Shravan 2024 : भगवान शंकराच्या गळ्यात नाग का असतो? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा...
Shravan 2024 : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे.
Shravan 2024 : सध्या पवित्र श्रावण (Shravan) महिन्याला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज श्रावणातील चौथा दिवस आहे. श्रावणमासात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. त्यानुसार, उद्या म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी (Nag Panchami) साजरी केली जाणार आहे. श्रावणात येणारा हा पहिला सण असल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी मान्यता आहे.
शंकराच्या गळ्यात नाग का असतो?
त्यानुसार, भगवान शिव यांची मूर्ती किंवा प्रतिमा डोळ्यासमोर आली की डोक्यावर चंद्रकोर, जटांमध्ये गंगा आणि गळ्यात नाग पाहायला मिळतात. मात्र शंकराच्या गळ्यात नाग का असतो याची आपल्याला माहिती आहे का? शिवशंकराच्या गळ्यात नाग, केसात गंगा, डोक्यावर चंद्र आणि हातात त्रिशूल-डमरू आहे. हे सगळे शिवशंकरांचे प्रतीक मानले जातात. पण, भगवान शंकराच्या गळ्यात नाग का असतो याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
'अशी' आहे पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार नागराज वासुकी हे भगवान शिव यांचे परमभक्त होते. नागराज वासुकी हे नेहमी शिवशंकरांची पूजा करण्यात व्यस्त राहायचे. पौराणिक कथेनुसार नागराज वासुकी यांनी समुद्रमंथनाच्या वेळी दोरीचे काम केले होते. नागराजाची भक्ती पाहून भोलनाथ प्रसन्न झाले होते. त्यांनी नागराज वासुकी यांना गळ्यात गुंडाळण्याचे वरदान दिले. यानंतर नागराज वासुकी अमर झाले.
'अशी' करतात नागपंचमीची पूजा
नागपंचमी हा सण पवित्र श्रावण महिन्यात साजरा केला जातो. या दिवशी मंदिरांमध्ये नागांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी नागाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. याव्यतिरिक्त कुंडलीतून काल सर्पदोष दूर करण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जातात. नागपंचमीच्या दिवशी लोक सापाची विधीवत पूजा करतात. यंदा हा नागपंचमीचा सण 9 ऑगस्ट 2024 रोजी येत आहे. हा सण विधीवत साजरा करून तुम्हीही भोलेनाथचा कृपाशिर्वाद मिळवू शकता. भगवान शिव शंकर हे सर्व देव-देवतांमध्ये श्रेष्ठ मानले जातात. त्यामुळेच त्यांना महादेव मानले जाते. म्हणून भोलेनाथाची पूजा करताना सर्व गोष्टींचे रीतसर पालन करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :