Vasant Panchami 2024 : वसंत पंचमीच्या दिवशी बनले दुर्मिळ योग; लग्न आणि प्रेमसंबंधासाठी 'हा' दिवस शुभ
Vasant Panchami : वसंत पंचमीच्या दिवशी कोणतीही शुभ मुहूर्त न पाळता लग्न, मुंडन विधी, विद्यारंभ, अन्नप्राशन विधी, अशी विविध शुभ कामं केली जातात. धार्मिक मान्यतेनुसार, ज्ञान आणि विद्येची देवी सरस्वती वसंत पंचमीच्या दिवशी प्रकट झाली.
Vasant Panchami 2024 : हिंदू धर्मात वसंत पंचमीला विशेष महत्त्व आहे. विद्या, संगीत आणि कलेची देवी माता सरस्वतीची या दिवशी पूजा केली जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला, म्हणजेच पाचव्या दिवशी वसंत पंचमी (Vasant Panchami) साजरी केली जाते. यावेळी वसंत पंचमी 14 फेब्रुवारीला, म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आली आहे. त्यामुळेच यावेळी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी लग्नांची क्रेझ आहे. वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीसोबत कामदेवाचीही पूजा केली जाते.
वसंत पंचमीचा दिवस शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो, या दिवशी तुम्ही पंचांग न पाहता तुम्ही विवाह, गृहप्रवेश, मुंडन, नामकरण विधी करू शकता. ज्या लोकांना माघ महिन्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त मिळत नाही, ते वसंत पंचमीच्या दिवशी लग्न करू शकतात.
वसंत पंचमी हा अवर्णनीय शुभ मुहूर्त
हिंदू मान्यतेनुसार, वसंत पंचमी हा चांगल्या कामांसाठी अतिशय शुभ असा मुहूर्त आहे. शास्त्रानुसार, या तिथीला शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्तासाठी पंचांगाचा सल्ला घेण्याची गरज नसते. या दिवशी शुभ मुहूर्त न पाळता विवाह आणि शुभ कार्ये करता येतात. तसेच या दिवशी ठराविक काळाचा शुभ मुहूर्त नसल्यामुळे ज्यांचे विवाह मुहूर्तामुळे ठरत नाहीत, असे विवाह देखील या दिवशी होऊ शकतात. यामुळेच दरवर्षी वसंत पंचमीला मोठ्या प्रमाणात विवाहसोहळे होत असतात. यावेळी वसंत पंचमीला व्हॅलेंटाईन डेचा योगायोग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी 13 आणि 14 फेब्रुवारीला जवळपास 25 ते 30 हजार विवाह होणार आहेत.
ज्योतिषांच्या मते, वसंत पंचमीच्या दिवशी दोषरहित उत्कृष्ट योग तयार होतो, या कारणास्तव वसंत पंचमीचा दिवस विवाह आणि शुभ कार्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवशी लग्न करणाऱ्या जोडप्यांना सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद मिळतात आणि ते सात जन्म एकत्र राहतात, अशी मान्यता आहे.
13 आणि 14 फेब्रुवारीचा दिवस शुभ
ज्योतिषींच्या मते, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 13 फेब्रुवारीला 2 वाजून 41 मिनिटांनी सुरू होत आहे. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजून 09 मिनिटांपर्यंत वसंत पंचती चालेल. उदय तिथीनुसार, 14 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीची पूजा होणार आहे.
लग्नसराईसाठी हॉल बुक
मात्र 13 तारखेला ज्यांचं लग्न होईल त्यांचा विवाहही वसंत पंचमीच मानला जाईल. बँक्वेट हॉल ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी 13 आणि 14 या दोन्ही दिवशी असंख्य बुकिंग आले आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: