Blog : आपण असं थाटात उभं राहायचं की.....
कुणाच्या आयुष्यात संकट येत नाहीत, पण या संकटांना धीराने तोंड देऊन संकटांना सुद्धा आपल्या धेर्याच कौतुक वाटलं पाहिजे, इतकं माणसानं खंबीर असलं पाहिजे, याचं आजच ताज उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर खेळाडू 'ग्लेन मॅक्सवेल' (Glenn Maxwell)
वर्ल्ड कॅप सामने सुरू असून आजचा सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात होता. हा सामना अफगाणिस्तान साठी अगदी अटीतटीचा होता. जिंकण्याशिवाय पर्यायच नव्हता. याच उद्देशाने अफगाणिस्तान संघ मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात उतरला होता. सुरुवातीला फलंदाजी करत अफगाणिस्तान संघाने साजेशी धावसंख्या उभारली. इब्राहिम झादरान याच्या 129 धावांच्या जोरावर अफगाणिस्तान संघाने 291 धावा जमवल्या.
विश्वविजेत्या असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला या धावा अगदी सोप्या असल्या तरीही मात्र अफगाणिस्तान संघ काही वेगळ्याच ऊर्जेत मैदानात उतरला होता. त्याची झलकच पाहायला मिळाली. अवघ्या चार धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. या नंतर धक्क्यांची बरसातच झाली. अवघ्या 91 धावांवर ऑस्ट्रेलियाचे सात गडी बाद झाले होते. कुणालाही फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. याचवेळी क्रिजवर ग्लेन मॅक्सवेलची एन्ट्री झाली. साथीला कॅप्टन पॅट कमिन्स हा देखील होता. मात्र 91 धावांवर सात गडी बाद असताना ऑस्ट्रेलिया आणखी तग धरू शकणार नाही, आणि अफगाणिस्तानचा विजय पक्का झाल्याचे खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसत होते. याचवेळी ग्लेन मॅक्सवेल अवघ्या 33 धावांवर असताना त्याचा सोपा झेल सुटला, अन हाच सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.
ग्लेन मॅक्सवेलने बाजू तर सावरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. मात्र याचवेळी त्याच्या पायाला क्रंक आल्याने मॅक्सवेलला खेळणं देखील मुश्किल झालं, खेळणं मुश्किल झालं तर पळणं देखील मुश्किल झालं. अशाही स्थितीत तो पायाची पर्वा न करता खेळत होता. एकवेळ अशी आली की तो कोसळला सुद्धा, त्यामुळे पॅट कमिन्स त्याला बाहेर जाण्यास सांगितले, त्याच्या जागेवर ऍडम झम्पा हा देखील मैदानात येत होता. तरीदेखील ग्लेन मॅक्सवेल संघासाठी थांबून राहिला. पाय इकडचा तिकडं न करता तो फटकेबाजी करत होता. अखेर त्याने शेवटपर्यंत लढा देत संघाला न होणारा विजय मिळवून दिला...
आयुष्यात संकटांनी धुमाकूळ घातला तरी आपण अस थाटात उभं राहायचं की संकटांनी पण नांगी टाकली पाहिजे! या ओळींना साजेशी खेळी करणारा ग्लेन मॅक्सवेल.... सगळं संपलं असताना देखील, 'नाही मी शेवटपर्यंत लढणार, उभं राहणार' आणि गेलेलं सगळं मिळवणार' असा निर्धार करून विजयश्री खेचून आणणारा ग्लेन मॅक्सवेल ऊर्जा देऊन गेला.