देशभरातील तिसरा लॉकडाऊन संपायला अजून पाच दिवस असताना, लॉकडाऊन वाढणार की संपणार, जर वाढला तर कोणत्या बाबतीत शिथिलता मिळणार याचे तर्क-वितर्क लढविण्यात नागरिक सध्या 'बिझी' आहे. आज रात्री देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहे. तिसरा लॉकडाऊन शेवटच्या टप्प्यात असताना त्यांच्या या भाषणात काही चकित करणारी घोषणा असेल का? याचं उत्तर अनेक वृत्तवाहिन्याना सुद्धा मिळालेलं नाही. मात्र या सगळ्या प्रक्रियेत वास्तव कुणी बदलू शकणार नाही ते म्हणजे, देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत क्रमांक एकवर असणाऱ्या महाराष्ट्राची कोरोनाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही, त्यामुळे शस्त्र म्यान करून चालणार नाही. ज्या पद्धतीने हे युद्ध सुरु आहे किंबहुना अधिक जोरदारपणे कोरोना विरोधातील लढाई सुरूच ठेवावी लागणार आहे. अजूनही राज्याला कोरोना वाढीचा असणारा धोका कायम असून मे महिन्यात बऱ्यापैकी रुग्ण संख्या वाढली आहे.


राज्याची आरोग्य यंत्रणा कोरोनाशी कसून मुकाबला करत आहे, रुग्ण संख्या वाढली तर त्यावर मात कशी करायची यामध्ये मुंबई महापालिकेचे अधिकारी गुंतले असून विविध उपाय योजना करीत आहे. सध्याच्या घडीला अजूनही कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकाला त्यांच्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करुन घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारांच्या वर गेली असून 2293 व्यक्ती आजारामुळे मृत झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 23401 असून, त्याखालोखाल गुजरात मधील रुग्णांची संख्या 8541 असून तामिळनाडू मध्ये हीच संख्या 8022 तर दिल्लीमध्ये 7233 आणि राजस्थानमध्ये 3988 इतकी रुग्ण संख्या आहे. इतर राज्यातील रुग्णांची संख्या यापेक्षा कमीच आहे. केंद्रीय पथकं सर्व राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पोलीस यंत्रणा रात्र-दिवस काम करत आहे त्यांच्यावर कामाचा अधिक ताण येत आहे.


कोरोनामुळे लागू करण्यात आलेला तिसरा टप्पा 17 मे रोजी संपत आहे. ज्या कारणाकरिता लॉकडाऊन केला आहे त्या विषयात अपेक्षित अजून यश प्राप्त झालेले नसले तरी हळू-हळू अर्थव्यवस्थेला चालना देणं ही काळाची गरज असल्याचं यापूर्वी अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे काही दिवसांपासून कोरोनासोबत जगायला शिकावं अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. कारण जवळ-जवळ गेले दोन महिने अनेक लोकं लॉकडाउन मुळे कामावर जाऊ शकले नाही. आरोग्य की जगण्यासाठी लागणार पैसे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. यामधून संपूर्ण देशाला सुवर्णमध्य काढून जीवन जगायचे आहे. सर्व लोकांना 'आपला जीव प्यारा आहे', असे म्हणणारे महाभाग स्वतः लॉकडाऊन कधी उठतोय याची वाट पाहत आहे. कारण लोकं खरंच कंटाळी आहे, त्यामध्ये आहे ती नोकरी टिकते की जाते यांची डोक्यावर टांगती तलवार आहेच. त्यामुळे आरोग्याची लढाई लढता-लढता जीवनमान कसं सुसह्य होईल याकडे लोकांचा कल आहे. मात्र या प्रक्रियांमध्ये कोरोना प्रादुर्भावाचे काही धोके संभवतात, ते टाळून कसं पुढे जात येईल याचा विचार होणे गरजेचे आहे.


लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय झाला तरी वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्य व्यवस्थापनात काही बदल निश्चित करावे लागतील जेणेकरुन लोकांना तात्काळ उपचार मिळतील. लॉकडाऊन सुरू होऊन 47 दिवस उलटले असले तरी त्या आधीपासूनच बऱ्याच नागरिकांनी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने अनेक ज्या नियोजित शस्त्रक्रिया होत्या त्या पुढे ढकलल्या आहेत. त्याला आता बराच काळ लोटला असून काहींना त्या शत्रक्रिया करून घ्यावयाच्या आहेत. मात्र कोरोनाचा रौद्र रुप पाहता अजून कुणीही या शस्त्रक्रिया करण्यास धजावत नाही. अनेक जण दुखणी अंगावर काढत आहेत. त्याचबरोबर कोविड विरहित आजार असणाऱ्या रुग्णाना विविध समस्यांना तोंड दयावे लागत आहे. अनेकांना उच्च रक्तदाब, श्वसनाच्या विकाराच्या समस्या, अस्थमा, आणि मधुमेह या रुग्णांना नियमित वैद्यकीय तज्ज्ञांच्या तपासणीची गरज असते मात्र तेही रुग्ण सध्या 'वेट अँड वॉच' च्या भूमिकेत आहेत. आरोग्य व्यवस्थानाच्या पातळीवर अनेक समस्या आहेत त्या सोडविण्याकरिता अधिकच्या उपाययोजना कराव्या लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.


तसेच या कोरोनच्या गेली दोन महिने पेक्षा अधिक काळ चाललेल्या युद्धामुळे, वरिष्ठ नागरिक आणि लहान मुले घरात बसून कंटाळली आहे. त्यांना घरात कोंडून किती दिवस ठेवणार हा प्रश्न सध्या अनेक कुटुंबप्रमुखानं पडत आहे. अशा या सर्व प्रकारामुळे मानसिक संतुलनावर परिणाम होऊ शकण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्यामुळे या सर्व अन्य आजाराच्या उपचारांसोबत मानसोपचार तज्ज्ञाची गरज भासणार असून याकरिता काही रुग्णालयात जेथे कोविड रूग्ण नाही आहेत, अशा ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग चालू केल्यास लोकांना नक्कीच याच फायदा होऊ शकतो. काही रुग्णांना केवळ मानसिक 'कोरोना' झाला असून त्यांचामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अनेक वेळा घरचे सदस्य समजावूनही त्यांना फारसा फरक पडत नाही. या अशा परिस्थतीवर फारसं कुणी भाष्य करत नाही हे तितकच वास्तव आहे.


आरोग्य यंत्रणेचे खरं तर आपण सर्व नागरिकांनी आभारच मानले पाहिजे. सध्या उपलब्ध अशा आहे त्या परिस्थितीत ते रुग्णांना उपचार देत आहे. काही वेळ प्रसंगी काही जणांच्या शिव्याही त्यांच्या वाट्याला आल्या असल्या तरी ते त्यांची सेवा चोख बजावत आहे. अनेक वैद्यकीय तज्ज्ञानुसार मे नंतर परिस्थिती आटोक्यात येईल, कारण प्रत्येक साथीच्या आजारात एक मोठा रुग्णसंख्या वाढणारा टप्पा येतो नंतर हळू-हळू ती साथ आटोक्यात येते. मे महिन्यातील हा टप्पा तसाच म्हणावयास हरकत नाही. लोकसंख्या, घनदाट लोकवस्तीच्या तुलनेत लॉकडाऊनमुळे मुंबई शहरात बऱ्यापैकी साथ नियंत्रित ठेवण्यात आरोग्य यंत्रणेने यश मिळविले आहे. मात्र ती साथ अजून नियंत्रणात आणण्याकरिता अजून बरेच कष्ट घ्यावे लागतील हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे लढाई अजून संपलेली नसून अजून अनिश्चित काळाकरिता कोरोनाविरोधातील ही लढाई लढावी लागणार हे निश्चित आहे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग