Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीचं व्रत 'पुण्यदायी'; जाणून घ्या या व्रताची संपूर्ण कथा
Jaya Ekadashi Vrat Katha : जया एकादशीला भगवान विष्णूंची विधीवत पूजा केली जाते. या दिवशी जया एकादशी व्रताची कथा वाचल्याने व्यक्तीला पुण्याची प्राप्ती होते.
Jaya Ekadashi : हिंदू धर्मात एकादशी (Ekadashi) तिथीला खूप महत्त्व आहे. एकादशीचा विशेष दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी पकडली जाते, जी व्यक्तीला पापांपासून मुक्ती देते. यंदा ही एकादशी 20 फेब्रुवारीला आली आहे. या दिवशी उपवास ठेवल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. शिवाय, या दिवशी जया एकादशी व्रताची कथा वाचल्याने शुभ फलप्राप्ती होते. जया एकादशीनिमित्त व्रताची पौराणिक कथा जाणून घेऊया.
जया एकादशी व्रताची कथा (Jaya Ekadashi Vrat Katha)
पौराणिक कथेनुसार, एकदा नंदन जंगलात उत्सव सुरू होता. सर्व देवी-देवता, संत आणि दिव्य पुरुष या उत्सवात सहभागी झाले होते. या उत्सवात गंधर्व गात होते आणि गंधर्व कन्या नाचत होत्या. सभामंडपात नृत्य करत असताना नृत्यांगना पुष्पावतीला माल्यवान नावाच्या गंधर्वाच्या गाण्याची भुरळ पडली. या तीव्र आकर्षणामुळे, ती सभामंडपाचं भान विसरली आणि माल्यवान तिच्याकडे आकर्षित होईल, अशा प्रकारचं नृत्य करू लागली. नृत्य पाहिल्यावर माल्यवानचंही भान हरपलं आणि तो मधेच गाण्याचे सूर-ताल विसरून गेला. त्या दोघांच्याही चुकांमुळे इंद्र देव संतापले आणि त्या दोघांना स्वर्गातून बाहेर काढून पृथ्वीवरील अत्यंत वाईट अशा पिशाच्च योनीत जाण्याचा शाप दिला.
शापाच्या परिणामामुळे हे दोघेही पिशाच्च योनीमध्ये जन्माला आले आणि हिमालयातील झाडावर राहू लागले, या वेळी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. या शिक्षेमुळे एकदा दोघे फारच दुःखी झाले, यामुळे त्यांनी केवळ फलाहार केला आणि त्या रात्री त्या दोघांचाही थंडीमुळे मृत्यू झाला. तो दिवस होता जया एकादशीचा. त्या दिवशी दोघांनाही जया एकादशीचा नकळत उपवास घडला आणि म्हणून त्यांना पिशाच्च योनीतून मुक्ती मिळाली.
नंतर ते पूर्वीपेक्षाही सुंदर बनले आणि पुन्हा एकदा त्यांना स्वर्गात जागा मिळाली. जेव्हा इंद्र देवांनी दोघांना तिथे पाहिलं, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्यांच्या मुक्तीबद्दल विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, हा भगवान विष्णूच्या जया एकादशीचा प्रभाव आहे. यावर इंद्र प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुम्ही विष्णूचे भक्त असल्याने मला तुम्हा दोघांबद्दल आदर आहे, म्हणून तुम्ही स्वर्गात आनंदाने वास्तव करू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Jaya Ekadashi 2024 : जया एकादशीला 4 शुभ योग; लक्ष्मी-नारायणाची राहील कृपा, करा 'हे' काम