Saturday Rules : शनिवारी केस-नखं कापण्यासोबतच 'ही' कामं केल्यास पडते शनीची वक्रदृष्टी; प्रत्येक कामात येतात अडथळे, संकटंही ओढावतात
Shaniwar Rules : शनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित आहे. शनि लवकर प्रसन्नही होतात आणि तितक्याच लवकर क्रोधित देखील होतात. त्यामुळे शनिवारी असं कोणतंही काम करू नये, ज्यामुळे शनिदेवाचा प्रकोप सहन करावा लागेल.
Saturday Rules : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला (Shani Dev) कर्मदाता आणि दंडाधिकारी म्हटलं गेलं आहे, कारण शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार त्याला फळ देतो आणि दंडही देतो. शनीच्या शुभ आशीर्वादामुळे व्यक्तीचं जीवन स्वर्गासारखं बनतं आणि त्याला सर्व सुख प्राप्ती होते.
पण काही कारणाने शनि कोपला तर व्यक्तीचं जीवन नरक बनतं, त्यात शनिवार हा शनिदेवाचा आवडता दिवस आहे. त्यामुळे या दिवशी असं कोणतंही काम करू नये, ज्यामुळे शनि नाराज होऊ शकतो. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या केल्या तर शनिदेवाचा कोप होतो? जाणून घेऊया.
शनिवारी 'या' गोष्टी अजिबात करू नका (Saturday Rules)
केस किंवा नखं कापू नका
शनिवारी केस, दाढी किंवा नखं कापू नयेत. असं केल्याने जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. या क्रियांमुळेही शनिदोष होतो.
लोखंडी गोष्टी खरेदी करू नका
लोहाचा संबंध शनि ग्रहाशी आहे. शनिवारी लोखंडाची कोणतीही वस्तू खरेदी करू नये, असं केल्याने घरात कलह निर्माण होतात आणि कौटुंबिक नात्यात तेढ निर्माण होते. चुकून जरी तुम्ही शनिवारी एखादी लोखंडी वस्तू खरेदी केली तरी ती घराबाहेर ठेवा आणि हवं तर दुसऱ्या दिवशी ती घरात आणा. शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करणं टाळा, अन्यथा तुम्हाला शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो.
मीठ खरेदी करू नका
शनिवारी मीठ खरेदी करू नये, असं केल्याने व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबून जातो आणि त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. शनिवारी मीठ खरेदी केल्याने शनिदोष देखील निर्माण होतो.
मांसाहार करू नका
शनिवारी मांसाहार करणं अत्यंत अशुभ मानलं जातं. या दिवशी जे मांसाहार करतात किंवा घरी मांस शिजवतात, त्यांना शनि शिक्षा देतो. यासोबतच शनिवारी दारूचं सेवन देखील करू नये.
पुरुषांनी सासरी जाऊ नये
ज्याप्रमाणे लग्नानंतर स्त्रीला माहेरी जाण्यासाठी शुभ आणि अशुभ काळ असतो, त्याचप्रमाणे पुरुषांना त्यांच्या सासरी जाण्याचे काही नियम आहेत. शनिवारी पुरुषांनी सासरी जाऊ नये, अशी मान्यता आहे, असं केल्याने सासरच्यांशी संबंध बिघडतात.
प्राण्यांना त्रास देऊ नका
शनिदेवाला प्राण्यांप्रती ओढ आहे, त्यामुळे शनिवारी प्राण्यांना त्रास देऊ नये, त्यांच्यावर अत्याचार करू नये. याशिवाय तुमच्यामुळे कोणाचंही मन दुखी होणार नाही, याची काळजी घ्या. तसेच या दिवशी कुत्रे, गाय, बकरी आणि पशु-पक्ष्यांना भाकरी खायला द्यावी, यामुळे शनिदेव प्रसन्न होतात, असं मानलं जातं. तसेच शनिवारच्या दिवशी कुणाशीही वाद घालू नये, भांडण, मारामारी करू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :