Shani Uday 2024 : बरोबर एका आठवड्याने होणार शनीचा उदय; 'या' राशींना होणार साडेसातीचा त्रास, जाणून घ्या उपाय
Shani Uday 2024 : शनि सध्या कुंभ राशीमध्ये अस्त अवस्थेत असून अवघ्या आठवडाभरात शनि आपली चाल बदलेल. 18 मार्चला शनीचा उदय होईल, या काळात काही राशींना शनीच्या साडेसातीचा त्रास सहन करावा लागणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Shani Sadesati Upay 2024 : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात शनीला पापी आणि क्रूर ग्रह समजलं जातं. शनीची (Shani) शुभ दृष्टी लाभदायक असली तरी शनीची साडेसाती आणि शनीची अशुभ दृष्टी जीवनासाठी अत्यंत क्लेशदायक मानली जाते. शनीच्या हालचालीतील छोट्यातला छोटा बदल प्रत्येक राशीच्या लोकांवर परिणाम करत असतो.
यातच आता 18 मार्चला शनीचा उदय होणार आहे, ज्याचा काही राशींना मोठा फायदा होईल, तर काही राशींना यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागू शकतं. जून 2024 पर्यंत शनि उदय स्थितीत असेल. शनि प्रत्यक्ष असल्याने या काळात काही राशींच्या मागे शनीची साडेसाती लागेल, या राशींना पुढील काही महिने आर्थिक समस्यांचा आणि आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल. नेमक्या कोणत्या राशींवर शनीची साडेसाती असेल आणि यावर उपाय काय? जाणून घेऊया.
या राशींवर असणार शनीची साडेसाती
मीन रास (Pisces)
या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. या काळात तुमच्याकडून काही अनावश्यक खर्च होऊ शकतात. या कालावधीत तुम्ही पैसे वाचवण्यात अपयशी व्हाल. मार्च ते जूनच्या काळात तुम्ही कोणतंही नवीन काम सुरू करणं टाळावं, अन्यथा नुकसान होऊ शकतं. शनीच्या उदय काळात तुम्हाला सावध राहावं लागेल.
कुंभ रास (Aquarius)
शनि उदयानंतर कुंभ राशीच्या मागे साडेसाती लागेल. कुंभ राशीच्या लोकांना शनीच्या उदयाचा खूप अशुभ परिणाम जाणवेल. तुमच्या खर्चात प्रचंड वाढ होऊ शकते. या काळात फालतू अनावश्यक खर्च टाळा आणि पैसे वाचवण्याचा विचार करा. नोकरी आणि व्यवसायात लोक तुमच्या विरोधात कट रचू शकतात. काळजीपूर्वक वाहन चालवा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या वादात पडणं टाळा आणि नातेवाईकांशी पैशाचे व्यवहार करू नका. यावेळी तुम्ही कोणत्याही मालमत्तेत पैसे गुंतवू नका, तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
मकर रास (Capricorn)
मकर राशीचा स्वामी हा शनि समजला जातो. त्यामुळे एकीकडे शनीच्या उदयामुळे तुम्हाला फायदाही होईल, पण त्याचा अशुभ प्रभाव वाढल्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना देखील सामोरं जावं लागेल. या काळात तुमच्या घरातील खर्चात प्रचंड वाढ होऊ शकते. पैशाच्या बाबतीत तुम्हाला अडचणी येऊ शकतात. मानसिक अस्वस्थता वाढेल आणि नोकरीच्या बाबतीत मनात एक प्रकारची भीती राहील. या काळात कुणाशीही पैशाचा व्यवहार करू नका.
शनीच्या साडेसातीपासून दूर राहण्यासाठी करा 'हे' उपाय
1. शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी दररोज हनुमान चालिसा पठण करा आणि शिवलिंगाचा जलाभिषेक करा.
2. रोज शनिदेवाशी संबंधित 108 मंत्रांचा जप करा. ‘ओम प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नमः’ आणि ‘ओम शं शनिश्चराय नमः’ या मंत्राचा जप करा.
3. दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनीची पूजा करा. शनि मूर्तीसमोर बसून शनि चालिसा पठण करा. शनि रक्षा स्त्रोताचं पठण करा.
4. दररोज भोलेनाथांची पूजा करा. दर सोमवारी शिवशंकराचा रुद्राभिषेक करावा. भगवान शंकराची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील समस्या देखील दूर होतील.
5. शनिवारी एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ, मोहरीचे तेल, घोंगडी आणि काही दक्षिणा दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :