रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासात पाचव्यांदा चॅम्पियन्स ठरली आहे. मुंबईनं दिल्ली कॅपिटल्सचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवून अंतिम सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. किंबहुना यंदाच्या आयपीएल मोसमावरही मुंबई इंडियन्सचंच वर्चस्व दिसून आलं. ट्रेण्ड बोल्टनं रचिला पाया, रोहित शर्मा झालासे कळस... मुंबई इंडियन्सच्या आयपीएल फायनलमधल्या दिल्ली कॅपिटल्सवरच्या विजयाचं वर्णन करण्यासाठी ही पंक्ती पुरेशी ठरावी. पण मुंबईनं दिल्लीवर मिळवलेला हा विजय इतका निर्विवाद होता की, आयपीएलच्या फायनलसाठी टीव्हीकडे डोळे लावून बसलेल्या करोडो भारतीय क्रिकेटरसिकांचा पुरता रसभंग झाला. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातील कदाचित ही सर्वात एकतर्फी फायनल ठरावी. आयपीएलच्या या एकतर्फी फायनलमध्ये रंग भरला तो मुंबई इंडियन्सच्या तीन शिलेदारांनी. पहिला ट्रेण्ट बोल्ट, दुसरा जयंत यादव आणि तिसरा रोहित शर्मा. किंबहुना त्या तिघांनीच मुंबईचं आयपीएलमधलं पाचवं विजेतेपद निश्चित केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
बोल्ट आणि रोहित यशाचे मुख्य शिल्पकार
क्वालिफायर टू सामन्यात दिल्लीचा मॅचविनर ठरलेल्या मार्कस स्टॉयनिसला पहिल्याच चेंडूवर माघारी धाडून बोल्टनं दिल्लीच्या डावात पहिला सुरुंग पेरला. स्टॉयनिसच्या बॅटला चाटून निघालेला चेंडू यष्टिरक्षक क्विन्टन डी कॉकच्या ग्लोव्हजमध्ये विसावला, तोवर त्यानं स्वत:भोवतीच एक गिरकी घेऊन आपली विकेट आपल्या डोळ्यांनी पाहिली. त्यानंतर बोल्टनं अजिंक्य रहाणेला पुढच्याच षटकात बाद करून दिल्लीची फलंदाजी आणखी खिळखिळी केली. त्याचा चेंडू फ्लिक करण्याच्या प्रयत्नात उडालेला रहाणेचा झेलही यष्टिरक्षक डी कॉकनं पकडला. दिल्ली या दोन धक्क्यांमधून सावरायच्या आत ऑफ स्पिनर जयंत यादवनं शिखर धवनचाही स्वस्तात काटा काढला. यादवचा चेंडू ऑनला भिरकावून देण्याच्या नादात धवननं तिन्ही यष्ट्या मोकळ्या सोडल्या होत्या. यादवचा तो चेंडू धवनच्या बॅटच्या पट्ट्यातून हुकला, आणि त्या चेंडूनं धवनची मधली यष्टी उडवली.
जयंत यादवची कमाल
दिल्लीच्या फौजेत धवनसह रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर आणि अक्षर पटेल या चार डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश होता. त्यामुळं लेग स्पिनर राहुल चहरला विश्रांती देऊन जयंत यादवला खेळवण्यात आलं होतं. मुंबईच्या संघव्यवस्थापनानं टाकलेला तो विश्वास यादवनं धवनला माघारी धाडून सार्थ ठरवला. मग बोल्टनं शिमरॉन हेटमायरची शिकार केली. त्यानं अवघ्या तीस धावांच्या मोबदल्यात या तीन विकेट्स घेऊन फायनलची सूत्रं मुंबईच्या डगआऊटमध्ये आणून ठेवली.
रोहित शर्माला अनफिट म्हणायचं?
त्याआधी, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या भागिदारीनं 96 धावांच्या भागिदारीनं या सामन्यात थोडी चुरस निर्माण केली. कारण दिल्लीच्या हाताशी 156 धावांचं संरक्षण उभं राहिलं होतं. पण रोहित शर्मानं अवघ्या 51 चेंडूंत 68 धावांची खेळी उभारून मुंबईला लक्ष्याच्या नजिक नेऊन ठेवलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वन डे आणि ट्वेन्टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयनं अनफिट ठरवलेला रोहित फायनलच्या मैदानात फिट फलंदाजांना लाज वाटावी इतक्या सहजतेनं खेळला. रोहित शर्मानं त्याची खेळी ही पाच चौकार आणि चार षटकारांनी सजवली. विशेष म्हणजे त्यानं या खेळीत वीस एकेरी आणि दोन दुहेरी धावांचीही वसुली केली. त्यामुळं ट्वेन्टी 20 च्या मैदानात मुंबई इंडियन्सला जिंकून देणारा रोहित शर्मा टीम इंडियासाठी अनफिट का ठरावा, असा प्रश्न पडला होता.
संघभावना अधिक मोलाची
मुंबई इंडियन्सच्या यशस्वी पाठलागात सूर्यकुमार यादवची नि:स्वार्थी वृत्ती दाखवून देणारा क्षणही फार महत्त्वाचा ठरला. मुंबईच्या डावातल्या अकराव्या षटकात रोहित शर्मानं रवीचंद्रन अश्विनचा चेंडू मिडॉफकडे ढकलून एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी क्षेत्ररक्षक प्रवीण दुबेनं चपळाईनं चेंडू उचलून तो यष्टिरक्षक रिषभ पंतच्या दिशेनं थ्रो केला. तोवर रोहित समोरच्या एंडला पोहोचला होता. चूक त्याचीच होती. पण त्या वेळी नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या सूर्यकुमार यादवनं क्रीज सोडून आपली विकेट दिल्लीला बहाल केली. सूर्यकुमारची ती नि:स्वार्थी वृत्ती नवोदितांना शिकवण देणारी तर होतीच, पण मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांमधली संघभावना अधोरेखित करणारी ठरली. आयपीएलच्या अख्ख्या मोसमात छोट्या छोट्या घटनांमधून वारंवार दिसलेली ही संघभावना मुंबई इंडियन्सच्या यशाचं खऱ्या अर्थानं गमक ठरली.
कर्तृत्त्व आणि नेतृत्त्व
मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांमधल्या या संघभावनेनं आयपीएलच्या फायनलमधला त्यांचा विजय अधिक सोपा केलाच, पण त्याआधी आयपीएल साखळीच्या गुणतालिकेतही मुंबईनं नंबर वन राखून आयपीएलच्या मोसमावर खऱ्या अर्थानं आपला ठसा उमटवला. मुंबईच्या बिनीच्या शिलेदारांनी अख्ख्या मोसमात गाजवलेलं कर्तृत्त्व आणि रोहित शर्मा-कायरन पोलार्डचं नेतृत्त्व अंबानींच्या फौजेच्या यशाचं गमक ठरलं. छोटा डायनामाईट ईशान किशन आणि अनुभवी क्विन्टन डी कॉक या दोघांनी मुंबईकडून यंदाच्या मोसमात पाचशेपेक्षा अधिक धावांचा रतीब घातला. त्यापैकी ईशान किशन हा तर एका मोसमात पाचशेपेक्षा अधिक धावा करणारा पहिला अनकॅप प्लेयर म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव गाठीशी नसलेला पहिला शिलेदार ठरला. सूर्यकुमार यादव (480 धावा), रोहित शर्मा (332 धावा), हार्दिक पंड्या (281 धावा) आणि कायरन पोलार्ड (268 धावा) यांनीही धावांच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. ट्रेण्ट बोल्ट आणि जसप्रीत बुमरा यांनी मुंबईला लसिथ मलिंगाची यंदाच्या मोसमात उणीव जाणवू दिली नाही. बुमरानं 27 आणि बोल्टनं 25 विकेट्स काढून प्रतिस्पर्ध्यांना गुंडाळण्याचं काम चोख बजावलं. राहुल चहर (15 विकेट्स), जेम्स पॅटिन्सन (11 विकेट्स), कृणाल पंड्या (सहा विकेट्स), नॅथन कूल्टर-नाईल (पाच विकेट्स) आणि पोलार्ड (चार विकेट्स) यांनीही आलटून पालटून विकेट्स काढून विजयाचं पारडं मुंबईच्या बाजूनं झुकवलं.
मुंबईच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी अख्ख्या मोसमात सातत्यानं बजावलेली कामगिरी त्यांच्या पाचव्या विजेतेपदाच्या दृष्टीनं निर्णायक ठरली.
विजय साळवी यांचे अन्य ब्लॉग :
- BLOG | रोहित शर्माच्या डोक्यावर दुखापतीची टांगती तलवार
- BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : चेन्नई सुपर 'फ्लॉप'
- BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : धवन पैलवान की जय हो!
- BLOG : कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : मुंबईचा खडूस फलंदाज
- BLOG | : कर्णधार धोनीला फलंदाज धोनीवर भरवसा नाही का? कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट
- BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : गावस्करांचं चुकलं की, त्यांना समजून घेताना अनुष्काचं चुकलं?
- BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : झुंजार माणसा, झुंज दे… असं कृतीतून सांगणारा क्रिकेटर
- BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : चुकांमधून शिकण्याची वृत्ती हेच रोहित आणि सूर्यकुमारच्या यशाचं गमक
- BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : वादळवारं सुटलं ग.. आयपीएलचं तुफान उठलं ग..
- BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : बंगलोरचा आयपीएलमधला इतिहास बदलण्याची जबाबदारी देवदत्त पडिक्कलवर
- BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : ख्रिस गेलला का बसवलं आणि अजिंक्य रहाणेचं घोडं अडलं कुठे?
- BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : जय हो अंबाती रायुडू, जय हो फाफ ड्यू प्लेसी
- BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : स्टॉयनिसला सलामीला बढती देण्याचा मास्टरस्ट्रोक कुणाचा?