एक्स्प्लोर

'पिशवी'सूत्र

माणसाचा पिशवीशी असलेला संबंध किती खोलवरचा आहे आणि दैनंदिन मानवी जीवनातलं पिशवीचं महत्व यावर खुमासदार भाष्य करणारा लेख...

खरं तर पिशवीचा संबंध मानवी जीवनाशी जन्माआधी आणि जन्मानंतरही येतो. जन्म होण्याआधी गर्भाशयाच्या पिशवीत नऊ महिने काढावे लागतात तर मृत्यूनंतर मर्तिकाचे सामान एका पिशवीवजा गाठोड्यात आणले जाते. पिशवीचा प्रवास असा प्रारंभापासून अंतापर्यंत प्रत्येकाची सोबत करतो. दैनंदिन जीवनात देखील पिशवी हा अविभाज्य घटक झालाय. पिशवीच्या जगात नुकताच एक प्रलय येऊन गेला तो म्हणजे प्लास्टिक पिशवीवरील बंदी. ही बंदी थोडीफार शिथिल होईल न होईल वा त्यावर राजकारण होईल हे जगजाहीर आहे. कारण आपल्या लोकांनी कशावर राजकारण केले नाही अशी गोष्टच आपल्याकडे नाही. कोणाच्या घरी पोर जन्मलं वा कुठे कुणी मयत झालं तरी त्यावरही घरगुती राजकारण सुरु होते. घरगुती पातळीवरचे राजकारण सासू सुनेच्या पारंपारिक छद्म-डावपेचाहून भयानक असते. त्यानंतर गल्लीत, मग गावात आणि राज्य-देश पातळीवर राजकारण होत राहते. यातून कशाचीच सुटका नाही, मग प्लास्टिक पिशवी कशी अपवाद राहील ! तर मंडळी या प्लास्टिक पिशवीने अलीकडील काळात आपलं आयुष्य पुरतं व्यापून टाकलेलं होतं. खरं तर मानवी जीवनात पिशवीचा उगम कधी झाला असावा ही माहिती देखील रंजक असणार आहे. तो मानववंशशास्त्रज्ञांचा प्रांत आहे.  आपण त्यावर भाष्य करणे म्हणजे म्युनिसिपालटीत ढेकुण मारण्याच्या मोहिमेत काम करणाऱ्याने एतद्देशीय युद्धज्वर आणि जागतिक शस्त्रसंधीच्या रस्सीखेचीत बुडून जात अश्मयुगातील शस्त्रांचा संदर्भ देत 'वॉर एक्स्पर्ट'चा आव आणल्यासारखे होईल. उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यातील मानवाच्या इतिहासापर्यंत मागे गेले की अनेक गोष्टींचा सुगावा लागतो. नुकतेच पूर्व आफ्रिकेत सापडलेले एक लाख ९५ हजार वर्षे पूर्वीच्या काळातील  मानवाचा पूर्वज समजल्या जाणाऱ्या होमो सेपियन्सचे सांगाडे असोत की साठच्या दशकात मोरोक्को येथील जेबेल इरहूड इथं सापडलेल्या तीन लाख वर्षाआधीचे सांगाडे असोत शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हा माणूस शिकारीच्या साधनांसह अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत होता. नाही म्हणायाला अजूनही माणूस अन्नाच्या शोधात हिंडतोच आहे; म्हणजे आपण अजूनही तिथेच आहोत असे समजायला हरकत नाही. नाहीतरी आपले अनेक दुर्गुण पाहू जाता आपण आदिम काळात जगतो आहोत अशी ओरड अलीकडे सारखी कानी येते. तर मंडळी या मानवाकडे शिकारीसाठीची एक काठी होती जिला त्याने धाग्यासारखी एक तत्सम गोष्ट गुंडाळली होती. या मानवाने स्वतःभोवती प्राण्यांची फर गुंडाळली होती. या दोन गोष्टी आपल्याला पिशवीच्या इतिहासासाठी पुरेशा आहेत. बाकी विज्ञानात नाक खुपसायचे आपल्याला कारण नाही कारण त्यासाठी जे सूक्ष्म नाक लागते ते आपल्याकडे नाही. यावरून कुणी आपल्याला नकटे म्हणायचेही कारण नाही. जरी कुणी आपल्याला नकटे म्हटले तरी आपण चिडण्यात काही हशील नाही कारण फार उंच नाकाने कांदे सोलतो असं आपल्याला कुणी म्हटलेलं सहन होणार नाही. असो लेख नाकावरचा नसून पिशवीवरचा असल्याने आपण मूळ विषयाकडे परत येऊ. अश्मयुगातील मानव जेंव्हा ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण मिळवण्यासाठी गुहेत राहू लागला तेंव्हा त्याला शिकार करून आणलेल्या प्राण्याचे कातडे ऊब देते हे कळले असणार आणि त्या कातड्यात त्याने काही वस्तू गोळा करून ठेवल्या असणार ती मानवी इतिहासातल्या थैलीचे प्राथमिक स्वरूप असणार. या थैलीचे अंतिम स्वरूपही आपण पाहत आहोत जी राजकारणी लोकांना लाखो कोटी रुपयांची भेट म्हणून दिली जाते. आदिमानवाला त्याने अनाहूतपणे बनवलेल्या थैलीच्या या स्वरूपाचा जर अंदाज आला असता तर त्याने थैली बनवली नसती. प्राण्यांच्या आतडीचा कातडीचा त्याने दोरीसारखा वापर केला, दगडी दाभण तयार केले आणि प्राण्यांच्या चामडीची रीतसर थैली बनवली. या थैलीची पुढे अनेक स्थित्यंतरे होत गेली. चुंगडं, पोतं, पिशवी आणि आताची कॅरी बॅग हे ढोबळ मासले. एके काळी थैलीतून सोन्याच्या मोहरा वाहिल्या जात तीच थैली इतकी आकसत गेली की तिची पानाची चंची झाली. तिला दोन दोरखंड लागले आणि तिची पिशवी झाली. खरे तर मनुष्याच्या देहातच पित्ताशयाची आणि मुत्राशयाची अशा दोन पिशव्याच असतात. स्त्रियांत एक जास्त ती म्हणजे गर्भाशयाची. ग्रामीण भागातील स्त्री आजही या विषयीच्या संभाषणात म्हणत असते, 'काही कळलं का ?" "नाही जी व्हंजी काय वो काय झालं ?" "खालच्या गल्लीच्या सावताच्या सखूची पिशवी काढली जणू ?" "आन हे आणिक कधी झालं वो ?" "बाई सुटली म्हणायची शिवताशिवतीच्या दुखण्यातनं  !" या संभाषणात कुठेही गर्भाशयाचा उल्लेख होत नाही पण रोख तोच असतो. सामान्य भाषेत रुग्णाच्या नातेवाईकांना समजावून सांगणं सोपं जावं म्हणून डॉक्टर देखील 'पिशवी' या शब्दाचाच वापर करताना दिसतात. "हे बघा माणिकराव .... (केसपेपरवरचे नाव चाळत) हे आत दाखल असलेले गुंजीराव तुमचे भाऊच ना ?" "सर गुंजी नाही गुणाजीराव... गुणाजी खोडमोडे !" हो हो .. (उसने आवसान आणून हसत) तर त्यांनी तुमची खोड मोडली आहे ...म्हणजेच त्यांनी पिण्याची सवय इतकी जोपासली की त्यांची पिशवी आता त्यांना दाद देत नाही..." "म्हणजे ऑफ होणार का ?" माणिकभाऊच्या प्रश्नाने डॉक्टरच दचकतात. तर ही पिशवी अशी आपल्या परिचयाची वस्तू आहे. एके काळी पिशव्यांचे फार नखरे असत, नाना आकाराच्या आणि नाना तऱ्हेच्या पिशव्या असत. सर्वांच्या परिचयाची पिशवी म्हणजे नायलॉनच्या जाड हूक्सने बनवलेली बास्केट. ही बास्केट जाळीदार असे. त्यामुळे आतल्या वस्तू बाहेरून दिसत. आम्ही आज काय आणलंय बघा असं म्हणत समोरच्याला टुकटुक माकड करायची खोड असणाऱ्या शोबाज लोकांना ही बास्केट घेऊन खरेदीला जाणे म्हणजे पर्वणी असे. अंगाला लटके झटके देत हातात बास्केट वागवणाऱ्या नखरेल ललना पाहिल्या असत्या तर चित्रगुप्तही स्वर्गात एखादी बास्केट घेऊनच गेला असता. एक पिशवी असायची मांजरपाटाची. आता या कापडाचे नाव मांजरपाट असे होते पण प्रत्यक्षात मार्जार योनिशीही त्याचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. काहींच्या मते लोकमान्य टिळकांच्या काळात परदेशी कापडांच्या होळ्या पेटवल्या जात तेंव्हा अशा प्रकारचे कापड मँचेस्टरहून येत असावे. 'मँचेस्टरक्लॉथ' या शब्दाचा 'मांजरपाट' असा अपभ्रंश झाला आणि नंतरच्या काळात ते कापड मुंबईतल्या गिरण्यांमध्ये विणले जाऊ लागले. या कापडाचे आधी शर्ट चड्ड्या शिवल्या जात आणि ते वापरून त्याचा पार लगदा झाल्यावर त्याच्या पिशव्या बनत. काहींच्या मते मांजरपाट म्हणजे दक्षिणेकडील एक शहर मद्रीपोलम येथील जाड्याभरड्या कापडाची एक जात होय. याला तिकडे मांदरपाट असे म्हणतात. आपल्या लोकांना मांजरपाट सरसकट भलेही माहित नसेल पण आंतरपाट सगळ्यांना माहित असतो. होय ना ? तो दुर्दैवी की सुदैवी दिवस कुणी विसरेल का ? आजकालच्या लग्नसोहळ्यात तर अक्षताही छोट्याशा देखण्या आकर्षक पिशवीत घालून पाहुण्यांना दिल्या जातात. असो.. तर मांजरपाटाच्या या पिशव्या बाजारात घेऊन फिरायाला कमालीची लाज वाटे. याहून वाईट अवस्था गोणपाटाच्या पिशवीची असे. ताग हा शब्द कसा दाढी वाढलेल्या माणसासारखा वाटतो नाही का ! तर ज्यूट म्हटलं की कसं सफाचट तुकतुकीत चेहरा असल्यासारखं वाटतं. तर या ज्यूटपासून गोणपाट बनवले जाई. मराठीत याला अंबाडी, तागी अशी रुक्ष नावे आहेत. याचेच पुढे बारदान बनवले जाऊ लागले. म्हणजे खताच्या, बियाण्याच्या, धान्याच्या इत्यादीच्या पिशव्या. मागच्या दशकात या गोणपाटाची जागा प्लास्टिक मिश्रित पॉलिइथेनॉलच्या पोत्यांनी घेतली आणि त्याच्या रिकाम्या पोत्यांच्याही पिशव्या बनू लागल्या. या पिशव्यांना एक विशिष्ट वास असे जो काही केल्या जात नसे. या सर्व पिशव्यांचे पुढे तरट बनत असे. सरते शेवटी ते दाराबाहेर येत असे. देशी डोअरमॅट म्हणून त्याचा वापर होई. या सर्व प्रकारातील पिशव्या अत्यंत बेढब, वजनदार वस्तूंनी मानपाठ वाकवणाऱ्या आणि फाटता फाटत नसलेल्या असत. तर काही पिशव्या अत्यंत देखण्या आकर्षक असत, जणू एखाद्या कमनीय शोडषेचा आकार त्यांना लाभलेला असे. मखमली पिशव्या, हिरयाच्या पुरचुंडया ठेवण्यासाठीच्या वेल्वेटच्या मऊसुत पिशव्या, सुती कापडी पिशव्या यांना सोडून घरात लग्नाला आलेल्या मुलीने भरतकाम केलेल्या पिशव्या हा एक प्रकार असे. खरं तर भरतकाम आणि रामायणातील भरत यांचा काडीमात्र संबंध नाही. पण एके काळी वधूपरीक्षेच्या वेळी काही खडूस म्हातारी माणसं हटकून विचारायची, "मुलीला काही भरतकाम वगैरे येते की नाही की नुसतीच रामायणाची पारायणे करते ?" भरतकाम या तुसड्या शब्दाला कशिदा, जरदोजी, कसुती ही अन्य नावेच छान शोभून दिसतात. तर भरतकाम केलेल्या या पिशव्या खूप सुंदर दिसत. आणखी एक पिशवी आठवडा बाजारात आवर्जून दिसे ती म्हणजे त्रिकोणी चौकोनी रेषांचे वीणकाम केलेल्या पांढऱ्या लाल जाड कापडी पिशव्या. बाळाच्या टकुज्याला याच कापडाचा वापर होई जोडीला त्याच्या आई वा आज्जीच्या इरकली चोळीचे तुकडे जोडलेले असत. या पिशवीत काहीही कितीही कोंबले तरी ती द्रौपदीच्या थाळीसारखी थोडी जागा शिल्लकच राखे. या पिशव्यांच्या जगात ब्रीफकेस, सुटकेस, होल्डॉल, हॅवरसॅक, बॅकपॅक यांची घुसखोरी होत गेली आणि अनेक पिशव्यांचे रंगरूप बदलत गेले. पोतडी, बटवा, ऍटॅची ही रूपे तर इतिहासजमा झाली. माहेरहून येणारी शिदोरीही मोठाल्या पिशवीत येई, रेशनचे धान्य येई, घराचा किराणा येई, बाळाच्या खेळण्या येत, आजीची औषधे आणि आईची साडीदेखील याच पिशवीत येई. पिशवीत बाजार आणल्याशिवाय खरेदी केल्याचे फिलिंग येत नाही. आजकालच्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये पिशवीतल्या खरेदीची ती मजा मिळत नाही. दाढीचे खुंट वाढवून फिरणाऱ्या लेखकांच्या खांद्यावर रुळणारी शबनम बॅग ही तर त्यांची ओळख झाली होती. महिला मंडळीच्या खांद्यावर लटकनाऱ्या विविध रंगांच्या आणि आकारांच्या पर्सेस हा देखील असाच एक जिव्हाळयाचा विषय. काही पिशव्या मात्र कष्टदायी असत, घरातील कामवाल्या माणसाच्या हातात दिलेल्या वा एखाद्या ओझे वाहण्याच्या कामावरील मजुराच्या हातातील भारीभक्कम वजनाच्या पिशव्या वाहणाऱ्या लोकांचे घामट मळकट हात त्या पिशव्यांना लागलेले असत आणि त्या श्रमजीवी देहाचे त्या पिशवीशी वेगळं नातं तयार झालेलं असे. आता सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे ती थोडीशी त्रासदायक आहे पण दीर्घकालीन परिणाम पाहू जाता समाजाच्या हिताचीच आहे. खरं तर १२ जुलै हा दिवस 'जागतिक पेपर बॅग दिवस' म्हणूनही साजरा होतो. १२ जुलै१८५२ मध्ये फ्रान्सिस ओलेने पहिली कागदी पिशवी बनवली होती आणि त्यात सुधारणा करत १८७० मध्ये मार्गारेट किंग यांनी किराणा नेता येईल अशी कागदी पिशवी बनवली होती.  म्हणजे दीडशे वर्षे झाली पाश्चात्य जग कागदी पिशव्या वापरते आहे आणि आपण अजूनही त्यांना मनापासून स्वीकारलं नाही. याने आपण आपलं आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान केलं आहे. आता हा हट्ट आपण होऊन सोडून द्यायला पाहिजे आणि कापडी वा कागदी पिशवीचा वापर केला पाहिजे. व.पु. काळे यांच्या 'सांगे वडीलांची किर्ती' या पुस्तकात एक उतारा आहे. तो इथे उद्धृत करतो. "यावरून एक गंमत आठवली.. अण्णांचा संसार म्हणजे एक पिशवी. त्या पिशवीत कॅश सर्टिफिकेटच्या स्वरुपात थोडीशी भविष्यकाळची तरतूद, स्वतःच्या १९०८ सालापासून लिहिलेल्या डायऱ्या. गेल्या पंचावन्न वर्षातला त्यांच्या जीवनाचा इतिहास पानापानांत अक्षररूप झाला आहे. पंचावन्न वर्षे ते दैनंदिनी लिहीत आहेत, अजून लिहितात. कधी विषय निघाला तर ते म्हणतात, "काही कमीजास्त घडलं तर एव्हढी पिशवी मी उचलणार आणि पळणार.. तुम्ही सगळीकडे धावत म्हणाल मी हे घेऊ का ते घेऊ ?"... अण्णांना लाभलेल्या या पिशवीसारखी एक पिशवी जगातल्या प्रत्येक माणसास लाभो आणि त्याला तिचा आणि जीवनाचा खरा अर्थ कळो हेच 'पिशवीसूत्र' होय !
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget