एक्स्प्लोर
हेरगिरी - 'हेरा'फेरी !
कधी कधी याच्या उलट परिस्थिती असते. आपल्याच राष्ट्राचा हेर असतो पण त्याला आपले म्हणता येत नाही कारण त्याला आपला नागरिक म्हटलं की हेरगिरी केल्याचा आरोप सिद्ध होतो. तर कधी भलत्याच माणसाला शत्रूराष्ट्राने पकडून डांबून ठेवलेले असते. ते त्याच्यावर हेरगिरीचे आरोप रचतात. फेक पुराव्यांची अन खोट्या साक्षीची चवड मांडतात. त्या माणसाला मरेस्तोवर कारागृहात सडवतात. त्याच्या दर्दनाक मृत्यूनंतर त्याचा देह संबंधित राष्ट्राच्या हवाली करतात. तर कधी हेरांना थेट मृत्युदंडच दिला जातो. तर बऱ्याच वेळा एखादया राष्ट्राने कोणी एक हेर पकडला की त्याचे शत्रूराष्ट्रही लगोलग काही काळात पाळत ठेवून असलेल्या हेराला पकडते. हेरगिरी करणाऱ्या लोकांची मानसिकता आणि तोंड बंद ठेवण्याची कला यावर बरेच गणित अवलंबून असते.
ब्रिटनच्या विल्टशायर रुग्णालयात ६६ वर्षीय गुप्तहेर सेरजी स्क्रीपल आणि त्याची मुलगी युलिया जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. या दोघांनाही सॅलिसबरी येथील एका शॉपिंग सेंटरबाहेर बेशुद्ध झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सेरजी स्क्रीपल मुळचा रशियाचा. २३ जून १९५१ मध्ये रशियाच्या एका छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म झाला. आपले शिक्षण त्याने रशियातच पूर्ण केले. त्याच्या मनातील सैन्यदलाची ओढ त्याला गप्प बसू देत नव्हती.
रशियन पायदळात सैनिक म्हणून त्याने आपले करिअर सुरु केले. तिथेच त्याने अशी काही कसब कलाबाजी दाखवली की रशियन गुप्तचर संस्था केजीबीने त्याची हेरगिरीसाठी निवड केली. या कामात त्याने चांगलेच रंग भरले. दरम्यानच्या काळात तो केजीबीत आणखी एका कारणाने चर्चेत आला होता ते म्हणजे त्याची जीवनशैली. त्याची लाईफस्टाईल अत्यंत आरामदायी आणि अलिशान अशी होती. महागडे ब्रँड वापरण्याचा शौक असलेला सेरजी 'स्पाय विथ द लुईस व्हिटन बॅग' नावाने प्रसिद्ध झाला होता. याचमुळे रशियन आर्म्ड फोर्सेस आणि केजीबीने त्याला रडारवर ठेवले.
१९९० च्या दशकात त्याची चौकशी सुरु झाली. यातून धक्कादायक माहिती समोर आली. तो एक डबल एजंट असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावरचा फास आवळण्यासाठी त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले गेले. २००४ मध्ये त्याला रशियातच अटक केली गेली. २००६ मध्ये त्याच्याविरुद्ध रीतसर खटला दाखल केला गेला. त्याच्या विरोधात देशद्रोहाचे गंभीर आरोप ठेवले गेले. १९९० पासूनच तो ब्रिटनसाठी रशियाची हेरगिरी करत होता हा मुख्य आरोप त्यात ठेवला गेला. त्याला डबल एजंट ठरवले गेले.
ढोबळमानाने डबल एजंट म्हणजे आपल्याच देशासाठी हेरगिरी करताना दुसऱ्या देशासाठी आपल्याच देशाची हेरगिरी करत गोपनीय माहितीची देवाण घेवाण करणे. अगदी जेम्स बॉण्ड स्टाईलने तो हे काम करायचा. रशियन पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रे यांची माहिती देण्याची एक साखळी त्याने आरंभली होती. ही सगळीच माहिती तो MI6 ला कोडद्वारे पाठवायचा. ब्रिटीश गुप्तचर संस्था MI6 ने त्याला या कामी १ लाख अमेरिकन डॉलर दिले होते हे पुराव्यानिशी सिद्ध केले गेले.
अखेर २००६ मध्ये सेरजीला १३ वर्षांची शिक्षा ठोठावली गेली. याच दरम्यान ब्रिटनने देखील रशियाचे काही हेर पकडले. त्यांची चौकशी सुरु केली गेली. त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं. २०१० मध्ये अमेरिकेच्या मदतीने रशिया आणि ब्रिटन यांच्यात हेरांच्या अदलाबदलीची प्रक्रिया सुरु झाली. यात रशियाने ब्रिटनचे चार हेर सोडले तर ब्रिटनने १० रशियन हेर सोडले. यावेळी दोन्ही राष्ट्रात एक करार केला गेला त्यानुसार सेरजीला अमेरिकेत स्थायिक केले जाणार होते, पण प्रत्यक्षात तो आपली पत्नी, मुलगा आणि मुलगी यांच्यासह ब्रिटनमध्ये वास्तव्यास गेला. त्याचे हे हस्तांतरण अत्यंत गोपनीय पद्धतीने झाले होते. तरीही तो अमेरिकेऐवजी ब्रिटनमध्ये गेला. तिथं वास्तव्यास असताना त्याने जीवनशैली पूर्ण बदलून टाकली. तो अत्यंत साध्या आणि विषम परिस्थितीत आपल्या कुटुंबासह राहू लागला. तरीही त्याच्या तिथल्या वास्तव्याची केजीबीला भनक लागली असावी.
ब्रिटनमधल्या वास्तव्यात सुरुवातीलाच त्याची पत्नी कार अपघातात मरण पावली. आपल्या पत्नीचा एकाएकी झालेला अपघाती मृत्यू त्याला हादरवून गेला. त्या धक्क्यातून तो सावरतो न सावरतो तोच काही महिन्यात पुन्हा एकदा एका कार अपघातातच त्याच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला. हे अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याची शक्यताच जास्त आहे. या नंतर तो आपल्या तरुण मुलीसह अत्यंत दक्षता बाळगत लपून छपून राहत होता. तरीही रविवार ४ मार्च रोजी मुलगी युलियासह त्याच्यावर विषप्रयोग केला गेला. केजीबीच्या लोकांनीच त्याला शोधून काढून त्याच्यावर व त्याच्या मुलीवर विषप्रयोग केला असा गंभीर आरोप ब्रिटनच्या प्रधानमंत्री थेरेसा मे यांनी त्यांच्या संसदेत केला. दोघेही एका शॉपिंग सेंटर बाहेर बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. ब्रिटनमधील विल्टशायर जवळील एका रुग्णालयात आता या बापलेकीवर उपचार सुरु आहेत. दोघांचीही अवस्था अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं गेलंय.
डबल एजंट सेरजी आणि त्याच्या मुलीला रशियानेच विष दिले असा संसदेत दावा करताना ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी रशियाला सज्जड दम भरला. रशियन लष्कर आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना खडेबोल सुनावताना दोन दिवसांत या कृत्याचे उत्तर द्यावेच लागेल असे आव्हान दिले. एवढेच नव्हे, 'तर दोन दिवसात उत्तर न मिळाल्यास रशियाने आमच्या जमीनीवर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करून मोहिम राबवली असे गृहित धरले जाईल. तसेच याचे चोख प्रत्युत्तर रशियाला आमच्याकडून दिले जाईल' असा इशारा त्यांनी दिला. 'स्क्रिपल आणि त्याच्या मुलीला देण्यात आलेले विष नोव्हिचोक नावाचे जालीम विष आहे. हे विष रशियन लष्कराकडून वापरले जाते हे सर्वश्रुत आहे' असंही त्या म्हणाल्या. 'त्यांनी आमच्या जमीनीवर ही कारवाई केलीच कशी ?' असा सवाल देखील मे यांनी उपस्थित केला. रशियाने मात्र, ब्रिटनचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तर या आरोपांकडे सुरुवातीला स्पष्ट दुर्लक्ष केले. एका रशियन मंत्र्याने तर ही ब्रिटीश संसदेतील सर्कस असल्याची मल्लीनाथी केली. रशिया आपल्या मागणीला फारसे गांभीर्याने घेणार नाही याची जाणीव कदाचित थेरेसा मे यांना असावी, त्यांनी १५ मार्च रोजी आपल्या देशातील २६ रशियन उच्चायुक्तांना घरचा रस्ता दाखवला. एवढेच नव्हे, तर रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंधांसाठी अमेरिकेच्या मदतीने संयुक्त राष्ट्रात दबाव टाकण्यासही सुरुवात केली. यावर मात्र पुतीन तडकाफडकी व्यक्त झाले, कारण ब्रिटनने केलेली ही कारवाई त्यांना चांगलीच झोंबली आणि जागतिक पटलावर रशियाची मानहानी करणारा अलीकडचा हा मोठा प्रसंग होता. 'शीतयुद्धाच्या काळात जसा आवाज थंड केला तशी वेळ आता पुन्हा आणू नका' असं मॉस्कोने दटावले. तसेच ब्रिटनच्या या कारवाईनंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रवक्त्याने बदला घेणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान या प्रकरणात अमेरिकेने ब्रिटनला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) सुरक्षा परिषदेच्या आपातकालिन बैठकीत अमेरिकेच्या राजदूत निकी हेली म्हणाल्या, 'ब्रिटनमध्ये दोन जणांना विष देऊन मारण्यात आले. या षडयंत्रामागे रशिया आहे हे अमेरिकेचे मत आहे. अशा घटनांना पायबंद घालायचा असेल तर कडक पाऊल उचलावे लागेल. अन्यथा उद्या न्यूयॉर्क किंवा परिषदेमध्ये असलेल्या कोणत्याही देशावर हल्ला होऊ शकतो. रशिया न्यूयॉर्कवरही केमिकल वेपन्सचा वापर करण्यास मागेपुढे पाहाणार नाही.' या शाब्दिक चकमकीनंतर रशियानेही आपले दात दाखवत ब्रिटनच्या दूतावासातील २३ अधिकाऱ्यांना देश सोडून जाण्यास फर्मावले.
रविवार १८ मार्च रोजी 'द सन'ने दिलेल्या माहितीनुसार नोव्हिचोक हे विष सेरजीच्या बीएमडब्ल्यू कारच्या व्हेंटीलेशन सिस्टीममध्ये बूट केले होते. हे विष इतके जालीम होते की सॅलिसबरी भागातील ३८ लोकं याने आजारी पडली आहेत, यात विल्टशायरचे पोलिस अधिकारी डिटेक्टीव्ह सार्जंट निक बेली यांचाही समावेश आहे. नोव्हिचोकने शरीरातील सर्व मज्जातंतू बाधित होत जातात आणि त्यात मृत्यू होतो. लिक्विड फ्युम्सच्या स्वरुपात याचा वापर होतो.
सेरजी आणि त्याची मुलगी युलिया वरील हल्ला रशियानेच केला होता हे जर सिद्ध केले गेले तर रशिया रासायनिक अस्त्रे कुठेही आणि कशीही वापरू लागलाय हे आपोआप सिद्ध होईल आणि त्याचे जे परिणाम असतील ते प्रलयकारी असतील. पण अशा प्रकारची ही पहिली घटना नव्हती. याही आधी अशीच घटना याच दोन राष्ट्रादरम्यान घडली होती. २००६ साली पूर्वाश्रमीच्या केजीबी एजंट असलेल्या आणि नंतर अमेरिकेत आश्रय घेतलेल्या एका हेराचा लंडनमध्ये मृत्यू झाला होता. हा गुप्तचर सध्याचे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा कट्टर विरोधक होता. या गुप्तचराने अमेरिकेत आश्रय घेतल्यावर एका चेचेनवादी मुखपत्राचा संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.
नोव्हेंबर २००६ रोजी अचानक या व्यक्तीची तब्येत बिघडली आणि थोडयाच दिवसात त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अन्नातून विषबाधा. विषपण साधे नाही, तर पोलोनियम २१० म्हणजे किरणोत्सर्गी पोलोनियम. हे किरणोत्सर्गी रसायन फक्त रशियातच मिळते. या व्यक्तीच्या मृत्यूने ग्रेट ब्रिटन आणि रशियाच्या राजकीय संबंधात नवीन तेढ निर्माण झाली. असे म्हटले जाते की, हा विषप्रयोग म्हणजे या गुप्तचराला दिलेली शिक्षा होती. या हेराचे नाव होते अलेक्झांडर लिवेनेन्को. भारतीय वृत्तपत्रातही तेंव्हा याची दखल घेतली गेली होती. एका हेराच्या मृत्यूसाठी इतकं पछाडलं जाणं साहजिक असतं कारण हेरगिरी आणि त्यांची हेराफेरी काळजाला कायमचा सल लावणारी असते. त्यात डबल एजंट असला की मग त्या जखमेचा नासूर होतो.
कधी कधी याच्या उलट परिस्थिती असते. आपल्याच राष्ट्राचा हेर असतो पण त्याला आपले म्हणता येत नाही कारण त्याला आपला नागरिक म्हटलं की हेरगिरी केल्याचा आरोप सिद्ध होतो. तर कधी भलत्याच माणसाला शत्रूराष्ट्राने पकडून डांबून ठेवलेले असते. ते त्याच्यावर हेरगिरीचे आरोप रचतात. फेक पुराव्यांची अन खोट्या साक्षीची चवड मांडतात. त्या माणसाला मरेस्तोवर कारागृहात सडवतात. त्याच्या दर्दनाक मृत्यूनंतर त्याचा देह संबंधित राष्ट्राच्या हवाली करतात. तर कधी हेरांना थेट मृत्युदंडच दिला जातो. तर बऱ्याच वेळा एखादया राष्ट्राने कोणी एक हेर पकडला की त्याचे शत्रूराष्ट्रही लगोलग काही काळात पाळत ठेवून असलेल्या हेराला पकडते. हेरगिरी करणाऱ्या लोकांची मानसिकता आणि तोंड बंद ठेवण्याची कला यावर बरेच गणित अवलंबून असते.
कुलभूषण जाधव प्रकरणात आपली पंचाईत झाल्याचे पाहावयास मिळते. कुलभूषण यांना भारतीय भूमीवर पाकने अटक केलेली नाही पण त्यांचे भारतीय मूळ असणे हे पाकच्या पथ्थ्यावर पडले आहे. कुलभूषण यादव यांचे कबुली जबाब असणारे काही व्हिडीओ ठराविक कालांतराने पाकिस्तानने जारी केले. त्यांच्या तोंडून भारतावरच टीका करवून घेतली. त्यांच्याकडून हवे ते वदवून घेतले. पाकने दबाव आणून हे जबाब घेतले आहेत अशी आपली यावरची भूमिका आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही या घटनेत आपलीच बाजू काहीशी उचलून धरली. असे असूनही पाक कुलभूषण यादव यांच्या आडून भारतावर शाब्दिक हल्ले चढवण्याची एकही संधी सोडत नाही. हेरगिरी ही अशी असते, कधी जीवाला पिसे लावते तर कधी काळजाला कुरतडते.
जाधव पकडले गेल्यानंतर त्यांचा भारतीय लष्कराशी / प्रशासनाशी संबंध असल्याचे आपल्याकडून आधी नाकारले गेले. नंतर ते सेवानिवृत्त लष्करी अधिकारी असल्याचा दावा भारत सरकारने केला पण पाकिस्ताननं जेव्हा त्यांची सेवानिवृत्ती पुस्तिका मागितली तेव्हा सरकारनं त्यावर मौन बाळगलं. त्यांची सेवानिवृत्ती पुस्तिका दाखवण्यात आली असती तर जाधव यांची केस मजबूत झाली असती. जाधव यांच्याकडून बनावट पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत. 'जाधव यांनी पाक अधिकारयांनी पढवलेले जबाब दिले आहेत' या आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ आपल्याकडे पुरावे नाहीत परंतु जाधव यांनी आपण भारतीय लष्करासाठी काम करतो याची कबुली दिली तेंव्हा आपल्याला दोन पावले मागे हटावे लागले.
पाकच्या म्हणण्यानुसार जाधव हे भारतीय लष्कराकडून वा गुप्तहेर खात्याकडून बलुचिस्तानात हेरगिरी करायला आले होते. पाकला मिळालेले हे मोठे सावज होतं, याला ते हत्यारासारखे न वापरता अंतरराष्ट्रीय मंचावर भारताची नाचक्की करण्यासाठी आणि स्वतःची उध्वस्त झालेली मानवतावादी छबी नव्या वर्खात पुढे आणण्यासाठी वापरलं. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा दोन वर्षं जाधव यांच्यावर लक्ष ठेऊन होती. संधी मिळताच त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे भारतानं बलूचिस्तानमध्ये अशी एक व्यक्ती पाठवली होती, अशा प्रचाराची जगाला आणि भारताला टोचणी देण्याची आयती संधी पाकिस्तानला मिळाली.
या सर्व घडामोडीत हेर असलेल्या किंवा हेर ठरवल्या गेलेल्या व्यक्तीच्या आप्तेष्टांच्या जीवाची घालमेल होते. कुलभूषण जाधव प्रकरणातला अनुभव ताजा आहे. जाधव यांच्या मातोश्री आणि पत्नी यांना पाकने आधी भेट नाकारली होती. नंतर त्याची अनुमती दिली. इस्लामाबादमध्ये आई आणि पत्नीशी यांच्याशी जेंव्हा त्यांची भेट घडवण्याआधी पाकने त्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती तेंव्हा आपली बाजू मजबूत होती. पण जाधव यांच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देऊन पाकने आपल्याला जाळ्यात अडकवले. जाधव यांच्या फाशीची अंमलबजावणी त्वरित करून पाकिस्तानच्या हातात काहीच पडणार नाही हे त्यांना ठाऊक आहे. उलट त्यांना जास्तीत जास्त काळ जिवंत ठेवणे पाकच्या राजकीय हिताचे आहे आणि हे त्यांनी चांगले ओळखले आहे. जाधव हे काही कसाबसारखे दहशतवादी नाहीत. त्यामुळे तिथे त्यांच्याविरुद्ध आक्रोश नाही मात्र संताप जरूर आहे. पाक जनता आणि मिडीया त्यांना 'कातील' संबोधते. पाकिस्तानमधल्या दहशतवादी प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि ते भारतीय गुप्तचर यंत्रणा 'रॉ'साठी काम करतात, हे त्यांनी मान्य केल्याचा पाकिस्तानचा दावा होता.
जगात एखादा गुप्तचर पकडला गेला आणि त्याला आदराची, सन्मानाची वर्तणूक दिल्याचे कुठे पाहण्यात नाही आणि त्याने स्वतः होऊन गुन्हा स्वीकार केल्याचेही आढळत नाही. गुन्हा कबूल केल्यावर त्याला चांगली वर्तणूक दिल्याचे दिसत नाही. जाधव यांच्या कुटुंबियांच्या भेटीत त्यांच्या पत्नीला, आईला कुंकु पुसायला लावले आणि मंगळसूत्र काढायला लावले. मायबोलीत बोलू दिले नाही. सुरक्षेच्या नावाखाली कपडे बदलायला लावले. भारतीय उच्चायुक्तांना सोबत बसू दिले नाही. संभाषणात इंटरकॉमवर बोलायला लावले मायलेकाच्या मधोमध काचेची भिंत उभी केली. जीनांच्या वाढदिनी उदारमतवादाचे नाटक करताना पाकिस्तानने शक्य तितका अपमानच केला. मात्र पाकने मात्र या प्रकरणी वरकरणी का होईना जगासमोर या निमित्ताने दयाळूपणाचा देखावा उभा केला होता. या कौटुंबिक भेटीत जाधव यांनी भारतावरच अनेक आरोप लावले पण त्यांच्या कुटुंबीयांनी बाणेदारपणे त्याचे उत्तरही दिले होते. यावर आपण कितीही आदळआपट केली तरी सध्याच्या चित्रानुसार जाधव हे पाकमध्ये पकडले गेलेले भारतीय गुप्तहेर आहेत, ते भारतीय लष्कराचे मुलकी अधिकारी आहेत, त्यांचे कुटुंबीय पाकमध्ये विनातक्रार भेटून गेलेत, शिवाय या बद्दल स्वतः जाधव यांनी पाकचे आभार मानले, त्यांच्या कुटुंबीयांनीही इस्लामाबादेत असताना शुकराना मानला. भलेही आपण याला देखावा म्हणू पण पाकने तो यशस्वीरित्या उभा केला होता.
जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घडवून आणताना पाकिस्तानातल्या भारतीय उच्चायुक्तांना जाधव यांना भेटण्याची परवानगी पाकिस्ताननं दिली नव्हती. जाधव त्या श्रेणीत मोडत नाहीत, तसंच ते काही राजकिय व्यक्ती नाहीत, असं स्पष्टीकरण पाकिस्ताननं दिलं होतं. असं असलं तरी या भेटीच्या आधी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं होतं की, पाकिस्तान त्यांना ती सुविधाही भविष्यात उपलब्ध करून देऊ शकेल. जाधव यांच्या प्रकरणात पाकिस्तान आत्मविश्वासाने आणि विचाराने पावले टाकत आपला मानवतावादी चेहरा जगापुढे आणण्याचा योजनाबद्ध प्रकार करतानाच त्यांच्या पत्नीच्या पादत्राणाच्या निमित्ताने आपल्याला डबल जिओपार्डीत गुंतवले. आजवर अनेक मासे दोन्ही देशांनी गळाला लावले होते पण कुलभूषण जाधव यांच्या निमित्ताने पाकला पहिल्यांदा मोठा मासा हाती लागला आणि त्या माशाचा गळ करून ते आपल्याला काही अंशी का होईना खेळवलं असे सध्याचे चित्र आहे.
आपण एकीकडे केवळ कांगावा करण्यात गुंतलो होतो तेंव्हा पाक मात्र आंतरराष्ट्रीय पटलावर या भेटीला फाशी वा न्यायालयीन प्रक्रीयेपासून अलग करत मानवतावादाशी सांगड घालत होता, हे जगासमोर मांडताना जाधव यांच्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यांना 'राईट टू डिफेंड'ची सोय दिली होती याची खुबीने जाणीव करून दिली गेली. आधी नातं नाकारून नंतर मौन स्वीकारून पुढे जाऊन थेट नातलगांची भेट घडवून आणताना आपल्याला पाकिस्तानचे मनसुबे कळले नाहीत का याचे उत्तर काळच देईल. जाधव यांच्याबाबत सरकार एकाच दृष्टिकोनावर का ठाम राहू शकले नाही ही कदाचित गोपनीयतेची बाब असू शकते पण त्यांच्या नातलगांच्या भेटीने आपण बॅकफूटवर जाताना पाकला क्रीझ बहाल केली, ज्याचा त्याने चतुराईने फायदा घेतला. या सर्वाचा परिणाम म्हणून दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबधांमध्ये बिघाड येणं शक्य नव्हते.
आपल्याबाजूने तसे संकेत जरी दिले गेले असते तरी आपण आणखी मागे आलो असतो. पाकच्या विदेश मंत्रालयाने यावर पुढे मल्लीनाथी करताना 'हे एक द्विपक्षीय देवाण-घेवाणीचं प्रकरण होऊ शकेल काय याचा अभ्यास केला जाईल' असे म्हणून आपल्याच कोर्टात चेंडू ढकलला होता. कारण यापूर्वी अशा सुटकेच्या घटना दोन्ही बाजूने घडल्या आहेत. योगायोगाने जेंव्हा जाधव पकडले गेले त्याच काळात एक पाकिस्तानी हेर नेपाळमध्ये पकडला गेला होता तर रेकीच्या आरोपावरून दोन पाकिस्तान्यांना भारताने ताब्यात घेतले. हेरांच्या या हेराफेरीत हेर आपल्या जीवावर उदार होऊन प्राणाची बाजी खेळत असतात हे मात्र खरे. कदाचित पाकला येथे 'हेरा'फेरी करायची हुक्की आली असावी. पण भविष्यात भारत पाकला नक्की धडा शिकवेल..
क्रमशः
(पुढील भागात – सरबजीत, रवींद्र कौशिक आणि रॉ)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement