BLOG : साक्षात शंकरावर गणेशकृपा
BLOG : गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांची कुणालाही नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. किंबहुना त्यांचं नाव ऐकलं नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
शंकर महादेवन म्हणजे शास्त्रीय संगीताचा पाया असलेले गायक. सुगम संगीत, रॅप आणि नव्या दमाची गाणी तेवढ्याच तन्मयतेनं गाणारे शंकर महादेवन यांनी गायलेली गाणी नेहमीच लोकप्रिय झाली आहेत. तरीही त्यांनी गायलेली गणपतीची गाणी म्हणजे संगीतप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने पर्वणीच म्हणावं लागेल.
'एकंदताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धिमही' हे त्यांचं श्रीगणेशाचं गाणं लोकप्रियतेचं शिखर म्हणावं लागेल. शंकर महादेवन कुठेही गेले तरी या गाण्याशिवाय त्यांचा कुठलाही कार्यक्रम पूर्ण होत नाही. यावरून त्यांच्या या गाण्याची महती लक्षात येते. शंकर महादेवन यांच्या आवाजातील गोडवा आणि गाण्यातील भक्तीमुळे हे गाणे वेगळ्या उंचीवर गेलं आहे.
आता त्यांचं आणखी एक लोकप्रिय गणेशगीत म्हणजे 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'सूर निरागस हो...गणपती'. त्यांचं हे गणपतीवरील गाणं सर्वांच्याच ओठांवर रुळलेलं आहे. हे गाणं गाताना शंकर महादेवन यांच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव गणपती बाप्पाविषयी खूप काही सांगून जातात. शिवाय 'जय गणेश जय गणेश जय गणेश देवा', फोर्टच्या इच्छापूर्ती गणपतीसाठी गायलेलं 'बाप्पा माझा माझ्या संगे नाचतो, बोलतो' तसेच 'गजाननम गजवदनम गणपती गणमाम्यहम' ही गणेशस्तुती त्यांच्या आवाजात ऐकण्याचा आनंद वेगळाच आहे.
शंकर महादेवन यांनी सुरवातीच्या काळात ब्रेथलेस गाऊन धम्माल उडवली होती. त्यांच्या ब्रेथलेसने सर्वांचेच श्वास रोखले होते. त्याचवेळी पार्श्वगायनात हा गायक मोठा पल्ला गाठेल, असं भाकित केलं जातं होतं. ते खरं ठरलं.
गणपतीची गाणी गाताना 2016 मध्ये 'गणनायक तू सिद्धिविनायक... वंदन तुजला हे गणनायका' हे सुंदर ब्रेथलेस शंकर महादेवन यांनी गायलं होतं. तेही खूप लोकप्रिय झालं होतं.
शंकर महादेवन यांच्यावर जणू गजाननाची कृपाच आहे. श्री गणेशाची 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही आरती आपण गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजात शेकडो-हजारो वेळा ऐकली असेल. शंकर महादेवन यांनीही ही आरती गायली आहे. लताबाईंच्या आवाजातील तोच गोडवा आणि तोच भाव शंकर महादेवन यांनी गायलेल्या आरतीतून आपल्याला पुन्हा हृदयाला भिडतो. शिवाय त्यांनी गायलेली 'शेंदूर लाल चढाओ' ही आरतीही तेवढीच सुरेल झाली आहे.
शंकर महादेवन यांचा 'तुतारी' हा अल्बन दोन-तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. त्यात गणपतीच्या गाण्यावर नाचताना शंकर महादेवन खूप छान वाटतात. शिवाय 'माय गणेश फेव्हरेट' हा शंकर महादेवन यांचा अल्बनही श्रवणीय झाला आहे. श्रीगणेशाची गाणी गाण्याची संधी शंकर महादेवन यांना मिळते आणि ती लोकप्रिय होतात, यातच सर्वकाही आलं आहे.
वास्तविक हिंदी चित्रपटांमध्ये गणपतीवर अनेक गाणी आहे आणि जुन्या तसंच नव्या गायकांनी ही सर्वच गाणी समरसून गायली आहेत. अगदी अलीकडच्या काळात 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात 'लंबोदर तू विनायक' (गायक सुखविंदर सिंग), 'डॅडी' चित्रपटात 'आला रे आला गणेशा' (वाजित) तसंच हृतिक रोशन याची भूमिका असलेल्या 'अग्निपथ'मधील 'देवा श्रीगणेशा' (अजय गोगावले) ही गाणीही लोकप्रिय झाली आहेत. तरीही इतर गायकांच्या तुलनेत शंकर महादेवन यांच्या वाट्याला गणपतीची खूप गाणी आली आहेत आणि त्यांनीही ती समरसून गायली आहे. थोडक्यात या शंकरावर श्रीगणेशाचा वरदहस्त आहे, असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही)