Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
Tirupati Balaji Prasad Laddu : सध्या तिरुपती बालाजी मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाच्या लाडूवरुन राजकारण तापलं आहे. या लाडूत तुपाऐवजी जनावरांची चरबी वापरल्याचा आरोप आहे. हा लाडू नेमका कसा बनतो? जाणून घेऊया.
Tirupati Balaji Prasad Laddu : तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून मिळणारे लाडू सध्या चांगलेच चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे आंध्र प्रदेशातील टीडीपी नेते चंद्राबाबू नायडूंनी केलेले आरोप. नायडू यांचे कट्टर विरोधक आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा, असा धक्कादायक आरोप चंद्राबाबू नायडूंनी केला.
तिरुपती मंदिरात भाविकांना दिला जाणारा लाडूचा (Tirupati Balaji Prasad Ladoo) प्रसाद अतिशय पवित्र मानला जातो. परंतु अशातच, नुकत्याच झालेल्या आरोपांमुळे आंध्र प्रदेशात खळबळ उडाली आहे. तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि फिश ऑईलचे अंश आढळून आल्याचंही आता लॅब अहवालातून सिद्ध झालं आहे. मात्र हे लाडू नेमके तयार कसे केले जातात हे तुम्हाला माहीत आहे का?
प्रसादाला 300 वर्षांची परंपरा
तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून मिळणारे लाडू हे प्राचीन आहेत. या प्रसादाविना तिरुपतीचं दर्शन अपूर्ण मानलं जातं. या लाडूची किंमत 10 ते 25 रुपयांपर्यंत आहे. तब्बल 300 वर्षांपासून येथे हे लाडू बनवले जात असल्याचं सांगितलं जातं. या लाडूंची खास गोष्ट म्हणजे ते बरेच दिवस ठेवले तरी खराब होत नाहीत, म्हणूनच इथे येणारा प्रत्येकजण हा प्रसाद घेऊन जातो. 1715 सालापासून तिरुपती बालाजी मंदिरात हे लाडू बनवले जातात.
प्रसादाच्या स्वयंपाकघराला 'पोटू' म्हणतात
तिरुपती मंदिरात जिथे लाडू तयार केले जातात, त्या स्वयंपाकघराला पोटू म्हणतात. या पोटूमध्ये दररोज जवळपास 8 लाख लाडू बनवले जातात. लाडू बनवण्यासाठी खास जागा निश्चित करण्यात आली आहे. शिवाय, ते तयार करणारे स्वयंपाकी देखील वेगळे आहेत. येथे फक्त मंदिराचे पुजारी आणि काही खास लोक जातात. येथे सर्वांना जाण्यास बंदी आहे. येथे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.
प्रसाद कसा बनवला जातो?
तिरुपती बालाजी मंदिरात मिळणारे प्रसादाचे लाडू खास पद्धतीने बनवले जातात, त्याला दित्तम म्हणतात. हा प्रसाद बनवण्यासाठी बेसन, काजू, बेदाणे, साखर, तूप, वेलची इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो. आत्तापर्यंत या रेसिपीत फक्त 6 वेळा बदल करण्यात आले आहेत. प्रसाद तयार करण्यासाठी दररोज 10 टन बेसन, 10 टन साखर, 700 किलो काजू, 150 किलो वेलची, 300 ते 400 लिटर तूप, 500 किलो खडीसाखर, 540 किलो बेदाणे इत्यादींचा वापर केला जातो.
लाडू बनवण्यासाठी 50 कोटींची मशिन
तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (TTD) ने आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात लाडू बनवण्याचं काम स्वयंचलित करण्यासाठी 2023 मध्ये 50 कोटी रुपयांची मशिन घेतली. रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या सहकार्याने आता दोन मशिन बसवण्यात आल्या आहेत, ज्याद्वारे रोज जवळपास 8 लाख लाडू बनवले जातात.
हेही वाचा: