फूडफिरस्ता : 'डॅडी’ नावाचा दोस्त
तुम्ही फक्त टिळक रोडचा ‘डॅडी’ ! हे नाव उच्चारून बघा. त्याला देवाघरी जाऊन एव्हाना साडेपाच वर्ष होऊन गेल्येत, पण आत्ताच्या तारखेला, वयाच्या 22-25 वर्षांच्या मुलांमुलींपासून ते सत्तर ऐशी वयाच्या वृद्धापर्यंत प्रत्येकाला हा माणूस एका झटक्यात आठवेल.

मागेच एका ब्लॉगमधे लिहिलं होतं त्याप्रमाणे लक्ष्मी रस्त्याचा मूळ पिंड जसा व्यावसायिक तसा टिळक रस्त्याचा मूळ पिंड शैक्षणिक.अनेक प्रसिद्ध शाळा,कॉलेजेस टिळक रस्त्यालगत विद्यादानाचं काम करतायत. शाळा, कॉलेजेसबरोबर येतात ते अनेकविध व्यवसाय. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खाण्याच्या तऱ्हेतऱ्हेचे जिन्नस विकणाऱ्या म्हणून सुरु झालेल्या खानावळी, हॉटेल्सबरोबरच छोट्यामोठ्या बेकरीही सगळ्यांच्याच उपयोगाच्या.
हे व्यवसाय चालवणारी माणसं मग अश्या नगरीच्या शोधात कुठूनकुठून येतात. इथे काम करतात, स्वतःची घरं बांधतात तशीच इथल्या संस्कृतीशीही पूर्णपणे एकरूप होतात. व्यवसाय करून जसे पैसे कमावतात तशीच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचीही प्रचंड दौलत गोळा करतात.
असा विषय निघाला की मला ‘डॅडी’ हे नाव सगळ्यात आधी आठवतं.
तसं त्याचं पाळण्यातलं नाव शंकर, आडनाव शेट्टी. पण ह्या नावानी फारच कमी जण ओळखतील हे मला माहित्ये. पण तुम्ही फक्त टिळक रोडचा ‘डॅडी’ ! हे नाव उच्चारून बघा. त्याला देवाघरी जाऊन एव्हाना साडेपाच वर्ष होऊन गेल्येत, पण आत्ताच्या तारखेला, वयाच्या 22-25 वर्षांच्या मुलांमुलींपासून ते सत्तर ऐशी वयाच्या वृद्धापर्यंत प्रत्येकाला हा माणूस एका झटक्यात आठवेल. एसपी कॉलेजमध्ये विशेषतः हॉस्टेलवाला कुठलाही माजी विद्यार्थी, टिळक रोडला कट्ट्याच्या (वगेरे) निमित्ताने वावरलेली कोणतीही व्यक्ती त्याला ओळखणार नाही असं होऊच शकत नाही.
टिळक रोडला पोस्ट ऑफिसच्या पलीकडच्या बाजूला ‘रिगल’ बेकरी चालवायचा आमचा ‘डॅडी’. वयाने जवळपास वडिलांच्याच वयाचा पण आपला एकदम जानी दोस्त आणि कोणतीही अतिशयोक्ती न करता सांगतो, हीच भावना असणारे माझ्यासारखे किमान पाचेक हजार लोकं तरी ह्या जगात सापडतील.
एसपीत शिकणारा किंवा आमच्यासारखा मित्रांबरोबर अधूनमधून समोरच्या कट्ट्यावर हजेरी लावणारा कोणीही मुलगा, शेजारच्या अमृततुल्यमध्ये चहा प्यायला किंवा जवळच्या ऑफिसमधून ब्रेक घेऊन मधेच बाहेरच्या पुजारींच्या टपरीवर ‘बिडी’ मारायला येणारा कोणीही गृहस्थ असो. एकदोन भेटीत डॅडीच्या नजरेच्या टप्प्यात यायचा आणि मग डॅडीच्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या कायमचा प्रेमात पडून जायचा.
कमीतकमी 25 वर्ष तरी बघितलं मी डॅडीला. त्याची उंची तशी माफकच पण ती कसर भरून काढणारी त्याची तब्येत मात्र एखाद्या मैलावरूनही उठून दिसणारी. बलदंड शब्दाला जागतील असेच ‘बायसेप्स’. त्याच्या ‘सिमेट्री’ला शोभेल अशी छाती आणि पार खपाटीला असलेलं पोट. त्याचं ते व्यक्तिमत्व मी आणि माझ्यासारखे त्याला जोडले गेलेले हजारो लोकं आयुष्यात विसरणार नाहीत.
बेकरीत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी अदबीने बोलून त्याला आपलेसे करत उत्तम आणि सचोटीने व्यवहार करणारा बडबडा ‘डॅडी’ म्हणजे टिळक रस्त्याच्या कॉलेजच्या तरुणाईला शोभेल असं मूर्तिमंत चैतन्य.
कायम ताजा भरलेला माल ही त्याच्या ‘रिगल’ बेकरीची ख्याती. क्रीमरोल, खोबरा, वाटी असे केक यायचे कधी आणि संपायचे कधी हे समजायचंही नाही. अगदी नवख्या गिऱ्हाईकांनाही चुकूनही एखादा ब्रेड तो शिळा द्यायचा नाही. हे माहिती असल्याने एकदा त्याच्या बेकरीत गेलेला माणूस कायमचा त्याचा व्हायचा.
अर्थात त्यामुळे बेकरीत सतत भरलेलं गिऱ्हाईक, ते नसलंच तर भेटायला आलेल्या असंख्य तरुण मित्रमंडळींची वर्दळ. त्यामुळे दुकानात फारच क्वचित प्रसंगी एकटा दिसायचा. पुण्यातल्या सामाजिक क्षेत्रातल्या अनेक बड्या व्यक्तींशी त्याचे एकदम दोस्तीचे संबंध. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि हॉटेल व्यावसायिक येता-जाता आवर्जून त्याच्या बेकरीत शिरणार.
घरापासून लांब येऊन हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या पब्लिकचा तर तो साक्षात तारणहार होता. अडीनडीला उधार माल देण्यापासून ते बादशाहीच्या मेसचे पैसे ठराविक तारखेपर्यंत देण्यापर्यंत, ह्या पोरांची अनेक कामं तो बिनबोभाट करून टाकायचा. अनेक मुलं तेही पैसे बुडवून पळून जायची त्यांच्याबद्दलही कोणाकडे कधीच वाच्यता करायचा नाही. बाहेर हॉस्टेलवर रहाणाऱ्या मुलींच्या होणाऱ्या छेडछाडींचा आपल्या पद्धतीने बंदोबस्त करून टाकायचा. एसपीतली अनेक ‘लफडी’ त्याच्या पुढाकाराने प्रेमविवाहात बदलली आहेत.
माझ्या त्याच्या बद्दलच्या पहिल्या आठवणी शाळेत असल्यापासूनच्या. दुपारच्या मधल्या सुट्टीत कधी डबे आणले नसतील तर आम्ही एकदोन मित्र ताजे केक, क्रीमरोल्स, पॅटीस खायला त्यामानाने जरासे लांब असलेल्या त्याच्या बेकरीत जायचो. त्यावेळी त्याच्याशी पहिल्यांदा ओळख झाली. खाऊन झाल्यावर मग आपणहून पाण्यानी भरलेली काचेची बाटली पुढे करायचा. दुकानात दुसरं गिऱ्हाईक नसेल तर आमचं पाणी पिऊन होईपर्यंत, रावळगाव किंवा लिमलेटची एखादी गोळी घेऊन स्वतः दुकानाबाहेरच्या फुटपाथवर यायचा. पण ती गोळी हातावर देताना कधीच सरळमार्गाने दिलेली मला आठवत नाही. पुढची 4-5 मिनिटे नुसत्या हातचलाख्या चालायच्या.
गोळी काढून पटकन वर टाकल्यासारखा काय करायचा? नंतर नुसतीच हूल देऊन ती गोळी दुसऱ्या स्वतःच्याच खिशातून काढून काय दाखवायचा? निरनिराळ्या गमती चालायच्या. आम्ही मुलं एकीकडे ते खेळ, आ वासून बघतही राहायचो आणि दुसरीकडे ते एन्जॉयही करायचो. कारण गमती करताना मुलांना त्रासिक वाटेल असं तो कधीच वागला नाही. मिश्कील स्वभाव आणि मुलांशी खेळवण्याची त्याची आवड त्यावेळीही जाणवायची. जरावेळ असे खेळ केल्यावर ती गोळी पटकन आमच्या कोणाच्या तरी शर्टच्या खिशात अलगद टाकत, पाठीवर प्रेमानी एक धपाटा मारत, “चल बच्चा स्कूल भाग,लेट होईल नं?” म्हणायचा.
पुढे एसपीला मित्रांकडे भेटायला गेलो की कधीतरी रिगल शेजारच्या अमृततुल्यबाहेरच्या फुटपाथवर चहा घ्यायला जायचो. माझ्याकडे लक्ष गेलं तर मधूनच बाहेर डोकावत, माझ्या हातात सिगारेट दिसत नाहीये ना, हे तपासायचा. त्याचवेळी त्याची स्वतःची पेटती ‘पनामा’ मात्र दुकानातल्या अॅश-ट्रे मध्ये ठेवलेली असायची हे मला नंतर कधीतरी समजलं.
बेकरीवरून जाताना त्याच्याकडे लक्ष न देता पुढे गेलोय हे त्याच्या लक्षात आलं की पुढच्यावेळी आपल्यावर ‘रेशन’ ठरलेलं. मग दुकानात गेलं की, “बच्चे ! बडा हो गया” म्हणत हात जोरात दाबत शेकहँड करणार. मग नेहमीच्या स्टाईलने “गच्च ना?” विचारून डोळे बारीक करून मिचकवणार. त्याचा अर्थ भले काहीही होत असेल तरी, सभ्य माणसाने, “एकंदर बरं चाललंय ना? असा घ्यायचा, त्यामुळे त्यावर मान डोलावल्याशिवाय पर्याय नाही. आपण कसांयस डॅडी? विचारायचा अवकाश, की आपल्या टाईट हाफ शर्ट किंवा टी शर्टच्या आत न लपणारे बायसेप्स बाहेर काढून, दंडाच्या बेडक्या टणाटण उडवून वरती परत ‘कसंय?’ विचारणार आणि पुन्हा डोळे मिचकवणार. हे सगळं अगदी वयाच्या पासष्ठाव्या वर्षीही हां !
एकदा माझी टीव्हीवर झालेली एक छोटी मुलाखत त्याने पाहिली होती, त्याचं त्याला कोण कौतुक? मी शाळेत असल्यापासून क्रीमरोल, डोनट खायला यायचो, ते माझ्या डोक्यावर हात ठेवत शेजारी भेटेल त्याला (धरून) कौतुकाने सांगणार. तेवढ्यात दुकानात कोणी गिऱ्हाईक आलं तर टुण्णकन उडी मारून पुन्हा आत जाणार, जाताजाता “जा बच्चा काम कर”, म्हणायचा. एकाच वेळी सजग दुकानदार, प्रेमळ काका आणि सच्चा दोस्त दिसायचा मला त्याच्यामध्ये.
आपल्याला वेळ नसताना रोडवरून जाताना थांबून कधी ‘डॅडी’ हाक मारली की प्रेमळ हसत बाहेर येणार. गाडीवरून उतरायला लावून, घट्ट मिठी मारणार. मिठी म्हणजे समोरच्याला घट्ट पकडून आपलं पोट त्यावर दोनचार मिनिटं अक्षरशः जोरजोरात घुसळायचा. हे रामदेव बाबा वगेरे आत्ताआत्ता फेमस झाले; डॅडीची मिठी आणि त्याचं ते पोट घुसळणं, त्याच्या खूपच आधीपासून समद्या टिळक रोडवर ‘वर्ल्ड फेमस’. निवडणूक प्रचाराला आलेल्या तत्कालीन खासदार कलमाडींनाही भर टिळक रस्त्यात त्याने मारलेली मिठी आणि त्यावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेले (झालेले) हावभाव ह्यांचा किस्सा, अजूनही टिळक रोडच्या कट्टेकर्यामध्ये साभिनय सादर केला जातो.
आपल्याला वेळ नसताना जाताना हात वर करून हाक मारली की, “बच्चा भिरर्र” अशी काहीतरी हाळी द्यायचा ती पार टिळक स्मारकच्या चौकापर्यंत ऐकू यायची.
आता अश्या गोष्टी आठवल्या तरी डॅडीच्या आठवणीने डोळ्यात पाणी तरारतं. तसं क्रिमरोल आणि केकच्या चिल्लरमधे असा प्रेमळ ‘डॅडी’ मिळणं हे तसं सगळ्यांच्याच नशिबात नसतं.
ट्रेंडिंग न्यूज























