आज पर्यंत आपण समाजमाध्यमांवर अनेक वेळा अमुक एक 'चॅलेंज' करण्यासाठी समस्त मित्र परिवाराला एखादी 'अॅक्टिव्हिटी' टॅग करून ते चॅलेंज करण्यासाठी सांगत असतो. या सध्याच्या कोरोनाच्या या महाभयंकर वातावरणात आपण हा खेळ म्हणणार नाही परंतु कटू वास्तव करण्यासाठी उद्युक्त करू. आज संपूर्ण समाजव्यवस्थेला आपण चॅलेंज करूया, एखादा कोरोनाबाधित रुग्ण आहे त्याला कोणताही अडथळा न येता रुग्णालयात दाखल करून दाखवायचं हे आहे चॅलेंज. विशेष करून मुंबई शहरात. जर हे चॅलेंज पूर्ण झाले तर जगात सगळ्यात सुखी आपण असू कारण सगळ्यांना नक्कीच एक समाधान असेल की एक कोरोना बाधित रुग्ण कोणतीही अनाठायी धावपळ न करता रुग्णालयात दाखल झाला.
सध्याच्या घडीला मुंबई शहरातील हे कटू वास्तव कोणाला जर नाकारायचं असेल तर त्यांनी ते खुशाल नाकारावं, ज्याला त्याला तो अधिकार आहे. येथे कुठलाही वाद निर्माण करायचा नाही आह . मात्र सध्यस्थिती तशीच आहे. अनेक उदाहरणं आहेत, जी कोरोनाबाधित रुग्णाला दाखल करायचं आहे म्हणून मुंबई पालथी घालत आहे, शोधा म्हणजे हजार सापडतील अशीच काहीशी या शहराची परिस्थिती आहे. आपली राज्याची सर्व आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन अगदी इमाने इतबारे काम करीत आहे, त्याबद्दल कुणाचे दुमत नाही. पण खरंच सांगतोय, खूप त्रास होतोय एखाद्या रुग्णाला ऍडमिट करण्यासाठी हा 'ग्राउंड झिरो रिपोर्ट' आहे. यामध्ये कुणाचे दोष दाखवायचा हेतू नाही आहे, मात्र हे वास्तव मान्य करुन काही तरी बदल घडायला हवेत त्यासाठी केलेला हा उहापोह. एका बाजूला सांगितलं जातंय आजराची काही लक्षणं आढळली तर लपवू नका. दुसऱ्या बाजूला जर एखादा 'पॉझिटिव्ह' आला तर कुठे दाखल करुन घ्यायचे हे पण सांगून टाका, म्हणजे ते नागरिकांना सोपं जाईल. ज्या हेल्पलाईन चा आधार घेण्याचे आवाहन केले गेले त्या हेल्पलाईन वर फोन करुन झाल्यानंतर पण न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे .
अनेक रुग्ण हताश होऊन सध्या मुंबई मध्ये फिरत आहे, प्रत्येक रुग्णाचा नातेवाईक छोटी-मोठी ओळख काढून आपल्या स्वकियाला रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी विविध प्रयत्न करीत आहे. त्यांना त्यात यश प्राप्तच होते असे नाही. डोळ्यात अनेक अश्रू येणारे, काहीही संबंध नसणारे पाया पडतो पण आमच्या पेशंटला अॅडमिट करुन घ्या अशा विनवण्या करणारे लोक रात्री अनेक रुग्णालयाचे दारे ठोठावत आहेत. खूप तास झाले पेशंट पॉझिटिव्ह आहे पण अजून कुणी घ्यायला आलेच नाही असे सांगणारे पण आहेत. तर काही जण काही वेळा करता 'कॅज्युल्टी' मध्ये ठेवून थोडे उपचार द्या सांगणारे नागरिक आहेत.
यामध्ये कुणाची चूक या वादात न पडता आपण कशा पद्धतीने रुग्णांना उपचार देऊ शकतो यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खरोखरच मुंबईतील सर्व रुग्णालये संपूर्ण भरली आहे का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आजही अनेक शासकीय रुग्णालयात व्यवस्थित नियोजन न केल्यामुळे खाटा उपलब्ध आहेत. मात्र 'थातुर मातुर' कारणामुळे त्या तशाच पडून आहेत. राजकारणी हे संवेदनशील असतात, त्यांना कायम चांगलं व्हावं असं वाटत असतं, कुठलाही रुग्ण न भटकता त्याला व्यवस्थित उपचार मिळावे वाटत असतं, पण तसं घडत नाही. सर्व सामान्य घरातील प्रत्येक नागरिकांची राजकीय व्यवस्थेतील माणसाबरोबर ओळख निघेलच असं नाही. काही स्वाभिमानी लोकांना असं त्यांचं काम सांगायला आवडत नाही.
आजपर्यंत कोरोनासंबंधित ज्या काही प्रशासन आणि व्यवस्थेच्या विरोधातील बातम्या विविध वृत्तपत्रात छापून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत, त्यातील बहुतांश बातम्या ह्या अशा आहेत की, रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या रुग्णालयात गेल्यानंतरही प्रवेश मिळाला नाही आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. कोरोनाबाधितांची रुग्ण संख्याच एवढी वाढत आहे की, आहे ती व्यवस्था अपुरी पडत आहे. त्या व्यवस्थेसाठी करायचं काय? याचं उत्तर शोधण्याची हीच ती वेळ. रुग्णांवर का अशी फिरण्याची वेळ येत आहे. जे काही लिहिलं आहे ते मनाचे श्लोक नसून जळजळीत वास्तव आहे. त्या वास्तवावर जर वेळीच उत्तर शोधून काढलं नाही तर जन आक्रोश व्हायला वेळ लागणार नाही.
सध्या शहरात जी काही खासगी आणि शासकीय रुग्णालये आहेत, त्यात सर्वच मग आलीत छोटे मोठे नर्सिंग होम ज्या ठिकाणी रुग्णाला उपचार दिले जाऊ शकतात आणि त्यांना दाखल करून घेतले जाऊ शकते अशा सर्व व्यवस्थेचा या मध्ये सहभाग आलाच. प्रशासन माहिती तंत्रज्ञानावर आधारित मुंबईतील उपलब्ध असणाऱ्या बेडची माहिती देणार अॅप का विकसित करु शकत नाही. यामुळे सर्व रुग्णांना माहिती मिळू शकेल की एखाद्या रुग्णालयात बेड उपलब्ध आहे किंवा नाही. आज रुग्णाच्या नातेवाईकांचा अनेकांना फोन करुन जीव मेटाकुटीला येत असतो. कोविड झाल्यावर जवळचे नातेवाईक जवळचे न राहता लांबचे होतात. त्यात त्या आजाराची धास्ती, त्याला होणार खर्च अशा विविध समस्या त्या रुग्णांच्या कुटुंबीयांसमोर उभ्या राहतात.
कोरोना सारख्या या महाभयंकर आजराने व्यवस्थेला दिलेले हे चॅलेंज ते प्रशासन कशा पद्धतीने स्वीकारतं आणि त्याच्यावर मात करतं यावर त्याची यशस्विता अवलंबून आहे. सध्याच्या घडीला रुग्णांना बेड भेटत नाही म्हणून शासन आणि प्रशासन धावपळ करीत आहे, विविध ठिकाणी बेड टाकत आहे. त्यांच्या या सर्व प्रयत्नांना सलाम, खूप चांगलं करताय मात्र तरीही काही गोष्ट अपुऱ्या पडत आहेत. कुणी नागरिक मुद्दामून आजारी पडत नाही. मात्र तो आजारी पडणारा रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची उडणारी त्रेधातिरपीट पाहून कुणाचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही. अनेक वेळा त्या नातेवाईकांनी धावपळ केल्यानंतर त्या रुग्णाला दाखल करुन घेतले जातेही, मात्र त्याची होणारी अनाठायी धावपळ कशी थांबेल याचा विचार केला गेला पाहिजे, असं कोणतं 'मॅकॅनिज्म' विकसित केल्यावर ही धावपळ थांबू शकेल, याचा विचार येथे केला गेला पाहिजे. विशेष म्हणजे फक्त कोरोनाबाधितच नाही तर कोरोन नसणारे रुग्ण आजारी पडले तर त्यांच्या पदरी हीच धावाधाव येते. तूर्तास, रात्र वैऱ्याची आहे, सावध राहा. कारण अनेक रुग्णांची फरफट ही काळ्या अंधारातच होत आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची