(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | गांधींच्या स्मृतींची हत्या
भारतात आज गांधींशी संबंधित प्रत्येक स्मृतींची हत्या करणे सुरु आहे. याचाच भाग म्हणजे त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा उदोउदो सुरु आहे. अहिंसेला दुर्बलांचे शस्त्र समजणाऱ्या या लोकांपुढे आता अहिंसात्मक आंदोलनाचा नवा अध्याय सुरु झाला आहे.
भारतात आज गांधींशी संबंधित प्रत्येक गोष्टीची हत्या केली जात आहे. मोठमोठ्या कार्यालयात, रस्त्यावर , चौकाचौकात आणि विशेष म्हणजे प्रत्येक मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये गांधींशी संबंधित स्मृतींची हत्या केली जात आहे. गांधी हेच भारताच्या फाळणीला जबाबदार होते, त्यांनी मुस्लिमांचे लांगुलचालन केलं, त्यांचा आधुनिकवादाला विरोध होता अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर करण्यात येतात.
वर्षातील आजचा दिवस असा आहे की या दिवशी गांधीजींना ठेवणीतून बाहेर काढले जाते. त्यांच्या नावाने कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यांचं स्मरण केलं जातं. या महामानवाला त्याच्या स्वत:च्या देशात सन्मान मिळतोय हे जगाला दाखवण्यासाठीच हा प्रयत्न केला जातो. हा दिवस कार्यालयीन स्तरावर शहीद दिवस साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी देशाच्या सर्वशक्तीमान राज्यकर्त्यांना दोन मिनीटांचे मौन बाळगावं लागतं. त्यानिमित्तानं राजघाटावर देशातील प्रतिष्ठीत समजले जाणारे लोकं भेटी देतात. ही सर्व औपचारिकता पार पाडल्यानंतर सरकार पुन्हा एकदा आपल्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्याचा कार्यक्रम सुरु करतं.
अलिकडच्या वर्षांत गांधींच्या स्मृतीवर झालेले हल्ले आणि त्या अनुषंगाने त्यांचा मारेकरी, नथुराम गोडसे याच्या प्रतिष्ठेचा उदोउदो करणे हा भारताचा नवीन कॉमनसेन्स बनला आहे. याच देशात दोन हजार वर्षांपूर्वी महाभारतात सांगितलं होतं की 'अहिंसा परमो धर्म', म्हणजे अहिंसा हा सर्वात मोठा आहे धर्म आहे. दोनच आठवड्यांपूर्वी ग्वाल्हेर शहरात 'गोडसे ज्ञान शाळा' या स्मारक ग्रंथालयाच्या उद्घाटनानिमित्त हिंदू नागरिकांची एक मोठी गर्दी जमली होती. त्या ठिकाणी गोडसेला महान देशभक्त असल्याचं सांगण्यात आलं, त्याचं कौतुक करण्यात आलं. 1949 साली फाशीवर देण्यात आलेल्या गोडसेचा त्यांनी गौरव केला. काही दशकापूर्वी गोडसे हा महाराष्ट्रातील पुणे या शहरात त्याच्या समविचारी लोकांशी गुप्तपणे भेटायचा. नथूराम गोसडेचे भाऊ गोपाल गोडसे आणि विष्णू करकरे हे त्यांची जन्मठेप भोगून 1964 साली तुरुंगातून बाहेर आले. गांधी हत्येमध्ये त्यांनीही काही भूमिका बजावली होती. नथुराम गोडसे याला 'देशभक्त' मानणाऱ्या हिंदू राष्ट्रवादी गटाच्या 200 जणांनी या दोघांचं जंगी स्वागत केलं. जेव्हा ही बाब भारतीय संसदेच्या निदर्शनास आणली गेली, त्यावेळी गोंधळ एकच माजला.
1980 च्या दशकात हिंदू राष्ट्रवादी गटाने पुन्हा तोंड वर काढलं. सात वर्षापूर्वी, सध्याचं सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी गोडसे भक्तांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. दहशतवादी कृत्यामुळे अनेक वर्षे तुरुंगात असलेल्या आणि गोडसेला देशभक्त मानणाऱ्या प्रज्ञा ठाकूरने भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर भोपाळ मधून निवडणूक लढवली आणि जिंकली. गोडसे हा देशभक्त होता, आहे आणि यापुढेही राहणार असं वक्तव्य तिनं केलं होतं.
गांधी हत्येचे उदात्तीकरण करणे हा देशात राजकीय यशासाठी पासपोर्ट ठरत आहे. काहीजणांचा असा तर्क असू शकेल की गोडसेचे अनुसरण अतिशयोक्तीपूर्ण आहे. ग्वाल्हेरमध्ये त्याच्या नावाने स्मारक ग्रंथालय उघडले गेले परंतु दोन दिवसांनी जनतेच्या रोषामुळे ते बंद करावं लागलं. प्रज्ञा ठाकूर हिचे ट्विटर अकाऊंटवर दोन लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत, ही संख्या एका रात्रीत दहा पटीनेही वाढू शकेल. पण गांधीजींनी राष्ट्रपिता म्हणून मान्यता दिल्यास किंवा तसा उल्लेख केल्यास भाजपा नेतृत्वाने प्रज्ञा ठाकूरच्या गोडसेबद्दलच्या मताला नाकारलं पाहिजे. पण खरी परिस्थिती अशी आहे की गांधींच्या विचारांची हत्या करणाऱ्यांची संख्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
पण केवळ गांधी हत्येकरांच्या कर्कश्य आवाजामुळे काळाचा दोलक त्यांच्याकडे झुकलाय असं म्हणता येणार नाही. ज्या अहिंसेच्या भाषेने गांधीना किमान आधुनिक इतिहासात तरी महान केले, ती भाषा आता सामान्यांच्या जीवनातून गायब होताना दिसत आहे. संभाषण साधताना अहिंसा हा घटक त्यात नसतो. भारतीय समाजात हिंसेचा वापर वाढतोय. त्यामुळेच ट्रोल्स जे अत्यंत हिंसक आणि अश्लील भाषा वापरतात अशांना राज्यकर्त्यांनी रस्त्यावरील हिंसेव्यतिरिक्त इतर प्रकारच्या हिंसेसाठी वापरले जाते. अहिंसेच्या या भूमीत आता हिंसेची हवा वाहतेय.
गांधींनी त्यांच्या आयुष्यात खूप काही कमावलं होतं. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी एकदा परदेशी पाहुण्यांना सांगितलं होतं की 'भारत हा गांधी आहे'. यामागे असा अर्थ होता की भारताने त्याचे स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळवलं होतं आणि भारत जगाला हे अभिमानाने सांगू शकत होता. अहिंसा या संकल्पनेला कमकुवतपणा, स्त्रीत्व आणि जगातील इतर तशाच अर्थाच्या संकल्पना अशा तिहेरी जोखडातून मुक्त करण्यासाठी गांधीजींना धडपडावं लागलं. हिंदू राष्ट्रवाद्यांच्या मते अहिंसा हे दुर्बलांचं हत्यार आहे.
अलिकडच्या काही घटनांवरुन असं दिसून येतं की गांधींच्या स्मृतींच्या मारेकऱ्यांना अजूनही खूप काम बाकी आहे, अजूनही महात्म्याचा छळ पूर्ण झाला नाही. डिसेंबर 2019 मध्ये काही मुस्लिम महिला, त्यामध्ये अनेक महिला या अशिक्षित होत्या, त्यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन सुरु केलं. दिल्लीतील ते शाहीनबागचे आंदोलन हे पुढच्या काळात हजारो शाहीनबागांना जन्म देईल. तीन महिने सुरु असलेले हे आंदोलन सरकारला नियंत्रित करता आलं नाही, पण कोरोनामुळे ते आंदोलन संपवण्याची संधी सरकारकडे चालून आली. आता शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तशाच प्रकारचे अहिंसात्मक आंदोलन सरकारसमोर उभं राहिलंय. अहिंसात्मक आंदोलनाचा नवीन अध्याय सुरु झाला आहे. गांधींच्या स्मृतींना मारण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे स्वत:च्या विचारसरणीनुसार, आपल्या स्वतःच्या काळातील अहिंसेच्या कल्पनेचे पुनरुज्जीवन करणे. इतिहासाच्या या क्षणी त्यापेक्षाही महान कार्य कोणतेही असू शकत नाही.