BLOG : मुत्सद्देगिरीची झलक, शरद पवारांचं राजकारण अन् शिंदे-दादा-फडणवीसांची पंचाईत
BLOG :
अस्तित्वाची लढाई हे शब्द आपण नेहेमी ऐकत आलो आहोत. पण त्याचा नेमका अर्थ महाराष्ट्रात आता बघायला मिळतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि एनसीपी शरदचंद्र पवार या दोन नव्या पक्षांसाठी ही लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई असेल. जुने जाणते नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असेल.
या दोन्ही नेत्यांसोबत वेगवेगळ्या कारणांनी राहिलेल्या नेत्यांसाठी सुद्धा ही अस्तित्वाची लढाई असेल; हा कसोटीचा काळ असेल. काँग्रेसच्या काही नेत्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नसेल. जसजसं जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल, निवडणूक प्रचार सुरु होईल तशी या नेत्यांची घालमेल वाढू शकते.
गेल्या वेळच्या, 2019 सालच्या निवडणुकीत त्यावेळी एकसंघ असलेल्या राष्ट्रवादीला दोन मुद्द्यांनी अनपेक्षित साथ दिली होती. दोन्ही गोष्टी अर्थातच शरद पवार यांच्याशी संबंधित. एक म्हणजे ईडीची न आलेली नोटीस आणि दुसरी म्हणजे छत्री असूनही पावसात भिजत भाषण करण्याचा निर्णय.
अवसान गळालेल्या राष्ट्रवादीमध्ये या दोन्ही गोष्टींनी जीव फुंकला होता. शरद पवारांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत कधीही मिळाली नव्हती एवढी सहानुभूती मिळाली होती. त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीचं मतदान आणि जागा वाढण्यात झाला होता. काँग्रेसलाही याचा फायदा मिळाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'फडणवीस' असणं सुद्धा अत्यंत खुबीने वापरायचा प्रयत्न झाला होता. या सगळ्यामुळे भाजपचं गणित नाही म्हंटलं तरी बिघडलं होतं.
आता सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न असू शकतो. राष्ट्रवादीतील फूट असो अजितदादांचं रोखठोक बोलणं असो किंवा जरांगेंच्या आंदोलनाचा, आरोप-प्रत्यारोपांचा रोख फडणवीसांकडे वळवण्याचा प्रयत्न असो. कुठल्या तरी मुद्द्यावर शरद पवारांना सहानुभूती मिळावी असेच प्रयत्न सुरु आहेत.
ते यशस्वी झाले तर 'एनसीपी शरदचंद्र पवार' या नव्या पक्षाचा फायदा होईल आणि त्यासाठीच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे बारामतीत अचानक व्हायरल झालेलं एक निनावी पत्र असू शकतं. या जाळ्यात न अडकण्यासाठी अजित पवार आणि भाजप सगळे प्रयत्न करत असणार. परसेप्शनच्या या खेळात कोण चांगलं चित्र उभारु शकतं यावर सामान्य मतदार कोणाच्या बाजूने कलतील ते ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत होणाऱ्या एका सरकारी कार्यक्रमासाठी शरद पवारांना निमंत्रण नाही अशी बातमी आली.
कार्यक्रम बारामतीत होत असताना, पवारांच्या संस्थेत होत असताना कार्यक्रम पत्रिकेवर शरद पवारांचं नाव टाकायचं नाही असा निर्णय ज्याला थोडंफार राजकारण कळतं असा कोणीही व्यक्ती ठरवून घेईल असं वाटत तर नाही. ज्याच्या चुकीमुळे कार्यक्रमपत्रिकेवर नाव टाकायचं राहिलं असेल किंवा नाव टाकायचं नाही असं खरंच एखाद्याने ठरवलं असेल तर त्याने शरद पवारांची खूप मोठी मदतच केली आहे.
नमो रोजगार मेळावा म्हणजे वरवर पाहता एक रुटीन सरकारी कार्यक्रम. पण शरद पवारांच्या एकामागोमाग अचूक खेळींमुळे तो एकदम राजकीय मुत्सद्देगिरीच्या केंद्रस्थानी आला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं. आमंत्रण स्वीकारलं तरी पंचाईत आणि नाही स्वीकारलं तरी पंचाईत अशी स्थिती शिंदे-फडणवीस-पवार यांची झाली असेल. त्यातही बारामतीची मोठी लढाई लढायच्या तयारीत असलेल्या अजितदादांसमोरचा पेच जास्त मोठा असेल.
अर्थात देवेंद्र फडणवीसांनी जेवणाचं आमंत्रण नाकारण्यासाठी पत्रात दोन अतिशय महत्वाची कारणं दिली आणि बॅलन्स काही प्रमाणात साधला. संभाजी महाराज आणि लहुजी वस्तादांच्या स्मारकाच्या भूमीपूजनापुढे शरद पवारांचं आमंत्रण काहीच नाही असा संदेश त्यातून दिला.
ग्राऊंडवरच्या लढाई इतकीच परसेप्शनची लढाई किती महत्वाची आहे हे आपण पाहात आलो आहोत. या सगळ्या घडामोडी सुरु असतानाच गुरूवारी रात्री आणि आज सकाळी सुप्रिया सुळेंनी व्हाट्सप स्टेटसला बारामतीतून लढणार असल्याचे दोन फोटो ठेवून आपली उमेदवारी जाहीर केली आणि एकप्रकारे प्रचाराचा श्रीगणेशाच केला.
शरद पवार हे मुरलेले, कसलेले, मुरब्बी राजकारणी का आहेत याची झलक नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळाली. रोजगार मेळाव्याच्या नो बॉलवर पवारांनी रन्स काढून घेतल्या आहेत असं म्हणता येईल. फडणवीसाच्या उत्तरानं आणखी एक चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न फसला असंही म्हणावं लागेल.
या लेखकाचा हा ब्लॉग वाचा: