Vastu Tips : सकाळी उठताच 'या' 3 वस्तू पाहू नका, वास्तूशास्त्रानुसार या गोष्टी दिसणं अशुभ; संपूर्ण दिवसावर होईल परिणाम
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार सकाळी काही गोष्टी दिसणं अशुभ मानलं जातं. सकाळ-सकाळ या गोष्टी दिसल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो
Vastu Tips : प्रत्येकाला सकाळी उठताच आपली सकाळ चांगली आणि प्रसन्न जावी असं वाटतं. याचं कारण म्हणजे जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो. पण, वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips), सकाळी काही गोष्टी दिसणं अशुभ मानलं जातं. सकाळ-सकाळ या गोष्टी दिसल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होतो आणि संपूर्ण दिवस खराब जातो असं म्हणतात. तर, या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
सकाळी बंद घड्याळ दिसणं
सकाळी उठताच कधीही बंद घड्याळाकडे पाहू नये. बंद घड्याळ पाहिल्याने संपूर्ण दिवस खराब जातो. वास्तूशास्त्रानुसार, घरात बंद घड्याळ कधीच ठेवू नये. बंद घड्याळ ठेवणं हे एक प्रकारे अशुभतेचं लक्षण मानलं जातं.
सकाळी उठताच आरसा पाहू नका
आपल्यापैकी अनेकांना सकाळी उठताच आरसा बघायची सवय आहे. पण, वास्तूशास्त्रानुसार, सकाळी उठताच कधीच आरसा पाहू नये. हे अशुभतेचं लक्षण मानलं जातं. सकाळी उठताच आरसा पाहिल्याने याचा संपूर्ण दिवसावर परिणाम होतो. तसेच, झोपेतून उठलेला चेहरा आरशात पाहिल्याने दिवसभर आळस येतो. मात्र, तेच तुम्ही फ्रेश होऊन आरसा पाहिलात तर पूर्ण दिवस प्रसन्न आणि उत्साहित जातो.
खरकटी भांडी पाहू नका
अनेकांना रात्री भांडी धुवून झोपायची सवय नसते. पण, वास्तूशास्त्रानुसार, हे अशुभ मानलं जातं. वास्तूशास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार, सकाळी उठताच खरकटी भांडी पाहू नयेत. यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी रात्री झोपायच्या आधीच भांडी धुवून घ्यावीत. यामुळे घरात भरभराटही येते.
वास्तूशास्त्रात, घर, वास्तू, संपत्ती, नोकरी, व्यवसाय या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींचं पालन केलं तर याचे शुभ परिणाम मिळतात. अन्यथा वास्तूदोष लागण्याची शक्यता असते. त्यामुळे याकडे कधीच दुर्लक्ष करु नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: