Nirjala Ekadashi 2024 : निर्जला एकादशीला जुळून आले अनेक शुभ योग; अचूक तारीख, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
Nirjala Ekadashi 2024 : वर्षातील सर्व 24 एकादशींपैकी निर्जला एकादशी ही सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते. यंदा निर्जला एकादशी व्रत 18 जूनला पाळण्यात येईल. हा दिवस कोणत्या शुभ योगांनी संपन्न झालाय? जाणून घ्या
Nirjala Ekadashi 2024 : सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशीचं (Nirjala Ekadashi 2024) व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं. ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं. यावेळी एकादशी 18 जूनला आली आहे. या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबीयांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि व्रताचा पूर्ण लाभ मिळतो.
शुभ फलप्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत पाळलं जातं, हे व्रत पाण्याविना पाळलं जातं आणि म्हणून सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं. पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती, म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हणतात. या व्रताची अचूक तारीख, पारण वेळ आणि या दिवशी कोणते शुभ योग तयार होत आहेत? जाणून घेऊया.
निर्जला एकादशीची तिथी आणि पारण वेळ (Nirjala Ekadashi 2024 Tithi)
ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी कधी सुरू होईल? : 17 जून रोजी पहाटे 4:43 वाजता
ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी कधी समाप्त होईल? : 18 जून रोजी सकाळी 7:28 वाजता
उपवास केव्हा पाळला जाईल? : 18 जून
निर्जला एकादशी व्रताची पारण वेळ : 19 जून रोजी सकाळी 5.24 ते 7.28 दरम्यान
यंदा निर्जला एकादशीला जुळून आले 'हे' शुभ योग (Nirjala Ekadashi 2024 Shubh Yog)
या वेळी निर्जला एकादशीला अनेक शुभ योग तयार झाले आहेत. स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्रात मिळून 3 शुभ योग तयार झाले आहेत. या शिवाय या दिवशी रात्री 9.39 पर्यंत दिवसभर शिवयोग राहील, त्यानंतर सिद्ध योग तयार होईल. सिद्ध योगाचं व्रत केल्याने तुमच्या घरात धनसंपत्ती वाढते, असं मानलं जातं. याशिवाय दुपारी 3:56 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5:24 पर्यंत त्रिपुष्कर योग तयार होईल. या शुभ योगांमध्ये निर्जला एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला भरपूर पुण्य प्राप्त होतं
निर्जला एकादशी व्रताचे महत्त्व (Nirjala Ekadashi Vrat Significance)
निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी नांदते. आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्यांसाठी निर्जला एकादशीचे व्रत अत्यंत शुभ मानलं जातं. एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते. भक्तांवर श्रीहरी-विष्णूंची कृपा कायम राहते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धन-संपत्तीत वाढ होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :