Gudi Padwa 2024 : गुढी कशी उभारावी? गुढी पूजनात कोणतं साहित्य वापरावं? जाणून घ्या अचूक माहिती
Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, या दिवशी सर्व घरांवर गुढी उभारली जाते. पण गुढी नेमकी उभारायची कशी? गुढीची पूजा कशी करायची? जाणून घ्या
Gudi Padwa 2024 : उद्या गुढीपाडवा (Gudi Padwa 2024), अर्थात हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे, हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो. या दिवशी प्रत्येकाच्या घरावर गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात. आता ही गुढी नेमकी कशी उभारावी, कशी पुजावी आणि गुढी पूजनात कोणतं साहित्य वापरावं? याबाबत शास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊया.
गुढीपाडव्याला काय करावं?
गुढीपाडव्याच्या दिवशी कुटुंबातील सर्वांनी पहाटे उठून अंघोळ करावी. घरात झाडलोट करावी, केरकचरा काढावा. सकाळी दरवाजाबाहेर रांगोळी काढावी. दाराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. घरातील देव स्वच्छ करुन देवांची मनोभावे पूजा करावी आणि गुढी उभारायला घ्यावी.
गुढी कशी उभारावी?
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याला विशेष महत्त्वं आहे. उंच बांबूच्या काठीवर ही गुढी उभारली जाते. सहसा ती घराच्या छतापासून वर असेल अशीच बांधली जाते. अर्थात शहरी भागात हे अनेकदा शक्य नसल्यामुळे गुढीच्या उंचीपेक्षा ती उभारण्याला अधिक प्राधान्य दिलं जातं. गुढी पूजनात नेमकं कोणतं साहित्य लागतं? जाणून घेऊया.
गुढी पूजनासाठी लागणारं साहित्य:
एक उंच काठी
साडी किंवा ब्लाऊज पिस
साखरेच्या गाठी
कडूलिंबाची पानं
फुलांचा हार
तांब्याचा गडवा
आंब्याची डहाळी
अष्टगंध
हळद-कुंकू
पाट
गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी. यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस्र किंवा साडी गुंडाळली जाते. यावर मग, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधली जाते. या सर्व गोष्टी काठीला बांधून त्यांवर कलश तांब्या उपडा ठेवून तोसुद्धा घट्ट बसवावा.
सजवलेल्या काठीला अष्टगंध, हळद कुंकू वाहा. ज्यानंतर गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ करुन घ्या. खाली पाट ठेवा आणि त्याभोवती रांगोळी काढा. सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत पाटावर गुढी उभारा. तु्म्ही खिडकीला बांधून देखील गुढी उभारू शकता. आता गुढीसाठी आरतीचं ताट करुन ओवाळून घ्या. अशाच प्रकारे संध्याकाळी विधीवत पूजा करून गुढी उतरवा.
यंदा गुढी पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता? (Gudi Pujan Shubh Muhurta 2024)
यंदा गुढीपाडव्याचा सण हा 9 एप्रिलला (मंगळवारी) साजरा होणार आहे, त्यामुळे 9 तारखेला सकाळी 06:02 ते 10:17 मिनिटांपर्यंत गुढीपूजनाचा शुभ मुहूर्त आहे. तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून गुढी उभारू शकता.
हेही वाचा:
Gudi Padwa 2024 : गुढीपाडवा सण का साजरा करतात, कधी विचार केलाय? जाणून घ्या गुढीपाडव्याचं महत्त्व