एक्स्प्लोर
Advertisement
BLOG | 'सैन्यांचा आवाज, वीरमाता अनुराधा गोरे'
स्वराज्याची राजधानी रायगडावरचा हिरकणी बुरुज आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.. आणि त्या अनुषंगाने हिरा गौळणीची कथा ही ज्ञात आहेच. तिचं शौर्य, धाडस याचं कौतुक तर खुद्द छत्रपतींनीच केलं होतं. अशा असंख्य कर्तृत्ववान स्त्रिया आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहेत. नावं घेऊ तेवढी कमी आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम!
आज अशा एका हिरकणी बुरुजाला आपण भेटुया. तिचं नाव आहे वीरमाता अनुराधा गोरे. या वीरमाते विषयी आपण लिहुयाच पण आधी त्यांचा मुलगा अर्थात कॅप्टन विनायक गोरे यांनी जो लढा दिला त्याचं आधी स्मरण व्हायला हवं.
1995 सालची तो गोष्ट, संपूर्ण देश नवरात्रोत्सव साजरा करत होता. त्यावेळी कॅप्टन गोरे यांची ड्यूटी जम्मू-काश्मीरला होती. अचानक रात्री कुपवाड्यात गोरे यांच्या तुकडीवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर गोरेंनी प्रतिहल्ला करत चोख उत्तरंही दिलं. पण दरवेळी नियती आपल्याबाजूने असतेच असं नाही. त्या रात्री नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. एक मिसाईल थेट गोरेंच्या दिशेनं आलं आणि त्यांच्या देहाच्या चिंधड्या झाल्या.
आणि भारतमातेनं आपला आणखी एक सुपुत्र गमावला. तर अनुराधा ताईंनी पोटचा गोळा.
घरातला मुख्य आधार, 9 महिने पोटात सांभाळलेला, न्हाऊमाखू घातलेल्या एका माऊलीचा हा बाळ देशकामी आला. त्याचं वय होतं फक्त 26 वर्षे.
हे दुःख अनुराधा ताई कवटाळून बसल्या नाहीत. त्या खचल्या नाहीत किंबहुना एका सैनिकाची आई असल्यानं त्यांना फक्त लढायचं माहिती होतं.
अनुराधा गोरे यांनी शाळांशाळातून आणि मंडळांमंडळातून व्याख्याने देऊन तरुणांना भारतीय सैन्याची, सैनिकांची आणि ते करीत असलेल्या कामाची माहिती देणारी व्याख्याने देणे आणि वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिणे सुरू केले.
सैनिक म्हणजे नेमका कोण असतो. त्याचं कर्तव्य काय असतं. त्याचा धर्म म्हणजे भारतीय आणि माता म्हणजे भारतमाताच. असे विचार त्या तरुणांच्या मनात रुजवत आहेत.
सुरुवातीला त्यांनी 100 शाळांमध्ये सैनिकांची शौर्यगाथा सांगायचं ठरवलं होतं. परंतु, त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्या लिहित गेल्या आणि शौर्यगाथा सांगत गेल्या आणि अव्याहतपणे त्यांचं हे काम सुरु आहे.
ताई ज्या शौर्यगाथा सांगत असतात किंबहुना ती कथा. ती परिस्थितीच डोळ्यासमोर उभी करतात. सैनिक फक्त शत्रूवर गोळ्याच चालवतो का आणि म्हणूनच आपण सुरक्षित असतो का? तर नाही. त्याही पलिकडे तो प्राणाची बाजी कशी लावतो, घरदार सारं काही त्याला असतं परंतु देशसेवा हेच त्याचं आद्य आणि अंतिम कर्तव्य असतं हे सांगताना त्या कथा सांगतात सौरभ कालियाची.
सौरभ कालिया असा एक जवान ज्याने कारगिलयुद्धाच्या आधी देशासाठी बलिदान दिलं. त्याचं वय होतं वय वर्षे 22. सुट्टीवरुन कामावर निघायच्या आधी त्याने आईला सांगितलं होतं की, वाढदिवसाच्या दिवशी परत येईन काही गोडधोड कर, सगळ्यांना पार्टी देऊया. त्यानंतर निरोप घेऊन सौरभ कामावर रुजू झाला.
5 मे 1995 रोजी घुसखोरांचा सामना करताना पाकिस्तान्यांनी सौरभ आणि त्याच्या साथीदारांना पकडलं. त्यानंतर अटॉप्सी रिपोर्ट आल्यानंतर समजलं की त्यांना खूप वेदना देऊन मारलं गेलं होतं.
जवळपास 22 दिवस सौरभला पाकिस्तानकडून यातना दिल्या गेल्या होत्या. त्याचं ज्यावेळी पार्थिव आलं तेव्हा त्या पार्थिवावर स्पष्टपणे दिसत होते की संपूर्ण अंगावर दिलेले सिगारेटचे चटके. कानात घुसवलेल्या गरम सळयांचे तुकडे. त्याचे हात आणि पायसुद्धा तोडले होते. पण त्या वीराने अशा अवस्थेतही हूं की चू केलं नव्हतं!
आणि सौरभला अशाच मारलेल्या अवस्थेत पाकिस्तानने बॉर्डरवर टाकलं होतं. त्याची ओळख पटवणं सुद्धा कठीण होतं. आणि त्यानंतर घरी जेव्हा सौरभचं पार्थिव पोहचलं तो दिवस होता त्याच्या वाढदिवसाचा.
असे अनेक जवान देशासेवा बजावण्यात. देशाचं कर्तव्य पार पाडण्यात कामी आले आहे. केवळ सैनिक आहेत म्हणून आपण आहोत. अशा अनेक सैनिकांच्या खऱ्याखुऱ्या साहसी कथा सांगत अनुराधा ताई तरुणांमध्ये देशभक्ती जागृत करत आहेत. अनेक वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता यांच्यासाठी सुद्धा त्या एक आधार आहेत.
त्यांनी आजवर अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. जी सैन्य आणि सैनिकांशी संबंधित आहेत. आचंद्र-सूर्य नांदो, ओळख सियाचीनची, शौर्य कथा(युद्धविषयक)अशी काही त्यांची ग्रंथसंपदा आहे.
साधरणत: 4 वर्षापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं अनुराधा ताईंशी ओळख झाली आणि त्यांच्या संपर्कात आलो.
आजही त्यांच्या मनात तळमळ आहे मुलगा गमावल्याची नाही तर सैनिकांसाठीची. त्यांच्यामते सैनिकांचे आपण एक भारतीय म्हणून अधिक हात बळकट करायला हवेत. कारण आपले सैनिक हे कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्जा आहेत. कोणतीही आव्हानं पेलण्यासाठी ते तयार असतात.
पण आपल्या सैनिकांना, त्यांच्या कुटुंबियांना आपण भारतीय म्हणून मानसिक बळ देणं गरजेचं आहे. कारण अनुराधा ताईंच्या मते सैनिकांची लढाई ही केवळ सीमेपूरतीच नसते तर त्यांना देशातल्या शत्रूंसोबतही लढावं लागतं जे अधिक कठीण असतं. आपण देशवासिय म्हणून सतर्क राहणं गरजेचं आहे असं अनुराधा ताई त्यांच्या कार्यक्रमातून, व्याख्यानातून, संवादातून नेहमी सांगतात.
आपण सैनिकांसाठी काय करायला हवे, देशासाठी काय करायला हवं याची नेमकी दिशा ही वीरमाते आपल्याला देते आहे. आपणही तिच्या कार्याला नव्हे तर देशाच्या कार्याला थोडासा हातभार लावूया. आणि वीरमातेला महिला दिनाचा सलाम करुया!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement