एक्स्प्लोर
फूडफिरस्ता : रस्त्यावरचं खाणं पुण्यातलं - थोडा भूतकाळ, थोडं वर्तमान भाग- 3
आप्पा बळवंत चौकातल्या कोपऱ्यावरच्या टपरीवर पुर्वी मूग भजी चांगली मिळायची, नंतर त्या जागेचं नूतनीकरण झालं. हल्ली अनेक महिन्यात थांबलो नाही पण, टिळक चौकात कुमठेकर रस्त्याच्या सुरुवातीला 'गौरीशंकर' मध्ये मिळणाऱ्या भजीयेवढी सुंदर भजी पुण्यात मुश्किलीने मिळतील.

गाड्यांवर मिळणाऱ्या भज्यांमधलं अजून एक नाव म्हणजे ‘मूग भजी’! वास्तविक हा गुजरातमधल्या गाड्यांवर मिळणारा खाद्य प्रकार, पण तो इथल्या मातीत सहज मिसळून गेला. मूगडाळीतला कुरकुरीतपणा हा ह्या भज्यांमधला स्थायीभाव (आणि सहसा चव दुय्यम). गुजरातमधे गाड्यांवर मिळणाऱ्या भज्यांमधे कांदालसणीचा वापर कमी. अगदी वेगळ्या कढईत तळलेल्या बिना कांदालसणीच्या ‘जैन भज्या’ ही अनेक गाड्यांवर मिळतात. पण ही मूगभजी महाराष्ट्रात आल्यावर मात्र त्यातलं कांदे-लसूण चांगलंच वाढतं. जसं चायना मधलं ‘चायनीज’ भारतात आल्यावर मात्र संपूर्ण बदलतं त्याचाच हा स्थानिक आविष्कार !
आप्पा बळवंत चौकातल्या कोपऱ्यावरच्या टपरीवर पुर्वी मूग भजी चांगली मिळायची, नंतर त्या जागेचं नूतनीकरण झालं.
हल्ली अनेक महिन्यात थांबलो नाही पण, टिळक चौकात कुमठेकर रस्त्याच्या सुरुवातीला 'गौरीशंकर' मध्ये मिळणाऱ्या भजीयेवढी सुंदर भजी पुण्यात मुश्किलीने मिळतील. मूगडाळ भजीचा मोठा भाऊ म्हणजे उडीद डाळीचा बनवला जाणारा मेदू वडा आणि दही वडा. मेदू वड्यात दही घालून त्यालाच दही वडा म्हणून द्यायची प्रथा ही उडपी हॉटेलांतून सुरु झालेली पद्धत. मेदूवडा खावा सांबाराबरोबर तर खरा दही वडा म्हणजे उत्तर भारतात दिल्लीला वगेरे असतो तो ‘दही भल्ला ‘!
पुण्यातल्या स्ट्रीट फूड्समध्ये दही वडा नाव जरी घेतलं तरी मला पहिल्यांदा, सदाशिव पेठेतल्या हौदाशेजारच्या विश्वेश्वराच्या देवळाबाहेरची 'भटाची गाडी' आठवते. पुण्यातल्या काही हॉटेल्समध्ये मिळणारे दहीवडे मला आवडतात पण भटाच्या गाडीवर रोज संध्याकाळी मिळणाऱ्या दही वड्याची चव, पुण्यातल्या एकाही ए-क्लास हॉटेलातल्या वड्याला (आणि दह्यालाही ) नाही हे खात्रीने सांगतो. माफक तिखट आणि अजिबात तेलकट नसलेला वडा,त्याच्याबरोबर मापात विरजलेलं गोड दही. अंगभूत कोकणस्थी स्वभावाला अनुसरून, नसलेली चव यायला उगाचच बेदाणे वगैरे घालायची ‘प्रोफेशनल’ लपवाछपवी नाही. हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या दहीवड्याच्या निम्म्यापेक्षाही कमी किमतीत मिळणार. एकदा खाऊन बघा, विषय कट वडापाव,भजीच्या गाड्या गल्लीबोळात असल्या तरी गेल्या दशकापासून 'ब्रॅंडिंग'विषयात ह्या क्षेत्रातल्या अनेकांनी रस घेतलाय, ही गोष्ट एक मॅनेजमेंट विषयाचा विद्यार्थी आणि मराठी माणूस म्हणून मला भावते.
80 च्या दशकात सुरु झालेल्या ‘जोशी वडेवाले’ ह्यांच्यापासून पुण्यातल्या‘वडापावच्या’ ब्रॅंडिंग ची सुरुवात झाली, असं म्हणायला पाहिजे. आता वड्याप्रमाणेच स्पेशल भजीचीही गाड्या, टपऱ्या दुकानं चकाचक सुरु होताना आणि चालतानाही दिसतात. त्यामागे ब्रॅण्डिंग हेच खरं कारण आहे. स्ट्रीट फुडमधून उदयाला आलेले वडे, भजी आणि त्याचे ‘ब्रॅंडींग’हा विषय खरा एवढा विस्तृत आहे की त्यासाठी एक वेगळा लेख लिहावा लागेल.
‘स्ट्रीट फूड’विषय असताना जर मी भेळ,पाणीपुरी ही नावं घेतली नाहीत तर खवैय्ये लोक ह्या पामरांचं नाव घेणं (आणि ब्लॉग वाचणंही) टाकतील
खरंतर भेळ,पाणीपुरी ह्यात फार काही विशेष रेसिपीज आहेत अश्यातला कुठे भाग असतो? पण जी भेळ एकाला आवडेल ती दुसऱ्याला तेवढी कधीच आवडत नाही. अगदी जुळी भावंडं जरी गाडीवर भेळ खायला गेली तरी त्यांची ऑर्डर 'तिखट भेल -ज्यादा कांदा' तर दुसऱ्याची “मिडीयम भेल आणि “भैय्या वो चिंचेका पाणी है ना ? वो जरा ज्यादा डालनां बरं का ? !” वगैरे असते. ही ऑर्डर देताना भेळवाला 'भैय्या'च आहे असं गृहीत धरलेलं असतं.
96-97 नंतर पुण्यात आलेल्या युपी बिहारी भैय्यांनी भेळ किंबहुना पाणीपुरी क्षेत्रात घुसखोरी केलेली असली तरी ती मुख्यत्वे स्वस्तात विकणे ह्या USP वर . असे असले तरी पुण्यात नामवंत 'मराठी' भेळवाल्यांची संख्या ह्या व्यवसायातल्या मराठी माणसांना अभिमान वाटावा अशीच आहे. चांगला माल वापरून आपले नाव टिकवून ठेवत वर्षानुवर्षे ही लोक आपला व्यवसाय वाढवतायत. त्यांच्यातले काहीजण तर आता भेळ एक्स्पोर्ट देखील करतात.
शनिवारवाड्याच्या पटांगणात ज्यावेळी भेळ, पाणीपुरीच्या गाड्या उभ्या राहायच्या तेव्हापासून तिथल्या अनेक गाडीवाल्यांशी आपली खास मैत्री ! त्यातल्या ओपी म्हणजे प्रकाशशेठनी स्वतः बनवलेली भेळ, देहल्ली चाट वरचा रगडा, माझ्या एकदम आवडीची होती. आता ह्या गाड्या वाड्याबाहेर येऊनही सतरा अठरा वर्ष झाली; पण अजूनही त्या बाजूला संध्याकाळी कधी गेलो, तर फक्त प्रकाशशेठनीच बनवलेली भेळ खातो. वर आमच्या राजाभाऊ थोरातांच्या 'अजिंक्य' टी स्टॉल गाडीवरचा फर्मास चहा, क्या बात है !
असेच चांगला माल वापरून व्यवसाय करणारे भेळवाले म्हणलं की माझ्या डोळ्यापुढे नाव येतं ते, टिळक रस्त्यावरच्या पायगुडेंच्या 'कल्पना भेळ'चं.
1949 पासून टिळक रस्त्यावर असलेली कल्पना भेळ माझी 'ऑल टाईम फेव्हरेट'! लहान असल्यापासून इथली भेळ खात आलोय. चवीचे मूड वगैरे असतील त्यावेळी वेगवेगळ्या चवींची भेळ खाल्ली इथे. पण आजपर्यंत सांगितली तशी भेळ मिळाली नाही, असं कधीच झालं नाहीये. उत्कृष्ट क्वालिटीचे फरसाण, चुरमुरे कांदा आणि स्वतःची स्पेशल चटणी घातलेली भेळ म्हणजे दर्जेदार भेळेची गॅरंटी! खाऊन बघितल्याशिवाय त्यातली 'गम्मत' नाही समजणार. ह्या विषयावर ही वेगळा आणि अजून लांबलचक लेख लिहायला लागेल
पुण्याच्या स्ट्रीट फुडची खास ‘मावळी’खासियत म्हणजे मटकी भेळ! बाहेरच्या शहरात फिरताना निदान मलातरी दिसलेली नाही.अंगात पांढरा सदरा, डोक्यावर गांधीटोपी, बहुसंख्य गाडीवाल्यांच्या गळ्यात तुळशीहार ही मटकी भेळेची गाडी ओळखायची ठळक खूण !
मुख्य पदार्थ मोड आलेली गावरान मटकीच .मटकी वाफवून त्यावर साध्या भेळेमधल्या फरसाणीच्या ऐवजी जाड पोह्याचा मसालेदार चिवडा, त्यात बारीक चिरलेला कांदा, पुदिन्याची हिरवी चटणी एकत्र करुन त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा घालून हाताने रगडलेली ही भेळ फक्त वर्तमानपत्राच्या कागदात आपल्यासमोर येते. मटकी भेळ प्रामुख्याने पौड किंवा पानशेतच्या बाजूनी पुण्यात आलेल्या गाववाल्यांची खासियत !
आमच्या पेरूगेट भावे स्कुलच्या बाहेर एक काका अनेक वर्ष अशाच मटकी भेळेची गाडी लावायचे. त्या निमित्ताने आज आठवण होते ती भानुविलासच्या चौकात एक खुमच्या लावून वर्षानुवर्षे व्यवसाय केलेल्या एका काकांची. ते चित्रशाळेच्या कॉर्नरला उभे असायचे. ठेंगणी चण, चेहऱ्यावर फक्त बापुडवाणे म्हणावेत असे भाव, पेहराव अगदी वरती वर्णन केलाय तसा ! मटकी भेळ बनवतानाही तोंडात हरीनाम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, कधी एखादी ओवी !
लहान असल्यापासून त्या जागी बघायचो त्यांना. कुठे रहायचे माहिती नाही पण उन्हं उतरली की चौकात अवतीर्ण व्हायचे. पुढे माझं नारायण-शनवारात रोज येणंजाणं व्हायला लागलं त्यावेळी, आठवड्यातून एकदा तरी त्यांच्याकडे थांबून त्यांच्या हातची मटकी भेळ खाणं व्हायचंच.
साधारण 2000 सालाच्या आसपास शेवटची खाल्ली तेव्हा, माफक 10 रुपये किंमत होती. पुढे मिळालेल्या माहितीप्रमाणे, एका रात्री दारु पिऊन आलेल्या एका सरकारी गणवेशधारी अधिकाऱ्याने किरकोळ गोष्टीचा राग आल्यामुळे काकांना त्याच जागी बेदम मारहाण केली. हाय खाऊन ते जुनं खोड तिथेच वठलं. काकांनी ती जागा आणि मटकी भेळेच्या व्यवसायाला कायमचाच “जय हरी विठ्ठल” ठोकला !
वास्तविक ते माझे कोणीच नव्ह्ते, त्याचवेळी वार्धक्यात असलेले ते काका आता ह्या जगात असतीलच ह्याचीही शक्यता कमीच. पण संध्याकाळच्या वेळी चित्रशाळेवरुन जाताना अजूनही कधीतरी त्यांची आठवण होते.
ती जागा आता रिकामीच असते.त्यामुळे तिथे उभं राहिल्यावर, या माऊली,जयहरी असे स्वागत आता होणार नाहीये. कापऱ्या आवाजात ऐकू येणाऱ्या ज्ञानोबा,तुकोबांच्या ओव्या आता कधीच कानावर पडणार नाहीत, हे समजत असतं.
अश्यावेळी बदलत्या आणि दिवसेंदिवस जास्ती गजबजत चाललेल्या पुण्यातल्या रस्त्यांबरोबर,अश्या माणसांनी व्यापलेले मनाचे कोपरे कुठेतरी सुने होत जातायत, येवढंच जाणवत रहातं..
View More
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम























