डीन जोन्स गेला आणि जाताना चटका लावून गेला. खरं तर 59 वर्षे हे काही जाण्याचं वय नाही. पण कार्डियाक अॅरेस्टचा तो धोकादायक क्षण आपल्यातल्या एका हसतखेळत असलेल्या माणसाला चटकन कधी घेऊन जाईल याचा नेम नसतो. प्रोफेसर डीनो म्हणजे डीन जोन्सच्या बाबतीत नेमकं तेच घडलं.


आयपीएलच्या समालोचनाच्या निमित्तानं डीन जोन्स सध्या मुंबईत होता. त्यानं भारतभूमीवर आपला अखेरचा श्वास घ्यावा, हा एक विलक्षण योगायोग मानायचा का? कारण डीन जोन्सनं त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण हे भारतभूमीवरच अनुभवले होते.


ऑस्ट्रेलियाच्या 1986-87 सालच्या भारत दौऱ्यातली ती चेन्नईची टाय कसोटी, त्या कसोटीच्या पहिल्या डावात डीन जोन्सनं ठोकलेलं द्विशतक आणि मग डिहायड्रेशनमुळं त्याला सलाईन लावण्याची आलेली वेळ हे सारं माझ्या पिढीला आजही लख्खं आठवतंय. तोच डीन जोन्स मग 1987 साली ऑस्ट्रेलियानं भारतात विश्वचषक जिंकला, त्या वेळी अॅलन बोर्डरच्या विजेत्या संघाचा सदस्य होता. जोन्सनं त्या विश्वचषकातल्या आठ सामन्यांमध्ये मिळून तब्बल 314 धावांचा रतीब घातला होता.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर डीन जोन्स समालोचनाकडे वळला. एक समालोचक म्हणून त्याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती या भारतभूमीतच. क्रिकेट सामन्याचं आणि त्यातल्या वैयक्तिक कामगिरीचं नेमकं विश्लेषण करणारा त्याचा प्रोफेसर डीनो भारतीय क्रिकेटरसिकांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता.


इतकंच काय पण समालोचक या नात्यानं जोन्सचा भारतातला मुक्काम एवढा वाढला होता, की त्यानं जुजबी हिंदीही शिकून घेतलं होतं. त्यामुळंच जन्मानं किंवा नागरिकत्वानं ऑस्ट्रेलियन असला तरी तो मनानं भारतीय बनला होता. त्यामुळंच डीन जोन्सला भारतभूमीत मृत्यू आला, हा एक विलक्षण योगायोगच वाटतो.


वन डे क्रिकेटचं व्याकरण बदलणारा क्रिकेटर


डीन जोन्स एक कसोटी फलंदाज म्हणून मोठा होताच, पण वन डे क्रिकेटच्या इतिहासात त्याचं नाव आणखी आदरानं घेतलं जातं. वन डे क्रिकेटचं व्याकरण बदलून टाकणारा क्रिकेटर म्हणून डीन जोन्सकडे पाहिलं जातं. पुढे सरसावत वेगवान गोलंदाजांवर चालून जाणं, दोन क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू ढकलून 100 मीटर्सच्या शर्यतीत धावावं इतक्या वेगानं एकेरी-दुहेरी धावा वेचणं, तसंच आऊटफिल्डमध्ये कमालीचं आक्रमक क्षेत्ररक्षण करणं... वन डे क्रिकेटच्या दुनियेत आज सर्रास पाहायला मिळणारी ही वैशिष्ट्यं रूढ करणारा अवलिया होता तो डीन जोन्स.


डीन जोन्सनं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीत 164 सामन्यांमध्ये 44.61 च्या सरासरीनं 6068 धावांचा रतीब घातला. त्यात सात शतकं आणि 46 अर्धशतकांचा समावेश होता. डीन जोन्स हा वन डे क्रिकेटचा महारथी होता, तितकाच तो एक कसोटी फलंदाज म्हणूनही मोठा होता.


जोन्सची कसोटी क्रिकेटमधली 46.55 ही सरासरी त्याच्या थोरवीची साक्ष देते. त्यानं 52 कसोटी सामन्यांमध्ये 11 शतकं आणि 14 अर्धशतकांसह 3631 धावा फटकावल्या होत्या. डीन जोन्सनं भारत दौऱ्यातल्या चेन्नई कसोटी सामन्यात फटकावलेलं द्विशतक ही एका ऑस्ट्रेलियन फलंदाजाच्या टिपिकल कणखर वृत्तीचं सर्वोत्तम उदाहरण मानण्यात येतं.


कहाणी जोन्सच्या झुंजार द्विशतकाची


डीन जोन्सच्या कारकीर्दीतली ती केवळ तिसरी कसोटी होती. वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांनंतर त्याला चक्क दोन वर्षे डावलण्यात आलं होतं. आणि दोन वर्षांनंतर थेट तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. डीन जोन्सनं त्तत्कालिन मद्रासमधल्या रणरणत्या उन्हात तब्बल आठ सात 22 मिनिटं फलंदाजी करून 210 धावांची खेळी उभारली होती.


डीन जोन्सच्या या खेळीची आणि त्याच्या झुंजार मनोवृत्तीची एक आठवण आवर्जून सांगण्यात येते. या खेळीदरम्यान जोन्स डिहायड्रेशनमुळं इतका थकला होता की, त्यानं मैदानातच उलटी केली होती. त्या वेळी खरं तर निवृत्त होण्याची त्याची इच्छा होती. त्यानं समोरच्या एंडला असलेल्या कर्णधार बोर्डरकडे ती इच्छा व्क्त केली हती. पण खडूस बोर्डर कसला ऐकतो? त्यानं जोन्सला खेळत राहण्यासाठी चिथावलं.


बोर्डरचा सल्ला शिरसावंद्य मानून डीन जोन्स खेळत राहिला. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. डिहायड्रेशनमुळं जोन्स तब्येत इतकी बिघडली की, बाद झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं जोन्सला पुन्हा आपल्या पायांवर उभं राहता यावं, म्हणून त्याला सलाईन लावण्याची वेळ आली होती. त्या परिस्थितीत तो पुन्हा उभा राहिला आणि त्या कसोटीत खेळलाही.


डीन जोन्सचं ते उदाहरण म्हणजे झुंजार माणसा, झुंज दे... या कणखर मनोवृत्तीचं मूर्तीमंत प्रतीक होतं. दुर्दैवानं हा इतिहास ज्यांना ठाऊक नव्हता, त्यांनी जोन्सच्या समालोचनाला दूषणं दिली. आयपीएलमधल्या मुंबई-कोलकाता सामन्याच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीनं डीन जोन्सला टॅग करूनच ट्विट केला की, तुझ्या समालोचनाचा त्रास होतो.


डीन जोन्सच्या जागी दुसरातिसरा कुणी असता तर तो चिडला असता किंवा त्यानं त्या ट्विटकडे दुर्लक्ष केलं असतं. पण जोन्सला प्रत्येक ट्विटला उत्तर देण्याची सवय होती. त्यानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं, ‘तू सामन्याचं प्रक्षेपण पाहतोयस याचा आनंद आहे. पण तुला माझं समालोचन ऐकायचं नसेल तर तू टेलिव्हिजनचा व्हॉल्यूम म्यूट करु शकतोस.’


पाहिलंत असा होता डीन जोन्स. क्षमाशील आणि खोडकरही.


विजय साळवी यांचे अन्य ब्लॉग :