Amalaki Ekadashi 2024 : आज आमलकी एकादशी; जाणून घ्या अचूक मुहूर्त आणि पूजा पद्धत
Amalaki Ekadashi 2024 Date : प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात, कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, ही एकादशी विष्णू देवाला समर्पित आहे. तरी आमलकी एकादशी शंकर आणि पार्वती पूजनाला देखील समर्पित आहे.
Amalaki Ekadashi : फाल्गुन शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी (Amalaki Ekadashi) असं म्हणतात. यंदा 20 मार्च रोजी आमलकी एकादशी आहे. पुराणांमध्ये या आमलकी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी (Ekadashi) येत असल्यामुळे याला रंगभरनी एकादशी असंही म्हणतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा देखील केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, जे आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाही, त्यांनी आवळ्याचं सेवन केलं पाहिजे. तसेच या एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने लाभ होतो, अशी मान्यता आहे. आमलकी एकादशीचा अचूक मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.
आमलकी एकादशी मुहूर्त
पंचांगानुसार, आमलकी एकादशी 19 मार्च 2024 रोजी मध्यरात्री 12 वाजून 21 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 20 मार्च रोजी मध्यरात्री 2 वाजून 23 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 20 मार्चला आमलकी एकादशीचं व्रत केलं जाईल.
आमलकी एकादशी व्रत कसा करावा?
आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी उठून व्रताचा संकल्प करावा. दिवसभरात फक्त फलाहार करावा. चौरंगावर विष्णू देवाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. यानंतर विष्णू देवाची पूजा करा, विष्णू सहस्रनामाचं पठण करावे, देवाला नैवेद्य दाखवा. हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त होत नाही, तर द्वादशीला अन्नदान करून व्रताची समाप्ती करावी.
आमलकी एकादशीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन दूध किंवा जलाभिषेक करावा. महादेवाला बेलपत्र अर्पण करा. शंकराच्या पिंडीची पूजा करा आणि शंकर-पार्वतीकडे सुख-शांतिची प्रार्थना करा.
असं आहे धार्मिक महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शंकर आणि पार्वतीने महाशिवरात्रीच्या दिवशी विवाह केला आणि आमलकी एकादशीच्या दिवशी विवाह झाल्यानंतर ते प्रथम काशीला गेले. तेव्हापासून फाल्गुन शुद्ध एकादशी रंगभरनी एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी संपूर्ण काशी गुलालमय होऊन जाते. या दिवशी विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. या दिवशी भगवान विष्णू, शंकर-पार्वती, लक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धी, सौभाग्य लाभतं.
आवळ्याच्या झाडाचं पूजन
आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाचं पूजन केलं जातं. पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णूंनी आवळ्याच्या झाडाची निर्मिती केल्याचं सांगितलं जातं, त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाचं पूजन करण्यास सांगितलं जातं. आवळ्याच्या झाडाजवळचा परिसर स्वच्छ करून घ्यावा आणि या झाडाखाली कलशाची स्थापना करावी. भगवान विष्णूचं नामस्मरण करून पूजन करावं. कलशाला धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. तसेच आवळ्याचं सेवन करावं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Holi 2024 : होळीच्या दिवशी सकाळी करा 'ही' एकच गोष्ट; वर्षभर खिशात राहील पैसाच पैसा