(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vasant Panchami 2024 : यंदा 'या' तारखेला साजरी होणार वसंत पंचमी; तिथी, शुभ मुहूर्त आणि पौराणिक कथा जाणून घ्या
Vasant Panchami : वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करणं महत्त्वाचं मानलं जातं. ज्ञानाचे उपासक वसंत पंचमीच्या दिवशी विधीपूर्वक सरस्वती देवीची पूजा करतात.
Vasant Panchami 2024 : माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला, म्हणजेच पाचव्या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. वसंत पंचमीला (Vasant Panchami 2024) श्री पंचमी आणि ज्ञानपंचमी असंही म्हणतात. वसंत पंचमीच्या दिवशी ज्ञान आणि विद्येची देवी सरस्वती ब्रह्मदेवाच्या मुखातून प्रकट झाली, असं म्हणतात आणि यामुळेच या दिवशी सरस्वती देवीची पूजा करतात. वसंत पंचमीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे, अशी मान्यता आहे.
वसंत पंचमी हा सण प्रामुख्याने विद्यार्थी, कला, संगीत या क्षेत्राशी संबंधित लोक साजरा करतात. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सरस्वती देवीची पूजा-आराधना केली जाते. या दिवशी सरस्वती देवीची पूजा केल्याने व्यक्ती बुद्धिमान आणि एकाग्र होतो, असं म्हणतात.
यंदा वसंत पंचमी कधी साजरी होणार?
हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी वसंत पंचमी साजरी केली जाते. यंदा वसंत पंचमी 14 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. मात्र, वसंत पंचमी 13 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजून 41 मिनिटांनी सुरू होणार असून ती 14 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे. उदय तिथीनुसार, 14 फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी होईल.
वसंत पंचमीचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार, प्रत्येक तिथीमध्ये एक शुभ मुहूर्त असतो. त्या शुभकाळात देवाची आराधना केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. त्यानुसार, वसंत पंचमी तिथीला शुभ मुहूर्त 14 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजून 01 मिनिटांपासून सुरू होईल आणि 12 वाजून 35 मिनिटांपर्यंत राहील. या काळात देवी सरस्वतीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं, यामुळे देवीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
वसंत पंचमी पौराणिक कथा
वसंत पंचमीची कथा महाकवि कालिदास यांच्याशी जोडलेली आहे. पौराणिक कथेनुसार, कालिदास यांची पत्नी त्यांना सोडून गेली त्यावेळी ते खूप दुःखी झाले आणि आत्महत्या करण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ते आत्महत्या करण्यार त्या पूर्वी देवी सरस्वती त्यांच्यासमोर प्रकट झाल्या आणि त्यांना त्या नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले. जेव्हा कालिदासांनी त्या नदीमध्ये स्नान केले तेव्हा अचानक त्यांचे आयुष्य बदलले आणि ते महाज्ञानी झाले. तेव्हापासून त्यांनी महाभारत आणि रामायणासारख्या अनेक काव्यांची रचना केली.
वसंत पंचमीशी जोडलेल्या आणखी एका कथेनुसार, वसंत पंचमीशीच्या दिवशी देवी सरस्वती पृथ्वीवर प्रकट झाल्या तेव्हा संपूर्ण सृष्टीला वाणी आणि ज्ञानाची प्राप्ती झाली.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: