PBKS vs RCB IPL 2025 : बंगळूर संघाची परतफेड

शुक्रवारी झालेल्या बंगळूर विरुद्ध पंजाब सामन्यात पंजाब संघाने विजय मिळविला होता. आज बंगळूर संघाने त्याची परतफेड केली. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून फलंदाजीस आमंत्रण दिले ते पंजाब संघाला. पंजाब संघाने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. प्रियांश आणि प्रभसिमरन यांनी काही देखणे फटके मारून आज पंजाब संघ मोठी धावसंख्या उभारेल असे संकेत दिले. पण कृणाल जेव्हा गोलंदाजीस आला तेव्हा त्याने या दोन्ही सलामवीरांना तंबूचा रस्ता दाखवला.
प्रियांश एक मोठा फटका खेळताना टीम डेव्हिड कडे झेल देऊन बाद झाला. तर प्रभसिमरन सुद्धा टीम डेव्हिड कडे झेल देऊन कृणाल पंड्याच्या गोलंदाजी वरच बाद झाला. बंगळूर संघाकडून सध्या टीम डेव्हिड फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दोन्ही कडे उत्तम कामगिरी करीत आहे. श्रेयस आज स्वस्तात बाद झाला. नेहल वढेरा जेव्हा धावचीत झाला, तेव्हा पंजाब संघ 1 बाद 42 वरून 4 बाद 76 अशा अवस्थेत गेला.
आज पंजाब संघ मोठी धावसंख्या करू शकला नाही याचे कारण जेवढी कृणाल आणि सुयश यांची गोलंदाजी. तेवढीच हेझलवूड आणि भुवी यांनी केलेली डेथ ओवर मध्ये गोलंदाजी. लक्ष्यात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की शशांक 11 व्या षटकात फलंदाजीसाठी आला आणि तो नाबाद राहिला त्याच्या धावा होत्या 33 चेंडूत 31 आणि त्यात फक्त 1 चौकार होता. चेंडूला जेव्हा पासून लाळ लावण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा पासून चांगले स्विंग गोलंदाज रिव्हर्स करू लागले. आणि आता ही आयपीएल गोलंदाजांची देखील होऊ लागली आहे. भुवीने जे 19 वे षटक टाकले त्यात त्याने 1 वाईड यॉर्कर आणि 5 नियमित यॉर्कर टाकले. यावरून यॉर्कर हे अस्त्र किती प्रमाणात प्रभावी ठरत आहे याचा अंदाज येतो. जी गोष्ट भुवीने केली तीच हेझलवूडने केली आणि पंजाब संघाला त्यांनी 157 धावसंखेवर रोखले.
158 धावसंखेचे आव्हान घेऊन उतरलेल्या बंगळूर संघाची सॉल्ट जरी लवकर बाद झाला तरी त्यांनी दुसऱ्या विकेट साठी 69 चेंडूत 103 धावांची भागीदारी केली आणि सामना तिथेच पंजाब संघाच्या हातून निसटला. जेव्हा विराट आणि पडिक्कल खेळत होते तेव्हा ते बाद होतील याची शक्यता सुद्धा वाटत नव्हती. इतके ते तांत्रिक दृष्ट्या भक्कमपणे खेळत होते. आल्या आल्या पडिक्कलने आक्रमणाची जबाबदारी घेतली तेव्हा विराटने दुय्यम भूमिका घेतली.
एक वेळ या दोघांनी धावून 4 धावा काढल्या, तेव्हा विराट अजून ही किती तरुण आहे याचा अंदाज येतो. चहल जेव्हा आला तेव्हा त्याचे स्वागत पडिक्कलने षटकार मारून केले. एकट्या पडिक्कलने 4 षटकार मारून 35 चेंडूत 61 धावा केल्या. आणि विराट 54 चेंडूत 73 धावा काढून नाबाद राहिला.
या आयपीएल सर्धेत तांत्रिक दृष्ट्या सरस असलेले फलंदाज उत्तम कामगिरी करून तंत्र किती महत्वाचे आहे हे दाखवून देत आहेत. ही आयपीएल जेवढी गोलंदाज गाजवित आहेत तेवढेच क्लास फलंदाज देखील. आजच्या सामन्यानंतर 10 गुणांसहीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांची साठी हा रजतच्या नेतृत्वाखालील सुवर्णकाळ आहे. फक्त हा सुवर्काळ किती लांबवितात हाच काय तो प्रश्न.
























