Dasara 2022: दसरा का साजरा केला जातो? सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या
Dasara 2022: दसरा हा अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस मानला जातो. विजयादशमीला हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो.
Dasara 2022: 'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा..' हिंदू संस्कृतीत (Hindu Religion) खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा (Dasara 2022) हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आज 5 ऑक्टोबर या दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्याचा सण साजरा केला जात आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यालाच विजयादशमी देखील म्हटले जाते. या दिवशी रावण दहन आणि सरस्वती पूजन, शस्त्रपूजा केली जाते. याशिवाय या दिवशी दुर्गा देवी, प्रभू श्रीराम, श्री गणेश यांची देखील पूजा करण्याचीही परंपरा आहे. दसऱ्याला सीमोल्लंघन करण्याची आणखी एक प्रथा आहे. सीमोल्लंघन म्हणजे काय? काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या
अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस
धार्मिक मान्यतेनुसार, दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता. तसेच नऊ रात्री आणि दहा दिवसांच्या युद्धानंतर दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला होता. त्यामुळे दसरा हा अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्याचा दिवस मानला जातो. विजयादशमीला हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. तर उत्तर भारतामध्ये दसऱ्याला आणि विजया दशमीचा सणाला रामलीला सादर केली जाते. यामध्ये रावणाचा पुतळा उभारून त्याचे दहन केले जाते. या दहनामागे समाजातील आणि सर्वांच्या मनातील वाईट विचार, सवयी यांचा नाश व्हावा अशी अपेक्षा असते
सीमोल्लंघन म्हणजे काय?
पूर्वीच्या काळी योद्धे महत्त्वाच्या मोहिमेचा शुभारंभ दसऱ्याला करत होते. महत्त्वाच्या लढाईसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर निघण्याची प्रथा होती. याशिवाय अनेक व्यापारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर विदेशात जाऊन व्यापार करायचे. यामुळेच दसऱ्याला सीमोल्लंघनाचा दिवस म्हणून ओळखण्यास सुरुवात झाली. दसऱ्याच्या मुहूर्तावर शेतकरी नवं पीक घरात घेऊन येतात.
शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार या वर्षी अश्विन शुक्ल दशमी म्हणजेच 5 ऑक्टोबर 2022 रोजी दसरा साजरा होत आहे. 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी दशमी सुरू होईल. 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता दशमी तिथी संपेल. दसऱ्याचा विजय मुहूर्त दोन वाजून सात मिनिटांपासून ते दोन वाजून 54 मिनिटांपर्यंत असेल. तसेच दुपारचा शुभ मुहूर्त एक वाजून 20 मिनिटांपासून ते तीन वाजून 41 मिनिटांपर्यंत असेल.
रावण दहनाचा शुभ मुहूर्त
दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते आणि यासाठी शुभ मुहूर्त सूर्यास्तानंतर असतो. यावेळी रात्री साडेआठ वाजता रावण दहनाचा शुभ मुहूर्त आहे. आज श्रावण नक्षत्र 9.15 मिनिटांपर्यंत राहील.प्रदोष काळात श्रावण नक्षत्रात रावण दहन करणे शुभ मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या
- Name Astrology: 'O' अक्षराच्या नावाचे लोक असतात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित, सहजासहजी हार मानत नाहीत
- Astrology : आयुष्यात प्रगती आणि आनंद हवा असेल, तर रविवारी करा हे 6 सोपे उपाय