आयपीएलच्या रणांगणात अखेर मंगळवारी मुंबई इंडियन्सचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. दिल्ली कॅपिटल्सनं क्वालिफायर टू सामन्यात सनरायझर्स हैदराबादचं आव्हान 17 धावांनी उधळून लावलं. पृथ्वी शॉला वगळून अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसला सलामीला बढती देण्याची दिल्लीची रणनीती या सामन्यात कमालीचा मास्टरस्ट्रोक ठरली. किंबहुना त्याच रणनीतीनं दिल्लीला आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल फायनलचं तिकीट मिळवून दिलं. विशेष म्हणजे स्टॉयनिसची आयपीएलच्या इतिहासात सलामीला खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.

Continues below advertisement

मार्कस स्टॉयनिसनं दिल्लीच्या विजयात 27 चेंडूंत 38 धावा आणि 26 धावांत तीन विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी बजावली. त्यानं सलामीला पाच चौकार आणि एका षटकारासह ठोकलेल्या 38 धावांनी हा सामना खऱ्या अर्थानं दिल्लीच्या बाजूनं झुकवला. किंबहुना स्टॉयनिस आणि शिखर धवन यांनी 8.2 षटकांत दिलेली 86 धावांची सलामी दिल्लीच्या विजयात निर्णायक ठरली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

दिल्लीकडून या सामन्यासाठी पृथ्वी शॉला संधी मिळणार नाही, हे स्पष्ट दिसतच होतं. कारण गेल्या आठ सामन्यांमध्ये मिळून त्याला केवळ 49 धावाच जमवता आल्या होत्या, त्यापैकी तीन सामन्यांत तर पृथ्वीला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळं त्याला वगळून वेस्ट इंडिजचा शिमरॉन हेटमायर फायनल इलेव्हनमध्ये येणार हे नक्की होतं. पण हेटमायर हा चौथ्या-पाचव्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज होता. त्यामुळं पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत शिखर धवनच्या साथीनं सलामीला कुणाला उतरवायचं या प्रश्नाचं उत्तर शोधणं दिल्लीसाठी सोपं नव्हतं.

Continues below advertisement

स्टॉयनिसला का दिली सलामीला बढती?

दिल्लीच्या फौजेत सलामीसाठीचा पहिला पर्याय अर्थातच अजिंक्य रहाणे होता. कारण याआधी राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं आयपीएलच्या सामन्यांमध्ये सलामीवीराची भूमिका यशस्वीपणे निभावली होती. पण मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर या जोडीनं रहाणेऐवजी अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसवर विश्वास दाखवला. त्याची दोन कारणं म्हणजे स्टॉयनिसनं यंदाच्या आयपीएल मोसमात रहाणेच्या तुलनेत दाखवलेलं सातत्य आणि ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीगमध्ये त्यानं सलामीवीराच्या भूमिकेत बजावलेली कामगिरी.

ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीगमध्ये मार्कस स्टॉयनिस हा गेल्या मोसमात सलामीवीर म्हणूनच खेळला होता. त्यानं मेलबर्न स्टार्सकडून खेळताना 17 सामन्यांमध्ये तब्ब्ल 705 धावा फटकावल्या होत्या. बिग बॅश लीगच्या इतिहासात एका फलंदाजाची ती मोसमातली सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग हाही मूळचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर. त्यामुळं पहिल्या पॉवरप्लेमध्ये स्टॉयनिस कसं वादळ निर्माण करु शकतो, याची त्याला नेमकी कल्पना होती.

यंदाच्या आयपीएल मोसमातही स्टॉयनिसनं क्वालिफायर टू सामन्याआधी 15 सामन्यांमध्ये तीन अर्धशतकांसह 314 धावांचा रतीब घातला होता. त्याचा स्ट्राईक रेटही उत्तम म्हणजे तब्ब्ल 140पेक्षा अधिक होता. त्याउलट अजिंक्य रहाणेला यंदाच्या मोसमात आठ सामन्यांमध्ये केवळ 111 धावा फटकावता आल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेटही केवळ 108च्या आसपास घुटमळत होता. त्यामुळं मार्कस स्टॉयनिसला सलामीला बढती देण्याची पॉन्टिंगनं मांडलेली रणनीती कर्णधार श्रेयस अय्यरनं उचलून धरली.

दिल्लीच्या सुदैवानं स्टॉयनिस साथीला आला आणि शिखर धवनलाही त्याचा ओरिजिनल सूर गवसला. यंदाच्या मोसमात लागोपाठ दोन शतकं ठोकल्यानंतर धवनचा फॉर्म आणि त्याचं सातत्य हरवलं होतं. त्याला गेल्या पाचपैकी चार सामन्यांमध्ये मिळून केवळ सहाच धावा करता आल्या होत्या. त्यापैकी तीन सामन्यांमध्ये धवनला भोपळाही फोडता आला नव्हता. पण स्टॉयनिसच्या साथीनं त्यानंही हैदराबादच्या गोलंदाजांना फोडून काढलं. त्या दोघांनी सलामीला 86 धावांची झंझावाती भागीदारी रचून दिल्लीच्या डावाचा भक्कम पाया घातला. धवननं 50 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह 78 धावांची खेळी उभारली.

मार्क स्टॉयनिसनं शिखर धवनच्या साथीनं दिलेल्या सलामीनं दिल्लीच्या विजयाचा पाया घातला आणि मग स्टॉयनिस-रबाडा जोडीनं त्या पायावर विजयाचा कळस चढवला. स्टॉयनिसनं धवनच्या साथीनं फलंदाजीत बजावलेली कामगिरी, आक्रमणात कागिसो रबाडाच्या जोडीनं बजावली. त्या दोघांनी हैदराबादच्या फलंदाजांची फळी कापून काढली. रबाडानं 29 धावांत चार, तर स्टॉयनिसनं 26 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मार्कस स्टॉयनिसची हीच अष्टपैलू कामगिरी दिल्लीच्या क्वालिफायर टू सामन्यातल्या विजयाचं मुख्य गमक ठरली.

विजय साळवी यांचे अन्य ब्लॉग :