>> संतोष आंधळे
संपूर्ण जगात महाभयंकर कोविड-19 विरुद्ध मोठं युद्ध सुरु असताना केवळ रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळावेत म्हणून कुटुंबाची काळजी न करता जीवाची बाजी लावून युद्धभूमीवर पाय रोवून रणरागिणी परिचारिका लढा देत आहे. डॉक्टरांनी उपचार देऊन झाल्यानंतर रुग्णांची संपूर्ण सुश्रुषा करण्याचं महत्वाचं काम या परिचारिका करत असतात. डॉक्टरांपेक्षा रुग्ण हा जास्त वेळ परिचारिकेच्या देखभालीखाली असतो. रुग्ण पहिला परिचारिकाच्या संपर्कात येतो. अशा या परिचारिका आज जीवावर उदार होऊन कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्याचं काम इमानेइतबारे करत आहे. हे सगळं आज पुन्हा एकदा सांगण्याचं कारण की, उद्याचा मे 12 हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो.
रुग्णाची सेवा करण्याचं व्रत उचललेल्या आणि या सेवेस खऱ्या अर्थाने सुरुवात केली ती म्हणजे फ्लॉरेन्स नाईटिंगेल या परिचारिकेनं. त्यांनी अख्या जगाला दाखवून दिले की रुग्णांची सुश्रुषा कशा प्रकारे करावी. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी झाला. त्यांचा हा जन्मदिवस संपूर्ण जगातील ज्या ठिकाणी नर्सेस आहेत, त्या ठिकाणी साजरा केला जातो. विशेष म्हणजे आज त्यांची 200 वी जंयती आहे. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जखमी सैनिकांची सेवा केली होती. तसेच त्यांनी 1860 साली लंडनमध्ये पहिल्या नर्सिंग स्कूलची स्थापनही केली होती. खरंतर नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या परिचारिकांचं फ्लॉरेन्स नाईटिंगेल दैवत. आज राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात नर्सिंगची हजारो कॉलेजेस आहे यामध्ये फक्त महिला नाही तर पुरुषही ही रुग्णसेवा देण्याकरिता प्रवेश घेत आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टराप्रमाणे नर्सिंग क्षेत्राला मोठा मान आहे. आजच्या घडीला 70 टक्क्यांपेक्षा जास्त महिला या क्षेत्रात असून त्यांनी आपले प्राविण्य दाखवून चोख कामगिरी बजावल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर काही परिचारिकांचा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला आहे.
आज राज्यात खासगी आणि शासकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नर्सेसची संख्या अंदाजे 2 लाखांपेक्षा जास्त आहे. कोणतीही आरोग्याची आणीबाणी, दंगल, अतिरेकी हल्ला, नैसर्गिक आपत्ती असो नर्सेस कायम त्यांची सेवा बजावण्यात अग्रेसर असतात. काहीही झालं तरी कर्तव्य बजावायचे अशी शपथ त्या या सेवेत येताना घेत असतात. तुम्हा सर्वांना माहित असावं की कोणती शपथ त्या घेतात. परिचारिका ज्यावेळी आपल्या अभ्यासाला सुरुवात करून 3 महिने पूर्ण करतात आणि थेट जेव्हा रुग्ण सेवा प्रशिक्षणास सुरुवात करतात. त्यावेळी त्या या व्यवसायाशी निगडित शपथ घेतात किंवा प्रतिज्ञा करतात. ती शपथ खूपच विचार करायला लावणारी आहे, त्याचा वेगळा सोहळा हा प्रत्येक नर्सिंग कॉलेजमध्ये पार पडत असतो.
'परमेश्वर व ही सर्व मंडळी यांच्या समक्ष मी अशी प्रतिज्ञा करते की, मी माझे सर्व आयुष्य, आणि माझा व्यवसाय विश्वासूपणाने करण्यात घालवेन. जे काही वाईट व अनिष्ट आहे, त्यापासून अलिप्त राहीन. इजा होणारे औषध स्वतः घेणार नाही आणि हेतूपरस्पर इतरांनाही देणार नाही. माझ्या व्यवसायचा दर्जा उंचवण्याकरिता मी सतत प्रयत्न करेन. मला समजलेल्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक गोष्टी मी गुप्त ठेवेन. मी डॉक्टरांना निष्ठापूर्वक सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन, आणि माझ्यावर सोपवलेल्या रुग्णाच्या सेवेत मी स्वतःला वाहून घेईन.'
