Pradosh Vrat : आज बुध प्रदोष व्रत! 'या' शुभ मुहूर्तावर करा शंकराची पूजा; सुटतील सर्व समस्या
Pradosh Vrat : आज बुधवार, 21 फेब्रुवारी रोजी प्रदोष व्रत आहे. बुधवारी हे व्रत येत असल्याने याला बुध प्रदोष व्रत म्हणतात. प्रदोष व्रतात भगवान शंकराची विधीवत पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो.
Pradosh Vrat 2024 : माघ मासातील प्रदोष व्रताला (Pradosh Vrat) विशेष महत्त्व आहे. माघ शुक्ल पक्षातील त्रयोदशीला येणारं प्रदोष व्रत हे माघ महिन्यातील शेवटचं प्रदोष व्रत असेल, त्यानंतर फाल्गुन महिन्यातील प्रदोष व्रत येईल. बुध प्रदोष व्रत आयुष्मान आणि सौभाग्य योगात आलं आहे. याशिवाय त्या दिवशी पुनर्वसु आणि पुष्य नक्षत्राचाही शुभ संयोग होत आहे. बुध प्रदोष व्रताच्या दिवशी तयार झालेले दोन्ही योग शुभ आहेत आणि नक्षत्रही चांगले आहेत. यामध्ये पूजा-प्रार्थना केल्यानं मनोकामना पूर्ण होतात.
आजच्या दिवशी अनेक शुभ योगांचा आणि शुभ नक्षत्रांचा संयोग होत असल्याने आजचा दिवस अधिक विशेष बनला आहे. फलप्राप्तीसाठी हा प्रदोष व्रत नक्की किती वाजता सुरू होणार आणि कधी संपणार हे जाणून घेऊया.
प्रदोष व्रत कधी आहे?
वैदिक पंचांगानुसार, माघ शुक्ल त्रयोदशी तिथी बुधवार, 21 फेब्रुवारीला सकाळी 11.27 पासून सुरू होत आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी 22 फेब्रुवारीला दुपारी 01:21 वाजता प्रदोष व्रताचा तिथी समाप्त होईल.
प्रदोष व्रत 2024 शुभ मुहूर्त
बुध प्रदोष व्रत करणाऱ्यांना 21 फेब्रुवारीला शिवपूजेसाठी अडीच तासांपेक्षा जास्त वेळ मिळेल. माघ महिन्याच्या बुध प्रदोष व्रताची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 06:15 ते 08:47 पर्यंत आहे. त्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 05:13 ते 06:04 पर्यंत असतो.
प्रदोष व्रताचे महत्त्व
प्रदोष व्रतात महादेवाची पूजा-आराधना केल्यानं मनुष्याची सर्व संकटं नाहीशी होतात आणि रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान भोलेनाथांच्या कृपेने मनोकामना पूर्ण होतात. प्रदोष व्रत केल्यानं व्यक्तीला धन, ऐश्वर्य, सुख, सौभाग्य, समृद्धी, आरोग्य, संतान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
प्रदोष व्रतात शिवलिंग पूजेचे महत्त्व
शास्त्रानुसार, या दिवशी ब्रह्मा बेताल, देव, गंधर्व असे सर्व दिव्य जीव त्यांच्या सूक्ष्म रूपात शिवलिंगात लीन होतात. त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात केवळ शिवलिंगाचं दर्शन घेतल्याने सर्व जन्मांची पापं नष्ट होतात. तसेच त्रयोदशी तिथीला प्रदोष काळात बेलाची पानं अर्पण करून दिवा लावल्याने मोठे पुण्य प्राप्त होते. या व्रताचं महत्त्व यापूर्वी भगवान शंकरांनी सती माता यांना सांगितलं होते. कलियुगात फक्त प्रदोष व्रत आहे, जे माणसाचे रोग, दोष आणि दुःख नष्ट करून सुख प्रदान करते, असं शास्त्रात सांगितलं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Pradosh Vrat : प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'या' गोष्टी; अन्यथा वाढतील समस्या
Shani 2024 : जूनमध्ये होणार शनीचं मोठं परिवर्तन; पालटणार 'या' 3 राशींचं नशीब, होणार धनलाभ