एक्स्प्लोर

BLOG : अफाट हालअपेष्टांची अजरामर गोष्ट

BLOG : प्रसंग एक - 1927 चा सुमार असावा. लहानगा काळाबिंद्रा शंकर आपल्या श्रमलेल्या दमलेल्या बापासोबत जागल्याच्या कामाला जायचा. एक रात्र अशी आली, जेव्हा गावाबाहेरल्या विहिरीत एक शव फुगून वर आले. गावात सर्वत्र बोंब झाली. डोळ्यात बोट घातले तरी काही दिसणार नाही इतका मिट्ट काळोख होता. कोण कधी मरून पडलं आणि कशामुळे मेलं होतं, काहीच कळायला मार्ग नव्हता. रात्री मुडदा वर काढण्याचे कामही कठीण होते. 

गावातले म्होरके विहिरीजवळ गोळा झाले. अर्थातच, हे सगळेच उच्चजातीय होते. त्यांनी महारवाड्यात निरोप धाडला आणि विहिरीत पडलेल्या शवाची राखण करण्यासाठी जागल्याने ताबडतोब येण्याचे आदेश दिले. मरतुकड्या अशक्त रामा खरातच्या घरी ही वर्दी पोहोचली. इतक्या रात्री विहिरीपाशी कसं बसून राहायचं याच्या चिंतेने त्याची बायको रडू लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने लहानगा शंकर जागा झाला..  

दंड घातलेल्या जुनेर लुगड्यातली आपली आई इतक्या रात्री रडू लागली म्हणजे नक्कीच काहीतरी अप्रिय दुःखद घडले असणार ह्या जाणिवेने शंकरही रडू लागला. पोर रडू लागल्यावर रामाने बायकोला नजरेने दटावले. तिने पोराला शांत केले. घुंगराची काठी हाती घेऊन रामा खरात त्या विहिरीच्या दिशेने निघाला. 

एरव्ही ज्या विहिरीच्या पाण्याला स्पर्शही त्याला करू दिला नसता त्या विहिरीत पडलेल्या एका प्रेताची राखण करण्याचे काम त्याच्याकडे आले होते. शेत विहीर एकाची, प्रेत आणखी कुणाचे तरी आणि त्या विहिरीतले पाणी फक्त ठराविक लोकांचे, त्या पाण्यावर ज्यांची सावलीही मान्य नव्हती असा इसम मात्र त्याच पाण्यात पडलेल्या कुणा अज्ञाताच्या प्रेताची राखण करण्यासाठी सक्तीने बोलावला गेलेला! सारेच दुःखद आणि क्लेशदायक, आर्त!

रामा खरात विहिरीपाशी पोहोचला, तेव्हा काही मोजके लोक तिथे उभे होते. त्यांनी गुरकावण्याच्या स्वरातच दुरूनच रामाला दमात घेतलं. "राम्या इथून हलायचं नाय, डोळा लागू दिऊ नगंस, मुडद्यावर ध्यान ठीव नायतर तुझी धडगत नाय!" 

रामा खराताने सवयीने मान डोलावली. नाहीतरी त्याने उभ्या आयुष्यात फक्त मान डोलवण्याशिवाय काहीच केलं नव्हतं. त्यानं कधी मान वर करून पाहिलं नव्हतं की, कुणावर नजर रोखली नव्हती. तो फक्त हुकुमाची तामिली करण्यासाठी जन्माला आला होता. त्याला त्याचे मत नव्हते की, नव्हता कसला स्वाभिमान! मुळात स्वाभिमान असण्यासाठीची वंशपरंपरागत शक्ती आणि प्रिव्हिलेजेस त्याच्या बाप जन्मात शंभर पिढ्यात कुणातच नव्हते. असो. 

रामा, विहिरीच्या कठड्यापासून काही अंतर राखून एका धोंड्यानजीक बसून राहिला. रानातलं चावरं त्याला चावत होतं, रातकिडे किर्रर्र करत होते. आभाळात एकदिकून चान्नी नव्हती. गच्च भरून आलेलं काळं जांभळं आभाळ रात्रीदेखील त्याला जाणवत होतं. त्याच ढगामागे कुठे तरी चंद्र दडून होता. दूरवर कुठेतरी कोल्हेकुई होत होती आणि गावातल्या भटक्या कुत्र्यांचे रडणे त्यात भर घालत होते. रानाच्या खालल्या अंगाला कुठेतरी टिटवी ओरडत होती. रामा खरात तसाच बसून होता. त्याला घराची आठवण येत होती. 

बाप गेला म्हणून शंकर जागा झाला. बापाकडे जायचं म्हणून त्याने हट्ट धरला. शेवटी बापासाठी भाकरी घेऊन जायचं निमित्त त्याच्या कामी आलं. बरीच तंगडतोड केल्यानंतर तो विहिरीपाशी आला. त्याचे पाय भयंकर दुखत होते मात्र बापाचं सोबत असणं त्याला अधिक सुखावह वाटत होतं. हा आनंद क्षणिक होता. तिथे येताच त्याला पोटात ढवळू लागलं. 

आसमंतात दूरवर एक दुर्गंध पसरलेला होता. तो उग्र वास विहिरीतल्या प्रेताचा होता. कुठल्याही क्षणी उलटी होईल असं त्याला वाटू लागलं. अखेर रामाने त्याला रागे भरले. त्याने आणलेली भाकरी ह्या उग्र दर्पात खाणं अशक्य आहे हे त्याला पटवून दिलं. त्याला परत पाठवताना एक कानमंत्र दिला, 'शंकऱ्या तुला सांगून ठेवतो याद राख! हे काम तू करायचं नाय. तू यात खपून जाशील. आमचा जल्म वायफट गेला तुझा जल्म यात गुतू देऊ नगंस.' 

रामाने काकुळतीच्या स्वरात त्या रात्री जे काही सांगितलं, ते लहानग्या शंकरच्या मनावर कोरलं गेलं कारण त्या अंधारलेल्या रात्री विहिरीपाशी मढं राखत बसलेला बाप त्याच्या मस्तकात खिळा ठोकावा तसा रुतून बसला! शंकर घरी येऊन आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडला, त्या माऊलीने त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत केलं.               

दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. प्रेत टम्म फुगलं होतं. काही ठिकाणी फुटलं होतं. त्याचा भयंकर दुर्गंध येत होता.  ते प्रेत बाहेर काढण्याचा आदेश रामाला फर्मावला गेला. गावाला रामा खराताची शिवाशिव आता चालत होती कारण मेलेल्या माणसाला शिवायचे होते! प्रेत काढताना रामाला साप चावला, पायात वेदनेची तीव्र सणक आली. रामाचा जीव कळवळला!  

त्याला मदत करायची म्हणजे धर्म बाटवण्यासारखं होतं त्यामुळे कुणीही त्याला मदत केली नाही. वरच्या जातीचे लोक फक्त आदेश देत होते, त्यांच्या ठायी दयेचा लवलेशही नव्हता. लहानगा शंकरही तिथे आला होता. हे सर्व पाहताना त्याचा जीव बापासाठी तीळ तीळ तुटत होता. दरम्यान मनोमन तो ठाम निर्धार करत होता. ती विहीर केवळ एका प्रेताने भरलेली नव्हती तर समग्र दलित समाजाचे दमण केले गेलेले जीव, आत्मे तिथे पाण्यात थिजवले होते. ती अंधारलेली रात्र, ती विहीर, ते प्रेत आणि त्यांची राखण करत बसलेला बेबस बाप शंकर कधीच विसरू शकला नाही!

प्रसंग दोन – त्या रात्रीने शंकरच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. त्याच्या बापाने अक्षरश: रक्ताचे पाणी करून त्याला शाळेत घातले. शंकरला शाळेत प्रवेश मिळणे हे एक दिव्य होते. अनेक मिनतवाऱ्या केल्यानंतर त्याला शाळेत दाखला मिळाला. त्याचं शाळेत जाणं सोपं नव्हतं. महाराला शिवायचं म्हणजे महत्पाप मानले जाई! मुळात शिक्षण हे शूद्रासाठी नाहीच अशी त्याकाळी धारणा होती. अनेक अपमान आणि हालअपेष्टा सोसून शंकरने शाळेत जाणं जारी ठेवलं. 

एके दिवशी रामाच्या घरी एक पत्र येतं. महारवाड्यात कुणालाही वाचता येत नसल्याने रामा ते पत्र घेऊन गुरुजींच्या घरी जातो. शंकर देखील हट्ट करून बापाच्या मागे जातो. गुरुजींच्या घरी जाईपर्यंत रामाच्या जीवात जीव नसतो. त्याच्या मनात लाख विचार येतात. त्याचे तमाम नातलग त्याच्या डोळ्यापुढे तरळून जातात. आपल्याला कुणी आणि का पत्र पाठवले असेल ह्या विचाराचा खोडकिडा त्याचे मस्तक पोखरून काढतो. 

गुरुजींचे घर जवळ येते. रामा घरापासून बऱ्याच दूर अंतरावर उभं राहतो आणि त्यांना हाका मारू लागतो. खाली मान घालून असलेला बाप उन्हात घामाच्या धारांनी निथळत उभा आहे आणि आतून कुणीच बाहेर येत नाही, की कुणी प्रतिसाद देत नाही तेव्हा शंकर घायाळ होतो. तो चोरून नजर वर करतो तितक्यात गुरुजी ओसरीवर येतात. 

रामाला दूर उभं राहून बोलण्यासाठी निक्षून सांगतात. येण्याचे कारण विचारतात. घायकुतीला आलेला रामा खरात आपल्या हातातले पत्र दाखवत सांगतो, की पत्र वाचून हवंय! गुरुजी त्याला इशारा करतात. तो थोडे पुढे जाऊन पत्र खाली ठेवतो. हे सर्व घडत असताना शंकरच्या जिवाची घालमेल होते. धुळीत माखलेले, भीतीने थरथरणारे बापाचे अनवाणी पाय पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येतं. 

गुरुजी पुढे होऊन पत्र वाचतात, एक क्षण रामाकडे टक लावून पाहतात आणि पुढच्याच क्षणी सांगतात की, ‘ठीक आहे. मी पत्र वाचून दाखवतो’; कुऱ्हाडीकडे निर्देश करत म्हणतात की, “तु आधी लाकडं फोडून दे!” हतबल झालेला रामा लाकडांच्या ढिगाऱ्याकडे पाहतो. अतिशय थकलेल्या अवस्थेतला रामा पुढे जातो, शंकर त्याच्या मागोमाग जातो. जाताना त्याच्या पायाखाली गुरुजींच्या घरासमोरची रांगोळी येते. त्याने बापजन्मात असलं काही पाहिलेलं नसतं. त्याला त्याचे अर्थही ठाऊक नव्हते. 

शंकरने रांगोळी तुडवताच गुरुजींची सोवळ्यात असलेली बायको ओरडते, आंधळ्या महाराच्या पोरा, तुझे डोळे फुटलेत का, असं म्हणत शिव्यांची लाखोली वाहते. रामा आपल्या पोराला दटावतो, गुरुजींना हात जोडतो! अश्राप गायीसारखा डोळ्यात पाणी आणून कामाला लागतो. पंधरवडा जाईल इतके सरपण फोडून होते. रामा घामाघूम होऊन जातो! रामा एकेक ढलपी फोडत असतो तेव्हा शंकर आतल्या आत फुटून निघतो. बघता बघता सगळी लाकडं फोडून होतात. 

लाकडं फोडून झाल्यावर, ती एका जागी रचून घेतल्यानंतर, अतिशय निर्विकारपणे गुरुजी सांगतात की, पत्रात फार काही लिहिलेलं नाही. तुझी बहीण मरण पावलीय. त्याची बातमी पत्रातनं पाठवलीय. इतकं सांगून सव्य अपसव्य करत गुरुजी घरात निघून जातात! 

हातात घुसलेली धसकटं चेहऱ्यावर रुतवत रामा खरात आर्त टाहो फोडतो! आपल्या बापाला असं ढसाढसा रडताना पाहून शंकरचं काळीज डोळ्यात येतं! आपली आत्या मेलीय ही बातमी गुरुजींनी आधीच वाचली होती, ती त्यांना लगेच सांगविशी वाटली नाही! त्यांनी आधी खंडीभर लाकडं फोडून घेतली आणि मग बातमी सांगितली याचं विलक्षण शल्य त्या चिमूरड्या जीवाला झालं!

ती वेदना, ते दुःख त्याने बाभूळकाट्यासारखे जपले! हे सर्व दिवस, हा संघर्ष तो कधीही विसरला नाही!  त्याने त्या वेदनांचे निखारे बनवले आणि आपल्या मस्तकात भिनवले! तो जीव लावून शिकला. त्याने अशी काही मजल मारली की, पुढे जाऊन तत्कालीन, मराठवाडा विद्यापिठाचा तो कुलगुरू झाला! 

ही दास्तान आहे शंकरराव खरात यांची! बाबासाहेबांनी जर पिचलेल्या शोषित वंचित समाजाला शिक्षणाची उपलब्धी करून दिली नसती तर आजही त्या जीवघेण्या परंपरा स्वरूप बदलून जारी राहिल्या असत्या! इच्छाशक्ती तीव्र असली की, माणसाला काहीही असाध्य नाही हे शंकरराव खरातांनी दाखवून दिलं! त्यांच्या जन्मदिनीचे हे स्मरण लाखों कोट्यवधी दलितांच्या संघर्षास समर्पित! माणसाने हिंमत हारू नये, त्याच्या वाट्याला येणाऱ्या दुःख वेदनांना ठोकरून न देता, त्यांनाच आपली ताकद मानावे! जग झुकवता येतं, त्यासाठीचा निग्रह ठाम हवा!

काही नोंदी - 1. शंकररावांचे वडील रामा खरात हे गावचे तराळ होते. महारवाड्यात वस्तीला असणाऱ्या तराळाला गावात येण्याची मुभा असे मात्र त्यासाठी काही नियम रिती रिवाज होते. 'तराळ' म्हणजे गावभर दवंड्या पिटत फिरणारा. पाटलाजवळ सतत हजर असणारा, सरकारी अधिकार्‍यांची सरबराई करणारा, त्यांचे सामान वाहणारा महार किंवा मांग जातीतील व्हल्लार उपजातीतला माणूस. एका हातात कामठ्या अडकवलेली हलगी तर दुसऱ्या हातात खुळखुळा असणारी काठी, खांद्याला पिशवी अडकावून फक्त दलित वस्त्यात चपला घालून फिरायची परवानगी असलेला माणूस ! ऊन, वारा. पाऊस यांची तमा न करता गावभर त्यानं अनवाणी फिरायचं, गल्लोगल्ली घसा ताणून हालगी वाजवत दवंडी पिटायची हा शिरस्ता होता. हा मांग-महार लोकांना जवळ आलेला चालत नसे पण त्याची दवंडी चालत असे. तराळाला वंशपरंपरेने हे काम करावे लागत असे, अगदी त्याच्या घरी माणूस मेलेलं असलं तरी त्याला पाटलाने कुणाच्या मयतीची दवंडी पिटायला पाठवले तरी जावं लागे. ह्या तराळाचं दुःख शंकररावांनी जगापुढे आणलं. त्यांच्या आत्मचरित्राचे नावच मुळी, 'तराळ अंतराळ' असे आहे.

2. मराठी साहित्य जगतात स्वतःच्या विचारांची वेगळी चूल मांडणारा विद्रोही दलित साहित्यिक ही खरातांची दुसरी ओळख. खरातांनी झंझावती लेखन करून स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्याचा प्रभाव इतका पडला होता की, दोन्ही माडगूळकर बंधू खरातांच्या लेखनाचे चाहते होते, शिवाय ते खूप चांगले स्नेही होते. श्री. म. माटे आणि खरात यांच्या लेखनशैलीत काही साम्य जाणवते, पण खरात त्या वेदना जगले होते तर माटेंनी त्यांचा जागर केला होता.

3. अज्ञातात खितपत पडणे आणि त्या दु:खभोगाला कवटाळणे म्हणजे पुन:पुन्हा एकाच जागेवर फिरत राहण्यासारखं आहे, हे समाजाच्या आणि विशेषत: स्वत:च्याच जीवनप्रवासातून त्यांनी जाणलं. इतरांपुढेही ठेवलं. म्हणूनच त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये कुठेही आक्रस्ताळी सूर लागताना दिसत नाही. बंड करण्याचं, दारिद्रय झुगारण्याचं, शोषणाला ढकलण्याचं आणि अवहेलनेला पायाखाली घेण्याचं- ही सर्व तंत्रं काही प्रमाणात खरातांची पात्रं अवलंबतात, पण त्यात भोवताल उद्ध्वस्त करण्याची भाषा नाही.

4. बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, टिटवीचा फेरा, सुटका, दौण्डी, आडगावचे पाणी आणि गावशीव हे कथासंग्रह खरात यांच्या नावावर आहेत. या कथांतून आणि त्यांच्या शीर्षकांतून खरात यांचं वेगळेपण सिद्ध होतं. हातभट्टी, गावचा टिनोपाल गुरुजी, झोपडपट्टी, मसालेदार गेस्ट हाऊस, फुटपाथ नं. 1, माझं नाव या कादंबऱ्या शंकरराव खरात यांनी लिहिल्या. 1981 मध्ये त्यांनी लिहिलेलं ‘तराळ-अंतराळ’ हे आत्मचरित्र मराठी साहित्यविश्वातील एक श्रेष्ठ कलाकृती म्हणून गणलं गेलं. ‘दलित वाङ्मय : प्रेरणा व प्रवृत्ती’ या समीक्षाग्रंथात खरातांच्या चिंतनशीलतेचं, अन्वयार्थ शोधणाऱ्या विचक्षण समीक्षकाचं दर्शन वाचकाला होतं.

5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी व अनुयायी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना आंबेडकरांनी1927 ते 1956 या काळात जी पत्रं लिहिली, त्याचंही संपादन शंकरराव खरातांनी केलं. 1961 मध्ये तो ग्रंथ प्रकाशित झाला. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात, डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची आत्मकथा, त्यांची ही पुस्तकंही उल्लेखनीय ठरली.

6. शंकरराव खरात यांच्या समग्र लेखनाच्या मुळाशी समाजाने शोषण केलेला असहाय माणूस आणि त्या माणसाच्या वाट्याला आलेले भोग, त्यातून त्यानेच स्वत:चं करून घ्यावयाचं पुनरुत्थान टोकदारपणे आलं आहे. त्याच बळावर त्यांनी स्व-जीवनाची इमारत उभी केली. 1984 ला जळगाव इथे भरलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. याशिवाय अनेक मानाच्या पुरस्कारांचे, सोहळ्यांचे ते सन्माननीय धनी ठरले.

7. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यानंतर शिक्षणाला जीवनसन्मुख करण्यासाठी त्यांनी मांडलेला विचार आणि केलेले प्रयत्न मोलाचे ठरले. त्यांच्या समग्र जीवनप्रवासातून दिसणारा वैरभावविरहित निर्मळपणा दीपस्तंभासारखा आहे. विचारसमृद्ध जगणाऱ्या शंकररावांनी तो निर्मळपणा शेवटपर्यंत जपला. आजकाल अशी माणसं क्वचितच दिसतात.

8. समाजाने अस्पृश्य ठरवल्यानंतर वाट्याला येणारं दु:ख काय व कसं असतं याचा पदोपदी आलेला आणि हृदय पिळवटून टाकणारा अनुभव त्यांनी घेतला. 'जात', माणसाचा ठिकठिकाणी कसा पाठलाग करते याचे असंख्य घटनाक्रम त्यांच्या आयुष्यात आले. ते भोगून उभा राहिलेला हा माणूस शिकत राहिला, शिक्षणासाठी झगडत राहिला. त्यांचा हा संघर्ष फक्त बाह्यशक्तींशी नव्हता, तर स्वत:शीदेखील होता. शिक्षणासाठीचं झपाटलेपण आताशा लोप पावताना दिसतेय हे चित्र बरे नाही. 

9. वाट्याला आलेल्या उपेक्षा-अवहेलनेशी दोन हात करताना आंतरिक नकारालाही खरात परतवत राहिले. त्यासाठी शिक्षणाने त्यांना साथ दिली. शिक्षणाने नवा विचार त्यांच्या मनात रुजवला आणि तो फुलवत ठेवला. बाबासाहेबांविषयी खरात म्हणतात, “बाबासाहेबांच्या सहवासाने मी अधिक विचारी झालो हे खरं असलं, तरी संवेदनशील आणि विवेकविचारी झालो हे जास्त खरं आहे.” बाबासाहेबांना त्यांनी आपल्या स्वत्वात रुजवलं होतं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

10. माधव कोंडविलकर आणि शंकरराव खरात यांच्या साहित्याचे मूल्य जाणून घेताना कळते की ही माणसं अस्सल पोलादी होती, त्यांचं जिगर अफाट होतं! उभ्या आडव्या अक्राळ विक्राळ पर्वताशी टक्कर घ्यायची असेल तर मस्तकात कोणते विचार असले पाहिजेत हे त्यांना पक्के ठाऊक होते! सद्यकाळात हीच गोष्ट मिसिंग असल्याने संघर्ष कचकड्याचे ठरताना दिसतात.

11. विवेकाने व्याप्त असणारा विचार, संवेदनशीलतेची जोड मिळाल्यावर कशा पद्धतीने आविष्कृत होतो, याचं उत्तर मराठी साहित्यात ज्या मोजक्या लेखकांच्या लेखनात आढळतं; त्यात शंकरराव खरात यांचं नाव प्राधान्यक्रमाने घेतलं जातं. काळाचं प्रतिबिंब साहित्यात जसं दिसतं, तसं व्यक्तीचं म्हणजेच लेखकाचंही प्रतिबिंब त्याच्या लेखनात दिसतं. कथा, कादंबरी, वैचारिक, सामाजिक आणि समीक्षात्मक असं विविधांगी लेखन खरात यांनी केलं. कथा-कादंबऱ्यातून बोलणारी पात्रं लेखकाचीच असतात. त्यामुळे लेखकाचाच विचार ते बोलत असतात. शंकरराव खरातांच्या पात्रांतून पुढे येणारा विचार वास्तवाची जाणीव तर देतो, पण संयमातून तो जे सांगतो-बोलतो-वागतो त्यातून एका स्वतंत्र संस्कारशैलीची जाणीव वाचकाला सातत्याने होत राहते. दलित साहित्यिक म्हणून जरी खरात यांच्यावर शिक्का मारला जात असला, तरी त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि स्व-संस्कारशील शैलीचा विचार करता एकाच लेबलखाली त्यांना बसवणं अन्यायकारक आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Embed widget