कर्नाटक क्रिकेटमध्ये कल्पना होती. तिथले अनेक ज्येष्ठ पत्रकार अंडर नाईन्टिन वयोगटापासूनच त्याचं नाव घेत होते. पण देवदत्तनं गत राष्ट्रीय मोसमातल्या कामगिरीनं भारतीय क्रिकेटला आपली ओळख करून दिली. त्यानं वन डे सामन्यांच्या विजय हजारे करंडकात 67.66 च्या सरासरीनं 609 धावांचा रतीब घातला.


मग देवदत्तनं सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धेत 64.44 च्या सरासरीनं 580 धावांचा इमला रचला. कमाल म्हणजे देवदत्तनं त्या स्पर्धेत तब्बल 33 षटकारांची वसुली केली. रणजी करंडकातही कर्नाटकला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून देण्यात त्याचीच कामगिरी सर्वात मोलाची ठरली होती. तोच देवदत्त पडिक्कल आता रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा इतिहास बदलण्याच्या इराद्यानं आयपीएलच्या रणांगणात उतरलेला दिसतोय.