परिचारिका ह्या तशा बिनधास्त असतात, त्या अन्याय सहन करत नाहीत. याची माहिती आपल्या सगळ्यांना आहेच ते आपण एप्रिलच्या आठवड्यात पाहिलंसुद्धा. ज्यावेळी त्यांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई किट्स्) सुरक्षा किट मिळत नव्हते तेव्हा त्यांनी समाज माध्यमांवर याची माहिती दिली होती. तेवढ्याच त्या परिचारिका ज्या संस्थेत काम करतात त्याच्या नावाला खूप जपतात. काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयातील एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता, त्यामध्ये रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसून मृतदेह तसेच वॉर्डमध्ये पडून असल्याचे दिसत होते. त्याच रुग्णालयातील एक अधिपरिचारिकेने याला सडेतोड उत्तर दिल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यांनी या रुग्णालयावर किती ताण पडत आहे याची माहिती दिली असून कोणत्याही उपचारासाठी आलेल्या रुग्णाला या रुग्णालयातून परत पाठवले जात नाही, याची सविस्तर कहाणी त्यांनी यामध्ये मांडली आहे.
या दिवसाच्या निमित्ताने कमल वायकोळे, सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन, म्हणाल्या की, "आमच्या मुली रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत आहेत. प्रथम त्यांची काळजी घ्या. कोरोनासारख्या संकटात त्या न डगमगता काम करत आहेत. सुरुवातीच्या काळात पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई किट्स्) सुरक्षा किटवरुन थोडाफार प्रश्न होता. मात्र तो आता बऱ्यापैकी सुटला आहे. आमच्या परिचारिका कितीही काम असू द्या, विशेष म्हणजे जेव्हा मोठी संकटं येतात तेव्हा त्या पाय घट्ट रोवून काम करत असतात. परंतु प्रशासनानेही त्यांची काळजी घ्यावी ही माफक अपेक्षा आहे. आज या कोरोनाच्या या युद्धात आमच्या काही परिचारिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे, तर त्यांना वेळेत योग्य ठिकाणी उपचार दिले पाहिजे. तसेच त्यांच्या कामाचं नियोजन या काळात व्यवस्थित पद्धतीने करणे गरजेचं आहे. आरोग्य विमा कवच जाहीर केले आहे, त्यांचं स्वागतच आहे, पण ती देण्याची वेळ न येता त्यांच्या सुरक्षेची शासनाने योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे."
पुढे त्या असं ही सांगतात की, "राज्य सरकारच्या अखत्यारितील वैद्यकीय शिक्षण विभागातील नर्सेसच्या बऱ्यापैकी जागा ह्या भरल्याआहेत. मात्र आरोग्य विभागातील जागा गेली कित्येक वर्ष भरलेल्या नाही, त्यामुळे आहे त्या परिचारिकांवर कामाचा मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. त्या तात्काळ भरल्या गेल्या पाहीजे. शिवाय शासन आत कोरोनाचं संकट आहे म्हणून कंत्राटी पद्धतीवर पद भरतील मात्र कोरोनाचा काळ ओसरला की ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था होता काम नये. आज ज्या मुली 'बॉण्ड'वर काम करत आहे त्यांच्या वेतनाचा शासनाने सारासार विचार केला पाहिजे. विशेष म्हणजे आमच्या नर्सेसला सहावा आणि सातवा वेतन आयॊगाप्रमाणे वेतन दिले जात नाही. सरकारने त्यांच्यावर योग्यती कार्यवाही करावी. आमच्या आणि दिल्ली येथे सरकारच्या सेवेत काम करणाऱ्या नर्सेसच्या वेतनात मोठी तफावत असून किमान 20 हजार रुपयांचा फरक आहे, याकडे आपल्या सरकारने थोडे लक्ष द्यावे."
दुःखावर आईच्या मायेप्रमाणे फुंकर घालणाऱ्या या रानरागणीना खरं मानाचा मुजरा, आज तुम्ही रुग्णाच्या नातेवाईकांपेक्षा त्यांची जास्त रुग्णसेवा करत असता. तसेच अतिशय कठीण प्रसंगात तुम्ही आज डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही रुग्णांना उपचार देत आहेत. कालानुरूप परिचारिकांच्या अभ्यासात विविध बदल होत गेले असून आता नर्सेस थेट त्याविषयात सविस्तर प्रबंध सादर करून पीएचडी मिळवत आहेत, त्यांच्या नावापुढे सुद्धा डॉक्टर असे अभिमानाने लिहिले जात आहे. खरंतर प्रत्येक परिचारिकेकरिता उद्याचा 12 मे हा विशेष दिवस, जमलं तर सामाजिक माध्यमांवर त्यांना एक सलाम करा, त्यांना चांगलं वाटेल.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा