चांगल्या क्रिकेटरची लक्षणं काय असतात? चांगला क्रिकेटर असतो ना, तो आधीच्या सामन्यांमधल्या आपल्या चुकांमधून शिकत असतो, असं म्हणतात. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी आयपीएलच्या दुसऱ्याच सामन्यात बजावलेली कामगिरी ही त्या दोघांमधल्या चुकांमधून शिकण्याच्या वृत्तीचं द्योतक आहे.


आयपीएलमधल्या सलामीच्या सामन्यात चांगला स्टार्ट मिळूनही त्या दोघांनाही त्या स्टार्टचा लाभ उठवता आला नव्हता. रोहित काय किंवा सूर्यकुमार काय, त्या दोघांनीही सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला आपल्या विकेट्स बहाल केल्या होत्या. दोघांच्या त्या चुकीची शिक्षा मुंबई इंडियन्सला पराभवाच्या रुपानं भोगावी लागली.


पण आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनंही कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना आपल्या विकेटसाठी घाम गाळायला लावला. ट्वेन्टी ट्वेन्टी सामना म्हणजे हातघाईची लढाई असली, तरी प्रतिस्पर्धी आक्रमणावर डोळे मिटून हल्ला चढवायचा नसतो. त्यामागेही एक प्लॅनिंग असणं आवश्यक असतं. पण सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या डावात त्या प्लॅनिंगचाच अभाव दिसून आला.


मुंबई इंडियन्सच्या बहुतेक फलंदाजांनी आपल्या खिशात जणू टीम ओनर अंबानींचंच एटीएम कार्ड असल्याच्या थाटात चेन्नईसमोर मोठ्या फटक्यांचं शॉपिंग करायचं मनावर घेतलं होतं. त्या चुकांची शिक्षा त्यांना मिळाली. क्विन्टन डी कॉकनं कोलकात्यासमोरही त्याच चुकीची पुनरावृत्ती केली. पण रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या खडूस मुंबईकरांनी दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचून मुंबई इंडियन्सच्या डावाला मजबुती देणं ही आपली जबाबदारी असल्याचं ओळखलं.


रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनं खराब चेंडू निवडून आपली स्वत:ची धावांची भूक भागवली. पण धावांसाठी धाडसी फटके खेळण्याचा हावरेपणा त्यांनी आवर्जून टाळला. त्यामुळं त्या दोघांच्याही नावावर धावा लागल्या आणि मुंबई इंडियन्सच्या डावालाही मजबुती मिळाली. रोहित शर्मानं 54 चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांसह 80 धावांची, तर सूर्यकुमारनं 28 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह 47 धावांची खेळी उभारली.


रोहितनं सूर्यकुमारच्या साथीनं 90 धावांची भागीदारी रचून मुंबईच्या डावाला स्थैर्य आणि धावगतीला वेग मिळवून दिला. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारानं मग सौरभ तिवारीच्या साथीनं 49, तर हार्दिक पंड्याच्या साथीनं 30 धावांची भर घातली. रोहित शर्माची ही जबाबदारी स्वीकारण्याची वृत्तीच कर्णधार म्हणून त्याला आदर्श ठरवते.


एक फलंदाज म्हणून रोहित शर्मा किती मोठा आहे, हे आता नव्यानं सांगण्याची खरं तर गरज नाही. पण रोहितला साक्षात सुनील गावस्करांनी दिलेली कॉम्प्लिमेण्ट इथं सांगायलाच हवी. गेली पाच दशकं कॉपीबुक स्टाईल फलंदाजीचं जगातलं सर्वोत्तम उदाहरण ठरलेल्या गावस्करांनी नुकतंच एका कार्यक्रमात म्हटलं की, त्यांनाही रोहित शर्मासारख्या आक्रमकतेनं सलामीला खेळायला आवडलं असतं.


रोहित शर्माच्या फलंदाजीच्या ओघवत्या शैलीनं विराट कोहलीलाही त्याच्या प्रेमात पाडलं, याची कल्पना 2007 सालच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकादरम्यान आली होती. त्या वेळी विराट कोहली भारतीय संघात दाखलही झाला नव्हता. एका क्रिकेटरसिकाच्या उत्साहानं त्यानं त्यावेळी रोहित शर्माच्या फलंदाजीचा आनंद लुटला होता. त्यानंतर दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरनं एका सोहळ्यात आपले वारसदार म्हणून विराट कोहली आणि रोहित शर्माचा उल्लेख केला होता. आणि आता तर साक्षात गावस्करांनी रोहितच्या श्रेष्ठतेचा दाखला दिला आहे.


रोहित शर्मा हा त्याच्या जमान्यातल्या इतर फलंदाजांपेक्षा वेगळा आहे याचं मुख्य कारण म्हणजे चेंडूची दिशा आणि टप्पा लवकर हेरणारी त्याची नजर आणि त्यानंतर कोणता फटका खेळावा यासाठी त्याच्या हाताशी असलेला अधिक वेळ. त्यामुळं रोहित कोणताही फटका खेळण्यासाठी योग्य वेळेत योग्य पोझिशनमध्ये येतो. त्याच्या फटक्याचं टायमिंग इतकं अचूक जुळून येतं, की त्याला इतर फलंदाजांसारखी विशिष्ट फटका खेळण्यासाठी अधिकची ताकद खर्ची करावी लागत नाही.


आयपीएलआधीच्या लॉकडाऊनच्या काळात रोहित शर्माच्या पोटाचा घेर नक्कीच वाढला आहे. पण या सहा महिन्यांच्या वर्क फ्रॉम होममध्ये राहूनही, त्याच्या फलंदाजीची धार ओसरलेली नाही. त्यामुळं चेन्नईसमोरच्या अवघ्या 12 धावांतही रोहित शर्माचा क्लास उठून दिसला. मग कोलकात्यासमोर तर त्यानं तीन चौकार आणि सहा षटकारांची केलेली उधळण डोळ्यांचं पारणं फेडणारी ठरली.


रोहित शर्मा हा सहजसुंदर फलंदाजीचं एक टोक असेल, तर सूर्यकुमार यादव पॉवरबाज फलंदाजीचं दुसरं टोक आहे. त्यानं मनगटाला नाजूक हिसका देऊन खेळलेल्या फ्लिकवरही जर चेंडू कमालीच्या वेगान सीमापार जाऊन धडकतो. मग त्याच्या इतर फटक्यांविषयी विचारायचीच सोय नाही. या गुणवत्तेला सूर्यकुमार यादवनं समंजसपणानं दिलेली शिस्तीची जोड त्याला एक फलंदाज म्हणून यशाचं दान देणारी ठरली आहे.


अर्थात क्रिकेटच्या मैदानातलं एका फलंदाजाचं यश हे वैयक्तिक मोजलं जात असलं, तरी त्याचं अंतिम ध्येय हे आपल्या संघाचा विजय हेच असतं. आणि त्यासाठी जोडीनं खेळून यशस्वी व्हायचं असतं. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवनं नेमकं तेच काम चोख बजावलं. मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मिळवलेल्या विजयाचा पाया त्या दोघांनी रचलेल्या भागिदारीतच तर दडलेला आहे.


विजय साळवी यांचे अन्य ब्लॉग :


BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : जय हो अंबाती रायुडू, जय हो फाफ ड्यू प्लेसी

BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : बंगलोरचा आयपीएलमधला इतिहास बदलण्याची जबाबदारी देवदत्त पडिक्कलवर



BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : वादळवारं सुटलं ग.. आयपीएलचं तुफान उठलं ग..