>> संतोष आंधळे

गेली अनेक दिवस आपण ऐकतोय आजही आपण संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. मात्र दिवसागणिक कोरोनाबाधितांची आणि त्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. आपली आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधितांवर उपचार करण्याबरोबरच त्याचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिताही दक्ष असून त्याचवरही त्यांनी काम सुरु केले आहे. मात्र दोन दिवसापासून आपल्याच देशातील काही वैद्यकीय तज्ञांनी आणि संघटनांनी सामाजिक प्रसाराच्या टप्प्यास सुरुवात झाली असल्याचे वृत्त माध्यामध्ये छापून आले आहे. वैद्यकीय तंज्ञानानी केलेल्या मांडणीनुसार साथीच्या प्रसाराचे चार टप्पे असतात. त्यात पहिल्या टप्प्यात बाधित देशातून आलेल्या प्रवाशांना साथीच्या आजाराचा संसर्ग झालेला असतो तर या प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या लोकांना या आजाराची लागण होत असते, आणि तिसरा टप्पा म्हणजे म्हणजे कुठलाही प्रवास न केलेले आणि या बाधित लोकांच्या संपर्कात न आलेल्या व्यक्तींना या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होते. या टप्प्यात संसर्गाची लागण समाजामध्ये पसरत असते. मात्र या सगळ्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करणे गरजेचं असल्याचं मत राज्यातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.


या तिसऱ्या टप्यात संसर्गाचा प्रसार कसा होतो, याबाबत छडा लावणे मुश्किल होत जाते. कारण एक विशिष्ट भागात शहरात किंवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण दिसायला लागतात, त्यावेळी समूह संसर्गाला सुरुवात होते असे म्हटले जाते. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 98 हजारांच्या वर गेली असून 5598 व्यक्ती आजारामुळे मृत झाले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 70013 असून, गुजरातमधील रुग्णांची संख्या 17200 असून तामिळनाडूमध्ये हीच संख्या 23495 तर दिल्ली मध्ये 20834 आणि राजस्थानमध्ये 8980 इतकी रुग्ण संख्या आहे.


कोविड- 19 हा साथीचा आजार 213 देशांमध्ये पसरला असून एकूण 63,88,532 लोकांना याची लागण झाली असून 3,77,883 जण मृत्यूमुखी पडले आहेत. ज्या चीन देशातून या कोरोना विषाणूची सुरुवात झाली त्या देशाची रुग्णसंख्या सध्याच्या घडीला 83 हजार 022 इतकी आहे आणि 4634 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णसंख्येचं आकडा रोखण्यात यश प्राप्त झाले आहे.


राज्य सरकारच्या कोरोनाविषयक विशेष कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक, सांगतात की, " याबाबत सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून अँटीबॉडीज चाचणी करण्यास सुचविण्यात येणार आहे. या सामाजिक संसर्गाबाबतच्या वृत्ताबाबत नक्कीच संशयाला वाव आहे. मात्र आता लगेच या विषयवार जास्त काही सांगणे उचित होणार नाही. "


कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक क्रियाशील होते. या विषाणूचा सामना करण्यासाठी प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) तयार होतात. त्यामुळे ज्या रुग्णांची प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) चाचणी पॉझिटिव्ह येते. त्यामुळे त्या व्यक्तीला संसर्ग झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.


काही दिवसापूर्वी कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव देशात किती प्रमाणात झाला आहे तसेच विषाणूचा प्रसार कशा पद्धतीने होत आहे, याची माहिती मिळविणे गरजेचं आहे. याकरिता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि राष्ट्रीय क्षयरोग संशोधन केंद्राने 21 राज्यातील 69 जिल्ह्यात स्वैर (रँडम) चाचणी करण्याचे ठरविले असून याकरिता महाराष्ट्रातील बीड, नांदेड, परभणी, जळगाव, अहमदनगर, सांगली या जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. यामुळे एक प्रकारे देशातील संसर्गाची चाचपणी करण्यात आली आहे. या सर्वेक्षणातून मिळालेल्या निकालाची कोरोनासंदर्भांतील पुढील दिशा ठरवण्यासाठी मदत होऊ शकते.

या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यातील 400 नागरिकांचे रक्ताचे नमुने घेऊन आयजीजी (इम्युनोग्लोबीन) एलिसा चाचणी करण्यात आली आहे. यामुळे या चाचणी करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या शरीरात प्रतिकारक शक्ती बहाल करणाऱ्या पेशी (अँटीबॉडीज) निर्माण झाल्या आहे का? त्याचे प्रमाण किती आहे?, तसेच त्यांना यापूर्वीच कोणत्या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे का? हे कळण्यात मदत होणार आहे. ही चाचणी काही दिवसापूर्वीच, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) कोविड-19 साठी अँटीबॉडीज शोधण्यासाठी स्वदेशी आयजीजी एलिसा चाचणी विकसित आणि प्रमाणित केली आहे त्यांच्या साहाय्याने केली आहे. संसर्गाच्या संपर्कात असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण समजून घेण्यासाठी, देखरेखीसाठी तसेच विषाणूचा संक्रमण किती प्रमाणात होत आहे याकरिता अँटीबॉडीज चाचणी महत्त्वपूर्ण आहे.


याप्रकरणी, मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांचे माजी संचालक, डॉ अविनाश सुपे, सांगतात की, "साथरोगशास्त्र तज्ञ खरं तर या विषयाचा अभ्यास करत असतात, त्यासाठी ते वेगवेळ्या मापदंडाचा आधार घेत असतात. विशेष म्हणजे ज्या काही बातम्या या संदर्भातील आल्या आहे, त्यानुसार फार फार तर संसर्गाची सुरुवात झाली आहे असं म्हणू शकतो, पण नक्कीच या विषयाचा आणखी अभ्यास करणे गरजेचे आहे. "


नागरिकांनी मात्र आपल्याला दिलेल्याला सुरक्षिततेच्या नियमाचे पालन करून स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतली पाहिजे. रिमझिम पाऊस सुरु झालाय, बुधवारपासून लॉकडाउनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार करून नागरिकांनी वागलं पाहिजे. आरोग्य यंत्रणा सगळ्या परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे तिच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. तसेच आपल्या काही चुकांमुळे मोठा धोका संभवू शकतो हे मात्र कायम लक्षात ठेवलं पाहिजे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग